Saturday, August 31, 2024

इतिहासाची परिचय: शाळेतील ऐतिहासिक एन्काऊंटर

मी शाळेत होतो तेव्हा दिल्लीत अकरावी बोर्ड होता. आमची शेवटची बैच होती. शाळेचे नाव जरी नूतन मराठी असले तरी शाळेत शिकणारे ८० टक्के विद्यार्थी पाकिस्तानातून आलेले पंजाबी, मुलतानी आणि सिंधी शरणार्थी होते. पंधरा-वीस टक्के मराठी आणि दाक्षिणात्य विद्यार्थी होते. आज बहुतेक मराठी मुलांची संख्या दहा पेक्षा कमी असेल कारण करोल बाग  आणि जुन्या दिल्लीत मराठी लोकं बोटावर मोजणारे असतील. आठवीत मला संस्कृत मध्ये 90% मार्क्स मिळाले होते. मला लहानपणापासून वाचनाची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी जुन्या दिल्ली स्टेशन समोरच्या दिल्ली पब्लिक लाईब्रेरीचा सदस्य झालो होतो. हजारों हिंदी पुस्तके वाचली होती. नववीत हिंदी विषय घेण्याचा निश्चय केला. हिंदी शिकविणाऱ्या शिक्षक रमेशचंद्रांना एका मराठी विद्यार्थीने हिन्दी विषय घेतला याचा आनंद झाला. त्या काळात हिंदीत टॉपरला ही 75% मार्क मिळत नव्हते. नूतन मराठी शाळेची जयमंगला शास्त्री आर्ट्स मध्ये दिल्लीत प्रथम आली होती तिचे एकूण मार्क्स फक्त ७७ टक्के होते. संस्कृत मध्ये तिला ८० टक्यांच्या वर मार्क्स निश्चित मिळाले असतील. या शिवाय आर्ट्स विषय घेऊन आनंद कुलकर्णी (निवृत आयएएस) ही दिल्ली बोर्डात प्रथम आला होता. त्याकाळी टॉपर्सला कॉमर्स मध्ये ८०% पेक्षा कमी आणि सायन्स मध्ये ८५% पेक्षा  कमी राहत होते. 

आमच्या शाळेत बनारसचे शास्त्री सर संस्कृत शिकवायचे. हातात छडी घेऊन संस्कृत शिकवणारे बहुतेक ते एक मात्र शिक्षक असतील. संस्कृत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी वर ते मेहनत घेत असे, त्यामुळे संस्कृत शिकणाऱ्या दहा पैकी आठ विद्यार्थ्यांना 75 टक्के पेक्षा जास्त मार्क मिळायचे (त्याकाळचे 75 टक्के म्हणजे आजचे 90 टक्के). बहुतेक सर्वच मराठी मुलांना 75 टक्के पेक्षा जास्त मार्क अकरावी बोर्डात मिळायचे. मी नववीत हिंदी विषय घेतला ही बातमी समजतात त्यांनी मला बोलावले. मला आठवते, हातात छडी घेऊन ते खुर्ची वर बसले होते. टेबल समोर मी उभा राहिलो. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी तोफ डागली. पटाईत, तुला पागल कुत्रा तर नाही चावला. मी नकारार्थक मान डोलवली.  मग हिंदी का घेतली? मी, "मला हिंदी आवडते". तुम्ही मराठी मुले हिंदी लिहिताना भयंकर चुका करतात. हिंदीतील सर्व मात्रा मराठी पेक्षा उलट्या आहेत. नापास होशील. मी, सर मला माहित आहे. मी चुका करणार नाही. ते प्रेमाने म्हणाले, बाळ तुझी हिंदी कितीही चांगली असेल तरीही 75 टक्के मार्क मिळणार नाही. संस्कृत घेशील तर तुला सहज ८० टक्के पेक्षा जास्त मार्क मिळतील आणि अकरावीत फर्स्ट डिव्हिजन ही येईल. हिंदी भाषा तर पंजाबी, मुलतानी शरणार्थी मुलांसाठी  आहे त्यांना जोडाक्षरांचे उच्चारण करता येत नाही  याशिवाय "ळ" शब्दही बोलता येत नाही. त्यांची मजबुरी आहे, तुझी नाही. आता मला राहावले नाही, आपले  इतिहासाच्या  पुस्तकात वाचलेले दिव्य ज्ञान त्यांच्यासमोर प्रगट केले. मी म्हणालो, सर, संस्कृत बोलणारे आर्य मध्य आशियातून येऊन सप्तसिंधू प्रदेशात निवास करू लागले होते. तुम्ही चूक.... शास्त्री सरांना उलटून बोलणारा विद्यार्थी मुळीच आवडत नव्हता. समोरच्या टेबलवर  छडी जोरात आपटत ते म्हणाले, मूर्ख आणि  गाढव आहेत ते. आर्य जर खरोखर असतील तर ते दक्षिण भारतीय असतील. बाकी तुला खड्ड्यात उडी मारायची असेल तर मार. हिन्दी घेतली तर तुझी फर्स्ट डिव्हिजन  येणार नाही, याची शंभर टक्के खात्री देतो. शास्त्री सरांची वाणी सत्य झाली.  भरपूर मेहनत घेऊनी हिंदीत मला फक्त ५४ टक्के मार्क मिळाले. सात मार्कांनी फर्स्ट डिव्हिजन हुकली. (संस्कृत घेतली असती तर 80 टक्के मार्क्स निश्चित मिळाले असते).  रिझल्ट घ्यायला शाळेत गेलो होतो तेव्हा शास्त्री सरांची नजर चुकविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला सोडले नाही. भरपूर कान उपटले. पुढे अनेक वर्ष शास्त्री सर संस्कृत घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझे उदाहरण देत होते. शास्त्री सरांचे न ऐकण्याचा परिणाम मला भोगाव लागला होता. बाकी माझ्या मोठ्या बहिणीने संस्कृत साहित्यात एम.ए. केले  आणि लहान भावाला ही बारावीत संस्कृत मध्ये 85 टक्के मार्क   मिळाले होते.

संस्कृत आणि विंध्यपार भाषांमध्ये सापडणारे अनेक शब्द पंजाब ते युरेशिया कोणत्याही भाषेत सापडणार नाही. त्यांना संस्कृत बोलणे अवघड जाते.  ऋग्वेदातील पहिला शब्दच "अग्निमिळे..." आहे.  साहजिकच आहे, आज ही जेंव्हा उत्तर भारतात चतुर्वेद पारायण यज्ञ होतात,  वेदज्ञाता ब्राह्मण दक्षिण भारतातून येतात. त्याचे कारण हेच. एवढेच काय हरिद्वार येथील एका अश्याच यज्ञात योगगुरू ने ही कबूल केले त्यांना गुरुकुलच्या  विद्यार्थ्यांना वेद पाठ असेल तरी  दाक्षिणात्य लोकांसारखे  उच्चारण जमणे शक्य नाही. 

आर्य नावाचा कबीला खरोखरच अस्तित्वात होता, तर तो दक्षिण भारतात कुठे तरी राहत असेल. युरेशियन असण्याचा प्रश्नच येत नाही. या शिवाय त्या भागात कुबड असलेल्या गायी ही नाहीत. जर आर्य मध्य आशियातून आले असते तर घोड्यांवर स्वार होऊन आले असते. ऋग्वेदातील इंद्र सेनेच्या सेनापती मुद्गलानीच्या रथाला बैल ऐवजी घोडे जुंपलेले असते. घोडे दुर्मिळ असल्यामुळेच घोड्यांच्या बदल्यात राजकुमारी माधवीच्या कथेचा जन्म झाला.

ब्रिटिशांना भारतीयांवर सदैव विदेशी राज्य करतात हे सिद्ध करायचे होते. आजच्या शासकांना हिंदू मत विभाजित करून थोक मतांच्या मदतीने निवडणूक जिंकायची असते. त्यांची लाचारी कळते. पण जेंव्हा शिक्षित लोक लेखन करताना ही स्वतचे डोके वापरत नाही तेंव्हा असे वाटते ते गुलामी मानसिकतेत जखडलेले आहे आणि स्व:विचार करण्याची क्षमता विसरून गेले आहे. या शिवाय देशात आजगायत  किमान दहा हजार जागी उत्खनन झाले आहे. सर्वच ठिकाणी हजारों वर्ष पूर्वीच्या मानवीय वसाहती मिळाल्या आहेत.  हे उत्खनन ASI आणि अनेक विश्वविद्यालयांनी केले आहे. पण   सर्व उत्खनांचे आकडे आणि निष्कर्ष एका ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयास एएसआय ने अजून ही केलेला नाही. आज देशातील एक विश्वविद्यालय हे आकडे एकत्र करत आहे. तरीही भारतातील प्राचीन वसाहतींची संख्या बघता, प्राचीन काळात भारतातून माइग्रेशन झाले असेल. आज ही मोठ्या प्रमाणात माइग्रेशन होत  आहे. 

बाकी आर्य हा स्वभावसूचक शब्द आहे.  कुळ आणि जातीशी काही एक संबंध नाही.



No comments:

Post a Comment