धुकं म्हणजे निद्राग्रस्त धरतीने पांघरलेले एक शुभ्र, शांत वस्त्र. सकाळच्या कोवळ्या वेळी धुक्यातून फिरताना मन प्रसन्न होते. धुक्याच्या ओलसर स्पर्शात दवबिंदू फुलांवर मोत्यासारखे चमकतात. पूर्व दिशेकडून सूर्यदेवता सोनेरी किरणांचा साज घेऊन उगम पावतो, आणि त्या क्षणी धुकंही त्या सोनेरी रंगात न्हालेलं दिसतं. धुक्याला भेदून जेव्हा सूर्यकिरण अंगावर पडतात, तेव्हा त्या आनंदाच्या क्षणांचे वर्णन शब्दांत करणे अशक्यच वाटते. मन प्रसन्न, उत्साही आणि शांततेने भरून जातं.
पण काळ बदलतो. रोजगार आणि सुखसुविधांच्या शोधात लाखो लोक दिल्लीसारख्या महानगरांत स्थलांतर करतात. दिल्ली शहरात हजारो कारखाने धूर ओकत असतात, लाखो वाहनं दररोज रस्त्यावर धावतात. हिवाळी सकाळी हवा शांत असेल, की संपूर्ण आसमंतात धुकं पसरतं. पण हे धुकं शुभ्र नसतं— काळं, कुट्ट आणि गुदमरणारं असतं.
दिल्लीतील या धुक्याला "स्मॉग" म्हणतात. डॉक्टर सकाळी पार्कमध्ये धावणाऱ्यांना सतर्क करतात—या स्मॉगमध्ये फिरणे किंवा व्यायाम करणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. तुम्हाला प्रश्न पडेल, हा स्मॉग नेमका काय आहे?
लाखो वाहनांच्या धुरातील सूक्ष्म कण, कारखान्यांच्या विषारी धुराने भरलेल्या चिमण्या, औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या रसायनांचा दुर्गंधी वायू—हे सगळं धुक्याच्या थरात मिसळून तयार होतो स्मॉग. सर्दी, खोकला, दमा यांसारख्या आजारांना निमंत्रण देणारा हा काळा धुराचा थर झाडांच्या पानांवरही परिणाम करतो—पाने काळी पडून गळून जातात. जीवसृष्टी असो वा वनस्पती, सर्वांच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा स्मॉग.
प्रगतीच्या नावाखाली निर्माण झालेलं हे काळं धुकं सुख सुविधांच्या मागे धावण्याचं फलित आहे. जर माणूस अशाच वेगाने धावत राहिला, तर एक दिवस तो स्वतःच या काळ्या धुक्यात हरवून जाईल.
खरं आहे
ReplyDelete