Saturday, August 30, 2025

पाणी प्रेमाचे

नदीचे दोन्ही किनारे हसत-खेळत समुद्राला भेटण्यासाठी निघाले. दोन्ही किनारे एकत्र प्रवास करत समुद्राला सहज भेटले असते. न जाणे त्यांच्यात काय घडले. ते  श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने ग्रस्त झाले. दुराग्रहाची इंगळी ही त्यांना डसली. डाव्या किनार्‍याला वाटत होते, त्यालाच समुद्राकडे जाण्याचा मार्ग माहीत आहे. उजव्या किनार्‍याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. उजव्या किनार्‍याला वाटायचे, डावा किनारा मूर्ख आहे, त्याला काहीच कळत नाही. समुद्राकडे जाण्याचा मार्ग फक्त त्यालाच माहीत आहे, डाव्या किनार्‍याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. त्यांच्यात रोज विवाद होऊ लागले. एकदा भांडण विकोपाला गेले. डावा किनारा पूर्व दिशेकडे वळला तर उजवा किनारा पश्चिम दिशेकडे वळला. दोन्ही किनार्‍यामध्ये साठलेले नदीचे पानी वाळवंटात वाहून गेले.  

पाण्या अभावी त्यांना पुढे जाण्याचा मार्ग शोधणे अवघड झाले. दोन्ही किनारे पाण्याअभावी तडफडत-तडफडत वाळवंटात नष्ट झाले. 

नदीचे पाणी म्हणजे नवर्‍या-बायकोचे प्रेम. सुखी संसारासाठी हे प्रेम नेहमी जपून ठेवले पाहिजे. त्यासाठी सर्वस्व त्याग करावा लागला तरी केला पाहिजे. 




Tuesday, August 26, 2025

लघु कथा: म्हातारा आणि सोनेरी फुलांचा सुगंध

एक म्हातारा रोज  सकाळी  फिरायला बगीच्यात येत असे. बगीच्यात आल्यावर तो सोनेरी फुलांसोबत अनेक तास बोलायचा. आज सकाळी ही तो आला, पाहतो काय, बगीच्यातील सोनेरी फुलांचे रोपटे कुणीतरी उपटलेले होते. म्हातार्‍याच्या काळजात धस्स झाले, तो मटकण खाली बसला. हे बहुतेक क्रिकेट खेळणार्‍या द्वाड  मुलांचे काम आहे. त्याने मनातल्या मनात त्या मुलांना शिव्या मोजल्या. एक सोनेरी निर्जीव फूल उचलून आपल्या काळजाशी घट्ट धरले. त्याच क्षणी म्हातार्‍याला काळजात कळ जाणवली. 

आजोबा, कसे वाटते आता. म्हातार्‍याने डोळे उघडले. समोर क्यारीत सोनेरी फुले वार्‍यासवे मस्त डोलत होती. त्यांच्या सुगंध चहुओर पसरलेला होता. म्हातार्‍याने प्रेमाने सोनेरी फुलांना गोंजारले. आजोबांनी नेहमीच्या सवयीने फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो. आजोबा, आम्ही मस्त आहोत, इथे कसलीच काळजी नाही. इथे कुणीही आम्हाला त्रास देऊ शकत नाही. आजोबा, तुम्ही थकला असाल, थोडा निवांत पडा. तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो.  भरपूर वेळ आहे, आता आपल्याकडे. म्हातार्‍याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते. 



Saturday, August 23, 2025

लघु कथा: बंदूकीची गोळी ती

 

कॉंस्टेबलबलवान सिंह जोरात ओरडला, साहेब, आपल्या वर हल्ला करणारी,  आपल्या अनेक जवानांना मारणारी नक्सली कमांडर इथेच पडली आहे.  काय करायचे हिचे?  कमांडेंट तिच्या जवळ गेला, तिच्या कडे पाहिले, ती वेदनेने तडफडत रक्ताच्या थोरोळ्यात जमिनीवर पडलेली होती.  कमांडेंट ने  विचार केला, या घनदाट जंगलात मदत याला काही तास लागतील. तो पर्यन्त हिचे जीवंत राहणे शक्य नाही. हीची मरण यातनेतून मुक्ति करणेच योग्य. त्याच्या बंदूकीने तिच्या छातीचा वेध घेतला. कमांडेंटचे लक्ष क्षणभरासाठी तिच्या चेहर्‍याकडे गेले, त्याला वाटले तिचे डोळे म्हणत आहे, "साहेब, मला मारू नका, मला जगायचे आहे". कमांडेंट ने डोळे बंद केले आणि बंदूकीचे ट्रीगर दाबले. 

धाँय-धाँय गोळीचा आवाज आसमंतात घुमला. एक पक्षी आकाशी उडाला. 

आजच्या चकमकीत बंदूकीतून सुटणार्‍या गोळ्यांनी अनेक परिवारांचे आयुष्य उध्वस्त केले होते. अनेकांचे स्वप्न भंगले होते. त्या घटनेला अनेक वर्ष झाली. आता कमांडेंट निवृत होऊन गेला होता. कमांडेंट रोज रात्री झोपेची गोळी घेतो तरीही कमांडेंटला झोप येत नाही.  रात्रभर त्याच्या  कानात तिचा आवाज गुंजत राहतो -   "साहेब मला मारू नका, मला जगायचे आहे".  

युद्धाच्या कथा कधीच रम्य नसतात. त्या अतिशय वेदनादायक असतात. 

  


 

Thursday, August 21, 2025

ब्रेकिंग न्यूज आणि जीडीपी

 

पूर्व दिशेला सूर्य उगवला 
पश्चिमेला अस्त ही झाला.
कुठेच  काही घडले नाही 
चोरी डकैती झाली नाही 
रेप- दंगा काहीच नाही. 
 
चर्चेसाठी  मसाला नाही
तज्ञांची आता चर्चा नाही  
   ओरड-आरोप चिथावणी नाही।
  'ब्रेकिंग'चा न्यूजचा आत्माच मेला.

न्यूज एंकर, ब्रेकिंग वाले,
सारेच झाले बेरोजगार.
 स्टुडिओत उरली आता, 
फक्त स्मशान शांतता.   

टीव्ही विक्री थांबली,
लाचार झाली जीडीपी.
 शांततेच्या काळात,
देशाचा बाजारच झोपून गेला.

 


 



Tuesday, August 19, 2025

पिंपळ: आशेची किरण दाखविणारा

भल्या पहाटे आयुष्याला कंटाळून तो त्या डोंगराच्या कड्यावर पोहचला. इथून उडी मारली तर आपण नक्की मरणार ना, याची खात्री करण्यासाठी त्याने कड्या खाली डोकावून पाहिले. पण हे काय, कड्याच्या थोड्या खाली दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावत होते. झाडाच्या  मुळांनी दूर पर्यन्त दगडांना जखडून ठेवले होते. पिपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना झुगारून मस्त वार्‍या सावे डोलत होते.  त्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, इथे न माती, न पानी,  फक्त दगडाची एक भेग, तरीही हे झाड जिवंत आहे. झाडाला आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरीही पिंपळाने तक्रार केली नाही. दगडातच त्याने जगण्याचा मार्ग शोधला. आपण ही परिस्थिति बदलू शकतो. पूर्व दिशेला सोनेरी करणे उधळत सूर्य उगवला होता. त्याने विचार बदलला. तो पुन्हा आपल्या घरी परतला. नव्याने जगण्याचा संघर्ष सुरू करण्यासाठी. 

 

Saturday, August 16, 2025

गूढ कथा : अक्कल दाढ (संपादित)

  

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट भ्रष्टाचाराची फाईल वाचताना दाढ दुखू लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. घरी पोहचल्यावर गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. 

सकाळी दातांचा डॉक्टर कडे गेलो. डॉक्टर माझ्या कडे पहात  मिस्कील पणे हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीव घेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. कदाचित अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. भिक्षा मागत दारो-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? घाबरून मी ओरडलो, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. कार्यालयात पोहचल्यावर ती विशिष्ट भ्रष्टाचाराची फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून कपाटात ठेऊन दिली. घरी आल्यावर  पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो. 

आरश्यात मला माझा चेहरा काळा ठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही. 
 

Tuesday, August 5, 2025

लोकतंत्र वाचविण्यासाठी "SIRची" आवश्यकता

मतदाता यादीचे विशेष गहन पुनरीक्षण करणे म्हणजे SIR. नुकतेच बिहार राज्यात निवडणूक आयोगाने SIR प्रक्रिया राबवून मतदार यादीतील नावांची सत्यता तपासली. निवडणूक आयोगाने मृत, स्थलांतरित किंवा एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत मतदारांची नावे मतदाता यादीतून हटवली.  

बिहार मध्ये राबविलेल्या SIR प्रक्रियेचे परिणाम : 

 मुख्य निष्कर्ष (जुलै 2025 पर्यंत):

  • 7.23 कोटी मतदारांपैकी 99.86% मतदारांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे.
  • 64 लक्ष  मतदारांची नावे हटवली जाण्याची शक्यता आहे त्यात:
  • 22 लक्ष  मृत मतदार
  • 35 लक्ष  स्थलांतरित किंवा ज्यांचे पत्ते मिळाले नाहीत
  • 7   लक्ष  मतदार एकाहून अधिक ठिकाणी नोंदणीकृत.
  • 1  लक्ष मतदारांचा कुठेही पत्ताच  नव्हता. 
राजकीय पक्ष निवडणूक आयोगासमोर 1 सेप्टेंबर पर्यन्त आपत्ति आणि दावे दाखल करू शकतात.  

बिहारच्या सीमांचल भाग किशनगंज, पूर्णिया, अररिया, काटिहार येथे आधारकार्डांची संख्या तिथल्या जनसंख्येपेक्षा सव्वापट जास्त आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटते, "सर" प्रक्रियेचा मुख्य उद्देश्य त्यांच्या मतदारांना मतदाता यादीतून वगळणे आहे. त्यांचे म्हणणे आहे निवडणूक आयोगाने  पूर्वीच्या मतदाता यादीनुसार मतदान घ्यावे. ते "सर" विरोधात सुप्रीम कोर्टात गेले. दुसरीकडे सत्तापक्षाचे म्हणणे आहे, विरोधी पक्ष बांग्लादेशी मतदाता, डुप्लीकेट मतदाता, मृत मतदाता इत्यादींचा उपयोग नकली मतदानासाठी करतो.  

बांगलादेशी लोक भारतात रोजगारसाठी येतात. व्होट बँक साठी अनेक राजनेता त्यांना राशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदाता कार्ड बनविण्यास मदत करतात. लाखो बांग्लादेशी, मुंबई असो की एनसीआर, भारतीय नागरिक बनून मतदान करत असतील, तर त्यात कुणालाही आश्चर्य वाटले नाही पाहिजे. नुकतेच गुरुग्राम मध्ये बांग्लादेशी नागरिकांचा शोध सुरू झाला आणि हजारों घरात काम करणारे नौकर-चाकर अदृश्य झाले, अश्या बातम्या मीडियावर आल्या आहे. बिहारपेक्षा जास्त वाईट परिस्थिति दोन्ही महानगरांमध्ये आहे. या शिवाय मृत मतदार आणि डुप्लीकेट मतदारांचा वापर ही सर्वच राजकीय पक्ष करतात.  

SIR पूर्ण झाल्यावर बिहार राज्यात 5 टक्के पेक्षा जास्त मतदाता, मतदाता यादीतून वगळले जातील. यात शंकाच नाही. ही संख्या फार मोठी आहे. आपल्या देशात अर्धा टक्केच्या फरकाने निवडणूक जिंकली जाते. ज्या राज्यात बोगस मतदाता ज्या पक्षाला मते देतील तो पक्ष भारी बहुमताने जिंकू शकतो. देशात लोकतंत्र वाचवायचे असेल तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला संपूर्ण देशात निवडणूकी पूर्वी SIR राबविण्याचे आदेश दिले पाहिजे. बिहार सारखे मतदाता सूचीचे गहन पुनरीक्षण संपूर्ण देशात केले पाहिजे.  मला तरी असे वाटते.