Thursday, July 12, 2012

साठाउत्तराची कहाणी-पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट


सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.

अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.  

विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन  राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले  त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते.  अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला:  राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण  दोघ मिळून   राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू. 

राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले व त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.  


तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही.  बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही.  आपण मूर्ख बनलो,  हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.

सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.

साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति. 

No comments:

Post a Comment