Saturday, September 27, 2025
विनाशाच मार्ग सोडा, निवडणूकी वर विश्वास ठेवा.
Monday, September 22, 2025
"मुक्तीच्या वळणावर थांबलेली नदी"
(आपण नदीच्या पाण्याचा प्रचंड प्रमाणावर वापर करत आहोत. नदीकाठावरील जंगल उद्ध्वस्त झाले आहे. वाढत्या तापमानामुळे हिमालयातील बर्फही झपाट्याने वितळत आहे. भविष्यात नदीला पाणी न मिळाल्यास तिच्या प्रवाहावर व पर्यावरणावर काय परिणाम होईल. या लघु कथेच्या माध्यमाने...)
Friday, September 19, 2025
"धुक्याच्या दोन छटा : शुभ्र स्वप्न आणि काळा सावली
धुकं म्हणजे निद्राग्रस्त धरतीने पांघरलेले एक शुभ्र, शांत वस्त्र. सकाळच्या कोवळ्या वेळी धुक्यातून फिरताना मन प्रसन्न होते. धुक्याच्या ओलसर स्पर्शात दवबिंदू फुलांवर मोत्यासारखे चमकतात. पूर्व दिशेकडून सूर्यदेवता सोनेरी किरणांचा साज घेऊन उगम पावतो, आणि त्या क्षणी धुकंही त्या सोनेरी रंगात न्हालेलं दिसतं. धुक्याला भेदून जेव्हा सूर्यकिरण अंगावर पडतात, तेव्हा त्या आनंदाच्या क्षणांचे वर्णन शब्दांत करणे अशक्यच वाटते. मन प्रसन्न, उत्साही आणि शांततेने भरून जातं.
पण काळ बदलतो. रोजगार आणि सुखसुविधांच्या शोधात लाखो लोक दिल्लीसारख्या महानगरांत स्थलांतर करतात. दिल्ली शहरात हजारो कारखाने धूर ओकत असतात, लाखो वाहनं दररोज रस्त्यावर धावतात. हिवाळी सकाळी हवा शांत असेल, की संपूर्ण आसमंतात धुकं पसरतं. पण हे धुकं शुभ्र नसतं— काळं, कुट्ट आणि गुदमरणारं असतं.
दिल्लीतील या धुक्याला "स्मॉग" म्हणतात. डॉक्टर सकाळी पार्कमध्ये धावणाऱ्यांना सतर्क करतात—या स्मॉगमध्ये फिरणे किंवा व्यायाम करणे आरोग्यास अपायकारक ठरू शकते. तुम्हाला प्रश्न पडेल, हा स्मॉग नेमका काय आहे?
लाखो वाहनांच्या धुरातील सूक्ष्म कण, कारखान्यांच्या विषारी धुराने भरलेल्या चिमण्या, औद्योगिक वसाहतीतून निघणाऱ्या रसायनांचा दुर्गंधी वायू—हे सगळं धुक्याच्या थरात मिसळून तयार होतो स्मॉग. सर्दी, खोकला, दमा यांसारख्या आजारांना निमंत्रण देणारा हा काळा धुराचा थर झाडांच्या पानांवरही परिणाम करतो—पाने काळी पडून गळून जातात. जीवसृष्टी असो वा वनस्पती, सर्वांच्या अस्तित्वावर घाला घालणारा हा स्मॉग.
प्रगतीच्या नावाखाली निर्माण झालेलं हे काळं धुकं सुख सुविधांच्या मागे धावण्याचं फलित आहे. जर माणूस अशाच वेगाने धावत राहिला, तर एक दिवस तो स्वतःच या काळ्या धुक्यात हरवून जाईल.
Wednesday, September 17, 2025
मोदींच्या मिस्कील नजरेतून – एक अकबर-बीरबल
(आज पंतप्रधान मोदीजींचा वाढदिवस आहे पुन्हा एकदा ही गोष्ट वाचकांसाठी)
पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिनमध्ये बसतो ती एका मोठ्या हॉलमध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूंना साडेतीन फूट उंच पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४–२५ जणांचा स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्याबरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते.
हॉलचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो. तिथे एक तीन फूट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.
त्या दिवशी दुपारचे साडेतीन वाजले असतील. नुकताच सर्वांचा चहा झाला होता. अचानक दरवाजा उघडून एक कर्मचारी आत आला आणि थरथरत्या पण सर्वांना ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला, “पंतप्रधान इकडेच येत आहेत!”
मी चमकलोच. गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्यरत आहे. या आधी पंतप्रधान तर सोडाच, कुणा वरिष्ठतम अधिकाऱ्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिनमध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना—देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावं लागतं, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो.
सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करायला सुरुवात केली. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचार्याच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच, पहिलेच केबिन असल्यामुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली आणि विभिन्न विषयांवर माझे मत विचारले. प्रत्येक केबिनसमोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली आणि त्यांच्या सोबत चर्चा ही केली.
सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिनमध्ये बसणाऱ्या स्टाफची विचारपूस केली. त्यांची नजर अलमारीवर ठेवलेल्या ७–८ रिकाम्या चहाच्या कपांवर गेली. त्यांनी मिस्कीलपणे विचारलं, “बहुत चाय पीते हो आप लोग?”
स्टाफमधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिलं, “सर, सारे कप हमारे नहीं हैं, और लोग भी अपने खाली कप यहाँ रख देते हैं.”
पंतप्रधान हसले आणि म्हणाले, “दोस्तों, आपने अकबर-बीरबल की कहानी सुनी है?”
आम्ही सर्व टक लावून त्यांच्या कडे बघू लागलो. पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.
त्यांनी अकबर-बीरबलची गोष्ट सांगायला सुरुवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत):
एकदा अकबर बादशाह बीरबलच्या घरी गेले. पाहतात काय—बीरबल आणि बीरबलाची बेगम एका मंचकावर बसून आंबे खात होते. आत येताच अकबर बादशाहचं लक्ष जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेलं.
अकबर बादशाहने मनात विचार केला—बीरबल स्वतःला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे की बादशाहही किती बुद्धिमान आहे.
अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या आणि म्हणाले, “बीरबल, मी सांगू शकतो की माझ्या इथे येण्याआधी तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत.”
बीरबल अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे हे त्याने सहज ओळखलं. तो मिस्कीलपणे म्हणाला, “जहाँपनाह, आपण चुकत आहात. या खाली टाकलेल्या कोयी मी खाल्लेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयींसह आंबे खाते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय स्पष्ट झाला. आम्हीही मुक्तपणे हसलो.
(कहाणीचा अर्थ मला जो कळला—बीरबलने आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनवले असेल, पण मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नका. उगाच दुसऱ्यांचे नाव कशाला घेता? हा सर्व चहा तुम्हीच गटकला आहे!)
पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यांशी अशा पद्धतीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर-बीरबलची गोष्ट सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.
Friday, September 12, 2025
तात्यांचे टेरिफ: ब्राह्मणी अर्थव्यवस्थेविरुद्ध जनतेच्या संघर्षाचे प्रतीक
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मनुवादी ब्राह्मणी अर्थव्यवस्था ही गरिबांच्या शोषणावर उभी होती. ब्राह्मणी मानसिकतेने ग्रस्त उद्योगपतींनी मजुरांचे श्रम, त्यांचे हक्क आणि त्यांची माणुसकी यांची पायमल्ली केली. त्या काळात बॉलीवूडनेही जनतेच्या बाजूने भूमिका घेतली. चित्रपटांमधून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. मिल मालक 'प्राण' शोषण करणार्या ब्राह्मणी अर्थव्यवस्थेचे प्रतीक होते—जो मजुरांच्या घामातून आपला वैभव उभारायचा.
स्वातंत्र्यानंतर जनतेने या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तत्कालीन पंतप्रधानांनी या शोषणकारी व्यवस्थेला आव्हान दिले. काही मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले. 80% आयकर लादून धनसंपत्तीच्या एकाधिकाराला लगाम घालण्यात आला. समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार पुढे आला. जनतेला शोषणातून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण हे स्वप्न अपूर्ण राहिले. सरकारला पुन्हा ब्राह्मणी उद्योगपतींची मदत घ्यावी लागली.
तात्यांनी टेरिफ लावून भारतातील गरीब जनतेला ब्राह्मणवादाविरुद्धच्या संघर्षात मदत केली आहे. सर्व पुरोगामी मंडळींनी तात्यांचे आभार मानले पाहिजेत—कारण हा संघर्ष केवळ आर्थिक नाही, तर सामाजिक न्यायाचा यज्ञ आहे.
Sunday, September 7, 2025
वोट चोरी वर चर्चा
गप्पा मारताना तो सहज म्हणाला, “ईव्हीएमच्या मदतीने वोट चोरी सहज शक्य आहे.”
मी विचारलं, “कसं शक्य आहे? ईव्हीएमला इंटरनेट कनेक्शन नसतं. शिवाय एकदा मतदान झालं की ती मशीन बंद केली जाते—वीजही नसते.”
तो म्हणाला, “आज टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. इंटरनेट नसतानाही आकाशीय तरंगांच्या माध्यमातून ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो.”
त्याची गूढ भाषा मला काही समजली नाही. शेवटी मी त्याला म्हटलं, “मला तुझं सगळं पटतंय. ईव्हीएममध्ये वोट चोरी होऊ शकते.”
तो खुश झाला. म्हणाला, “म्हणजे राहुल गांधींचे आरोप बरोबर आहेत!”
तेवढ्यात मला पार्कमधल्या एका बाकावर एक गृहस्थ टाइम्स ऑफ इंडिया वाचताना दिसले. मी त्याला विचारलं, “आकाशीय तरंगांच्या माध्यमातून या वर्तमानपत्राचं नाव बदलून हिंदुस्तान टाइम्स करता येईल का?”
ते माझ्याकडे पाहून म्हणाले, “काका, हे शक्य नाही. कागदावर छापलेले शब्द बदलता येत नाहीत.”
मी म्हणालो, “ईव्हीएमचा डेटा जर बदलला, आणि त्यानुसार छापील कागदी स्लिप्स बदलल्या नाहीत, तर चोरी सहज उघडकीस येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काही निवडणूक क्षेत्रांमध्ये ईव्हीएमसोबत छापील स्लिप्सची मोजणी केली जाते. त्यामुळे वोट चोरी शक्य नाही.”
त्याचं तोंड अगदी लहान झालं. म्हणाला, “मला हे माहीत नव्हतं.”
Thursday, September 4, 2025
विषवाहिनीत हरवलेली कुरुवंशाची शौर्यकथा
ब्रज रक्षक गोवर्धन
हिरव्यागार वस्त्रांनी नटलेला गोवर्धन पर्वत आकाशात उंच मानकरून उभा होता. दूर यमुने पर्यन्त पसरलेले हिरवेगार कुरण. पायथ्याशी कमळ दलांनी भरलेले अनेक सरोवर असलेला सुंदर ब्रज परिसर सारस, बदके, हंस इत्यादि चित्र विचित्र पक्षी, हरिण ,व्याघ्र सहित अनेक वन्यप्राण्यांनी सुशोभित होता. यमुनेच्या काठी कदंब, आंबा, पेरु, इत्यादि नाना वनस्पति आणि वृक्षांनी आच्छादित कुंजवन होते. एक दिवस पशू पालक आपल्या गायी, म्हशी, बकर्या घेऊन या परिसरात आले. मानवी स्वभावानुसार घर बांधण्यासाठी आणि जाळण्यासाठी वृक्ष तोड केली. पण नवीन वृक्ष लागवड केली नाही. काही काळांत गोवर्धन पर्वत वनस्पति विहीन झाला. फक्त माती आणि दगडे शिल्लक उरली. दर पावसाळ्यात दरड कोसळू लागली. गोवर्धंनाच्या पायथ्याशी असलेली सरोवरे ही माती दगडांनी भरून गेली. यमुना काठचे कुंजवन ही नाहीसे झाले. वन्य प्राणीही ब्रज परिसर सोडून निघून गेले.
एक दिवस वादळ आले. मेघ गर्जना सहित भयंकर पाऊस कोसळू लागला. यमुनेला भयंकर पूर आला, तिला रोखण्यासाठी काठावर वृक्ष नव्हते. यमुनेचे पानी गावांत शिरले. दुसरीकडे वृक्ष विहीन गोवर्धन पर्वताचे अनेक कडे ढासळले. गोवर्धन पर्वतावरून चिखलाचा पूर ही गावांत शिरला. शेकड़ों घरे जमींदोस्त झाली. शेकडो गोपालक आणि हजारों पशु पाण्यात वाहून गेले. सर्वांना वाटले हा देवराज इंद्रचा कोप आहे. देवराज इंद्रला प्रसन्न करण्यासाठी यज्ञाचे आयोजन करण्याचा निश्चय केला. पण श्रीकृष्णाने यज्ञाचा विरोध केला. श्रीकृष्ण म्हणाला, आपल्याच मूर्खपणामुळे आपल्या वर ही आपत्ति आली. आपणच गोवर्धन पर्वतावरील आणि यमुनेच्या काठी असलेली झाडे आणि वनस्पति नष्ट केली. आपण विसरून गेलो गोवर्धन पर्वत आपला रक्षक आहे. आपण स्वार्थाने आंधळे होऊन मूर्खपणा केला नसता तर या भयंकर पावसाने आपले नुकसान केले नसते. गोवर्धन पर्वताला पूर्वीचे वैभव प्रदान करणे गरजेचे आहे. श्रीकृष्णाचे म्हणणे सर्व गोपालकांना पटले. श्रीकृष्णाच्या नेतृत्वात त्यांनी पुन्हा गोवर्धन पर्वतानवर वृक्ष लागवड केली. पायथ्याशी असलेल्या सरोवरांना पुन्हा जिवंत केले. या शिवाय श्रीकृष्णाने 99 सरोवरांचा निर्माण केला. यमुनेकाठी हजारों वृक्ष लाऊन कुंजवनांची निर्मिती केली.
काळ बदलला. ब्रज परिसर पुन्हा पूर्वी सारखा हिरवळीने समृद्ध झाला. वन्य प्राणी पशू-पक्षी तिथे पुन्हा परतले. एक दिवस पुन्हा भयंकर पाऊस आला. पण या वेळी चिखलचा पूर आला नाही. परिसरतील शेकडो सरोवरांनी पावसाचे पानी साठवून घेतले. यमुना काठावरच्या वृक्षांनी पूरचा जोर कमी केला. गोपालक आणि त्यांचे पशू सुरक्षित राहिले. गोवर्धन पर्वताने बृजची रक्षा केली.
आपण निसर्गाचे संरक्षण केले की निसर्ग आपली रक्षा करतो, हा मार्ग श्रीकृष्णाने जगाला दाखविला. निसर्ग सुरक्षित राहावा यासाठी आपल्या ऋषींनी पर्वत, नद्या, सरोवरे, जंगल इत्यादींना देवत्व प्रदान केले.
आज आपण स्वार्थी झालो आहोत. आपल्या शूद्र स्वार्थांसाठी निसर्ग नष्ट करत आहोत. परिणाम भयंकर पूर येऊ लागला आहे, पर्वत कोसळू लागले आहेत. हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहे. मानव जातीला वाचवायचे असेल तर आज पुन्हा श्रीकृष्णाने दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण करण्याची गरज आहे.
Monday, September 1, 2025
कालिदास आणि आजचा ययाती
निरीक्षर आणि मूर्ख कालिदास एका झाडाच्या फांदीवर बसून त्याच झाडाला आपल्या कुल्हाडीने तोडत होता. एका ऋषीने ते दृश्य पाहिले. तो कालिदासला म्हणाला, मूर्ख ज्या क्षणी झाड तुटेल त्याच क्षणी तू ही खाली पडेल. कदाचित, झाडासोबत तू ही मरणार. कालिदासला ऋषींचे म्हणणे पटले, तो झाडावरून खाली उतरला. कालिदास पुढे मोठा विद्वान लेखक झाला. कालिदासने त्याच्या साहित्यात मानवाचे पशू पक्षी, प्राणी आणि झाडे फुले यांच्या प्रेमाचे वर्णन केले आहे. प्रकृतीच्या सुंदरतेचे वर्णन केले आहे.
आजच्या ययातिला पृथ्वीवरच स्वर्ग सुख भोगायचे आहे. त्याने राहण्यासाठी सीमेंट कांक्रीटचे घर बांधले. घरातील सर्व फर्निचर, कपाटे, इत्यादींसाठी लाकूड मोठ्या प्रमाणात वापरले. त्याच्या घरातील एसी, मायक्रोवेव, फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, कंप्यूटर इत्यादि सर्व विजेवर चालणारे होते. पेट्रोल वर चालणारी कार ही घरात होती. ययाति स्वतला सर्व शक्तिमान समजतो. फक्त शिकारीसाठी त्यांनी जंगलातील प्राण्यांचा शिकार केला. पृथ्वीवरून पशू-पक्षी आणि इतर प्राणी नाहीसे होऊ लागले.
त्याने स्वतचे लाड पुरविण्यासाठी जंगल स्वच्छ करून, धरतीला खोदून, तिला जखमी करून मोठ्या प्रमाणात खनिजे बाहेर काढली. वीज निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणावर कोळसा काढला, कार चालविण्यासाठी पेट्रोल ही पृथ्वीच्या रक्तातून काढले. त्यामुळे पृथ्वीवरील वायु प्रदूषित झाली, पाणी प्रदूषित झाले. प्रदूषणामुळे सर्वत्र रोगराई पसरली. आज ययातिला स्वर्ग सुखाएवजी नरक यातना भोगाव्या लागत आहे. ययाति ऋषींना शरण गेला. ऋषि म्हणाले, ययाति, तुला नरक यातनेतून मुक्ति पाहिजे असेल तर, पृथ्वीवरील सर्व प्राण्यांचा, पशू पक्षी, वनस्पति, झाडे सर्वांच्या जगण्याचा अधिकार स्वीकार कर. धरतीचे रक्त पिणे आणि तिला जखमी करणे बंद कर. त्याशिवाय तुला नरक यातनेतून मुक्ति मिळणार नाही.
प्रश्न एकच. ययाति ऋषींचे ऐकणार का? स्वर्गसुखाच्या लालसेने नरक यातना भोगत राहणार.
* ययाति प्राचीन महाकाव्य महाभारतातील एक राजा ज्याला जिवंतपणे स्वर्ग सुख भोगायचे होते. त्याच्या इच्छा कधी न संपणार्या होत्या. अखेर त्याला सत्याचा साक्षात्कार झाला. त्याने सर्व संसारीक भोगांच्या त्याग करून संन्यास घेतला.