जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टात गेला
तोचि भला.
(दासबोध १९.९.१६)
[समर्थ म्हणतात - जो स्वत:च्या कार्यासाठी दुसर्यावर विसंबून राहतो त्याच्या कार्याचा नाश होतो, म्हणून जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोचि शहाणा समजावा].
रोज सकाळी नळात पाणी येते. तरीही आपण भरून ठेवतो. टंकित पाणी साचवितो. कारण एखाद्या दिवशी नळात पाणी आले नाही तर चूळ भरायला ही पाणी मिळणार नाही याचा दिल्लीकरांना चांगलाच अनुभव आहे. आपली मुले शाळेत शिकतात. शाळा कितीही उत्तम असली तरी आपण महिन्यातून एखाद दिवस शाळेत जाऊन शिक्षकांना भेटतो आणि मुलाच्या अभ्यासाबाबत चर्चा करतो. कारण त्याची अभ्यासात प्रगती झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते.
पण आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. पण दुसऱ्यांवर डोळे बंद करून ठेवण्याचा परिणाम काय होतो. उदा. दिल्लीत सोसायटीत राहणारे भाजीपाला सुद्धा मोबाईल वर मागवितात. याचा फायदा घेऊन दुकानदार बहुधा शिळी भाजीच घरपोच करतात. परिणाम लोक ताजी भाजी म्हणजे काय हे ही विसरून गेलेले आहेत. एकदा मी एका मित्राच्या घरी आलेली शिळी भाजी परत केली आणि त्याला घेऊन त्याच दुकानात गेलो. तेंव्हा मित्राला कळले कित्येक वर्षांपासून त्याचा ओळखीचा दुकानदार त्याला शिळी आणि खराब भाजी पुरवून ताज्या भाजीचे पैसे घेत होता. त्या दिवसापासून तो स्वत: बाजारात जाऊन भाजी आणू लागला.
छत्रपति शिवाजी महाराज खात्री केल्याशिवाय कुणावर ही विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी अफजल खान वर विश्वास ठेवला असता तर स्वराज्य स्थापना झाली नसती. दूसरी कडे पंत प्रधान नेहरुंनी हिंदी चीनी भाई भाई नाऱ्यावर विश्वास ठेवला. १९६२ युद्धात भारताचा दारुण पराभव झाला.
आजच्या जगात दुसर्यावर विश्वास ठेवावेच लागतो. उदा: घर बांधायचे असेल तर ठेकेदारावर विश्वास ठेवावा लागतो. पण घराचा नक्शा पास करून घेणे, बँक मार्फत लोनची व्यवस्था करणे, सरकारी अनुमती इत्यादी बाबी स्वत:च बघाव्या लागतात. विटा, सिमेंट, लोखंड कुठे चांगले आणि स्वस्त: मिळते हे ही पाहावे लागते. ठेकेदार किती ही विश्वासू असला तरी आपल्याला जातीने उभे राहून कामावर लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा कुठे घर मनाप्रमाणे आकार घेते. अन्यथा घराचे स्वप्न, स्वप्नच राहण्याची शक्यता जास्त. दुसर्यांवर अवलंबून राहायचे असले तरी त्याच्या कामावर लक्ष हे ठेवावेच लागेल. त्या साठी थोडे कष्ट ही करावे लागतील.
ज्या कामांचे चांगले आणि वाईट परिणाम स्वत:च भोगायचे असतात. ती कामे करण्यासाठी स्वत:च कष्ट करावे लागतात अन्यथा काय होते, या वरून एक जुनी कथा आठवली.
पूर्वी इक्ष्वाकु वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते. राजा सत्यव्रताने सौपा मार्ग निवडला चक्क तपश्चर्या ऑउटसौर्स केली. ऋषी विश्वामित्र तपस्या करणार आणि सत्यव्रत स्वर्गात जाणार हे ठरले. या साठी राजा सत्यव्रताने किती सुवर्ण मुद्रा मोजल्या असतील, काही कल्पना नाही. एवढे मात्र खरे, ऋषी विश्वामित्र तपस्येला बसले आणि सत्यव्रताचे स्वर्गारोहण सुरु झाले.
आता परीक्षा देणारा एक आणि पास होणारा दुसरा, कुणालाही हे आवडणार नाही. देवतांचा राजा इंद्राला सत्यव्रताचा ऑउट सौर्सिंग प्रकार मुळीच रुचला नाही. आता विश्वामित्र सारख्या महान तपस्वी आणि इक्ष्वाकू वंशाच्या बलाढ्य राजाच्या विरुद्ध बलप्रयोग करणे देवराज इंद्राला जमणे शक्य नव्हते. पण इंद्राजवळ अप्सरा रुपी ब्रह्मास्त्र भरपूर होते. त्यांचा वापर कसा करायचा हे ही इंद्राला चांगले माहित होते. इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्रांची तपस्या भंग करण्याचा आदेश तिला. रति समान सुंदर स्त्री समोर पाहून विश्वामित्र यांची विकेट उडाली. विश्वामित्र राजाला दिलेले वचन विसरून गेले. तपस्या अर्धवट सोडून, विश्वामित्रानी मेनके सोबत संसार थाटला. राजा सत्यव्रताची गत तर ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. ते त्रिशंकू झाले. अधांतरी लटकले. त्यांची स्वर्गात जाण्याची मोहीम पूर्णपणे फसली. सत्यव्रताने तपस्या केली असती तर किमान मृत्यू नंतर निश्चितच ते स्वर्गात गेले असते.
सारांश एकच, प्रपंचातील कामे असो किंवा परमार्थ साधण्याचा मार्ग, कार्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला स्वत:च कष्ट करावेच लागतात. तेंव्हाच कार्य तडीस जाते. समर्थांच्या शब्दातच,
व्याप आटोप करती
धके-चपटे सोसती
तेणे प्राणी सदेव होती
देखता देखता.
(दासबोध १५.३.७)
No comments:
Post a Comment