आज सकाळी आकाशात ढग जमलेले बघितले, बहुतेक लवकरच पाऊस
येईल असे वाटते. बाकी दिल्लीत कितीही घनघोर घटा, काळेकुट्ट ढग आकाशात
जमले तरी पाऊस पडेलच याची काहीच शाश्वती नाही. अधिकांश वेळी नेत्यांच्या
आश्वासनाप्रमाणे जोरजोरात गर्जना करीत हे ढग न बरसतता पुढे निघून जातात. कधी-कधी
विचार येतो, या मेघांना बरसण्यासाठी बक्षिसी तर पाहिजे नाही ना?
सहज बालपणीच्या पावसाळी कवितेची आठवण आली "येरे येरे पावसा.
तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा".
त्या वेळी हि मनात विचार येत असे, पाऊस आल्याने पैसा
कसा खोटा होतो. अनेक वेळा गच्चीवर पावसाच्या पाण्यात भिजताना ५-१० पैश्याचे नाणे
बरसणाऱ्या पावसाच्या धारे खाली हि ठेऊन बघितले. पण पैसा काही खोटा झाला नाही. मग
या म्हणी मागचे रहस्य काय? या प्रश्नाचे उत्तर त्या वेळी तरी सापडले नाही.
दीडएक वर्षांपूर्वी नोट बंदी झाली. लोकांनी ५००-१००० च्या गड्या कचर्या ढिगार्यात फेकलेल्या बघितल्या. डोक्यात उजेड पडला. नोट बंदी म्हणजे
मोठा पाऊस आणि हाच तो पैसा जो खोटा झाला होता.
आता या खोट्या झालेल्या पैश्याचे काय बरे करायचे. हा पैसा खरा करण्यासाठी
काहींनी सरकारला भारी भरकम कर दिला तर काहींनी खोटा पैसा खरा करण्यासाठी त्यांच्या
गरीब नातलगांच्या आणि मित्रांच्या बँक खात्यांचा वापर भाडे
तत्वावर केला. काहींनी हे खोटे नोट बदलण्यासाठी ३०-३० टक्के कमिशन
गरिब खातेधारकांना दिले. स्वत:चाच पैसा बदलण्यासाठी दुसर्यांना कमिशन का बरे? दुसर्यांचे काम
करण्याचे बक्षीस म्हणून मिळालेला पैसा खोटा झालेला होता तो खरा करण्यासाठी हि
बक्षिसी. 'यालाच म्हणतात रिश्वत घेताना पकडलेला व्यक्ती रिश्वत देऊन सुटला'.
एकदा ग्रहदशा बिघडली कि असा पैसा ठेवणार्यांना जेलमध्ये हि जावे
लागते आणि तो पैसा सरकार हि जब्त करते. त्यांच्या दृष्टीने
असा पैसा खोटा झालेला असतो.
आता या म्हणीचा अर्थ स्पष्ट झाला. मेघ बरसणे म्हणजे
कार्य पूर्ण होणे. या कार्यासाठी घेतलेला पैसा मोठा पाऊस आल्यावर खोटा होणारच.
पुन्हा मनात एक प्रश्न आला,आता दिल्लीच्या
आकाशात जमलेले ढग बरसण्यासाठी किती बक्षिसी घेणार आणि आपण ती बक्षिसी
या ढगांना आपण कशी काय देणार? .....
No comments:
Post a Comment