मायेच्या संसारासाठी
पोटाच्या खळगीसाठी
निरर्थक मी भटकत होतो
जगणे त्याला समजत होतो.
कोऱ्या-कोऱ्या कागदांवर
खोटा हिशोब लिहित होतो
सृजनतेचा आव खोटा
स्वत:ला ब्रम्हा समजत होतो.
खोटे होते शब्द, खोटी होती माया
रिक्त होते हात, कोरी होती वही
अंधाऱ्या रस्त्यात हरवून मी गेलो.
शोधेल का माय मला?
घेईल का कुशीत पुन्हा?
ऐकता-ऐकता अंगाई नवी
पाहणार का पुन्हा,
सोनेरी स्वप्नांची
सोनेरी स्वप्नांची
नवी कोरी वही.
अहाहा! क्या बात है. आपण मोठे होण्याच्या नादात आपलं बालपणीचं निरागस स्वप्नाळू मन विसरत जातो. खरोखर अशी एखादी सोनेरी स्वप्नांची वही आईच्या अंगाईत पुन्हा एकदा गवसली तर आयुष्य पुन्हा एकदा किती सुंदर आणि निरामय होईल!! आयुष्याचा तरल निरागसपणा बोटांच्या फटीतून निसटून जावा नि हातात फक्त अनुभव, कर्तव्यपूर्ती आणि मिळकतीच्या सारांशाचे मोठाले दगड ओंजळीत शिल्लक रहावे तर मग मोठं होण्याच्या शर्यतीत वयाच्या गणिताने मला नेमकं दिलं तरी काय? तुमच्या या कवितेने अंतर्मूख केलंय...
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete