Sunday, September 15, 2024

साक्षरता (शिक्षण) , बेरोजगारी आणि आरक्षण

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण साक्षरतेचा बेरोजगारी आणि आरक्षणाची सरळ संबंध आहे. मेकॉले पूर्वीच्या शिक्षण व्यवस्थेत बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. "द ब्युटीफुल ट्री" या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीने १८३० ते १८५० मध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या बाबतीत केलेले सर्व्हे उपलब्ध आहे. त्याकाळी देशात सहा लाखांच्या वर गुरुकुल होते. प्रत्येक गावात एक गुरुकुल निश्चित होते. वयाच्या 13 वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना स्थानिक भाषा गणित इत्यादीचे ज्ञान दिले जात होते. सामान्य व्यक्तीसाठी एवढे ज्ञान पुरेसे आहे. त्यानंतर अधिकांश विद्यार्थी त्यांच्या परंपरागत व्यवसायांचे ज्ञान गुरुं कडून  प्राप्त करायचे. हुशार विद्यार्थी घर, तलाव बांधणे ते वैद्यकीय शिक्षण घ्यायचे. काही विद्यार्थी साहित्य आणि संगीताचा अभ्यास करायचे. राजकीय आश्रय नाही मिळाला तर त्यांच्यासमोर ही बेरोजगारीची समस्या राहत असे. अत्यंत हुशार मुले वेदाध्ययन करायचे. त्यांनाही रोजगाराची ग्यारंटी नव्हती. तरीही त्या काळी बेरोजगारी दर अत्यंत कमी होती. 

नंतर मेकॉले शिक्षण आले. या शिक्षणाच्या मुख्य हेतू जनतेला साक्षर करणे होते. सरकार चालवायला बाबू पाहिजे होते. सरकारने शिक्षण त्याच उद्देश्याने  देण्याची व्यवस्था केली. जगण्याचे ज्ञान देणारे शिक्षण दिले नाही. स्वतंत्रता मिळाल्या नंतर ही धोरण बदलले नाही. जुन्या शिक्षण पद्धतीतील १९७७ ची आमची बॅच ही शेवटची होती. दिल्लीत पाचवी बोर्ड होता. त्याचा परिणाम ७० टक्के लागायचा. नंतर आठवी बोर्ड होता. त्याचा परिणाम ही ६०-७०% लागायचा. नंतर अकरावी बोर्ड. अकरावीत नववी, दहावी ,अकरावी तीन वर्षांचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेत यायचा. आमच्या वेळी सुद्धा  परीक्षा परिणाम ६०% टक्के असेल. दुसऱ्या शब्दात पहिलीत ऍडमिशन घेतलेल्या शंभर मुलांपैकी फक्त ३० ते ४० मुले अकरावी पास करत असेल. त्यातील २० एक टक्के विद्यार्थी ग्रॅज्युएशन करण्यासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेत असे. तरी देखील सर्वांना व्हाईट कॉलर नोकरी मिळणे अशक्य होते. १५ वर्षांचे शिक्षण घेऊन ही जगात जगण्यासाठी रोजगार करण्याचे कोणतेही ज्ञान अधिकांश विद्यार्थ्यांना मिळत नव्हते.

आताची परिस्थिती तर अतिशय गंभीर आहे. "इधर से आलू डालो उधर से ग्रॅज्युएट निकालो". पहिली ते ऍडमिशन घ्या आणि पंधरा वर्षांनी ग्रॅज्युएट व्हा.  दहावीपर्यंत कोणालाही नापास करता येत नाही. गेल्या वर्षी दिल्लीत दहावीचा परिणाम  ९८ टक्के होता. बारावीचा परिणाम ही ९५% टक्यांचा वर. हीच परिस्थिती देशातील अधिकांश राज्यात आहे. ९० टक्यांच्या वर मार्क्स सहज मिळतात. सरकारी कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही मिळाली तरी नोएडात एमिटी सारख्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी सिटी आहेत. अश्या हजारहून जास्त प्राइवेट युनिव्हर्सिटी भारतात असतील. या शिवाय पत्राचार, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी इत्यादी ही आहेत. दुसऱ्या शब्दांत पहिलीत प्रवेश घेतलेल्या नंतर ७० टक्यांच्या वर विद्यार्थी स्नातक होणारच. अधिकांश विद्यार्थी आर्ट्स हा विषय घेऊन पास झालेले असतात. कोणतेही टेक्निकल ज्ञान त्यांचा जवळ नसते. यातले ८० टक्के बेरोजगार राहणार किंवा अत्यंत कमी पगाराची नोकरी करतील. 

२०१७ मध्ये जुना सोफा सेटची( १+२) अवस्था खराब झालेली होती. पण लाकडाचा बेस मजबूत होता. जेल रोड वरून कापड, फोम इत्यादी सामान सहा हजारात विकत घेतले आणि कारपेंटर करून नवीन सोफा बनवून घेतला. एका दिवसात त्याने सोफा सेट तयार केला. त्याचे त्यांनी साडेतीन हजार रुपये घेतले. तो कारपेंटर महिन्याचे ५० ते ६० हजार कमवत होता. ज्या दुकानात तो काम करायचा त्याला एक सोफासेट तयार करण्याचे अडीच हजार रुपये मिळायचे. त्याचा मुलगा स्नातक झाला. तो ८००० रू  ची नोकरी करत होता. त्याने मुलाला आपल्या धंद्यात आणायचा प्रयत्न केला तर मुलगा म्हणाला आता या वयात  मला कारर्पेंटरी शिकणे अशक्य आहे. उलट त्याने प्रश्न केला, तुम्ही मला कशाला शिकवले. वयाची २१वी उलटल्यानंतर शारीरिक मेहनतीचे काम शिकणे अशक्यच.

दुसरीकडे अधिकांश मुसलमानांची मुले मात्र मदरसेत शिक्षण घेतात. पंधरा-सोळा वर्षाची होताच ते व्यवसायिक शिक्षण घेतात. माझा एक मित्र नोएडात एका सोसायटीत वाहतो. तो एकदा मला म्हणाला त्यांच्या सोसायटी वीज वाला, प्लंबर, कारपेंटर इत्यादी सर्व मुस्लिम आहे. शोधूनही हिंदू सापडणार नाही. शहाबेरीच्या फर्निचर मार्केटमध्ये सर्व दुकाने मुस्लिम समाजाची आहेत. आज उत्तम नगर मेट्रो स्टेशन जवळ फळ विकणारे सर्व विक्रेता मुस्लिम समाजाचे आहे. आमच्या भागातील ८०टक्के न्हावी मुस्लिम आहे. आता सैलुन चालवतात. जास्त कमाई ही होते. मुस्लिम समाजात बेरोजगारीचा प्रश्न उद्भवत नाही. कारण कमी साक्षर असल्याने सर्व शारीरिक मेहनतीची कामे करायला ते सदैव तत्पर राहतात

आता बिना ज्ञान प्राप्त करता ग्रेजुएट होणाऱ्या लाखो बेरोजगार युवकांचा वापर राजनेता करतील तर नवल नाही. शिवाय समाजाला जाती-जाती वाटून निवडणूक ही सहज जिंकता येते. मंडल आरक्षणाच्या मागे बेरोजगार साक्षर युवकांची फौज होती. आत्ताच्या मराठा आरक्षणामागे ही बेरोजगार साक्षर युवकांची फौज आहे. आरक्षणाचा गाजर देऊन राज नेता निवडणूक जिंकतात पण त्याने बेरोजगारीची समस्या दूर होईल का? महाराष्ट्रात जवळपास १८ लक्ष सरकारी नोकऱ्या आहेत. अधिकांश कर्मचारी वीस ते पंचवीस वयात नोकरीला लागतात. अर्थात ३० ते ३५ वर्षाची नोकरी सर्वच करतात. वर्षाला ५० हजार हून जास्त नोकऱ्या महाराष्ट्र सरकार देऊ शकत नाही, यातही पोलीस, शिक्षक, स्वास्थ कर्मचारी, इंजिनीयर आणि अनेक तकनीकी पदे ही आहेत. जास्तीत जास्त पंचवीस एक हजार नोकऱ्या शिपाई आणि बाबूंच्या असतील. तेवढ्याच पांढरपेशा नोकऱ्या निजी क्षेत्रांत असतील. आता कितीही आरक्षण दिले तरीही कोणत्याही समाजाचा बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. उदाहरण मराठा समाजाला १० टक्के वेगळे आरक्षण दिले तरी  फक्त ५००० युवकांना सरकारी नोकरी मिळेल. महाराष्ट्र सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनवर बजेटचा ३५ टक्यांच्या पेक्षा जास्त खर्च करते.  दरवर्षी हा खर्च वाढत जात आहे. अनेक राज्यांची  याहून वाईट परिस्थिती आहे. भविष्यात सरकारी पदांची संख्या कमी करण्याची संभावना जास्त आहे. तसेही राजा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च बजेटचा १६ टक्केहून जास्त नसला पाहिजे.

मी गेल्या महिन्यात १०० वर्षानंतर दिल्ली सोडून ग्रेटर नोएडा इथे शिफ्ट झालो आहे.  घराचे इंटेरियर करणारे, वीज काम करणारे, प्लंबर, सफेदी करणारे सर्व कारीगर मुस्लिम समाजाचे होते. ठेकेदार हिंदू असूनही त्याला हिंदू कारीगर मिळत नाही. कारण हिंदू कारीगरांनी आपल्या मुलाना ग्रेजुएट केले आणि बेरोजगारीच्या लाईनीत उभे केले. हे बेरोजगार राजनेत्यांच्या आदेशावर आरक्षणाच्या खेळात मग्न आहे. "इधर से आलू डालो उधर से ग्रेजुएट निकालो" या शैक्षणिक धोरणाने  समाज  नपुंसक बनला आहे, हेच सत्य.

मग काय करावे. प्राचीन गुरूकुल पद्धती बघितली तर उत्तर मिळते. आठवी बोर्ड पुन्हा सुरू करून ५० टक्के मार्क्स ज्यांचे येतील त्यांनीच पुढे सामान्य शिक्षण घ्यावे.  दहावी आणि बारावी बोर्डात ही ५० टक्के मार्क्स पास होण्यासाठी अनिवार्य करणे.  आठवी, दहावी, बारावी नापास झालेले तरुण पुन्हा शारीरिक मेहनतीचे कामांकडे वळतील. त्यांच्यासाठी वेगवेगळे स्किल डेव्हलपमेंट साठी प्रशिक्षण केंद्र  सुरू केले पाहिजे. जेणे करून स्व: रोजगार सुरू करण्याचे ज्ञान त्यांच्यापाशी राहील. जे स्नातक होतील त्यांना ही रोजगार मिळण्याची शक्यता वाढेल. समाजाला मूर्ख बनविण्याचा आरक्षणाचा खेळ ही संपेल. जाती द्वेषाची राजनीतीचा ही अंत होईल.

Friday, September 13, 2024

सर्व्हे: अंदाज का चुकले.

या वेळी सर्वच सर्व्हे वाल्यांचे अंदाज चुकले. कारण काय. काही दिवसांपूर्वी पार्क मध्ये फिरताना एका चॅनल साठी सर्व्हे करणाऱ्या कंपनीत काम करणारा भेटला. त्याला हा प्रश्न विचारला. तो म्हणाला सर्व्हे करताना आम्ही  प्रत्येक लोकसभेच्या मतदारांचे ही विश्लेषण करतो. उदाहरण उत्तर प्रदेशचा विचार केला तर किती अल्पसंख्यक आहेत. यादव किती इत्यादी.(कारण यादव+ मुस्लिम युती होती).  महाराष्ट्रात मराठा  समाजाचाही  विचार (M+M युती) केला. वंचितांचा  ही विचार केला. पण एक चूक झाली जिथे अल्पसंख्यक मतदार १५ टक्के होते. सर्व्हेत त्यांना १५ टक्के वजन दिले. जगात इजरायल हमास युद्ध, युरोपातील आंदोलने पाहता अल्पसंख्यक समाजाला वाटते भारतात ही लवकर शरिया राज्य येईल. यासाठी  अल्पसंख्यक समाजाने ८० टक्यांच्या वर मतदान केले. त्यात ही ९५ टक्के अल्पसंख्यक मतदारांनी इंडीला मतदान केले. इंदोर मध्ये इंडी उमेदवार नव्हता तरीही २.१४ लक्ष अल्पसंख्यक समाजाने नोटाला मतदान केले. तो म्हणाला जिथे १५ टक्के अल्पसंख्यक आहेत आणि  मतदान ५० टक्के झाले असेल तर  सर्व्हेत अल्पसंख्यक मतांना वजन २६ टक्के दिले पाहिजे, ५५ टक्के मतदान असेल तर २२-२३ टक्के आणि ६० टक्के असेल तर २० टक्के. असे केले असते तर अंदाज चुकले नसते. त्याने आपल्या उच्च अधिकाऱ्यांसमोर हा मुद्दा मांडला होता पण त्यांनी तो लक्षात घेतला नाही. त्यामूळे अधिकांश सर्व्हे चुकले. 

महाराष्ट्रात मुस्लिम इसाई मिळून १८ टक्के आहेत. ते भाजपला कदापि मत देणार नाही. कसाबला फासावर लटकवणारे उज्ज्वल निकम ही पराजित झाले. त्यांच्यासाठी ही मतदान करायला मुंबईची जनता आली नाही. देशातील मध्यम वर्ग मतदान बाबत भयंकर उदासीन आहे. दिल्लीतील एका सोसायटीत २७० मते होती फक्त  ९० लोकांनी मतदान केले.  उज्ज्वल निकम जर  दिल्लीतून  उभे राहिले असते तर रिकॉर्ड मतांनी जिंकले असते. असो. 

मला ही त्याचे म्हणणे पटले. दिल्लीत मतदान २०१९ पेक्षा दोन टक्के कमी झाले. जिंकण्याचे मार्जिन ही कमी झाले. महाराष्ट्रात भाजपला २०१९ जेवढे मते मिळाली. पण शिवसेनेचे २४ टक्के मते होते त्यातली १६ टक्के उद्घव आपल्या सोबत टिकविण्यास  सफल झाले.  दादा फक्त तीन टक्के मत आणू शकले. त्यामुळे युतीला ५१ टक्के जागी ४३ टक्के मते मिळाली. आघाडीला ही ४३ टक्के हून थोडी जास्त पण जागा जास्त मिळाल्या. 

महाराष्ट्र विधानसभे बाबत बोलायचे तर अल्पसंख्यक समाजाच्या १८ पैकी १५ मतदान करतील. सर्व युती विरोधातच.  आघाडीच्या खिश्यात १५ मते आधीच आहे. उरलेल्या ८२ टक्के हिंदू जैन इत्यादी पैकी किती मतदान करणार, किती जातीला महत्त्व देतात. त्यावर विधान सभेचा निकालाची भविष्यवाणी केली जाऊ शकते. मतदान टक्का वाढला नाही तर युतीचा पराभव अटळ आहे.


Tuesday, September 10, 2024

आर्थिक युद्ध: भारतीय मधाची बदनामी करण्याचे षडयंत्र

  


गेल्या 15 वर्षात भारतातील मधाचे उत्पादन 27000 MT वरून 1,33,200 MT (2022) पर्यंत वाढले आहे. 2030 पर्यंत ते दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे. 
भारताने २०१३ मध्ये १९४ कोटी रुपयांचे मध निर्यात केले होते. २०२१-२२ मध्ये १२०० कोटी रुपयांचे मध निर्यात केले  

उत्पादित मधा पैकी निम्म्याहून अधिक मधाची निर्यात भारत करतो. या उद्योगात भारताच्या वाढती प्रगतीमुळे  परदेशी उत्पादकांचे नुकसान होणार हे उघड आहे. भारतीय मध उद्योगाला धक्का देण्यासाठी भारतातील बड्या कंपन्यांच्या  मधा बाबत भारतीय जनते मध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम म्हणजे आर्थिक युद्ध.  यासाठी  एका कुप्रसिद्ध भारतीय  एनजीओच्या मदतीने भारतातील मध बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांची भारतातच बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्या गेले. अधिकृत भारतीय प्रयोगशाळांकडून भारतीय कंपन्यांचा मध बनावट असल्याचे सिद्ध करणे शक्य नाही. पण आपल्या देशातील सुशिक्षित लोकही युरोप मधून कोणताही अहवाल आला की, कोणताही विचार न करता त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात. याशिवाय या शिवाय आपले नौकरशाह असो, पत्रकार असो किंवा तथाकथित एनजीओ असो, पैशासाठी सहज विकले जातात. गेल्या वर्षी एका कुप्रसिद्ध भारतीय एनजीओच्या मदतीने आणि भारतीय मीडियाच्या मदतीने बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्या गेले,

भारत हा उष्ण देश आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. येथील फुलांना सुगंध आणि गोडवा आहे. भारतीय मध औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे जगातील सर्वात जास्त मधाचे उत्पादन करणारा अमेरिका ही भारताकडून जास्तीत जास्त मध खरेदी करतो. आता युरोप बद्दल बोलायचे तर बहुतेक भाग थंड आहेत. तिथल्या फुलांना सुगंध आणि गोडवा नसतो. म्हणून, युरोपियन मधाचे शुद्धीचे मापदंड  वेगळे असल्याने या आधारावर भारतीय मधा बाबत संभ्रम निर्माण केला जाऊ शकतो. युरोपच्या एका देशातील एक लहान प्रयोगशाळा ज्यामध्ये 300 फुलांचे  मार्कर होते, त्यापैकी 85 टक्के युरोपियन फुले होती. भारतीय मधा बाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी या प्रयोगशाळेचा वापर करण्यात आला. भारतातील एनजीओच्या म्हणण्यानुसार, त्या प्रयोगशाळेत भारतातील सर्व प्रमुख ब्रँडच्या मधाची चाचणी घेण्यात आली आणि अहवालानुसार, युरोपियन मानकांनुसार, सर्वच मोठे भारतीय ब्रँडच्या खरे उतरले नाही. ते युरोपियन फुलांच्या मधाच्या मानकांनुसार नव्हते. भारतीय मधात भेसळ आहे, असा उल्लेख रिपोर्ट मध्ये नाही.  भारतीय एनजीओ ने ही तसे म्हंटले नाही. फक्त रिपोर्टचा दाखला देऊन संभ्रम निर्माण केला,

या अहवालाचा भारतीय मिळतात भरपूर प्रचार केला. मीडियानेही विचार न करता पंचायती चर्चा केली. भारतीय ब्रँडसची बदनामी केली. गंमत म्हणजे आपल्या ग्राहक मंत्रालयानेही तो अहवाल वेबसाईटवर टाकला. तिथे खरोखरच भारतीय मधाची  चाचणी झाली होती का?  असा प्रश्न कोणी विचारला नाही. मध उत्पादक कंपन्यांकडून संमती घेण्यात आली होती का? त्या प्रयोगशाळेला काही वैधानिक अधिकार होते का?  ज्या मध उत्पादकांची स्वतःची प्रयोगशाळा नाही, इतर प्रयोगशाळा ज्यांना भारत सरकारने यासाठी अधिकृत केले आहे, ते नियमितपणे त्यांच्या मधाची गुणवत्ता तपासून घेतात.  सर्वात मोठा प्रश्न हा आहे की त्या लॅबमध्ये भारतीय फ्लॉवर मार्कर होते का? चाचणी भारतीय नियमांनुसार झाली होती का? असे प्रश्न मीडियाने त्या एनजीओला विचारले नाही.

बाकीचे प्रश्न न मांडण्याचे कारण सांगायची गरज नाही. कारण सर्व समंजस लोकांना माहीत आहे. परिणामी, डाबर पासून ते पतंजली पर्यंतच्या सर्व भारतीय कंपन्यांना वर्तमानपत्र आणि टीव्हीवर मोठ्या जाहिरातींचे दाखले देऊन आपले शहर शुद्ध असल्याचे सांगावे लागले. यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करावे लागले. तरीही, बरेच लोक या अहवालावर विश्वास ठेवतील आणि कमी दर्जाचा विदेशी मध महागड्या किमतीत माल खरेदी करतील. 

खोटे आणि दिशाभूल करणारे अहवाल कसे तयार केले जातात याची सर्वांना कल्पना आली असेल. बाकी एवढे करून ही भारतीय मधाचा निर्यात वाढतच आहे. हे षडयंत्र पूर्णपणे फसले.  एनजीओ द्वारा भरपूर पैसा खर्च करून भारतीय  आणि अंतर्राष्ट्रीय ग्राहकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला तरीही  २३-२४ या वर्षात १४७०.८४ कोटी रुपयांचे 1,07,963.21 मेट्रिक टन मध निर्यात केले. 


Saturday, September 7, 2024

आर्य म्हणजे कोण : भारतीय ग्रंथांचा संदर्भ

आर्य नावाची जाती होती आणि ते  बाहेरून भारतात आले असे इतिहासकार बिना कोणत्याही आधारावर म्हणतात. भारतीय ग्रंथांच्या अनुसार आर्य  जातीवाचक किंवा समुदायवाचक शब्द नव्हे तर मानवीय गुणांच्या आधारावर आहे. आचार विचाराने श्रेष्ठ व्यक्तीला आर्य म्हंटले आहे. आपल्यातील समस्त दुर्गुणांचा नाश करून सद् मार्गावर चालणे म्हणजे आर्य होणे. 

इन्द्रं॒ वर्ध॑न्तो अ॒प्तुर॑: कृ॒ण्वन्तो॒ विश्व॒मार्य॑म् । अ॒प॒घ्नन्तो॒ अरा॑व्णः ॥

इन्द्रं वर्धन्तो अप्तुर: कृण्वन्तो विश्वमार्यम् । अपघ्नन्तो अराव्णः ॥ (9/63/5)

या ऋचेचा सामान्य अर्थ इन्द्र अर्थात राजाने समाजात सद्गुणांचा आणि ज्ञानाचा प्रसार केला पाहिजे  आणि दुर्गुणांचा प्रसार करणार्‍यांचा नाश करून आर्य धर्माचा प्रसार केला पाहिजे.  

महाभारतात  व्यासजी म्हणतात: 

न वैर मुद्दीपयति प्रशान्त,न दर्पयासे हति नास्तिमेति।
न दुगेतोपीति करोव्य कार्य,तमार्य शीलं परमाहुरार्या।।
(उद्योग पर्व)

जे विनयशील पुरुष विनाकारण कोणाचाही हेवा करत नाहीत आणि गरीब 
असतानाही दुष्कर्म करत नाहीत त्यांना 'आर्य' म्हणतात.
 
वशिष्ठ स्मृति म्हणते 

कर्तव्यमाचरन कार्य कर्तव्यमनाचरन 
तिष्ठति प्रकृताचारे स वा आर्य इति स्मृत. 

जो सत्कर्म करतो तो करणे योग्य आहे आणि वाईट कृत्ये करत नाही जी करणे योग्य नाही आणि जो चांगल्या आचरणात स्थिर राहतो तो आर्य होय.

श्रीमद् भगवत गीतेत  स्वयं भगवान कृष्ण म्हणतात: 
अभ्यासाद धार्यते विद्या कुले शीलेन धार्यते ।
गुणेन जायते त्वार्य, कोपो नेत्रेण गम्यते ।।(अध्याय ५ श्लोक ८)

ज्ञान निरंतर अभ्यासाने प्राप्त होते, गुण, कृती, स्वभाव यांनी स्थिर होते, आर्य-श्रेष्ठ मानवी गुणांनी ओळखले जाते.


Thursday, September 5, 2024

लाकूड वापरा, झाडे जगवा.

मनुष्य स्वभावाने स्वार्थी असतो. वस्तू असो व प्राणी किंवा वनस्पती ज्यात माणसाच्या स्वार्थ दडला आहे त्यांना तो जपतो. आपल्या स्वार्थासाठी त्यांचे उत्पादन वाढवितो. ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. 

तेव्हा नुकतीच सरकारी नोकरी लागली होती. सप्टेंबरचा महिना हा श्राद्धचा महिना असतो आणि याचवेळी सरकारी कार्यालयात हिंदी पखवाडा साजरा होतो. हिंदी पखवाड्यात अनेक कार्यक्रम होतात. निबंध प्रतियोगिता, अंताक्षरी प्रतियोगिता वादविवाद प्रतियोगिता, इत्यादी. या कार्यक्रमात सरकारी कर्मचाऱ्यांना आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळते. त्या काळी कार्यालयांचा वेळ सकाळी  सव्वा दहा ते संध्याकाळी सव्वा पाच हा होता. आमच्या  विभागात असे कार्यक्रम बहुदा संध्याकाळ ४ वाजता सुरु होत असे. त्यादिवशी वाद विवाद प्रतियोगिता होती. सकाळी हिंदी अनुभागाने वादविवाद प्रतियोगिता विषय सर्कुलर काढून सर्वांना कळविला. विषय आठवत नाही पण घरात लाकडाचा प्रयोग हा होता. नोकरीचे पहिलेच वर्ष होते म्हणून मी नाव दिले नाही. दुपारचे साडे तीन वाजले असतील हिंदी अधिकारी रूम मध्ये आले आणि म्हणाले पटाईतजी  तुम्ही पण भाग घ्या. मी उतरलो, माझे पहिलेच वर्ष आहे मला अनुभव नाही. अधिकारी, हसत म्हणाला, भाग घेतलेल्या शिवाय अनुभव मिळत नाही. मी तुमचे नाव सर्वात शेवटी टाकतो.दुसऱ्यांचे ऐकून तुम्ही तैयारी करू शकतात. आता माझा नाईलाज झाला,

माझ्या आधी १२ स्पर्धकांनी विचार मांडले. सर्वांनी घरात लाकडाचा उपयोग कसा कमी करावा जेणेकरून झाडांची कत्तल थांबेल. झाडे जगतील तर हिरवळ वाढेल पर्यावरणात सुधार होईल. त्यांची भाषणे ऐकता-ऐकता अचानक मनात विचार आला कृष्णा ने पूतनाचे दूध पिण्या ऐवजी रक्त प्राशन केले आणि तिचा मृत्यू झाला. पृथ्वीच्या वर जेवढे पदार्थ मिळतात त्यांचा आपण उपयोग केला तर पर्यावरणाला नुकसान होणार नाही आणि पृथ्वी ही नष्ट होणार नाही. 

भाषणाची सुरवात करत मी म्हणालो पूर्वी वसंत कुंज कुणी भागात अरावलीच्या टेकड्या होत्या. त्यावर जंगल होते. बिबट्या, कोल्हे, ससे इत्यादी प्राण्यांचे वास्तव्य होते.  रोडी आणि स्टोन डस्ट साठी त्या सर्व टेकड्या माणसांनी खोदून टाकल्या. नंतर त्यात कचरा भरून  वसंत कुंज सारखी श्रीमंतांची कॉलोनी बनली.  एकच हशा उमटला. घरांसाठी लोखंड अल्युमिनियम सिमेंट सर्वच आपण पृथ्वी खोदून बाहेर काढतो.  या सर्वांसाठी ऊर्जा लागते. त्यासाठी कोळसा खोदून काढावा लागतो आणि समुद्रातून हलाहल  विष अर्थात पेट्रोल ही काढावे लागते. तिथले जंगल नष्ट होतात. प्राणी पशू  पक्षी लुप्त होतात.  पन्नास ते शंभर वर्षांच्या आत ही घरे पडतात. त्यांच्या अधिकांश मलबा पुन्हा वापरता येत नाही.भूकंप आला तर लोकांना जिवंत काढणे ही कठीण असते.  मृत शरिरांना जमिनीत पुरले तर कब्रिस्तान भयंकर वेगाने जमीन गिळंकृत करतील. दिल्लीत हजारों एकड जमीन कब्रिस्तान ने गिळंकृत केली आहे. हीच स्थिती सर्वत्र आहे. 

आता लाकडांचा वापर केला तर काय होईल. गावांत आज ही जुन्या घरांचा भिंती बांधताना माती आणि बांबूचा वापर होतो. वरचा माला बांधायचा असेल तर लाकडांचा वापर होतो. छत खपरेल, नारळाची पाने इत्यादी पासून बनत असे. उन्हाळ्यात ही घरे थंड राहत असे. घरातील फर्निचर, दार, खिडक्या, पलंग  कपाट  लाकडांचेच बनविले पाहिजे. घर पडल्यावर माती पुन्हा वापरली जाऊ शकते. खराब लाकूड जाळण्याच्या कामी येते. स्मशानातील एका चितेवर वर्षात ६० ते ७० लोकांना मुक्ती मिळते.त्यासाठी दहा बारा झाडांचे लाकूड लागेल. वीस वर्षांत एक झाड कापण्या लायक होते. त्याकाळात त्याने भरपूर प्राणवायू दिली असते. चितेच्या  धुरापेक्षा शंभर पट तर निश्चित. पर्यावरण वाचवायचे असेल तर लाकूड बांबू इत्यादींचा जास्तीसजास्त वापर केला पाहिजे. ह्या सर्व वस्तू पृथ्वी वरच मिळतात. तिच्या शरीरावर घाव करायची गरज नाही.

 प्रश्न फक्त झाडे लावण्याचा आहे. व्यवसायिक रीतीने झाडांच्या शेतीला प्रोत्साहन दिले तर झाडांची संख्या वाढेल. जंगल ही वाढेल. पशू पक्षी इत्यादींची संख्या वाढेल. वातावरणात प्राणवायू ही वाढेल.  पृथ्वीचे पर्यावरण संतुलन कायम राहील. तीन मिनिटांचे भाषण पूर्ण झाले,सर्वांनी टाळ्या वाजविल्या.  मला ही पहिले बक्षीस मिळाले. 


 

Monday, September 2, 2024

जो दुसऱ्यांवरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला


जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टात गेला
तोचि भला.
(दासबोध १९.९.१६)

[समर्थ म्हणतात - जो स्वत:च्या कार्यासाठी दुसर्यावर विसंबून राहतो त्याच्या कार्याचा नाश होतो, म्हणून जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोचि शहाणा समजावा].  

रोज सकाळी नळात पाणी येते. तरीही आपण भरून ठेवतो. टंकित पाणी साचवितो. कारण एखाद्या दिवशी नळात पाणी आले नाही तर चूळ भरायला ही पाणी मिळणार नाही याचा दिल्लीकरांना चांगलाच अनुभव आहे. आपली मुले शाळेत शिकतात. शाळा कितीही उत्तम असली तरी आपण महिन्यातून एखाद दिवस शाळेत जाऊन शिक्षकांना भेटतो आणि मुलाच्या अभ्यासाबाबत चर्चा करतो. कारण त्याची  अभ्यासात प्रगती झाली पाहिजे ही आपली अपेक्षा असते. 

पण आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात. पण दुसऱ्यांवर  डोळे बंद करून ठेवण्याचा परिणाम काय होतो. उदा. दिल्लीत सोसायटीत राहणारे भाजीपाला सुद्धा मोबाईल वर मागवितात. याचा फायदा घेऊन दुकानदार बहुधा शिळी भाजीच घरपोच करतात. परिणाम लोक ताजी भाजी म्हणजे काय हे ही विसरून गेलेले आहेत. एकदा मी एका मित्राच्या घरी आलेली  शिळी भाजी परत केली आणि त्याला  घेऊन त्याच दुकानात  गेलो. तेंव्हा मित्राला कळले कित्येक वर्षांपासून त्याचा ओळखीचा दुकानदार त्याला शिळी  आणि खराब भाजी पुरवून ताज्या भाजीचे पैसे घेत होता. त्या दिवसापासून तो स्वत: बाजारात जाऊन भाजी आणू लागला.

छत्रपति शिवाजी महाराज खात्री केल्याशिवाय कुणावर ही विश्वास ठेवत नव्हते. त्यांनी अफजल खान वर विश्वास ठेवला असता तर  स्वराज्य स्थापना झाली नसती.  दूसरी कडे पंत प्रधान नेहरुंनी हिंदी चीनी भाई भाई नाऱ्यावर विश्वास ठेवला. १९६२ युद्धात भारताचा दारुण पराभव झाला. 

आजच्या जगात दुसर्यावर विश्वास ठेवावेच लागतो. उदा: घर बांधायचे असेल तर ठेकेदारावर विश्वास ठेवावा लागतो.  पण घराचा नक्शा पास करून घेणे, बँक मार्फत लोनची व्यवस्था करणे, सरकारी अनुमती इत्यादी बाबी स्वत:च बघाव्या लागतात. विटा, सिमेंट, लोखंड कुठे चांगले आणि स्वस्त: मिळते हे ही पाहावे लागते. ठेकेदार किती ही विश्वासू असला तरी आपल्याला जातीने उभे राहून कामावर लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा कुठे घर मनाप्रमाणे आकार घेते. अन्यथा घराचे स्वप्न, स्वप्नच राहण्याची शक्यता जास्त. दुसर्यांवर अवलंबून राहायचे असले तरी  त्याच्या कामावर लक्ष हे ठेवावेच लागेल. त्या साठी थोडे कष्ट ही करावे लागतील.

ज्या कामांचे चांगले आणि वाईट परिणाम स्वत:च भोगायचे असतात. ती कामे करण्यासाठी स्वत:च कष्ट करावे लागतात अन्यथा काय होते, या वरून एक जुनी कथा आठवली. 

पूर्वी  इक्ष्वाकु  वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते. राजा सत्यव्रताने सौपा मार्ग निवडला चक्क तपश्चर्या ऑउटसौर्स केली. ऋषी विश्वामित्र तपस्या करणार आणि सत्यव्रत स्वर्गात जाणार हे ठरले. या साठी राजा सत्यव्रताने किती सुवर्ण मुद्रा मोजल्या असतील, काही कल्पना नाही. एवढे मात्र खरे, ऋषी विश्वामित्र तपस्येला बसले आणि सत्यव्रताचे स्वर्गारोहण सुरु झाले.

आता परीक्षा देणारा एक आणि पास होणारा दुसरा, कुणालाही हे आवडणार नाही.  देवतांचा राजा इंद्राला सत्यव्रताचा ऑउट सौर्सिंग प्रकार मुळीच रुचला नाही. आता विश्वामित्र सारख्या महान तपस्वी आणि इक्ष्वाकू वंशाच्या बलाढ्य राजाच्या विरुद्ध बलप्रयोग करणे देवराज इंद्राला जमणे शक्य नव्हते. पण इंद्राजवळ अप्सरा रुपी ब्रह्मास्त्र भरपूर होते. त्यांचा वापर कसा करायचा हे ही इंद्राला चांगले माहित होते. इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्रांची तपस्या भंग करण्याचा आदेश तिला. रति  समान सुंदर स्त्री समोर पाहून विश्वामित्र यांची विकेट उडाली. विश्वामित्र राजाला दिलेले वचन विसरून गेले. तपस्या अर्धवट सोडून, विश्वामित्रानी मेनके सोबत संसार थाटला. राजा सत्यव्रताची गत तर ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. ते त्रिशंकू झाले. अधांतरी लटकले. त्यांची स्वर्गात जाण्याची मोहीम पूर्णपणे फसली.  सत्यव्रताने तपस्या केली असती तर किमान मृत्यू  नंतर निश्चितच ते स्वर्गात गेले असते. 

सारांश एकच, प्रपंचातील कामे असो किंवा परमार्थ साधण्याचा मार्ग, कार्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला स्वत:च कष्ट करावेच लागतात. तेंव्हाच कार्य तडीस जाते. समर्थांच्या शब्दातच,

व्याप आटोप करती
धके-चपटे सोसती
तेणे प्राणी सदेव होती
देखता देखता.
(दासबोध १५.३.७)