Thursday, September 5, 2024

लाकूड वापरा, झाडे जगवा.

मनुष्य स्वभावाने स्वार्थी असतो. वस्तू असो व प्राणी किंवा वनस्पती ज्यात माणसाच्या स्वार्थ दडला आहे त्यांना तो जपतो. आपल्या स्वार्थासाठी त्यांचे उत्पादन वाढवितो. ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. 

तेव्हा नुकतीच सरकारी नोकरी लागली होती. सप्टेंबरचा महिना हा श्राद्धचा महिना असतो आणि याचवेळी सरकारी कार्यालयात हिंदी पखवाडा साजरा होतो. हिंदी पखवाड्यात अनेक कार्यक्रम होतात. निबंध प्रतियोगिता, अंताक्षरी प्रतियोगिता वादविवाद प्रतियोगिता, इत्यादी. या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळते. त्या काळी कार्यालयांचा वेळ सकाळी  सव्वा दहा ते संध्याकाळी सव्वा पाच हा होता. आमच्या  विभागात असे कार्यक्रम बहुदा संध्याकाळ ४ वाजता सुरु होत असे. त्यादिवशी वाद विवाद प्रतियोगिता होती. सकाळी हिंदी अनुभागाने वादविवाद प्रतियोगिता विषय सर्कुलर काढून सर्वांना कळविला. विषय आठवत नाही पण घरात लाकडाचा प्रयोग हा होता. नोकरीचे पहिलेच वर्ष होते म्हणून मी नाव दिले नाही. दुपारचे साडे तीन वाजले असतील हिंदी अधिकारी रूम मध्ये आले आणि म्हणाले पटाईतजी  तुम्ही पण भाग घ्या. मी उतरलो, माझे पहिलेच वर्ष आहे मला अनुभव नाही. अधिकारी, हसत म्हणाला, भाग घेतलेल्या शिवाय अनुभव मिळत नाही. मी तुमचे नाव सर्वात शेवटी टाकतो.दुसऱ्यांचे ऐकून तुम्ही तैयारी करू शकतात. आता माझा नाईलाज झाला,

माझ्या आधी १२ स्पर्धकांनी विचार मांडले. सर्वांनी घरात लाकडाचा उपयोग कसा कमी करावा जेणेकरून झाडांची कत्तल थांबेल. झाडे जगतील तर हिरवळ वाढेल पर्यावरणात सुधार होईल. त्यांची भाषणे ऐकता-ऐकता अचानक मनात विचार आला कृष्णा ने पूतनाचे दूध पिण्या ऐवजी रक्त प्राशन केले आणि तिचा मृत्यू झाला. पृथ्वीच्या वर जेवढे पदार्थ मिळतात त्यांचा आपण उपयोग केला तर पर्यावरणाला नुकसान होणार नाही आणि पृथ्वी ही नष्ट होणार नाही. 

भाषणाची सुरवात करत मी म्हणालो पूर्वी वसंत कुंज कुणी भागात अरावलीच्या टेकड्या होत्या. त्यावर जंगल होते. बिबट्या, कोल्हे, ससे इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य होते.  रोडी आणि स्टोन डस्ट साठी त्या सर्व टेकड्या माणसांनी खोदून टाकल्या. नंतर त्यात कचरा भरून  वसंत कुंज सारखी श्रीमंतांची कॉलोनी बनली.  एकच हशा उमटला. घरांसाठी लोखंड अल्युमिनियम सिमेंट सर्वच आपण पृथ्वी खोदून बाहेर काढतो.  या सर्वांसाठी ऊर्जा लागते. त्यासाठी कोळसा खोदून काढावा लागतो आणि समुद्रातून हलाहल  विष अर्थात पेट्रोल ही काढावे लागते. तिथले जंगल नष्ट होतात. प्राणी पशू  पक्षी लुप्त होतात.  पन्नास ते शंभर वर्षांच्या आत ही घरे पडतात. त्यांच्या अधिकांश मलबा पुन्हा वापरता येत नाही.भूकंप आला तर लोकांना जिवंत काढणे ही कठीण असते.  मृत शरिरांना जमिनीत पुरले तर कब्रिस्तान भयंकर वेगाने जमीन गिळंकृत करतील. दिल्लीत हजारों एकड जमीन कब्रिस्तान ने गिळंकृत केली आहे. हीच स्थिती सर्वत्र आहे. 

आता लाकडांचा वापर केला तर काय होईल. गावांत आज ही जुन्या घरांचा भिंती बांधताना माती आणि बांबूचा वापर होतो. वरचा माला बांधायचा असेल तर लाकडांचा वापर होतो. छत खपरेल, नारळाची पाने इत्यादी पासून बनत असे. उन्हाळ्यात ही घरे थंड राहत असे. घरातील फर्निचर, दार, खिडक्या, पलंग  कपाट  लाकडांचेच बनविले पाहिजे. घर पडल्यावर माती पुन्हा वापरली जाऊ शकते. खराब लाकूड जाळण्याच्या कामी येते. स्मशानातील एका चितेवर वर्षात ६० ते ७० लोकांना मुक्ती मिळते.त्यासाठी दहा बारा झाडांचे लाकूड लागेल. वीस वर्षांत एक झाड कापण्या लायक होते. त्याकाळात त्याने भरपूर प्राणवायू दिली असते. चितेच्या  धुरापेक्षा शंभर पट तर निश्चित. पर्यावरण वाचवायचे असेल तर लाकूड बांबू इत्यादींचा जास्तीसजास्त वापर केला पाहिजे. ह्या सर्व वस्तू पृथ्वी वरच मिळतात. तिच्या शरीरावर घाव करायची गरज नाही.

 प्रश्न फक्त झाडे लावण्याचा आहे. व्यवसायिक रीतीने झाडांच्या शेतीला प्रोत्साहन दिले तर झाडांची संख्या वाढेल. जंगल ही वाढेल. पशू पक्षी इत्यादींची संख्या वाढेल. वातावरणात प्राणवायू ही वाढेल.  पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम राहील. तीन मिनिटांचे भाषण पूर्ण झाले,सर्वांनी टाळ्या वाजविल्या.  मला ही पहिले बक्षीस मिळाले. 


 

No comments:

Post a Comment