Wednesday, January 25, 2023

वार्तालाप : (३) नमस्कार करण्याचे फायदे

 

श्री सार्थ दासबोधात समर्थ म्हणतात: 

नमस्कारास वेचावें  नलगे 
नमस्कारास कष्टावें नलगे 
नमस्कारास कांहींच नलगे 
उपकरण सामग्री. (४/६/२२)

आपल्या देशात आज ही खेडे गावांत रस्त्यातून येता जाता अनोळखी माणसाला ही लोक स्मित करून ,राम-राम, जय रामजी की म्हणतात नमस्कार करतात. आपण ही आई, वडील, गुरुजन आणि वरिष्ठांना नमस्कार करतो. पण समर्थ म्हणतात लहान मोठे अनोळखी सर्वांनाच नमस्कार केल्याने आपले काहीच जात नाही. ज्या गोष्टीसाठी पै ही लागत नाही ती करण्यात कंजूषी कारायची गरज नाही. नमस्कार केल्याने रस्त्यावरचे दुकानदार, रेहडी पटरीवाले, भाजी विक्रेता, रस्त्यातून जाणारे अनोळखी लोक ही आपल्याला ओळखू लागतात.  वेळ प्रसंगी त्यांची मदत ही होते. 

याचेच एक उदाहरण. एक जुना प्रसंग, त्यावेळी आमच्या कालोनीत पक्के रस्ते नव्हते. रिक्शा घेण्यासाठी किंवा कार्यालयात जाण्यासाठी  जनकपुरी सी-1 च्या बसस्टॉप पर्यंत पायीच चालत जावे लागायचे. तिथे काही रेहडीवाले फळ-भाज्या  विकायचे. मी रोज त्यांना येता जाता नमस्कार करत होतो. कधी कधी फळ भाजी इत्यादि ही विकत घेत होतो. एक दिवस दीड वर्षाच्या लेकी सोबत जनकपुरी सी-1 वर रिक्शातून उतरलो. तोच एका वेगात येणार्‍या कारने रिक्षाला धडक दिली. रिक्षाचे मागचे एक चाक वाकडे झाले आणि रिक्शालाहि नुकसान झाले. कार चालक गाडीतून उतरला आणि रिक्शा चालकावर भडकला, तुला रिक्शा चालविता येत नाही, माझ्या कारची हेड लाइट तुटली, नुकसान भरपाई कोण देणार म्हणत त्याने रिक्शावाल्यावर हात उगारला. मी त्याच्या हात मध्येच धरला आणि म्हणालो चूक तुमची आहे, नुकसान भरपाई तुम्हाला द्यायला पाहिजे. पहिले तुलाच देतो नुकसान भरपाई म्हणत त्याने माझ्यावर हल्लाच केला म्हणा. खबरदार साहेबांना हात लावला तर म्हणत रस्त्यावरचे फळ विक्रेता लगेच माझ्या मदतीला धाऊन आले. परिस्थिति क्षणात बदलली. कार चालकाने रिक्शाचालकाला दुरुस्तीचा खर्च दिला. जर मी त्यांना नमस्कार करत नसतो तर ते माझ्या मदतीला धाऊन आले असते का?  ही आहे नमस्काराची महिमा. 


No comments:

Post a Comment