Sunday, June 16, 2013

पुन: एकलव्य : नियतीचा खेळ


एकलव्य चित्रगुप्त समोर उभा होता पण त्याचे मन अशांत होते. चित्रगुप्तने आपला निर्णय ऐकविण्याआधी, आपल्याला एकदा तरी बोलायची संधी द्यावी असे त्याला वाटत होते. तेवढ्यात चित्रागृप्ताने निर्णय दिला, एकलव्य तुझ्या हातून पापकर्मे घडली नाही आहेत, त्या मुळे तुला नरकात पाठविता येणार नाही. पण तुझ्या मनात काही अतृप्त इच्छा शेष आहेत, म्हणून तुला स्वर्गातही धाडता येणार नाही. तुला पृथ्वीवर परत पाठवावे लागेल, तुझ्या मनात काय आहे?

एकलव्य म्हणाला - हे देव, माझ्यावर अन्याय झालेला आहे, आपण जाणत असालच. मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालो असतो पण द्रोणाचार्यांनी राजपुत्र अर्जुनासाठी माझा अंगठा दक्षिणा म्हणून मागून घेतला. माझी इच्छा अपुरी राहिली. हे देव, माझे एकच मागणे आहे पृथ्वीवर उच्च कुळात माझा जन्म व्हावा आणि अर्जुनाचा एका वनवासीच्या घरी जन्म व्हावा, माझ्यावर झालेला  अन्याय अर्जुनाला हि कळला पाहिजे.  हीच माझी इच्छा आहे.

चित्रगुप्त म्हणाले, एकलव्या तू प्रतिशोधाच्या अग्नीत जळत आहे, पुन्हा एकदा विचार कर.

एकलव्य रागात म्हणाला, विचार म्हणजे काय? साक्षात धर्माच्या दरबारात ही मजवर अन्याय होणार का?  चित्रगुप्त म्हणाले, जसी तुझी इच्छा, तू पृथ्वीवर उच्च कुळात जन्म घेशील आणि अर्जुन वनवासी कुळात घेईल. तथास्तु.

कलयुगात पुण्यनगरी येथे एका मध्यमवर्गीय ब्राह्मणाच्या घरात एकलव्याचा जन्म झाला. वडील सरकारी नौकरीत होते. घरची परिस्थिती बर्यापैकी होती. एका पुब्लिक शाळेत एकलव्य शिक्षण घेऊ लागता. एकलव्याचे एकच ध्येय होते, काहीही करून बारावीत चांगले मार्क्स आणायचे त्यासाठी त्याने शाळे व्यतिरिक्त अनेक क्लास ही जॉईन केले होते. अपेक्षे प्रमाणे त्याला बारावीत ९५% टक्के मार्क्स मिळाले.

आपले ध्येय साधण्यासाठी देशातील प्रमुख शिक्षण संस्थान इंद्रप्रस्थ व्यवस्थापन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तो इंद्रप्रस्थ नगरील पोहचला. कोट-पैंट आणि टाई घातलेला हा एकलव्य महाविद्यालयाच्या दरवाज्यावर पोहचला. तिथे त्याला पायात तुटलेली चप्पल व मळके कपडे घातलेला एक मुलगा दिसला, त्याला पाहताच एकलव्यला गतजन्म आठवला, तू अर्जुन का? निश्चित तू वनवासी कुळात जन्मला असेल, म्हणत एकलव्य मोठ्याने हसला.

अर्जुनाची ही गतजन्माची स्मृती जागृत झाली, तो म्हणाला एकलव्य, खरं आहे, मी वनवासी कुळातच जन्म घेतलेला आहे, आज सकाळीच छत्तीसगड वरून इथे आलो आहे. घरापासून १०-१२ की.मी. दूर असलेल्या सरकारी शाळेत माझे शिक्षण झाले आहे मला बारावीत ६०% मार्क्स मिळाले आहे. गुरुजी म्हणाले तुला इंद्रप्रस्थ येथील महाविद्यालयात अवश्य प्रवेश मिळेल म्हणून मी इथे आलो आहे.

एकलव्य मोठ्याने हसला, अर्जुन मला ९५% टक्के  मार्क्स मिळाले आहे, ९०% टक्क्याहून कमी  मार्क्सवाल्यांनी इथे फिरकलेही नाही पाहिजे. एवढे कमी मार्क्स येऊन ही तू येथे आला आहे, हे पाहून मला आश्चर्य वाटते. अर्जुन यावर काहीच बोलला नाही. प्रवेश फार्म जमा करून, एकलव्य आपल्या हॉटेल वर परत आला. उद्या निकाल जाहीर होणार, अर्जुनाची निराशा होईल, ह्या विचाराने त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. तो शांत झोपी गेला.

दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजता, एकलव्य महाविद्यालयात पोहचला. निकाल लागला होता. यादीत एकलव्याचे नाव नव्हते. त्याच्या पेक्षा कितीतरी कमी मार्क्सवाल्यांना प्रवेश मिळालेला होता. अर्जुनाचे ही नाव त्यात होते. त्यामुळे एकलव्याच्या अंगाची लाही-लाही झाली. काही तरी गलफत जाहली असेल. जाब विचारयला पाहिजे, तो तणतणत, प्राचार्यांचा कार्यालय जवळ पोहचला.

दरवाज्यावर पाटी होती त्यावर लिहिले होते प्राचार्य श्रीयुत द्रोणाचार्य. असं होय, मनात पुटपुटत, एकलव्य सरळ आत शिरला आणि द्रोणाचार्यांवर ओरडलाच, प्रत्येक जन्मात माझ्यावर अन्याय करताना तुम्हाला लाज का वाटत नाही? त्या अर्जुना जवळ अस काय आहे, प्रत्येक वेळी तुम्ही त्याची बाजू राखतात.

द्रोणाचार्यांनी ही एकलव्याला ओळखले  शांत पणे म्हणाले, एकलव्या, तुझ्यावर झालेल्या अन्यायासाठी मी कारणीभूत नाही, व्यवस्था कारणी भूत आहे.

ते कसें, मला मूर्ख बनवू नका. एकलव्य मी सगळ समजावून सांगतो, असे म्हणत द्रोणाचार्यांनी एकलव्यला समोर कुर्सी वर बसविले आणि म्हणाले एकलव्या या महाविद्यालयात व्यवस्थापन विषयाच्या ५० जागा उपलब्ध आहे. त्यात ७०% स्थानीय विद्यार्थांसाठी राखीव आहे. गेल्या युगांमध्ये दलित, वनवासी आणि मागासवर्गीय लोकांवर झालेल्या अन्यायाचे परिताप करण्यासाठी, कलयुगात आपल्या लोकशाही सरकारने त्यांना आरक्षण दिलेले आहे. शिवाय काही जागा मुलींसाठी, विकलांग मुलांसाठी, स्वतंत्रता सेनानीच्या मुलांसाठी आणि काही अल्पसंख्यकांसाठी आरक्षित आहे. तुझ्यापेक्षा कमी मार्क्स असून ही वनवासी कोट्यात अर्जुनाचे सर्वात जास्ती मार्क्स आहे. सामान्य श्रेणीत केवळ १ मार्क्स कमी पडल्यामुळे तुला प्रवेश मिळाला नाही.

एकलव्यला आता काहीच सुचत नव्हते, पुन्हा अर्जुनाच्या हातून त्याचा पराभव झाला होता. त्याला वाटले पुन्हा एकदा त्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी हिसकावला होता. त्याची दशा बघून द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्या, तुझी इच्छा होती, अर्जुनाने वनवासी व्हावे, ती पूर्ण झाली. पण बदला घेण्याच्या विचाराने जळत असलेला तू विसरून गेला, काळाचे चक्र सदैव फिरत राहते, ते कधीच अन्याय करत नाही.. एकलव्य चुपचाप उठला आणि परत फिरला.
 
 

1 comment: