तो पुन्हा बारावीत
नापास झाला. जो मुलगा बारावी पास करू शकत नाही तो आयुष्यात काय करणार? फुकटचे किती
दिवस खाऊ घालायचे तुला? तू जगला काय, नि मेला काय, आम्हाला सारखेच. वडिलांचे कटु बोल राहून-राहून त्याला टोचत होते. त्याच्या मनात विचारांचे
काहूर उठले. आपण एक साधी परीक्षा ही पास करू शकत नाही. व्यर्थ आहे आपले जगणे.
आपण मेलो तर निदान घरात एक खाणार कमी होईल. त्याने आत्महत्या करण्याचा
निश्चय केला.
गावा जवळच्या
डोंगराच्या कड्यावरून कधी-काळी कैद्यांना कडेलोट केले जात होते. त्या डोंगराच्या कड्यावर
पोहचल्यावर, इथून उडी मारली तर नक्की मारणार ना, याची खात्री करण्यासाठी
त्याने कड्या खाली डोकावून पाहिले. पण हे काय, कड्याच्या थोड्या
खाली दोन दगडांच्या भेगेतून एक पिंपळाचे झाड डोकावत होते. झाडाच्या मुळांनी दूर पर्यन्त
दगडांना जखडून ठेवले होते. पिंपळाचे ते झाड गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला झुगारून मस्त
वार्या सवे डोलत होते. च्यायला, इथून उडी मारली तर आपण कदाचित
पिंपळाच्या झाडाच्या फांदीत अटकू. पण त्या क्षणी त्याच्या मनात विचार आला, इथे न माती, न पाणी, फक्त दगडाची एक भेग, तरीही
हे झाड जिवंत आहे. झाडाला आधारासाठी मातीच्या जागी दगड मिळाले तरीही पिंपळाने तक्रार
केली नाही आणि जगण्याची आशा ही सोडली नाही. दगडातच त्याने जगण्याचा मार्ग शोधला. आपल्या
डोक्यावर छत आहे, घरात खायलाही मिळते. फक्त परीक्षेत नापास झालो
म्हणून आत्महत्या? आपल्यालाही पिंपळाप्रमाणे जगण्याचा काही ना
काही मार्ग निश्चित सापडेल. त्याने आत्महत्या करण्याचा विचार मनातून काढून टाकला आणि
तो घरी परतला. नव्या जोमाने आयुष्याची सुरुवात
करण्यासाठी.
No comments:
Post a Comment