Tuesday, July 3, 2018

आठवणीतून - पहाटे येणारी नर्स


हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या म्हणीनुसार माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्यामुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्यावर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नव्हते.  सकाळची वाट  पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल”, मनात म्हणायचो किती  तुकडे करणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिला पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी-सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट  घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला.



No comments:

Post a Comment