Tuesday, July 24, 2018

काही क्षणिका : राख




जाळल्या स्मृती 

हृदयी उरली

राख विस्मृतीची.




धरती जळाली

 सवे राख झाली 

वीज फिदायनी.




मेघांच्या अश्रूंत

भिजली राख 

प्रगटले चैतन्य. 


कितीही विसरण्याच्या प्रयत्न केला तरी राखेच्या रुपात स्मृती आपल्या हृदयात ठाण मांडून बसतीलच.


किती हि वीज पडली, उध्वस्त झाले जीव तरीहि धरतीच्या कोखात जीवन हे निजपणारच. राखेतून पुन:जीवित होणार्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे. 


 

Monday, July 23, 2018

आज आषाढी एकादशी, विठ्ठल नाही पंढरपुरी


आज आषाढी एकादशी 
विठ्ठल नाही पंढरपुरी 
भक्ताच्या दर्शनासी 
गेला तो मुंबापुरी

मला वाटते कधी-कधी इतिहासाची पुनरावृत्ती होते. महाराजांची कुलदैवत आई तुळजा भवानी. आसुरी शक्तींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अफजल खानाने आईची विटंबना केली. महाराजांच्या जागी दुसरा कुणी असता तर त्वेषाने खानवर तुटून पडला असता. हजारो मावळे शहीद झाले असते. स्वराज्याचे स्वप्न हि भंगले असते. अश्या प्रसंगी हि महाराज शांत राहिले. स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. 

विठ्ठल तर भक्तांचा देव. भक्तांचे कष्ट पाहून तो नाथा घरी पाणी भरायला गेला. भानुदासाला वाचविण्यासाठी शुष्क काष्ठाला हिरवे केले. जिथे  कठोर तपस्येनंतर देवांचे दर्घडते इथे पंढरीत तर साक्षात पांडुरंग भक्तांच्या दर्शनासाठी विटेवर उभे आहेत, अनेक युगांपासून. आपल्या एका भक्ताला इथे येण्यापासून आसुरी शक्तींनी  रोखले आहे, हे पांडुरंगाला कळणारच. मग त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी पांडुरंग त्याच्या घरी जाणारच. अर्थात हि साधी सौपी गोष्ट आसुरी शक्तींच्या अधीन असणार्या मूर्खांना कळणे अशक्यच. आज पांडुरंग चरणी एकच प्रार्थना. पांडुरंगा तू दयाळू आहे, आपल्या सर्व अज्ञ लेकरांना  क्षमा कर, क्षमा कर. 

Friday, July 20, 2018

काही क्षणिका : श्रावणात



गंगा आली 
अमृत पाणी 
श्रावणात.
 
पृथ्वी न्हाली 
हिरवी नटली
 श्रावणात.

ऊन- पाऊस 
 लग्न भुताचे
श्रावणात.


सोनेरी ढगांचा 
सतरंगी साज
श्रावणात.




Thursday, July 19, 2018

पाऊस - काल आणि आज



द्वाड पोरांनी 
मटकी फोडली 
अमृताची.



  टेंकर फोडले 
 कान्हा उपाशी 
दुधाविना. 




मेघ (द्वाड पोरे) आकाशातून अमृताचा वर्षाव करतो. इथे जाणते टेंकर फोडतात, तेही दुसर्यांचे. दुधाविना तान्हा कसा जगेल एक क्षण हि हा विचार जाणत्यांच्या मनात येत नाही. बहुतेक समर्थांनी अश्या लोकांसाठी पढत मूर्ख हा शब्द वापरला असेल. 


Wednesday, July 18, 2018

दोन क्षणिका: सुगंध




वासंतिक सुगंध 
वार्यासवे आला 
बंद दरवाज्या  समोर 
दम त्याने तोडला.


एसीच्या वार्यात 
कृत्रिम सुगंध 
रोग केंसरचा
असा पसरला. 



टीप: बंद दरवाजा, घरात एसी. मातीचा सुगंध असो किंवा फुलांचा सुगंध  घरात येऊ शकत नाही. डीओचा रासायनिक कृत्रिम सुगंध, केंसरला कारणी भूत आहे. 

Tuesday, July 17, 2018

क्षणिका - असत्य




तारेवरची कसरत 
पैलतीरी स्वर्गसुख
तोल गेला नरकवास. 

Monday, July 16, 2018

जन्मपत्रिका म्हणजें शोकपत्रिका


सौप्या शब्दांत सांगायचे जन्माची जागा आणि १२ राशी, सूर्य, चंद्रमा व  ग्रह इत्यादींची त्या जागेची संबंधित स्थिती. या स्थितीला कागदावर मांडणे म्हणजे जन्मकुंडली. त्या कुंडलीनुसार बालक/बालिकेचे भविष्य मांडणें म्हणजें जन्मपत्रिका.  काही ग्रह चांगले, काही दुष्ट.  शनीची साडेसाती तर मंगळी तर लग्न होणे दुष्कर.  या सर्व ठोकताळ्यांचा आधार काय, कुठलाच जोतिषी सांगू शकत नाही. मजेदार गोष्ट जगात अनेक प्रकारचे जोतिष सिद्धांत व अनेक प्रकारच्या जन्म कुंडल्या आणि त्यांचे वेगवेगळे ठोकटाळे. कुठल्या ठोकताळ्यांवर विश्वास ठेवायचा, हा हि एक प्रश्न आहे. 

माझ्या नाते संबंधातील गोष्ट. वडिलांना पत्रिकेचे भारी ज्ञान. पत्रिका पाहून मुलगी बघायचा कार्यक्रम ठरविला तिथे मुलगी नकार द्यायची किंवा मुलाला मुलगी पसंद नाही पडायची. बिना पत्रिका बघता आधी मुलगी बघितली तर पत्रिका आड यायची. वयाची ३५ची उलटली. मुली यायला बंद झाल्या. शेवटी त्यांच्या मुलाने एका सहकर्मी मुलीशी लग्न केले. पत्रिका, जात काही हि पहिली नाही. त्यांचा संसार सुखाचा आहे. पत्रिका पाहून लग्न झाल्यावर हि संसार सुखाचा होईल याची शाश्वती कुठला हि जोतिषी किंवा जन्मपत्रिका देत नाही.  कारण सुखी संसार आणि पत्रिका, यांचा संसाराशी काही हि घेणे देणे नाही. 

पत्रिकेत मंगळ असेल तर लग्न जमणे जवळपास अशक्य. शेवटी मंगळी मुलगा भेटला कि लग्न करून जवाबदारी झटकली जाते. मुलीचा संसार उध्वस्त झाला तरी चालते. शेवटी खापर पत्रिकेतल्या मंगळावर फोडल्या जाते. कधी-कधी लग्नच होत नाही. मुले/ मुली आयुष्भर अविवाहितच राहतात. दोषी कोण पत्रिकेतील मंगळ. या शिवाय पत्रिकेतील दुष्ट ग्रहांची शांती करण्यासाठी अवाढ्य खर्च केला जातो, चित्र-विचित्र रंगांचे दगड बोटांमध्ये घातले जातात. गंडा, ताबीज, दोरे बांधले जातात. आपल्या पत्रिकेत ग्रह चांगले नाही, याचा मनावर परिणाम झाला कि समजा आयुष्य उध्वस्त होणारच.  

एक प्रश्न कुणाच्या हि मनात येईल, खरंच पत्रिकेतल्या ग्रहांचा मानवीय जीवनावर परिणाम होतो का? हाच प्रश्न एका जोतिषीला विचारला. तो म्हणाला, पहा चन्द्रमाच्या प्रभावाने समुद्रात ज्वार-भाटा येतात. मग त्याचा परिणाम माणसावर का नाही होणार? प्रतिप्रश्न रास्त होता. मी म्हणालो तो प्रभाव प्रत्येक माणसावर एक सारखा पडतो. वेगवेगळा पडणार नाही. शारीरिक परिस्थितीनुसार कमी जास्त पडू शकतो, मान्य आहे. पण त्याच्या कुंडलीत कुठल्या स्थानावर चंद्रमा आहे याशी काही संबंध आहे का? जोतिषी चमकलाच असा प्रश्न आधी कुणीच विचारला नसेल. त्याच्या जवळ उत्तर नव्हते. सर्व ग्रह विधात्याने निश्चित केलेल्या मार्गानुसार सूर्याचे परिभ्रमण करीत आहे. त्यांना तुम्ही केंव्हा पैदा झाला, त्या वेळी ते ग्रह तुमच्या पत्रिकेत कुठल्या स्थानी होते, याच्याशी काही घेणे देणे नाही. त्यांच्या गृत्वाकर्षण, प्रकाश, इत्यादी प्रभाव जर पृथ्वीवरच्या लोकांवर पडत असेल तर सर्वांवर एक सारखाच पडणार. वेगळा नाही. शिवाय ब्रह्मांडात अब्जावधी खगोलीय पिंड आहेत त्यांच्या हि प्रभाव पृथ्वीलोकावर पडत असेल त्यांची हि जन्मकुंडलीत मांडणी का करत नाही. या प्रश्नावर जोतिषबुवा चूप राहिले. चिडून शेवटचा बाण त्यांनी मुखातून काढला, विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, पुढे काही बरे वाईट झाले तर बोंबलू नका. मी म्हणालो, पुढे काय होणार, हे विधात्याशिवाय कुणीच सांगू शकत नाही. जोतिषी तर निश्चित नाही. 

आमच्या वडिलांनी आमच्या लग्नाच्या वेळी जन्मकुंडली / पत्रिका बघितली नाही. घरात कुणाचेच काही वाईट झालेले नाही. पुढच्या पिढीने तर प्रेम विवाह केले जाती  बाहेर हि, सर्वांचे संसार सुखीचे आहे. महर्षी दयानंद तर जन्मपत्रिकेला, शोकपत्रिका म्हणायचे. ज्यांना आपला संसार उध्वस्त करायचा असेल किंवा पैसा उडवायचा असेल त्यांनी जन्मपत्रिकेवर विश्वास ठेवावा. मंगळ आणि शनीची शांती करावी.  ज्यांना आयुष्यात पुढे जायचे असेल  जन्मपत्रिका विसरून पुरुषार्थावर विश्वास ठेवावा. लग्न हि अनुरूप मुलगा / मुलगी पाहून करावे. पत्रिका पाहून तर कदापि नाही. 

Thursday, July 12, 2018

घर एक बोध कथा


(आस्था वाहिनी वर एक गोष्ट ऐकली होती. त्या गोष्टीचा विस्तार)

एका गावात एक घर होते. घरात आत शिरायला फक्त एक छोटासा दरवाजा होता. तो हि सदैव जाड काळ्या कपड्याने झाकलेला. त्या घरातील लोक रोज सूर्य उगवल्यावर छोट्याश्या दरवाज्यातून हातात एक बादली घेऊन बाहेर यायची. हाताने बादलीत काही तरी भरायचे नाटक करायची आणि घरात जायची. हा प्रकार कित्येक तास चालत असे. लोकांना त्यांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटायचे. हळू हळू हि वार्ता  त्या राज्याच्या राजाच्या कानावर पडली. सत्य पडताळण्यासाठी एक दिवस राजा मंत्री सोबत भल्या पहाटे त्या घरासोमोर येऊन ठाकला. सूर्य उगवला, घरातून एक वयस्कर माणूस हातात बादली घेऊन बाहेर आला आणि आपल्या रिकाम्या हाताने बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक सुरु केले. राजाला राहवले नाही त्याने विचारले, तुझ्या हातात काही नाही तरी हि तू बादलीत काहीतरी भरण्याचे नाटक करीत आहे. हा काय प्रकार आहे. तो माणूस विनम्रतेने म्हणाला, राजन आमच्या घरात आंधार आहे. मी सूर्याचे ऊन या बादलीत भरतो आणि घरात जाऊन ती बादली रिकामी करतो. राजाने हसू आवरीत विचारले, घरात प्रकाश पसरला का? तो म्हणाला, रोज कित्येक बादल्या भरून सूर्याचे ऊन घरात टाकतो तरी हि घरात आंधार राहतो. काहीच समजत नाही. राजा घराच्या दरवाज्याजवळ आला आणि तलवारीने काळे जाड कापड कापून टाकले. घरात सूर्याचा प्रकाश पोहचला. (गोष्ट इथेच पूर्ण होते). राजा म्हणाला, बघ दरवाजा उघडा असेल तर सूर्याचा प्रकाश घरात येईल, एवढी साधी गोष्ट तुला का कळत नाही. त्या माणसाने काही सांशक होऊन राजाकडे पहिले आणि विचारले, राजन सूर्याचा उन्हांसोबत धूळ माती पाऊस-पाणी, माश्या, डास व रात्रीच्या वेळी सर्प इत्यादी  येतील त्याचे काय? राजा मंद हसला आणि म्हणाला त्याचाही बंदोबस्त करतो. त्याने मंत्रीला आदेश दिला गवंडी करून या परिवारासाठी व्यवस्थित घर बांधून द्या.     

राजाच्या आदेशानुसार गवंडीने त्या परिवारासाठी घर बांधले. घरात शिरण्यासाठी एक मोठा दरवाजा, त्या शिवाय एक लोखंडी ग्रील असलेला एक जाळीचा दरवाजा हि. जेणे करून दिवस भर सूर्य प्रकाश व वारा घरात येत राहील. ग्रील सहित जाळीदार खिडक्या आणि काचेचे रोषनदान हि लावेले जेणेकरून धुळीची आंधी आल्यावर दरवाजे खिडक्या बंद केल्या तरी रोषनदान मधून प्रकाश येत राहणार. खिडक्या दरवाजांना जाळी असल्यामुळे रोगराई पसरविणार्या माश्या, डास इत्यादी घरात शिरू शकत नव्हते. रात्री दरवाजा बंद केल्यावर हिंसक पशु, विषाक्त सर्प इत्यादी घरात प्रवेश करु शकत नव्हते. तो परिवार आनंदाने त्या घरात राहू लागला. 

इथे घर म्हणजे माणूस. सूर्याचा उजेड म्हणजे ज्ञान. राजा म्हणजे गुरु. ज्ञानवान गुरु भेटल्यावर ज्ञानरुपी सूर्याचा प्रकाश घरात येतो. धूळ माती म्हणजे वाईट विचार. वाईट विचारांना दूर ठेवण्यासाठी दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागतात. खिडक्या व दरवाज्याला लागलेली जाळी रोगराई पसरविणार्या किड्यांना घरात येऊ देत नाही. विषाक्त सर्प हि घरात शिरू शकत नाही.  हे सर्व  किडे  दुष्ट विचारांचे प्रतिक आहेत. मनात दुष्ट विचार आल्यावरच माणूस दुसर्यांना त्रास देतो, मारहाण करतो. या विचारांच्या जास्त आहारी गेल्यावर माणूस दुसर्यांचा खून हि करतो.  

हृदयाचे कपाट मोकळे ठेऊन ज्ञानाचा प्रकाश आत येऊ द्या. पण वाईट व दुष्ट विचारांना हृदयात स्थान देऊ नका. बहुधा हाच या कथेचा सार आहे. 


Wednesday, July 11, 2018

क्षणिका - अर्धसत्य



असत्यापासून दूर 
सत्यापासून हि दूर
स्वार्थ सिध्द करणारे 
आप मतलबी अर्धसत्य.

Tuesday, July 10, 2018

क्षणिका - मार्ग सत्याचा



अंगार वेदनेचा 
दुखांचा कष्टांचा
मार्ग हरिश्चंद्राचा. 

Monday, July 9, 2018

राधा हि बावरी



अवसेच्या राती 
यमुनेच्या काठी 
कृष्णाला शोधी 
राधा हि  बावरी.

काळी यमुना 
मेघ काळा
अदृश्य झाला 
घनश्याम.

मेघांच्या तालावर
बंशीची धुन
वीजेच्या समेवर 
दिसला ग! घनश्याम.

प्रेमाच्या सरीत 
कृष्णाच्या मिठीत 
एकरूप झाली 
राधा हि बावरी.

* मेघांच्या तालावर-वादळांचा गडगडाट
वीजेच्या समेवर- वीज कडकली 

Friday, July 6, 2018

कविता - मेघ बरसला





मेघ बरसला 
विरही अश्रूंचा 
खारा खारा.

मेघ बरसला 
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा. 

मेघ बरसला 
 माळात रानात
काळा काळा.

मेघ बरसला 
भिजली धरणी
हिरवी हिरवी.






Thursday, July 5, 2018

वेद हे अपौरुषेय- कारण



वेदांना अपौरुषेय म्हंटले आहे. अपौरुषेय शब्दाचा अर्थ काय हा प्रश्न मनात येणारच. सामान्य अर्थ मनुष्य निर्मित नाही. मग त्या ऋचांची रचना कुणी केली.  देवांनी? पण ऋग्वेदातच म्हंटले आहे, देवांची निर्मिती हि सृष्टीच्या निर्मिती नंतर झाली आहे. निर्मित झालेली वस्तू जे निर्माण करेल ते अपौरुषेय निश्चितच नाही. त्यामुळे देवतांनी दिलेले ज्ञान हि अपौरुषेय नाही. 

वैदिक ऋषींनी वेदांच्या ऋचांची रचना केली नाही अपितु सनातन काळापासून विद्यमान सत्य जाणले, अनुभव केले आणि शब्दांत बांधले. हे शब्द म्हणजेच वैदिक ऋचा. ऋषींनी या वैदिक ऋचांचे ज्ञान समाज कल्याणासाठी आपल्या शिष्यांना दिले. या कारणामुळेच वैदिक ऋषींना मंत्रदृष्टा म्हंटले आहे. वेदांची भाषा संस्कृत असली तरी हि अगम्य आहे. एकाच शब्दाचे अनेक अर्थ तिथे सापडतात. त्यामुळे वैदिक ऋचांचा अर्थ विद्वान आपापल्या परीने वेग-वेगळे काढतात. बहुतेक जाणलेले ज्ञान चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून अशी भाषा ऋषींनी  वापरली असेल. 

अपौरुषेय म्हणजे सत्य आणि सनातन जे सृष्टीच्या प्रारंभापासून विद्यमान आहे. ऋषींनी ते सत्य जाणले आणि वेदांच्या माध्यमातून समोर आणले. आता सनातन सत्य म्हणजे काय? एक उदाहरण, झाडावरून फळ खाली पडते. सत्ययुगापासून ते आजगायत फळे झाडावरून खालीच पडतात. वर उडून जात नाही. पण फळे खालीच का पडतात, या मागचे कारण काय?  पृथ्वीच्या गृत्वशक्तीमुळे फळे खाली पडतात. गृत्वाकर्षण मानवाने निर्मित केलेले नाही. त्यामुळे गृत्वाकर्षण काय आहे हे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याची लांबी रुंदी हि मोजू शकत नाही. पण न्यूटनने पृथ्वीवर विद्यमान गृत्वाघर्षण  जाणले आणि गृत्वाघर्षणचा सिद्धांत समोर आला.  अशाच प्रकारे वेदांची निर्मिती झाली.

सारांश वैदिक ऋषींनी अनादीकाळापासून असलेले विद्यमान सत्य ओळखून, त्या सत्याला शब्दांत बांधले आणि वेदांची रचना केली म्हणून वेदांना अपौरुषेय म्हंटले आहे.
  

Wednesday, July 4, 2018

दोन क्षणिका - कविता आणि सिंहासन




भावनांच्या पाकात
शब्दांचे मीटर
प्रसवली कविता.

भाषणाच्या गर्जनेत 
शब्दांचे आश्वासन 
मिळाले सिंहासन.



Tuesday, July 3, 2018

आठवणीतून - पहाटे येणारी नर्स


हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या म्हणीनुसार माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्यामुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्यावर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नव्हते.  सकाळची वाट  पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल”, मनात म्हणायचो किती  तुकडे करणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिला पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी-सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट  घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला.



Monday, July 2, 2018

क्षणिका - एक माणूस


शहरात आला 
गर्दीत हरवला 
एक माणूस.


टाळे घरांवर
उजाड माळ
पहाडी गाव.