Monday, July 9, 2012

परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?



विद्यां चाविद्यां च यस्तद् वेदोभय्ँ सह 
अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतम्श्नुते.
[ईशोपनिषद (मंत्र ११) ]


शाब्दिक अर्थ: विद्या (अध्यात्म ज्ञान ) परमेश्वराला जाणण्याचे ज्ञान. आणि आणि अविद्याच्या  (भौतिक विद्या) मृत्यु वर विजय प्राप्तीचे ज्ञान. जो व्यक्ती दोन्ही ज्ञान एकाच वेळी जाणतो. तो जीवनाचा पूर्ण आनंद ही उपभोगतो आणि तो जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण आनंद उपभोगू शकतो.

प्रश्न आहे, परेमेश्वराला कोण जाणतो?

परमेश्वराचे भजन, ध्यान, व्रत-उपवास, तप-जप करून परमेश्वराची प्राप्ती होते का? तीर्थक्षेत्री जाऊन देवतांचे दर्शन घेतल्यास, हिमालयात तपस्या केल्याने, दान-पुण्य केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते का? वेद-शास्त्र, पुराणांचे अध्ययन केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर “नाही” हेच होय.

परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?


ईशान्य उपनिषदच्या सातव्या मंत्रात ऋषी म्हणतात:



यास्मिन् सर्वाणी भूतान्यात्मैवाभूद् विजानत 
तत्र को मोह: क: शोक एकत्व मनुपश्यत 


जो व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये एक मात्र परमतत्व अर्थात परमेश्वारालाच  पाहतो. त्याला सर्वत्रच परमेश्वराचे दर्शन होतात. सर्व परमेश्वराची लीला आहे हे तो जाणतो, त्या मुळे त्याला कुठल्या ही प्राण्यापासून भय वाटत नाही. तो कुणाशीही घृणा करीत नाही. सर्व प्राण्यांवर तो केवळ प्रेम करतो. असा व्यक्ती अमृत्वतेचा आनंद प्राप्त करतो.  या वरून एक जुनी कथा आठवली. एक ऋषी सरोवरात स्नान  करीत होते. काठावरच्या एका झाडाच्या फांदीवरून एक विंचू पाण्यात पडला. विंचू पाण्यात बुडू लागला. त्या ऋषीने विन्चूला आपल्या हातानी उचलले. आपल्या स्वभावानुसार त्या विंचवाने ऋषीस डसले. त्या ऋषींच्या  हातातून विन्चू पाण्यात पडला.  त्यांनी पुन्हा विन्चूला हातात उचलले. विन्चू पुन्हा त्यांना डसला. असे दोन-तीनदा घडले. अखेर विंचूला वाचविण्यात ऋषीला यश मिळाले. विंचू सुरक्षित जमिनीवर पोहचला.  एका शिष्याला राहवले नाही त्यांनी ऋषीस  विचारले हा विंचू सारखा तुम्हाला दंश देत होता तरीही तुम्ही त्याला का वाचविले.  या विन्चूत ही परमेश्वराचा अंश आहे. माझ्याप्रमाणे त्याला ही जगण्याचा अधिकार आहे. मी त्याला वाचविले नसते तर तो पाण्यात बुडाला असता. हाताला  अत्यंत वेदना होत असूनही त्या ऋषींच्या चेहऱ्यावर विंचवाला वाचवण्याचा आनंद दिसत होता. तो ऋषी मोह-माया, राग-द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त होता आणि संसारात राहून ही खऱ्या अर्थाने अमरतेचा आनंद उपभोगत होता.

महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्रांची कथा ही आपणास माहित असेलच. पुत्रांची त्या झाली तरीही विश्वमित्रांप्रती द्वेष-भावना वशिष्ठांच्या मनात क्षणभरही आली नाही.

सृष्टीच्या कणा-कणा परमेश्वराचे अस्तित्व आहे हे उपनिषद कालीन ऋषींना ज्ञात होते.  हिंसक प्राण्यांविषयी ही त्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती. त्यांच्या आश्रमात वन्य-प्राणीही माणसांसोबत निर्भिकपणे विचरण करीत होते असे अनेक उल्लेख आपल्या पुराण कथांमध्ये आहे.

आज वैज्ञानिक “गॉड पार्टिकल” शोधण्याचा दावा करीत आहे.  हा पार्टिकल ब्रह्मांडातल्या प्रत्येक अनु-रेणूत आहे असा त्यांचा दावा आहे. या प्रयोग मुळे ब्रह्मांडाचे अनेक रहस्य आपल्याला कळतील आणि  अनेक क्षेत्रात प्रगतीला ही चालना मिळेल अस अनेक वैज्ञानिकांच मत आहे.  गेल्या शंभर वर्षांत माणसाने भरपूर प्रगती केली आहे. पण त्याच बरोबर आपल्या फायद्यासाठी पृथ्वीवरील दुसर्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे.  एवढंच नव्हे तर अत्याधुनिक अस्त्रांचा वापर माणूस एका-दुसऱ्याचा विरुद्ध करीत आहे.  खरं म्हणाल तर सध्या तरी माणूस नावाचा प्राणी आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहत नाही आहे. या घृणा आणि द्वेषाच्या वातावरणामुळे सृष्टीतले अनेक जीव नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  जर एकाच “गॉड पार्टिकल” आपली निर्मिती झाली आहे तर प्रत्येकाचे अस्तित्व एका-दुसऱ्याच्या अस्तित्वावर टिकून आहे, एक नष्ट झाला तर दुसरा ही होईल हे साहजिक आहे. माणूस नावाचा प्राणी ही अमर होऊ शकणार नाही.

सारांश: जो व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये एक मात्र परमतत्व अर्थात परमेश्वारालाच पाहतो, तोच परमेश्वराला जाणतो. सर्व प्राण्यांवर तो केवळ प्रेम करतो. सर्वांच्या जगण्याचा अधिकाराचा सम्मान करतो. असा व्यक्ती अमृत्वतेचा आनंद प्राप्त करतो.

No comments:

Post a Comment