Tuesday, August 7, 2018

उलूक परिवार कथा


बालीत कपडे स्वस्त मिळतात. सरकारी कामातूनवेळ काढून खरीदारी करायला गेलो. मालमध्ये  फिरताना, लाकडाचे आई, बाबा आणि बाळ  या उलूक परिवाराने ध्यान आकर्षित केले. खरीदारी पूर्ण झाली, तरीही सारखे-सारखे लक्ष त्या उलूक परिवाराकडे जायचे, जणू ते म्हणत होते, आम्हाला हि तुझ्या सोबत यायचे आहे. अखेर राहवले नाही, भारतीय मुद्रेत फक्त ८० रुपये देऊन उलूक परिवार खरेदी केला. काही सहकार्यांनी  माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एक दुसर्याच्या कानात, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाला, "शायद  दिल के साथ दिमाग भी खराब हो जाता है" दुसरा उद्गरला "नहीं यार, पटाईतजी पठिया (सठिया) गए है". तीसरा म्हणाला "शेवटी बालीत हि पटाईतजींनी आपल्याला नातेवाईकांना शोधून काढले, आता घर वापसी". आजकाल पटाईतजी काहीशे विचित्र वागतात, या बाबत सर्व सहकारी एकमत होते. विमानातून उतरण्याआधीच, पटाईतजी आणि त्यांचे उल्लू हि कथा, सचिवालयात पसरली. घरी येताच, सौचे लक्ष हि उल्लू परिवाराकडे गेले. "मला १०० टक्के खात्री होती, तुमचे बाबा  काही तरी विचित्र वस्तू घरी घेऊन येतील." असो. तिच्या बडबडीकडे लक्ष न देता उलूक परिवार बैठकीच्या खोलीत शोकेसमध्ये  विराजमान झाले. 

शेजारची वर्षभराची रिया, संध्याकाळी घरी पोहचताच, समोरच्या दादू सोबत(मी) खेळायला यायची. "पोटावर उड्या मारणे, खांद्यावर लटकणे,अकुंच्या पकुंच्या पिकले पान कोण खाणार..." तास-दीड तास कसे निघून जायचे, कळायचे नाही. एक दिवस तिचे लक्ष उल्लू परिवाराकडे गेले. शोकेसमधून उल्लू परिवार तिच्या हाती आला. तिच्यासाठी उल्लू परिवाराचे नामकरण केले. मम्मी उल्लू, डैडी उल्लू आणि रिया उल्लू. आता तिचे मन उल्लू परिवारासोबत खेळण्यात रमले.  त्यांना हातात घेऊन इकडून-तिकडे हुदळायची.

एक दिवस सौच्या हातून डैडी उल्लू खाली पडला. त्याच्या कान तुटला. संध्याकाळी रियाने विचारले, "दादू डैडी उल्लूचा कान कोणी तोडला". मी उत्तर दिले 'डैडी उल्लू अणि मम्मी उल्लूचे भांडण झाले. मम्मीला उल्लूला राग आला आणि तिने डैडी उल्लूचे कान तोडले'. त्याच रात्री काही कारणामुळे तिच्या आई बाबांमध्ये वाद झाला. त्यांना भांडताना पाहून रिया म्हणाली "डैडी, मम्मी से झगड़ो मत, वर्ना कान तोड़ देगी"....त्यांचे भांडण तिथेच संपले. शेजारी काही तरी बिनसले आहे....

दुसर्या दिवशी मी कार्यालयात गेल्यावर तिची आई घरी आली. सौला विचारले. "अंकलजी ठीक है क्या". सौने उत्तर दिले, "उन्हें क्या होना था, अच्छे-भले ठीक-ठाक है". "रिया कह रही थी, उनका कान...".  सौला हसू आले, तिला कान तुटलेले डैडी उल्लू दाखविले. "अंकलजी क्या-क्या सिखाते रहते हैं."

काळ कुणाच साठी थांबत नाही, रिया मोठी होऊ लागली आणि गल्लीत खेळायला अनेक मित्र-मैत्रिणी तिला भेटल्या. हळू-हळू तिचे घरी येणे कमी झाले. एक दिवस संध्याकाळी घरासमोर रिया तिच्या मैत्रिणींसोबत खेळत होती. तिलाच पाहत दरवाज्यावर उभा होतो. तिची आईहि बाहेरच उभी होती, तिच्या हे लक्षात आले. ती रियाला म्हणाली,  रिया देखो, सामने वाले दादू आले आहेत. तिने आईकडे पाहत डोळे मिचकावत उत्तर दिले,  आता मला दादूशी काय मतलब.....आणि खेळण्यात दंग झाली. काळ बदलला आणि भातुकलीच्या खेळातील पात्र हि बदलले. 

उल्लू परिवार पुन्हा शोकेस मध्ये विराजमान झाला. 


No comments:

Post a Comment