Wednesday, August 28, 2013

मोर पंखी कावळा



एक  काळा कावळा, मोरांच्या देशी  गेला.

मोर पंखी ‘बपतिस्मा’, लाऊन घरी परतला.



‘श्रेष्ठत्वाची’ जाणीव, त्याला आता झाली.

पोरांसाठी  वेगळी, ‘संस्कृती’ शाळा बांधली.

जेवणाची सोय ही, त्याने वेगळी केली.



पाण्याची विहीर आता, कालबाह्य होती.

‘त्यागण्या’ साठी बांधले, टॅायलेट चकाकी.



सुगंधित लहारदार, कोक पेक्षा स्वादिष्ट

आवडत होते त्याला, त्याचेच  शिवाम्बू

कुणा शुद्राच्या घामाच्या, दुर्गंधी कसे झाले?

मोरपंखी कावळ्याची, इनसल्ट कोणी केली?



तुझ्यास पूर्वजाने, केली होती विहीर अशुद्ध.   

तोडले होते तेंव्हा, त्याचे हात नी पाय.

कावळ्या वर ही करू, अनुशासनात्मक कार्यवाही.

वाळीत त्याला टाकू, तबाह करू करिअर.



काळ बदलला, मुखौटे बदलले

रूप बदलूनी, मोरपंख लाविले



मानसिकता मात्र, बदलली नाही.  

उच्चाधिकारी झाले, कालचे ब्राम्हण.

Sunday, August 25, 2013

नाणे (गूढ कथा)/शतशब्द कथा


ब देशाचा राजा: "तुमचे नाणे दुप्पट वजनी असल्यामुळे आम्हाला एका नाण्यांसाठी दोन नाणे मोजावे लागतात".

अ देशाचा राजा: " तुमच्या कारीगरांना, आमच्या येथे पाठवा, आम्ही त्यांना आमच्या सारखे नाणे बनविणे शिकवू".

कारीगर वजनी नाणे बनविणे शिकून आले. 

ब देशाच्या राजाने त्यांना अ देशापेक्षा दुप्पट वजनाचे नाणे बनविण्याचे आदेश दिले.

कारीगरांनी नाणे बनविले.  नाणे पाहून देशाच्या राजाने डोक्यावर हात मारला. शिकल्या प्रमाणे कारीगराने देशाचेच नाणे बनविले होते.

आता ब देशाला अ देशाच्या एका नाण्यासाठी ४ नाणे द्यावे लागतात.

ज्याला कळला कथेचा अर्थतोच असेल खरा अर्थतज्ञ.

Saturday, August 17, 2013

अथ: जंगल कथा /शर्यत


फार पूर्वी नंदनवनात दरवर्षी ‘ससा कासव शर्यतीचे' आयोजन केले जात असे. दहा मैलाची ही शर्यत नेहमीच ‘कासव’ जिंकायचे. या शर्यतीत सस्यांवर अन्याय होतो म्हणून त्यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकला. शर्यतीची परंपरा बंद पडली. महाराज शेरखान सिंहासनावर विराजमान झाल्यावर बंद पडलेली शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी सर्व पक्षांना पाचारण केले. चर्चा सुरु झाली. सस्यांचा राजा म्हणाला– सभासदानों, आम्ही ससे जोरात धावू शकतो पण  जास्त अंतर धावणे आम्हाला शक्य नाही. आपणास माहीत आहे, आजकाल माणसांनी टेस्ट क्रिकेट एवजी २०-२० IPL सुरु केले आहे. तसेच ससा-कासव शर्यत १०० मीटरची केली तरच ससे यात भाग घेतील. महाराजांनी कासवांच्या राजाला विचारले, आपले काय म्हणणे आहे, कासव राज. कासवांचा राजा म्हणाला, महाराज, ‘ससा-कासव शर्यतीची परंपरा’ पुन्हा सुरु करण्यासाठी, आम्ही कुठला ही त्याग करायला तैयार आहोत. आम्हाला सस्यांनी सुचवलेले फेर-बदल मान्य आहे. ससा जिंको किंवा कासव हे गौण आहे, परंपरा अक्षुण, राहिली पाहिजे, हे महत्वपूर्ण. सर्व सभासदांनी साधु-साधु म्हणत, कासव राजाच्या उदात्त विचारांचे स्वागत केले. 

नंदन वनात शर्यतीची तैयारी सुरु झाली. तवाकीच्या सट्ट्याचा धन्ध्याला ही जोर चढला. नंदन वनातले अधिकांश  प्राणी या वेळी सस्यांवर ‘पैज’ लावीत होते.  शर्यतीच्या अगोदरच्या रात्री तवाकी, महाराज शेरखानला  म्हणाला, महाराज आपण कुणावर ‘पैज’, लावणार? महाराजांनी तवाकीला जवळ बोलविले आणि हळूच त्याच्या कानात काहीतरी पुटपुटले.

शर्यतीचा दिवस उगविला. शर्यतीचे उद्घाटन करताना  महाराज शेरखान म्हणाले, वर्षांपासून खंडित पडलेली परंपरा आज पुन्हा सुरु होते आहे, हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. काळाप्रमाणे या शर्यतीचे नियम हि बदलले आहे. आता ही शर्यत १०० मीटर धावण्याची होणार. पण आम्ही कुणावर हि अन्याय होऊ देणार नाही. शर्यत जरी ही १०० मीटर धावण्याची असेल तरी ही त्यात ५० मीटर  जमीनीवर आणि उरलेले ५०  मीटर पाण्यात अर्थात तलावात होईल.

आधीच कबूल केल्यामुळे, सस्यांचा नाईलाज झाला. एका सस्याला शर्यतीत भाग घ्यावा लागला. पहिले ५० मीटर सस्याने काही क्षणात पूर्ण केले पण पुढे पाणी होते.. हिम्मत करून ससा तलावात उतरला. ससा तो शर्यत पूर्ण करू शकला नाही.....

कासवाने आरामात चालत आणि पोहत शर्यत जिंकली. त्यारात्री शेरखानच्या महाली, तवाकी आनंदाने उद्गारला,  ‘फिक्सिंग सम्राट महाराज शेरखानाचा विजय असो’, चीअर्स! तीन जाम एकत्र वाजले

Wednesday, August 7, 2013

शतशब्द कथा - काय चुकल???


रात्री पोलिसांनी तिथे छापा मारला. उच्च शिक्षित परिवारांची प्रतिष्ठित शाळेत शिकणारी १५-१८ वयोगटातील पोरांना नशेच्या त्या अवस्थेत पोलिसांनी पकडले. त्यांना दम देऊन सोडण्यात आले. त्यात सोनल ही होती.

सोनलची आईचे बडबडने सुरु होते, "अशीच वागत राहिली तर समाजात तोंड दाखवायला ही जागा उरणार नाही." सोनल ओरडली, "बSSस! तुझे प्रवचन ऐकून कान पिकले माझे! काय केलं मी, हं थोडी विस्की घेतली, मित्रां बरोबर मजा केली, एवढेच नं. घरात काकटेल पार्टी होते, आणि तुझे डान्स मॅनर, त्या दिवशी उघड्या पाठीचे स्लिव्हलेस घालून, सर्वांसमोर बासच्या गळ्यात-गळे घालून नाचत होती आणि त्याचा हात..."

खटाक... सोनल किंचाळली. सोनलचे वडील मतिभ्रष्टा सारखे माय-लेकींना ओक्साबोक्सी रडताना बघत विचार करत होते, आपल काय चुकल???

Sunday, August 4, 2013

एक सीट का सवाल है बाबा




अस्मादिकांना एलर्जी, हृदय आणि मणक्याच्या दुखण्याचा त्रास असल्या मुळे मेट्रोत तास भर उभे राहून प्रवास करणे त्रासदायक.  म्हणतात न ‘जहाँ चाह, वहाँ राहबसायला सीट कशी मिळवावी या वर बरेच विचार मंथन केले. वय  मोठ दिसाव म्हणून पांढऱ्या झालेल्या केसांना रंगविणे सोडून दिले.

मेट्रोत चढल्या बरोबर, सीट वर बसलेल्या लोकांचे निरीक्षण करतो.  तरुण दिसत असलेल्या व्यक्ति जवळ उभे राहून विनम्र आवाजात थोडी जगह मिलेगी क्या' म्हणून विचारतो. तरुण व्यक्ती सभ्य असल्यात पांढऱ्या केसां कडे पाहून थोडीशी जागा बसायला देतो. एकदा ‘बुडटेकवायला जागा मिळाली की डोळे बंद करून ‘चीन प्रमाणे हळू हळू संपूर्ण सीट गिळंकृत करण्याच्या प्रयास सुरु करतो'. शेवटी तो सभ्य व्यक्ति त्रासून जागा सोडून उठून जातो. बसायला संपूर्ण जागा मिळते.

पण अधिकांश यात्री सभ्य नसतात, ते बसल्याबरोबर डोळे बंद करून झोपेचे नाटक करतात. या वर ही उपाय शोधला. (सकाळी उत्तम नगर पर्यंतचा रिक्षा करून रूट क्र. ७४० मधून सचिवालय पर्यंतचा प्रवास बसून करतो. त्या स्टेंड जवळ एक भिकारी ‘एक रुपये का सवाल है बाबा' म्हणत कित्येक वर्षांपासून भीक मागतो आहे, नेहमीचा असला तरी, त्याचा अत्यंत केविलवाणा चेहरा पाहून, त्याचा हातावर १-२ रुपये न कळत ठेवतोच.) आपल्याला सीट देऊ शकेल असा शिकार शोधून (३०च्या आतला) मनातल्या मनात त्या भिकाऱ्याचा चेहरा डोळ्यांसमोर आणतो, त्याचाच सारखा अत्यंत केविलवाणा दीनहीन चेहरा करत ‘शिकारच्यासमोर उभा राहतो व एका हात तोंडावर ठेऊन खोकला येत नसला तरी लक्षवेधण्या साठी खोकलण्याचे नाटक सुरु करतो. सीट वर बसलेल्या व्यक्तीला डोळे उघडावेच लागतात, आपल्या समोर उभ्या आलेल्या व्यक्तीची प्रकृती ठीक दिसत नाही हे पाहून, बहुधा त्याचा हृदयात दयेचा पाझर फुटतोच आणि मला बसायला जागा मिळतेच.

पण समजा असे घडले नाही, तरी ही खोकलण्यामुळे, खेटून उभ्या असलेल्यांना त्रास हा होतोच, त्यातला एखादा म्हणतोचदेखते नहीं अंकलजी को तकलीफ हो रही है’, बेचारा तो तरुण व्यक्ति मजबूरन आपली सीट सोडतो. सीट वर बसल्याक्षणी डोळे बंद करून झोपेचे नाटक सुरु करतो. उत्तम नगर आल्यावरच डोळे उघडतो.

पुष्कळदा मला वाटते माझ्यात आणि त्या भिकाऱ्यात काही ही फरक एवढाच तो पैश्याची भीक मागतो आणि मी सीटची.

Sunday, July 28, 2013

प्रेम आणि गालावरचे खड्डे



मुंबईत रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या बातम्या दूरदर्शन वर येत होत्या, माझ्या एका मित्राने या बाबत मला काही प्रश्न विचारले. त्याच्या मनातले बहुतेक प्रश्न आपण सर्वांच्याच मनात डोकावत असेल. म्हणून विचारलेल्या प्रश्नांचे समाधान कारक उत्तर देण्याचा प्रयत्न मी इथे केला आहे.

पहिला पाऊस पडल्याबरोबरच मातीचा सुगंध सर्वत्र दरवळतो. हिरव्यागार वस्त्रांनी नटलेली धरती, हिरव्या शालू नेसलेली भारतीय परंपरेत वाढलेल्या नववधू सारखी दिसते. पतिदेवांच्या  पहिला-पहिला स्पर्श होताच, आपली भारतीय नववधू लज्जेने चूर-चूर होते. तेंव्हा तिच्या गालावर सुंदर-सुंदर खड्डे पडतात. खड्डे पडलेल्या सुंदर, मोहक आणि मादक पत्नीस पाहून, पतीदेव तिच्या वर प्रेमाचा वर्षाव करणारच.  त्याच बरोबर गालावर लज्जेचे खड्डे ही अधिक पडणारच. 


आपले रस्ते ही आपल्या भारतीय परंपरेला जपणारे आहेत. कितीही डाबर किंवा सिमेंट कांक्रीटनी बनलेले असो, पाऊसाचा प्रथम प्रेमळ स्पर्श झाल्या बरोबरच, नववधू सारखे रस्ते लज्जेने चूर-चूर होतात आणि त्यांचा गालावर खड्डे पडतात. रस्त्याचं हे सुंदर मोहक रूप पाहून, प्रेमाचा पूर हा रस्त्यावर वाहणारच आणि मोठ्या संख्येने रत्यावर खड्डे ही पडणारच. त्यात नवल काय?  पुन्हा प्रश्न उभा राहतो, आपल्याच देशात रस्त्यांवर खड्डे का पडतात? पाश्च्यात देशांत का नाही? उत्तर सोपे आहे, पाश्चात्य देशांत, जिथे लोकांना सार्वजनिक प्रेम प्रदर्शन करण्याची मुभा आहे. तिथली नववधू पहिल्या रात्रीत लाजत नाही आणि तिच्या गालावर खड्डे ही पडत नाही. मग प्रेम वर्षावाचा प्रश्नच येत नाही. प्रेमाच्या अभावी त्यांचा संसार ही फार काळ टिकत नाही.(हा वेगळा भाग आहे). मुद्दा हा, तिथले रस्ते ही तिथल्या स्त्रीयांसारखे लज्जेहीन असतात,  मग त्यांच्या गालांवर खड्डे पडणार तरी कसे?

माझ्या मित्राने पुहा प्रश्न विचारला, पाऊसाचे आणि रस्त्यांचे प्रेम -बीम हे सर्व ठीक आहे. पण त्यांच्या प्रेमाचे परिणाम आपल्याला का भोगावे लागतात? दरवर्षी कित्येक वाहने खड्यात पडतात, कित्येक लोक जखमी होतात, कित्येकांची तर थेट  रवानगी देवाघरी होते. शिवाय दररोज होणारऱ्या ट्राफिक जाम मुळे कार्यालयात पोहचायला उशीर होतो व घरी यायला ही.


मी उतरलो, दोन जीव प्रेमात मग्न असताना, त्यांना त्रास देणे योग्य नाही. अशा वेळी रस्त्यांवर जाणे म्हणजे त्यांचा प्रेमात बाधा उत्पन्न करणे होय. प्रेमी जीवांना त्रास देणाऱ्यांना देव क्षमा करत नाही. अश्या लोकांना परिणाम भोगावेच लागतात. त्यात रस्त्यांचा काय दोष. पाऊस सुरु असताना चक्क दांडी मारून घरी बसावे हेच योग्य. म्युनिसिपाल्टी ने किती ही खड्डे बुजविले तरी ही प्रत्येक पाऊसात रस्त्यांच्या गालावर खड्डे हे पडणारच कारण पाश्चात्य स्त्रियांप्रमाणे आपल्या रस्त्यांनी लज्जा सोडलेली नाही. पाऊस आल्यावर त्यांचा गालावर खड्डे हे पडणारच उगाच म्युनिसिपाल्टी किंवा रस्त्याला शिव्या देण्यात अर्थ नाही. प्रारब्धाचा स्वीकार करावा हेच योग्य. असो

Saturday, July 20, 2013

कविता, मीटर आणि मी


माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला, आजकाल आमी बी कविता करू लागलोआहे, असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर? असे म्हणत ‘मजबूरी का नाम महात्मा गांधी’ या धर्तीवर’ तो कवितेची चोपडी चाळू लागला. मी ही कान टवकारून, त्याच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. थोड्या वेळानी तो उद्गारला, लेका, कविता छान आहे, आवडल्या (?), पण एक ही कविता मीटरमध्ये नाही, आणि खरंच सांगतो, बिना मीटरच्या कवितेची मार्केट वेल्यू नसते, कवीला प्रतिष्ठा ही मिळत नाही आणि मोबदला ही, असे म्हणत एखाद्या खलनायका प्रमाणे माझ्या कडे पाहत, तो खदा-खदा हसू लागला. त्या वेळी त्याचा चेहरा, मला चक्क ब्रूटस सारखा वाटला, ‘ब्रुटस तुम भी’ एवढेच म्हणायचं काय ते राहिलं. पण एक खरं त्याचा घाव जिव्हारी लागला. त्या दिवसापासून एक ही कविता सुचली नाही.

कवितेच मीटर म्हणजे काय, हा एकच प्रश्न सतत डोक्यात घोळू लागला. आज सकाळी विजेचे बिल आले. आजकाल विजेचे बिल पाहून हादरा हा बसतोच. किती ही कमी वीज वापरली तरी बिल दीड-दोन हजारापेक्षा कमी येत नाही. विजेचे निजीकरण झाल्याचा परिणाम. कंपनीने जुने मीटर बदलले, नवीन डिजीटल मीटर आले, ते वेगाने पळतात. ऊर्जा मंत्रालयात काम करणाऱ्या एक सहकर्मिला, या बाबतीत विचारणा केली होती. तो म्हणाला, मीटरच्या अचूकते बाबत काही प्रतिशत (+, -) ची सूट निजी कंपन्यांना मिळाली आहे, त्याचा गैरफायदा या कंपन्या घेतात. सर्वच मीटर (+) असतात. निष्कर्ष- मीटर आहे म्हणून आपण विजेचे बिल देतो, ‘मीटर वेगाने पळतात, आणि आपल्याला वीजेसाठी जास्त पैसा मोजावा लागतो’. दिल्लीत आटो, पूर्वी कधीच मीटरने पळत नसे, आजकाल मीटरने जायला तैयार राहतात. कारण नवीन मीटर आटोपेक्षा ही जास्तवेगाने पळतात. गेल्या रविवारी कुठे बाहेर जायचे होते, गल्लीत एक आटो उभा होता, आटोवाल्याला विचारले, तो म्हणाला साहब मीटर खराब है, मीटर ठीक होने तक सवारी नाही बिठा सकता, मी- बिना मीटर के चल. तो- ‘बिना मीटर के में मुफ्त में भी किसी को नही ले जा सकता, चलान कट जायेगा’. माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली, प्रकाश पडला, एक - बिना मीटर आटो ही रस्त्यावर धावू शकत नाही, दोन- ‘मीटर असेल तरच मोबदला मिळतो’.

त्याच संध्याकाळी, एका कवी/ गीतकारची मुलाखत दूरदर्शन वर पहिली. तो म्हणत होता, त्याला संगीतकाराच्या चालीवर गाणे लिहिणे जास्त सौपे वाटते, कविता पटकन मीटरमध्ये बसविता येते. कविता आधी लिहिली असेल तर चालीनुसार मीटरमध्ये बसविणे कठीण जाते. हा त्याचा अनुभव. मीटर मध्ये बसणाऱ्या कविता लिहिणाऱ्या गीतकाराला नक्कीच भरपूर मोबदला मिळत असेल. खरंच जिथे मीटर तिथे मोबदला/ पैसा. मग विजेचे मीटर असो, आटोचे असो किंवा कवितेचे.

डोक्यात गोंधळ माजला, अनेक प्रश्न उभे राहिले, विवेक पटाईत तुम्ही मीटर मध्ये कविता लिहू शकतात का? हृदयातून उत्तर आले - शक्यच  नाही. बिना मीटरच्या कवितेला बाजारात किंमत नाही, मग तुम्हाला आयुष्यात कधी प्रतिष्ठा आणि नाव मिळेल का? प्रतिष्ठा व नाव नसलेल्यांना कविसंमेलनात कुणी बोलवतो का? कुणी कविता छापतो का? माझ्या एका दिल्लीकर कवी मित्राने स्वत:च्या खर्चाने नागपूर हून आपले दोन-तीन कविता संग्रह प्रकाशित केले आहे (५००च्या आवृतीचे, १५ ते वीस हजार खर्च येतो असे तो म्हणाला होता). पुस्तके किती विकल्या गेली त्यास माहीत नाही. कारण रॉयल्टी त्याला कधीच मिळाली नाही.

आपण काय विचार करतो आहे, या विचाराने मला माझेच हसू आले. तुलसीदासाला कुठल्या ही राजाच्या दरबारी ‘राजकवीचे’ पद सहज मिळाले असते. पण तुलसीदासाने काशीच्या घाटावर, स्वांत सुखाय ‘रामचरितमानस रचले’ होते, कुठल्या ही मोबदल्याचा विचार न करता. त्या वेळी आत्मशून्य झालेल्या लोकांना राक्षसी शक्तींविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणे हाच रामचरितमानस रचण्याचा त्यांचा कदाचित उद्देश्य असेल. शेवटी स्वत:लाच म्हणालो, विवेक पटाईत, आजचे प्रश्न कवितेच्या माध्यमातून उभे करू थोडे ही यश मिळाले, तर काही मिळविण्याचे समाधान नक्कीच मिळेल. मग कविता मीटर मध्ये असो किंवा नसो.

Sunday, June 30, 2013

वृक्षांचे देवत्व


मुले ब्रह्मा त्वचा विष्णू शाखायाम तु शंकर:
पत्रे-पत्रे तु देवानाम् वृक्ष राज नमोस्तुते.

वृक्षांच्या मुळांमध्ये साक्षात ब्रह्मदेव निवास करतात. वृक्षांची त्वचेत भगवान विष्णु, फांद्यांमध्ये भगवान शंकर निवास करतात. पाना-पानात देवतांचा निवास असणार्‍या वृक्षराजाला मी नमस्कार करतो.

वृक्षांच्या विना मानव जातीच्या अस्तित्वाची कल्पना ही अशक्य आहे, आपल्या प्राचीन ऋषींना हे माहीत होते. वृक्ष पर्यावरणला शुद्ध करतात, घर आणि यज्ञा साठी लाकूड प्रदान करतात, क्षुधा शांत करतात आणि रोगांपासून आपल्याला मुक्त करतात (अशी आख्यायिका आहे - आयुष्यभर अध्ययन करून ही ‘चरकला’ एक ही वनस्पती किंवा वृक्ष सापडला नाही की ज्यात औषधीय गुण नाहीत).

पुराणात वृक्षांचे महत्व सांगताना महर्षि व्यास म्हणतात जो मनुष्य पिंपळ,
चिंचेचे, वट आणि कडू लिंबाचे एक-एक झाड, बिल्व आणि आवळ्याचे तीन-तीन आणि आंब्याचे पाच झाडे लावेल तो कधीही नरकात जाणार नाही. गीतेत ही भगवंताने ‘अश्वत्थ सर्व वृक्षाणाम’ वृक्षांमध्ये मी अश्वत्थ (पिंपळ) हा वृक्ष आहे असे म्हटले आहे. वृक्षांची महिमा सांगताना ऋषि म्हणतात एक वृक्ष दहा पुत्रांच्या बरोबर आहे. [(विष्णु धर्मसूत्र (१९/४)].

वृक्षांच्या रक्षणासाठी वृक्षांवर देवतांचे निवास स्थान आहे, ही परिकल्पना लोकांच्या मनात रुजविण्यचा प्रयत्न आपल्या प्राचीन ऋषिंनी केला. वट वृक्षावर –ब्रह्मा, विष्णु आणि कुबेर यांचे निवास तुळशी वर लक्ष्मी आणि विष्णु, सोमलता-चंद्रमा, बिल्व –शंकर, अशोक-इंद्र, आंबा –लक्ष्मी , कदंब- कृष्ण, पलाश-ब्रह्मा आणि गंधर्व, पिंपळ – विष्णु, औदुंबर – रुद्र आणि विष्णु, महुआ –अचल सौभाग्याचे आशीर्वाद देणारा वृक्ष (बंगालच्या अकाल च्या वेळी ज्या गावांत महुआची झाडे होती, तेथील गावकर्यांनी या झाडाच्या वाळलेल्या फुलांपासून बनलेल्या पोळ्या खाऊन आपले रक्षण केले, असे एका लेखात वाचले होते).

शेवटी कवी नीरजची कवितेतील एक अंश -

खेत जले, खलिहान जले,
सब पेड जले, सब पात जले.
मेरे गांव में रात न जाने कैसा पानी बरसता था.

हा अनुभव आपण आत्ताच घेतला आहे.

Tuesday, June 25, 2013

गूढ कथा: वृत्रासुर आणि पर्वतांत कैद नद्या


वेदांमध्ये कथा आहे. वृत्रासुराने नद्यांना पर्वतांत बंदिस्त केले होते. इंद्राने वज्राच्या प्रहाराने पर्वतांचे हृद्य फोडले आणि नद्यांना मुक्त केले. आज आपण वृत्रासुर प्रमाणेच पुन्हा नद्यांना पर्वतात बंदिस्त करतो आहे. याचा परिणाम आपल्याला भोगावेच लागेल. (इंद्र: अग्नी, वायू आणि जल या तिन्ही प्राकृतिक शक्तींचा स्वामी आहे. प्रकृतीच्या या शक्तीं बरोबर सहयोग करण्यात शहाणपणा असतो. या शक्तींवर विजय मिळविण्याचा प्रयत्न म्हणजे विनाशाचा मार्गावर चालणे.)

इंद्राच्या वज्राने, 
हृद्य फोडले पर्वतांचे.
बंदिस्त नद्या मुक्त केल्या
सकळ प्राणी सुखिया झाला.
 
पर्वतांत कैद केल्या नद्या,
बांधुनी धरणे
‘इंद्राचा’ क्रोध अनावर झाला
सकळ प्राणी दुखिया झाला.

नद्यांना आपल्या स्वार्थासाठी पर्वतांत कैद करण्याचा परिणाम ही आपल्याला भोगावे लागेल. 

 




Sunday, June 16, 2013

पुन: एकलव्य : नियतीचा खेळ


एकलव्य चित्रगुप्त समोर उभा होता पण त्याचे मन अशांत होते. चित्रगुप्तने आपला निर्णय ऐकविण्याआधी, आपल्याला एकदा तरी बोलायची संधी द्यावी असे त्याला वाटत होते. तेवढ्यात चित्रागृप्ताने निर्णय दिला, एकलव्य तुझ्या हातून पापकर्मे घडली नाही आहेत, त्या मुळे तुला नरकात पाठविता येणार नाही. पण तुझ्या मनात काही अतृप्त इच्छा शेष आहेत, म्हणून तुला स्वर्गातही धाडता येणार नाही. तुला पृथ्वीवर परत पाठवावे लागेल, तुझ्या मनात काय आहे?

एकलव्य म्हणाला - हे देव, माझ्यावर अन्याय झालेला आहे, आपण जाणत असालच. मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालो असतो पण द्रोणाचार्यांनी राजपुत्र अर्जुनासाठी माझा अंगठा दक्षिणा म्हणून मागून घेतला. माझी इच्छा अपुरी राहिली. हे देव, माझे एकच मागणे आहे पृथ्वीवर उच्च कुळात माझा जन्म व्हावा आणि अर्जुनाचा एका वनवासीच्या घरी जन्म व्हावा, माझ्यावर झालेला  अन्याय अर्जुनाला हि कळला पाहिजे.  हीच माझी इच्छा आहे.

चित्रगुप्त म्हणाले, एकलव्या तू प्रतिशोधाच्या अग्नीत जळत आहे, पुन्हा एकदा विचार कर.

एकलव्य रागात म्हणाला, विचार म्हणजे काय? साक्षात धर्माच्या दरबारात ही मजवर अन्याय होणार का?  चित्रगुप्त म्हणाले, जसी तुझी इच्छा, तू पृथ्वीवर उच्च कुळात जन्म घेशील आणि अर्जुन वनवासी कुळात घेईल. तथास्तु.

कलयुगात पुण्यनगरी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मणाच्या घरात एकलव्याचा जन्म झाला. वडील सरकारी नौकरीत होते. घरची परिस्थिती बर्यापैकी होती. एका पुब्लिक शाळेत एकलव्य शिक्षण घेऊ लागता. एकलव्याचे एकच ध्येय होते, काहीही करून बारावीत चांगले मार्क्स आणायचे त्यासाठी त्याने शाळे व्यतिरिक्त अनेक क्लास ही जॉईन केले होते. अपेक्षे प्रमाणे त्याला बारावीत ९५% टक्के मार्क्स मिळाले.

आपले ध्येय साधण्यासाठी देशातील प्रमुख शिक्षण संस्थान इंद्रप्रस्थ व्यवस्थापन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तो इंद्रप्रस्थ नगरील पोहचला. कोट-पैंट आणि टाई घातलेला हा एकलव्य महाविद्यालयाच्या दरवाज्यावर पोहचला. तिथे त्याला पायात तुटलेली चप्पल व मळके कपडे घातलेला एक मुलगा दिसला, त्याला पाहताच एकलव्यला गतजन्म आठवला, तू अर्जुन का? निश्चित तू वनवासी कुळात जन्मला असेल, म्हणत एकलव्य मोठ्याने हसला.

अर्जुनाची ही गतजन्माची स्मृती जागृत झाली, तो म्हणाला एकलव्य, खरं आहे, मी वनवासी कुळातच जन्म घेतलेला आहे, आज सकाळीच छत्तीसगड वरून इथे आलो आहे. घरापासून १०-१२ की.मी. दूर असलेल्या सरकारी शाळेत माझे शिक्षण झाले आहे मला बारावीत ६०% मार्क्स मिळाले आहे. गुरुजी म्हणाले तुला इंद्रप्रस्थ येथील महाविद्यालयात अवश्य प्रवेश मिळेल म्हणून मी इथे आलो आहे.

एकलव्य मोठ्याने हसला, अर्जुन मला ९५% टक्के  मार्क्स मिळाले आहे, ९०% टक्क्याहून कमी  मार्क्सवाल्यांनी इथे फिरकलेही नाही पाहिजे. एवढे कमी मार्क्स येऊन ही तू येथे आला आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते. अर्जुन यावर काहीच बोलला नाही. प्रवेश फार्म जमा करून, एकलव्य आपल्या हॉटेल वर परत आला. उद्या निकाल जाहीर होणार, अर्जुनाची निराशा होईल, ह्या विचाराने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो शांत झोपी गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता, एकलव्य महाविद्यालयात पोहचला. निकाल लागला होता. यादीत एकलव्याचे नाव नव्हते. त्याच्या पेक्षा कितीतरी कमी मार्क्सवाल्यांना प्रवेश मिळालेला होता. अर्जुनाचे ही नाव त्यात होते. त्यामुळे एकलव्याच्या अंगाची लाही-लाही झाली. काही तरी गलफत जाहली असेल. जाब विचारयला पाहिजे, तो तणतणत, प्राचार्यांचा कार्यालय जवळ पोहचला.

दरवाज्यावर पाटी होती त्यावर लिहिले होते प्राचार्य श्रीयुत द्रोणाचार्य. असं होय, मनात पुटपुटत, एकलव्य सरळ आत शिरला आणि द्रोणाचार्यांवर ओरडलाच, प्रत्येक जन्मात माझ्यावर अन्याय करताना तुम्हाला लाज का वाटत नाही? त्या अर्जुना जवळ अस काय आहे, प्रत्येक वेळी तुम्ही त्याची बाजू राखतात.

द्रोणाचार्यांनी ही एकलव्याला ओळखले  शांत पणे म्हणाले, एकलव्या, तुझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मी कारणीभूत नाही, व्यवस्था कारणी भूत आहे.

ते कसें, मला मूर्ख बनवू नका. एकलव्य मी सगळ समजावून सांगतो, असे म्हणत द्रोणाचार्यांनी एकलव्यला समोर कुर्सी वर बसविले आणि म्हणाले एकलव्या या महाविद्यालयात व्यवस्थापन विषयाच्या ५० जागा उपलब्ध आहे. त्यात ७०% स्थानीय विद्यार्थांसाठी राखीव आहे. गेल्या युगांमध्ये दलित, वनवासी आणि मागासवर्गीय लोकांवर झालेल्या अन्यायाचे परिताप करण्यासाठी, कलयुगात आपल्या लोकशाही सरकारने त्यांना आरक्षण दिलेले आहे. शिवाय काही जागा मुलींसाठी, विकलांग मुलांसाठी, स्वतंत्रता सेनानीच्या मुलांसाठी आणि काही अल्पसंख्यकांसाठी आरक्षित आहे. तुझ्यापेक्षा कमी मार्क्स असून ही वनवासी कोट्यात अर्जुनाचे सर्वात जास्ती मार्क्स आहे. सामान्य श्रेणीत केवळ १ मार्क्स कमी पडल्यामुळे तुला प्रवेश मिळाला नाही.

एकलव्यला आता काहीच सुचत नव्हते, पुन्हा अर्जुनाच्या हातून त्याचा पराभव झाला होता. त्याला वाटले पुन्हा एकदा त्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी हिसकावला होता. त्याची दशा बघून द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्या, तुझी इच्छा होती, अर्जुनाने वनवासी व्हावे, ती पूर्ण झाली. पण बदला घेण्याच्या विचाराने जळत असलेला तू विसरून गेला, काळाचे चक्र सदैव फिरत राहते, ते कधीच अन्याय करत नाही.. एकलव्य चुपचाप उठला आणि परत फिरला.
 
 

Sunday, June 9, 2013

फिक्सिंग आणि मोका -दोन कविता


 (१)
बिना कुणाला फिक्स केल्या आपल्या देशात कुठलेही काम होत नाही....
 

सगळ कसं छान आहे
सगळ कसं फिक्स आहे.
फिक्सिंगच्या चौकटीत इथे
बंदिस्त सर्वांचे आयुष्य आहे. 

म्हणतो दास विवेक कसा
फिक्स करा व फिक्स व्हा
आयुष्याचा आनंद लुटा.


(2)


जाळ्यात लहान मासोळ्याच येतात, मोठ्या मगरींच्या नादी कुणीच लागत नाही....
लहान लहान मासोळ्यां वर
मोका मोका मोका.
मोठ्या मोठ्या मगरीं पासून
तौबा तौबा तौबा.