Monday, September 24, 2012

आपण गणपतीला दुर्वा का वाहतो?


आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तरगणपतीला प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही. इंटरनेट वर बसून दुर्वाचे महत्व शोधू लागलो. सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.

काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन .
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी: अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]

हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर. दुर्वा प्रजाजनांना समृद्ध करते. कश्यारीतीने करते याचा विचार केला. दुर्वेचे अनेक उपयोग आहेत:

औषधीय उपयोग

दुर्व धातूचा अर्थच नष्ट करणे आहे. दुर्वा त्रिदोष नाशक आहे. वात कफ पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे औषधीय गुण माहिती होते.

दुर्वेचे पर्यावरणातील महत्व:
 
दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवते, पर्वतांना आणि नद्यांच्या किनार्याना ढासळू देत नाही. पाण्याला स्वछ आणि निर्मळ करते. हिरवी गार कुरणे डोळ्यांना शीतलता प्रदान करतातच शिवाय सूर्यप्रकाशात प्राणवायू ही उत्सर्जित करतात. अर्थातच पर्यावरण दृष्टीने दुर्वेचे महत्व आहे.

आर्थिक कारण:

गणपती अर्थात गणाचा अध्यक्ष अर्थात राजा. वैदिक काळात गायी, घोडे, शेळ्या हे मानवाच्या उपयोगी येणारे पशु. बैल-शेतीला, गाय-दुध, दही आणि तुपाला, घोडे प्रवासाला, युद्धाला इत्यादी.  शेळी, मेंढ्या इत्यादी जनावरांचे पालन मांस आणि वस्त्रांसाठी (त्या काळी अधिकांश लोक पशुंचे चर्मचा वापर वस्त्र म्हणून करायचे). या सर्वांसाठी लागणार हिरवीगार दुर्वा. अर्थात राज्यात दुर्वेनी भरपूर कुरण असतील तर पशु पुष्ट होतील आणी प्रजाजन समृद्ध होतील. शिवाय वाळलेल्या दुर्वेचे अन्य उपयोग- बसण्यासाठी आसन, इत्यादी.

मानवाची अमर होण्याची इच्छा:

मृत्युची भीती सर्वांनाच वाटते. अमर होण्याची इच्छा मनुष्य प्राणीत सुरवाती पासूनच आहे. आपल्या पुत्र आणि पौत्रांच्या माध्यमातून तो अमर राहण्याच्या प्रयत्न करतो. उन्हाळ्यात वाळलेले माळ- रान पाऊस पडताच क्षणात हिरवगार होते. शेंकडो वर्ष सुप्तावस्थेत राहूनही दुर्वांकुर पाऊस पडताच जमिनीतून बाहेर निघतात. जीवनाचा आनंद चाहुबाजूना पसरवतात. माणसाच्या मनात ही आपल्या संततीच्या माध्यमातून अमर राहण्याची इच्छा आहे. दुर्वा गणपतीला अर्पित करून आपण दुर्वेप्रमाणेच अमरतेच वरदान मागतो.

प्रश्न येतो दुर्वा गणपतीलाच का वाहतो?

राज्यात दुर्वेची भरपूर कुरण राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळच संपूर्ण जीवन चक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. आता ही आहेच. भाद्रपदात राना-वनात सर्वत्र हिरवीगार दुर्वा आपल्याला दिसून येते. पण पुढच्या पावसाळ्या पर्यंत ही दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे. गणाध्यक्ष अर्थात गण प्रमुखाने शत्रुं पासून या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जसे आपण सव्वा रुपया देवावर वाहून लाखांची कामना करतोच. तसेच प्रजाजनां आरोग्य पौष्टिक अन्न प्रदान करणारी दुर्वा सुरक्षित राहावी म्हणून उत्पन्नाचा सहावा हिस्सा गोपालक आणि शेतकरी गणाध्यक्ष अर्थात राजाला अर्पित करायचे. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.

दुर्वेचे रक्षण करणे का आवश्यक आहे?

आज ही आपल्या देशात अधिकांश शेतकरी शेती साठी बैलांचा वापर करतात. शंभर कोटींच्या वर असलेल्या देशाला दुध, दही आणि तूप गायी म्हशीं पासूनच मिळते. शेळ्या- मेंढ्या मांस साठी पाळल्या जातात. हे सर्व पशु गवत अर्थातदुर्वाखाऊनच पुष्ट होतात. सरकार ही शेळ्या-मेंढ्यांच्या पालानाला प्रोत्साहन देत आहे. कुरणांच्या अनियंत्रित वापरा मुळे आज ही कुरणे नष्ट होतात आहे. आणि आज सर्वत्र उजाड रान-माळ दिसतात. याच सरकारी धोरणामुळे गावातील सार्वजनिककुरणेनष्ट होण्याच्या मार्गावर आहेतच. शहरात ही बघतो दरवर्षी नगर निगम पावसाळ्यात बागांमध्ये गवत लावते आणि पोर दिवाळीच्या सुट्ट्यात क्रिकेट खेळून ते नष्ट करतात. परिणाम, पर्वत पावसाळ्यात ढासळतात,  नद्या किनार्याना तोडतात, सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते, पृथ्वीवर उष्णता वाढण्याच्या मागचेहिरवी दुर्वा युक्त कुरणाचा ह्रास हे ही मुख्य कारण आहे.

आज गणपती सारखा राजा नाही आहे. देशात लोकशाही आहे. त्या मुळे दुर्वा युक्त कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी ही आपलीच आहे. या वर्षी गणपतीवर दुर्वा वाहताना या कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी आपलीच आहे हे आपण ओळखलत तर हीच खरी गणपतीची पूजा होईल.


Saturday, September 15, 2012

एफ डी आई सुंदरी


निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची 
३६-२४-३६ फिगर वाली, 
स्वर्गातली अप्सरा  
एफ डी आई. 

घेउनी कवेत त्याला 

म्हणाली ती कशी.
स्वर्गातील अमुल्य डालर, 
वाहिन तुझ्या चरणी.
पित्जा-बर्गर डॉमिनो, 
अमृताहुनी गोड 
कोक पेप्सी स्वर्गातली
 आणिली मी तुझ्यासाठीच.
सुंदर शोभेल माझा राजा 
घालुनी परिधान वालमार्टी.

फक्त सोपव कि मला 
तुझे मेहनती हात-पाय  
तत्क्षणी   सोपविले त्याने 
आपले हातपाय मेहनती.
डोळे बंद करुनी बघू लागला 
स्वप्ने स्वर्ग सुखांची.

अचानक राक्षसी अट्टाहास 
आसमंतात गुंजला
नव्हती समोर अप्सरा, 
विळखा होता  राक्षसी.

ओरडला, चीत्कारला, 

पण उपयोग नव्हता.
त्याचे रक्त प्राशन करूनी, 
शोधात नव्या  सावजाच्या 
पुढे निघून  गेली 
एफ डी आई राक्षसी 

मित्रानो,  दिसली कधी तुम्हास्नी 
निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची
३६-२४-३६ फिगर वाली, 
एफ डी आई  अप्सरा.
फसू नका तिच्या जाळ्यात,
  गमवू नका हात पायांना
सदा सावधान राहा, सावधान राहा.

Sunday, September 9, 2012

आरोग्य दलिया


दलिया नाव घेतल्या बरोबर गव्हाचा दलिया आपल्या डोळ्यांसमोर येतो. सहा-सात महिन्यांपूर्वी सहज कतुहल म्हणून पतंजलीतून आरोग्य दलिया आणला होता. या दलिया मध्ये गहू, मुगाची डाळ (साली सकट), सम प्रमाणात बाजरी आणि तांदूळ.

साहित्यआरोग्य दलिया २ वाटी, जिरे १/२ चमचे, काळी मिरी १/२ चमचे किंवा १ हिरवी मिरची,तूप (शुद्ध) किंवा तेल १ किंवा २ चमचे, मीठ आवडीनुसार, टमाटर दोन (१०० ग्राम), पाणी ८ वाटी

वैकल्पित साहित्य: कोथिंबीर आणि *भाज्या

कृती : गॅस वर कुकर ठेवावे. १ चमचा तूप घालावे, तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व काळी मिरी घालावी. नंतर दलिया घालून एक ते दोन मिनिटे तुपावर परतवावा. नंतर पाणी, टमाटर व आवडीनुसार मीठ त्यात घालावे. दोन सीट्या झाल्यावर गॅस बंद करावा. दलिया जर जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात पाणी घालून पुन्हा एक ते दोन मिनिटे उकळी द्यावी.

टीप: आवडत असेल तर दुधी भोपळा, लाल भोपळा, खीरा, गाजर , तोरी, शिमला मिरची, बंद गोबी, सर्व प्रकारच्या शेंगा यात घालता येतात (दलिया चमच्यांनी खातात म्हणून या भाज्या बारीक चिरून घातल्या पाहिजे). (अर्धा किलो दलियाची किमत ३० रू आहे अर्थात स्वस्त आणि पोष्टिक ही)हा दलिया सर्वाना निश्चितच आवडेल ही अपेक्षा.

Wednesday, August 22, 2012

ईशान्य उपनिषद – जगण्याचा मार्ग.

ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते.
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.

(शांतीपाठ)

ईशा वास्यमिद्ँसर्व यत् किंच जागत्यां जगत.
तेन त्यक्तेन भुन्चीथा मा गृध: कस्य स्विद् धनम्.

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छत्ँसमाः.
एवं त्वयि नान्यथेतोऽस्तिण कर्म लिप्यते नरे.

[ईशोपानिषद (मंत्र १ & २)]

शान उपनिषद शांतीपाठा पासून सुरु होतो. ऋषी म्हणतात पूर्णातून पूर्ण निघत गेले तरी ही पूर्णच शेष राहिले. ईशान उपनिषदात पहिल्या मंत्रात ऋषी म्हणतात ‘त्याग सहित उपभोग’ करा. दुसऱ्याचा वाट्यावर हक्क सांगू नका. परमेश्वराने, प्रत्येकासाठी वेगळा वाट ठेवला आहे, आपल्या वाट्याचा उपभोग करीत प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. दुसऱ्या मंत्रात ऋषी म्हणतात अशा रीतीने शंभर वर्ष जगण्याची इच्छा केली तरी ही कर्म बंधन मानवाला बांधू शकत नाही.

उपनिषदकार ऋषींना “मंत्रदृष्टा” का म्हणतात हे ईशान उपनिषद वाचल्या वर कळते. भूत, वर्तमान आणि भविष्य पाहण्याची क्षमता त्यांचात होती. ब्रह्मा द्वारा निर्मित पृथ्वी समस्त जीव व जाती ही कधी तरी नष्ट होणारच हे सत्य असले, तरी भगवंताने मानवाला दिलेले आयुष्य त्याने जगले पाहिजे आणि त्या साठी मंत्रदृष्टा ऋषीने या मंत्रांद्वारे आपल्याला मार्ग दाखविला आहे.

पृथ्वीवरील आजचे वातावरण मानव आणि आज अस्तित्वात असेलेल्या समस्त प्राणीमात्रांसाठी अनुकूल असे आहे. अर्थात वातावरणातील हवा (गॅस),पाणी आणि माती यांचे संतुलन. जो पर्यंत हे वातावरण अनुकूल राहील मानवाचे अस्तित्व पृथ्वीवर टिकून राहील. पण माणूस बुद्धिमान आणि स्वत:ला भगवंताहून अधिक श्रेष्ठ समजतो. आपल्या स्वार्थासाठी वातावरणात बदल करण्याची क्षमता मानवाने आज मिळवली आहे. इतकेच नव्हे तर आपल्या स्वार्थासाठी इतर प्राण्यांना नामशेष करण्याचा हट्टच जणू माणसाने धरला आहे. स्वर्थापायी आंधळ्या झालेल्या मानवाला हे कस समजत नाही पृथ्वीवरील इतर जीवन नष्ट झाले तर मानवजाती ही नष्ट होईल. आपल्याच कर्माचे परिणाम मानवाला भोगावे लागेल. मग या जगात माणसाने आपले आयुष्य कसे जगावे जेणे करून मानवजाती आपले अस्तित्व पृथ्वी वर टिकवू शकेल अर्थात आपली शंभर वर्ष जगण्याची इच्छा पूर्ण करू शकेल याचे मार्ग दर्शन ऋषीने केले आहे.

‘रोटी कपडा आणि मकान’ आपल्या तीन मूलभूत गरजा आहे. या साठी आपण काही वस्तूंची ‘निर्मिती’ करतो आणि काहींचा ‘उपभोग’ करतो.

ऋषी “उत्पादन” या शब्दाचा अर्थ सांगतात, “पृथ्वीवरील वातावरणातल्या संतुलनात कुठलाही बदल न करता जी निर्मिती होते तिलाच आपण “उत्पादन’ हे म्हणू शकतो”. याच उत्पादित पदार्थांचा आपण उपभोग करतो. पण इथे प्रश्न उठतो कुठलीही वस्तूची निर्मिती वातावरण संतुलनात बदल केल्या शिवाय कसे शक्य आहे. ऋषी याच प्रश्नाचे उत्तर देतात जे काही आपण उपभोग करतो “त्याचा त्याग करा”.

उदाहरणार्थ: झाड-झुडपी ही जमिनीतून भोज्य पदार्थ व पाणी इत्यादी घेतात बदल्यात पिकलेली पाने परत जमिनीला परत करतात. वातावरणात प्राणवायू निर्माण करतात. पाणी जमिनीत साठवण्यास मदत करतात. जनावरे चारा खातात आणि विष्टा परत करतात. अशारीतीने वातावरणातले संतुलन कायम राहते. पण माणसाच्या गरजा मोठ्या आहे. उदाहरणार्थ जाळण्यासाठी, फर्निचर व घरांसाठी आपण लाकूड वापरतो पण तेवढेच झाडे लावून त्यांची पूर्ती करतो का? पृथ्वीच्या गर्भातून कोळसा व पेट्रोलियम पदार्थ काढून ‘दूषित वायू’ वातावरणात उधळतो या मुळे हवेतील प्राणवायू कमी होत चालली आहे. या मुळे वातावरणातले संतुलन बिघडत चालले आहे. ही ‘दूषित वायू’ परत पृथ्वीच्या गर्भात टाकण्यासाठी आपण काय करीत आहोत.  जर आपल्याला हे करणे शक्य नाही तर या पदार्थांचा वापर कशाला?

आपल्या स्वार्था साठी आपण दुसऱ्यांचा जगण्याचा हक्क आपण काढून घेत आहोत. कळत, असूनही पृथ्वीवरचे वातावरण दूषित करीत आहोत. अधिक काळ जर माणसाची अशीच प्रवृत्ती राहील तर मानवाला आपल्या कर्माचे परिणाम भोगावे लागतील व मानवजाती ही नष्ट होईल.

सारांश: जे काही आपण वातावरणातून घेतो ते आपल्याला परत करता आल पाहिजे. अन्यथा त्या पदार्थांचा उपभोग करण्याचा मोह टाळावा. ज्या पदार्थांना मानवाला परत करणे शक्य आहे त्यांचाच उपभोग घ्यावा अर्थात त्याग सहित भोग म्हणजे “सर्वोत्तम उपभोग”. अशा रीतीने जगल्यास आपण निश्चित शंभरी गाठू शकू.

Sunday, August 19, 2012

 


सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.

अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.  

विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते.  अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण  दोघ मिळून   राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू. 

राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.  

तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही.  बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही.  आपण मूर्ख बनलो,  हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.

सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.


साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति. 

 

आजचा कवी



कोळया सारखे जाळे विणुनी
करितो शब्दांची फेकाफेकी.

गाफिल श्रोत्यांना त्यात बुडवुनी
घेतो दाद मनाजोगति.

कधी सांगतो सिने नट्यांच्या
लफड्यांची स्टोरी.

कधी रंगवितो वासनामयी.
रंगील्या राती.

कधी चालवितो व्यंगास्त्रांचे बाण
राजनेत्यांवर्ती.

कधी उडवितो रक्तांकित
वीरश्रीची गाणी.

उजवी डावी वेडी वाकडी
नुसती शब्दांची खेळी.

लक्ष्य त्याचे सदैव असते
कोठी, गाडी आणि बिदागी. 

Tuesday, August 14, 2012

ब्लू लाईन कथा – फिरुनी नवी जन्मेन मी



(पूर्वी ब्लू लाईन चे नाव “रेड लाईन” असे होते. प्रशासकांना वाटले बहुतेक या नावामुळेच रस्त्यावर रक्त सांडले जाते. त्यांनी नाव बदलून ब्लू लाईन असे केले. ही गोष्ट वेगळी यमराजाच्या दरबारातली लाईन तरी ही कमी झाली नाही)

“चौधरी” –डीटीसी कर्मचाऱ्याचे टोपण नाव

ब्लू लाईन कथा – फिरुनी नवी जन्मेन मी

सन १९८८,  दिल्लीत डीटीसीच्या जवळ पास ३००० बसेस आणि तेवढ्याच बसेस निजी मालकीच्या होत्या.  बस आणि चालक निजी मालकाची व  कंडक्टर  डीटीसीचा असायचा.  बस मालकाला किलोमीटरच्या हिशोबाने मोबदला मिळायचा. सर्व बसेस मधे मासिक, त्रेमासिक पास चालायचे.  सर्वकाही सुरळीत सुरु होते.

अचानक एके दिवशी डीटीसीत हडताल सुरु झाली.  “चौधरी” डीटीसीच्या हरी नगर डेपोत कार्यरत होता. ही हडताल आपल्या भल्या साठी आहे, हे समजून अन्य कामगारांसमवेत तो ही यात शामिल झाला. हडताल अचानक संपली. हडताली नेता अदृश्य झाले. चौधरी सहित मोठयाप्रमाणावर चालक, कंडक्टर व अन्य तकनीकी कर्मचार्यांना नौकरी वरून कमी करण्यात आले.

मी ऑफिसला जाण्या साठी. नेहमीप्रमाणे बस स्थानकावर पोहचलो. बसचा मालक ही जातीने बस स्थानकावर उभा होता. त्याचा चेहरा आनंदी दिसत होता. मला पाहताच म्हणाला “पट्टेत साहब आजसे आपका पास नाही चलेगा, टिकट खरीदना पडेगा”. किलोमीटर स्कीम बंद झाली होती. बस मालकाने त्या साठी किमत मोजली होती आणि आता ऑफिसला जाण्या साठी मला ही जास्त पैसे मोजावे लागणार होते. ही हडताल बस माफिया व  भ्रष्ट राजनेत्यांनी घडवून आणली होती. त्यात आहुती पडली ‘चौधरी” सारख्या कर्मचाऱ्यांची. परिणाम भोगावे लागणार होते दिल्लीच्या जनतेला. डीटीसी कडे दुर्लक्ष करण्यात आले.  डीटीसीच्या बसेस कमी झाल्या. डीटीसीचे पास अर्थहीन झाले. 

ब्लू लाईन वाल्यांची मौज सुरु झाली. सवारी घेण्यासाठी बसेस एक-एक स्टाप वर ५-५ मिनटे थांबू लागल्या आणि मुख्य रस्त्यांवर आल्यावर सवारी घेण्यासाठी त्यांचात रेस लागू लागली. परिणाम रास्त्यांवर “रक्त सांडणे”  ही रोजची बाब झाली होती. शिवाय सकाळी आणि रात्री ९ नंतर बस मिळणे नामुष्कील झाले होते.

ब्लू लाईनचा अंत: १९९३, दिल्लीला विधान सभेचे पहिली निवडणूक झाली. श्री मदन लाल खुराना दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. डीटीसी दिल्ली सरकारच्या अंतर्गत आली.  श्री राजेंद्र गुप्ता, परिवहन मंत्री झाले.  सर्वप्रथम त्यांनी ब्लू लाईन बंद केली.  किलोमीटर स्कीम पुन्हा सुरु केली. कर्मचार्यांना पुन्हा कामावर घेण्यात आले.  डीटीसीच्या बसेस दुरुस्त करण्यात आल्या.  नवीन बसेस ही घेण्यात आल्या. अस वाटल की ब्लू लाईन नेहमी साठी बंद झाली.  पण तसे होणे नव्हते.

ब्लू लाईनचे पुनरागम:  श्री मदन लाल खुरानांची लोकप्रियता पक्षश्रेष्ठींच्या नाकात खुपू लागली. त्यांचा जागी श्री साहिब सिंग वर्मा हे मुख्यमंत्री झाले.  त्यांनी ग्रामीण भागाच्या लोकांच्या सुविधेसाठी (?)  काही प्रमाणावर ब्लू लाईन पुन्हा सुरु केली.  १९९८ च्या निवडणक जवळ आली. त्यावेळी श्रीमती सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. कांदा महाग झाला होता.  त्या वेळी नॉर्थ ब्लाकच्या बसस्टाप वर डीटीसीचे पास बनविले जात. मी पास बनविण्याच्या लाईनीत उभा होतो . तिथे “चौधरी” सर्वाना ओरडून सांगत होता. थोडे दिवस कांदे महाग खाल्ले तरी काही फरक पडत नाही पण सरकार बदलली तर पुन्हा ब्लू लाईन पुन्हा सुरु होईल. पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.  राजेंद्र गुप्ता मोठ्या अंतराने निवडणूक हरले. (ब्लू लाईन माफियाची कृपा). श्रीमती शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री झाला.  किलोमीटर स्कीम पुन्हा बंद केली. ब्लू लाईनचा पुनर्जन्म झाला. पुन्हा डीटीसीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्त्यावर डीटीसीच्या बसेस कमी होई लागल्या. जास्त कर्मचारी व कमी बसेस परिणामी डीटीसीचा तोटा ही भयंकर रीतीने वाढू लागला.  तेंव्हा पासून     मी ऑफिसला चार्टर बस मधून जाण-येण करतो आहे. दुसरी कडे स्कूटर, मोटारसायकल, कर इत्यादी वाहनांची संख्या वाढू लागली. प्राईवेट नौकरी साठी वाहन चालविता येण एक अतिरिक्त ‘योग्यता” झाली.

ब्लू लाईनचा पुन्हा अंत: न्यायालयाने ब्लू लाईन बंद करण्याचे आदेश दिले.  शिवाय कॉमनवेल्थ खेळ ही दिल्लीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.   खेळाडूंसाठी बसेसची आवश्यकता होती. ईज्जत-अब्रूचा प्रश्नही होताच.  ३००० च्या जवळपास नवीन बसेस  विकत घेण्यात आल्या आणि  २५०० जवळपास जुन्या बसेसला पुन्हा रस्त्यावर दुरुस्त करून आणण्यात आले.  डीटीसी पुन्हा जोमाने सुरु झाली. दोन करोडच्या वर एन सी आर च्या साठी या बसेस अत्यंत अपुऱ्या होत्या. 

ब्लू लाईनचा नवा जन्म: ब्लू लाईन पासून सुटका मिळणे दिल्लीकरांच्या नशिबी नव्हते.  रूप बदलून ब्लू लाईन पुन्हा परतली  (अ) “ग्रामीण सेवा” या सेवेचा ग्रामीण भागाशी काही ही संबंध नाही.  विक्रम स्कूटर (खर तर यात ३ आणि ३ असे ६ प्रवाश्यांसाठी बसण्याची व्यवस्था असते. पण मागचा भाग खुला करून तिथे एक फळी टाकून १२ प्रवासी + २ चालकाच्या शेजारी असे १४ किंवा १५ प्रवासी  विक्रमस्कूटर मध्ये बसतात.  ही सेवा चालली पाहिजे म्हणून पुष्कळ मार्गांवर डीटीसी सेवा ही अस्तित्वात नाही आहे. उदाहरण उत्तम नगर पासून –हरी नगर घंटाघर (तिथे एक मोठे सरकारी होस्पिटल आहे- सुमारे ६ किलोमीटर)  ला जायचे असेल तर या ग्रामीण सेवेतच बसावे लागेल. अर्थात ‘जान जोखीम’ मधे राहीलच. (ब) शिवाय मेट्रो स्टेशन पासून १० सिटर अशा मिनी बसेस मेट्रो बनल्या पासून सुरु झाल्या होत्या. या वर्षी त्या मोठ्या होऊन २० सिटर झाल्या. कश्या हे कळण्याचा मार्ग नाही.  या दोन्ही सेवा रस्त्याच्या मध्ये गाड्या उभ्या करून सवार्या घेतात, ट्राफिक जाम करतात आणि पूर्वीच्या ब्लू लाईन प्रमाणे रास्त्यांवर रेस ही लावतात.  शिवाय ‘क्लस्टर बसेस” या नावाने काही मार्गांवर किलोमीटर पद्धतीने नवी स्कीम ही सुरु गेली आहे. भविष्यात ही स्कीम पुन्हा ब्लू-लाईन मधे परिवर्तीत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.  असो, जो पर्यंत दिल्लीत ब्लू लाईन माफियाची ‘चलती’  आहे तो पर्यंत  दिल्लीकरांना ब्लू लाईन पासून मुक्ती मिळणे शक्य नाही.

Friday, August 3, 2012

दिल्लीचा पावसाळा


काळे कुट्ट मेघ 
आकाशी दाटले
विजेच्या कडाक्यात केल्या
त्यांनी पावसाळी घोषणा.

तेंव्हा त्यांचा चेहरा मला
नेत्यानं सारखा भासला


दोन-चार थेंबच
अंगावर सांडले
पावसात भिजण्याची
हौस मनी राहिली.

दिल्लीचा पावसाळा हा
असाच असतो.
भर श्रावणात हा
मृगजळ दाखवितो.  

Saturday, July 28, 2012

वाहतो रिश्वत जुडी



सदोबा हा सामान्य माणूस, कधीही कुणाला त्रास न देणारा. रहस्य, रोमांच विरहित- एका रेषेत चालणारा सरळ-सोप आयुष्य. वडील गेल्यावर संसाराचा गाडा त्याचा खांद्यावर आला. वडिलांच्या मृत्यु प्रमाण पत्रासाठी सदोबाला पहिल्यांदा रिश्वत जुडी अर्पण करावी लागली. हळूहळू सदोबाला कळले प्रत्येक कार्यासाठी रिश्वत ही द्यावीच लागते. मग डोक्याला ताप कशाला. सदोबा कसलीही चिडचिड व कटकट न करता रिश्वत जुडी आनंदाने वाहायचे. रिश्वत जुडी मुळे सदोबांची सर्व कामे त्वरित पूर्ण व्हायची. सदोबांचे ठाम मत झाले. “रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले.

त्यांची बायको प्रसूत झाली, प्रसूतिगृहातून रडण्याचा आवाज ऐकू आला. दाई बाहेर आली- आनंदाने घोषणा केली, साहेब मुलगा झाला आहे. सदोबानी शंभराची एक नोट तिच्या हातात ठेवली आणि मुलाला पाह्यला आत गेले. हॉस्पिटल मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याच क्षणापासून पोरासाठी त्यांनी रिश्वत देवीची आराधना सुरु झाली. मुलाच जन्म प्रमाण पत्र असो किंवा राशन कार्ड मध्ये नावाची नोंदणी सदोबानी आनंदानी रिश्वतजुडी रिश्वत देवीला अर्पण केली. डोनेशनरुपी रिश्वतजुडी अर्पणकरून मुलाला चांगल्या शाळेत आणि नंतर चांगल्या कालेजात प्रवेश मिळवून दिला. वेळ प्रसंगी स्वत:च्या सर्व इच्छा मारून व कर्ज घेऊन सुद्धा सदोबानी रिश्वत देवीला प्रसन्न केले. शेवटी वर्षभराच्या पगारा इतकी रिश्वत जुडी वाहून आपल्या मुलाला नौकरीत रुजू केले.

सदोबा प्रामाणिक होते तसे पक्के हिशोबी ही होते. मुलाचे लग्न करताना आतापर्यंत वाहलेल्या रिश्वत जुड्यांचा हिशेब त्यांनी केला व व्याजासकट भरपूर हुंडा घेऊन आपल्या मुलाचे लग्न केले. त्या वेळी रिश्वत देवीच्या चरणी वाहलेली जुडी सार्थकी लागल्याचा आनंद सदोबाना झाला. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. त्यांनी पोराला हाक मारली व आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. मुलानेही त्यांचा इच्छेचा सम्मान करत त्यांचा चित्तेवर  शंभर रुपयांच्या नोटांची एक जुडी वाहिली.
 
अखेर सदोबा चित्रगुप्ताच्या दरबारी पोहचले. चित्रगुप्ताने सदोबाला विचारले तुला कुठे पाठवू- स्वर्गात की नरकात? सदोबाने चित्रगुप्ताला साक्षात दंडवत केला व बरोबर आणलेल्या नोटांची एक जुडी चित्रगुप्ताच्या चरणी अर्पण केली व म्हणाला- आपण जे कराल ते योग्यच, फक्त एकच विनंती - पुन्हा भारतभूमीवर पाठवू नका, रिश्वत देवीची पूजा करत करत मी थकून गेलो आहे. चित्रगुप्त मिस्कीलपणे हसत म्हणाला- सदोबा तू पृथ्वीवर कधी ही कुणाला कष्ट दिले नाही, त्यामुळे मी तुला नरकात पाठवू शकत नाही. पण रिश्वत देऊन मला विकत घेऊ पाहत होता. तू विसरलाच ही भारतभूमी नाही, हे चित्रगुप्ताचे न्यायालय आहे. तुझ्या या अपराधामुळे तुला स्वर्गात ही पाठविता येत नाही. तुला फक्त एकच शिक्षा- सदोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. 


अचानक एक बायकी आवाज त्यांना ऐकू आला- साहेब मुलगा झाला आहे! सदोबाला कळून चुकल आपल्या नशिबी पुन्हा रिश्वत जुडी वहाण आल ! नशिबाला दोष देत सदोबानी टाS S हो फोडला.

Thursday, July 12, 2012

साठाउत्तराची कहाणी-पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट


सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.

अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.  

विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन  राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले  त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते.  अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला  राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण  दोघ मिळून   राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू. 

राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले व त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.  


तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही.  बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही.  आपण मूर्ख बनलो,  हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.

सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.

साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति. 

Monday, July 9, 2012

परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?



विद्यां चाविद्यां च यस्तद् वेदोभय्ँ सह 
अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतम्श्नुते.
[ईशोपनिषद (मंत्र ११) ]


शाब्दिक अर्थ: विद्या (अध्यात्म ज्ञान ) परमेश्वराला जाणण्याचे ज्ञान. आणि आणि अविद्याच्या  (भौतिक विद्या) मृत्यु वर विजय प्राप्तीचे ज्ञान. जो व्यक्ती दोन्ही ज्ञान एकाच वेळी जाणतो. तो जीवनाचा पूर्ण आनंद ही उपभोगतो आणि तो जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण आनंद उपभोगू शकतो.

प्रश्न आहे, परेमेश्वराला कोण जाणतो?

परमेश्वराचे भजन, ध्यान, व्रत-उपवास, तप-जप करून परमेश्वराची प्राप्ती होते का? तीर्थक्षेत्री जाऊन देवतांचे दर्शन घेतल्यास, हिमालयात तपस्या केल्याने, दान-पुण्य केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते का? वेद-शास्त्र, पुराणांचे अध्ययन केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर “नाही” हेच होय.

परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?


ईशान्य उपनिषदच्या सातव्या मंत्रात ऋषी म्हणतात:



यास्मिन् सर्वाणी भूतान्यात्मैवाभूद् विजानत 
तत्र को मोह: क: शोक एकत्व मनुपश्यत 


जो व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये एक मात्र परमतत्व अर्थात परमेश्वारालाच  पाहतो. त्याला सर्वत्रच परमेश्वराचे दर्शन होतात. सर्व परमेश्वराची लीला आहे हे तो जाणतो, त्या मुळे त्याला कुठल्या ही प्राण्यापासून भय वाटत नाही. तो कुणाशीही घृणा करीत नाही. सर्व प्राण्यांवर तो केवळ प्रेम करतो. असा व्यक्ती अमृत्वतेचा आनंद प्राप्त करतो.  या वरून एक जुनी कथा आठवली. एक ऋषी सरोवरात स्नान  करीत होते. काठावरच्या एका झाडाच्या फांदीवरून एक विंचू पाण्यात पडला. विंचू पाण्यात बुडू लागला. त्या ऋषीने विन्चूला आपल्या हातानी उचलले. आपल्या स्वभावानुसार त्या विंचवाने ऋषीस डसले. त्या ऋषींच्या  हातातून विन्चू पाण्यात पडला.  त्यांनी पुन्हा विन्चूला हातात उचलले. विन्चू पुन्हा त्यांना डसला. असे दोन-तीनदा घडले. अखेर विंचूला वाचविण्यात ऋषीला यश मिळाले. विंचू सुरक्षित जमिनीवर पोहचला.  एका शिष्याला राहवले नाही त्यांनी ऋषीस  विचारले हा विंचू सारखा तुम्हाला दंश देत होता तरीही तुम्ही त्याला का वाचविले.  या विन्चूत ही परमेश्वराचा अंश आहे. माझ्याप्रमाणे त्याला ही जगण्याचा अधिकार आहे. मी त्याला वाचविले नसते तर तो पाण्यात बुडाला असता. हाताला  अत्यंत वेदना होत असूनही त्या ऋषींच्या चेहऱ्यावर विंचवाला वाचवण्याचा आनंद दिसत होता. तो ऋषी मोह-माया, राग-द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त होता आणि संसारात राहून ही खऱ्या अर्थाने अमरतेचा आनंद उपभोगत होता.

महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्रांची कथा ही आपणास माहित असेलच. पुत्रांची त्या झाली तरीही विश्वमित्रांप्रती द्वेष-भावना वशिष्ठांच्या मनात क्षणभरही आली नाही.

सृष्टीच्या कणा-कणा परमेश्वराचे अस्तित्व आहे हे उपनिषद कालीन ऋषींना ज्ञात होते.  हिंसक प्राण्यांविषयी ही त्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती. त्यांच्या आश्रमात वन्य-प्राणीही माणसांसोबत निर्भिकपणे विचरण करीत होते असे अनेक उल्लेख आपल्या पुराण कथांमध्ये आहे.

आज वैज्ञानिक “गॉड पार्टिकल” शोधण्याचा दावा करीत आहे.  हा पार्टिकल ब्रह्मांडातल्या प्रत्येक अनु-रेणूत आहे असा त्यांचा दावा आहे. या प्रयोग मुळे ब्रह्मांडाचे अनेक रहस्य आपल्याला कळतील आणि  अनेक क्षेत्रात प्रगतीला ही चालना मिळेल अस अनेक वैज्ञानिकांच मत आहे.  गेल्या शंभर वर्षांत माणसाने भरपूर प्रगती केली आहे. पण त्याच बरोबर आपल्या फायद्यासाठी पृथ्वीवरील दुसर्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे.  एवढंच नव्हे तर अत्याधुनिक अस्त्रांचा वापर माणूस एका-दुसऱ्याचा विरुद्ध करीत आहे.  खरं म्हणाल तर सध्या तरी माणूस नावाचा प्राणी आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहत नाही आहे. या घृणा आणि द्वेषाच्या वातावरणामुळे सृष्टीतले अनेक जीव नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  जर एकाच “गॉड पार्टिकल” आपली निर्मिती झाली आहे तर प्रत्येकाचे अस्तित्व एका-दुसऱ्याच्या अस्तित्वावर टिकून आहे, एक नष्ट झाला तर दुसरा ही होईल हे साहजिक आहे. माणूस नावाचा प्राणी ही अमर होऊ शकणार नाही.

सारांश: जो व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये एक मात्र परमतत्व अर्थात परमेश्वारालाच पाहतो, तोच परमेश्वराला जाणतो. सर्व प्राण्यांवर तो केवळ प्रेम करतो. सर्वांच्या जगण्याचा अधिकाराचा सम्मान करतो. असा व्यक्ती अमृत्वतेचा आनंद प्राप्त करतो.

Thursday, July 5, 2012

वाटते भीती


वाटते भीती 
अभिव्यक्तीची 
सत्याची.

कानात बोलली
छाटून टाकली 
जीभ तिची.

शब्दात वाचली 
जाळून टाकली 
पुस्तके ती.

रेषांत दिसली 
पुसोनी टाकली.
चित्रे ती.

Sunday, June 24, 2012

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद



अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.

युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो

भूयिष्ठां  तेनमउक्तिं विधेम. 

[ईशोपानिषद (मंत्र १8) ]



शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्व काही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे. अग्निदेव प्रसन्न होउन आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतात.

आपल्या आयुष्यात अग्नीचे अत्यंत महत्व आहे. अग्नि विना आजच्या जगाची कल्पना आपण करू शकत नाही. आपल्या पोटात ही जठराग्नी जळत असते. ही अग्नी शरीलाला आवश्यक असे पोषक तत्व ग्रहण करते आणि व्यर्थ पदार्थ टाकून देते. काही भक्त व्रत-उपवासाद्वारे आपल्याच शरीराची (शरीरातल्या चरबीची) आहुती या अग्नीत देतात. अग्नीत तापल्या मुळे शरीर आणि मन शुद्ध होतात व परमेश्वरा पर्यंत पोहचण्याचा मार्ग प्रशस्त होतो. अशी अवधारणा.

समस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे. अग्नीत तापल्या मुळे समस्त पदार्थांचे दोष नष्ट होतात. चिकित्सक ही धातूंना अग्नीत जाळून १००% शुद्ध भस्म प्राप्त करतात. या लौह, रौप्य ,सुवर्ण इत्यादी भस्माचा उपयोग व्याधीग्रस्थांची व्याधी दूर करण्यासाठी उपयोग करतात. अर्थात माणसांच्या भौतिक इच्छाही अग्निदेव पूर्ण करतात. फिगर सुंदर ठेवण्यासाठी कुणी तरुणी जठराग्नित आपल्या चरबीची आहुती देते. अग्निदेव तिच्यावर ही कृपा करतात. तिला ही स्लीम फिगर मिळते.

नेता आणि अधिकाऱ्यांच्या मनात सत्ता आणि भौतिक सुखांची आकांक्षा असते. त्यात काहीच गैर नाही. पण त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना गैर-मार्ग वापरावे लागतात. सरकार-दरबारात कागदी घोडे दौडत असल्यामुळे त्यांचे गैर कृत्य सरकारी कागदोपत्री दर्ज होतातच. पहिले या फाईली रिकॉर्ड रूम मध्ये दबलेल्या राहत असे. पण आपल्याला माहीतच आहे. माहितीचा अधिकारामुळे कित्येक दडलेले घोटाळे बाहेर निघाले. कित्येक नेत्यांना आणि अधिकाऱ्याने तिहाडची सुगंधित* हवा खावी लागली (तिहाड जेलच्या एका बाजूला जनकपुरीतली घाण वाहून नेणारा नाला वाहतो. त्याचा सुगंधी वास जेल मध्ये सतत दरवळत राहतो. गेल्याच वर्षांपासून या नाल्याला झाकण्याचे काम सुरु झाले आहे आतापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले असेल- या महान कैद्यांची कृपा दुसर काय) असो.

सूचनेच्या अधिकारानुसार माहिती ही द्यावीच लागते आणि परिणाम ही भोगावे लागतात. कागद गहाळ कारणे ही सौप नाही कारण त्याची ही चौकशी होणार. कदाचित गहाळ जालेली फाईल पुन्हा प्रगट होऊ शकते. सत्तेच्या खेळात कुणी ही केंव्हा दगा-फटकी करू शकतो. घोटाळे उघडकीस आले तर अश्या नेत्यांचा मार्ग अवरुद्ध होऊ शकतो. सत्ता त्यांच्यापासून दूर होईल. कदाचित तिहाडची हवा ही खावी लागेल.

आपल्याला माहित आहे, अग्निदेव अत्यंत कृपाळू आहेत, आपल्या भक्तांना निराश करीत नाही. अश्या घोटाळेबाज अधिकारी आणि नेत्यांनी अग्निदेवाची प्रार्थना केली आणि अग्नीने ही आपल्या भक्तांवर कृपा केली तर त्यात गैर काय. ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. अशारीतीने सर्वकाही जाणाऱ्या अग्निदेवाने आपल्या भक्तांच्या प्रगतीच्या प्रवासाच्या मार्गातले अडथळे दूर केले.

ज्या प्रमाणे अग्निदेवाने त्यांच्या मार्गातले अडथळे दूर केले त्याच प्रमाणे सर्वांच्या मार्गातले अडथळे अग्निदेवाने दूर करावे ही चरणी प्रार्थना.


Sunday, June 17, 2012

सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य



हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं l
तत त्वं पुषन्नपावृणु  सत्यधर्माय दृष्टये l    

[ईशोपानिषद (मंत्र १५) ]

शाब्दिक अर्थ:  सोनेरी तेजाने (आवरणाने) सत्याचे मुख झाकलेले आहे. हे पूषण (पालनकर्ता) कृपया सोनेरी आवरण दूर करा सत्य रुपी धर्म पाहण्या करिता.

सूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बागेत  फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागेततल्या खुर्चीवर बसून  पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या  सूर्य  नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही.  हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे. सत्यरूपी  तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता.

सत्य हे नेहमीच सुवर्ण आवरणाखाली दडलेल असत.  मोह, माया, ममता लालसा, स्वार्थ इत्यादी अनेक गोष्टी सत्याचा आड नेहमीच येतात.  या  सुवर्णाच्या लोभापायी लोक खऱ्याच खोट करतात  किंवा  सत्याचा पक्ष घ्यायला घाबरतात. राजा हरिश्चंद्राचे आपण गुण गातो पण हरिश्चंद्र बनण्याची कुणाचीही इच्छा नसते.  

भर दरबारात द्रोपदीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न सुरु होता.  द्रोपदी न्याय मागित होती.  धर्माचे जाणकार भीष्म पितामह  एवम् इतर मंत्री व दरबारी शांत बसून होते किंवा दुर्योधनाला रुचणारी धर्माची व्याख्या करण्यात मग्न होते. (मिळणारा पगार, दरबारातले स्थान, विरोध करण्याचा परिणाम व आपल्याला काय करायचे आहे, त्यांनी जुगार खेळला, भोगू द्या त्यांना त्यांच्या कर्मांची फळे). राजा ही आंधळा होता, गांधारीने चक्क डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती. (राजसुखाची लालसा आणि पुत्र मोहामुळे सत्य आणि न्याय मार्गापासून दूर  अशा राजा साठीच  ‘आंधळा’ हे बिरूद कदाचित व्यासांनी धृतराष्ट्रासाठी वापरले असेल आणि पत्नीतर पतीची अनुगामिनी असतेच) जिथे भर दरबारात कुलवधूचे वस्त्र हरण होत असेल त्या राज्यात सामान्य जनतेवर काय आत्याचार होत असतील त्याची कल्पना करणे शक्य नाही.  त्या काळी स्त्रीयांच अपहरण आणि जबरन विवाह तर क्षत्रिय राजांसाठी सामान्य बाब होती. प्रजाही प्रारब्ध मानून असले अत्याचार निमुटपणे सहन करीत होती. परिणाम,  महाभारताचे युद्ध झाले, कित्येक अक्षोहिणी सैन्य रणांगणात ठार झाले. हस्तिनापूरचे राज्य धुळीस मिळाले.  प्रजाजानानाही त्याचे परिणाम भोगावे लागले. युद्धानंतरच्या भीषण वास्तव्याचे महाभारतात जे चित्रण आहे ते दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही. (ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे   दुष्काळ,  अतिवृष्टी  विकृत प्राणी आणि संततीचे जन्म इत्यादी).  जर त्याच वेळी भीष्मपितामह आणि राजा धृतराष्ट्राने पुत्र मोह आवरून सत्य आणि धर्मानुसार निर्णय घेतला असता तर महाभारत घडले नसते. असो.

आज आपण काय पाहतो. जन्म प्रमाणपत्र, जातप्रमाण पत्र, शाळा, कॉलेज मध्ये अडमिशन, नौकरीसाठी लोकांना ‘सुवर्ण’ मोजावे लागतात. व्यापार धंद्या साठी ही  नेता आणि दरबार्याना खुश करावे लागते.  न्याय दरबारी तर परिस्थिती आणखीनच विचित्र. १० रुपये रिश्वत घेणाऱ्या चपरासी जेल मध्ये जातो आणि करोडों बुडविणार्याना जेल नव्हे तर सरकार दरबारात मान मिळतो.  ही वस्तुस्थिती.

देशाला चालविणारे बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांना ही त्यांना मिळणारे प्रमोशन, सरकारी नौकरीतून निवृत्तीनंतर मिळणारे ‘बक्षिस’  यातच रस असतो. शिवाय  वाहत्या गंगेत हात धुवण्याचा मौका ते का सोडणार.  त्या मुळे सर्वकाही जाणूनही ते मूक राहतात,  न्यायपूर्ण व जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला घाबरतात. आज देशाची परिस्थिती महाभारत काळासाराखीच आहे.  परिणाम काय होणार हे जाणून ही सर्व चूप बसलेले आहे. कारण सत्य रूपी सूर्याचे तेज पाहण्याची हिम्मत कुणा मध्ये ही नाही.

मनात विचारांचे काहूर माजलेले होते. सूर्याचे उन आता बोचू लागले होते.  वर आकाशाकडे लक्ष गेल सोनेरी आवरण दूर झालेले होते सूर्याला क्षणभर पाहणे ही आता शक्य नव्हते.  मला माझेच हसू आले.  सूर्य उजेडापासून दूर सुरक्षित व थंड अश्या सुरक्षित घराच्या दिशेने चालू लागलो.

Saturday, June 9, 2012

मृत्यु / एक विचार



मरणाची भीती सर्वांनाच वाटले.  पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा.


(१)
अनंत पथाचा यात्री 
घेतो इथे
क्षणभर विश्रांति.

(२)


थकलेला- भागलेला जीवाला, निवांत सुखाची झोप, मायेचा पदरीच मिळणार ..


थकलेला पाखरू
परतला  घरी.
मायेचा पदरी
झोप सुखाची.

(३)


शेवटी साथ मृत्युचीच आहे 

नावडती जरी मी
आहे तुझी सहचरी. 
दिवसभर भटकून 
धनी येणार माझ्या 
मिठीत राती.