Tuesday, January 3, 2023

वार्तालाप(२०): श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ 

(श्री समर्थ सेवा मंडळाद्वारा संचालित श्री सार्थ दासबोधाचे निरूपण कार्यक्रमात, देशभरात  श्री दासबोधाचे निरुपणाचे कार्यक्र्म सुरू आहे. जानेवारी 2023 महिन्यात दिल्ली केंद्राला पाच रविवारी हा कार्यक्र्म सादर कारण्याचा मान मिळाला. पहिल्या रविवारी मला श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण करण्याचे दायित्व मिळाले. दिल्ली केंद्राचे दायित्व निर्वाह करणार्‍या डॉक्टर मंगला कवठेकर यांच्या मार्गदर्शनाची मोलाची मदत झाली. हा कार्यक्र्म 1 जानेवारी 2023 ला संध्याकाळी 4 ते 5 ऑन लाइन झाला. पुढील कार्यक्रम ही रविवारी याच वेळी होतील). 

श्री समर्थ व्यवस्थापन या विषयाचे आद्य गुरु होते. दोन शब्दांत व्यवस्थापन म्हणजे पूर्व निश्चित कार्याचे नियोजन करणे आणि ते कार्य यशस्वीरीत्या  कार्यान्वित करणे. व्यवस्थापनाचा उपयोग मानवी जीवनात सर्व क्ष्रेंत्रात होतो. समर्थांनी दासबोधात परमार्थ आणि प्रपंचात यशस्वी होण्याचे नियोजन आणि कार्यांवन कसे करावे याचे विस्तार पूर्वक वर्णन केले आहे. एकीकडे समर्थांनी दासबोधात शेती पासून ते राजकारण कसे करावे हे सांगितले आहे. तर दुसरी कडे  बद्ध जीवाने साधक कसे बनावे हे ही सांगितले आहे. 

सार्थ श्रीदासबोधातील श्रोताअवलक्षण समासात समर्थांनी श्रोत्यांचे अवलक्षण दूर करण्याचेय उपाय तर सांगितले आहे पण एकाग्रचित्ताने श्रवण केल्यानस त्याचे संसारात आणि आध्यात्मिक क्षेत्रात होणारे लाभ ही सांगितले आहे. आता पहिला प्रश्न सर्वांच्या मनात येतो श्रोता म्हणजे कोण. श्रोता हा श्रवण करतो. भागवत कथा असो किंवा सोसायटीची सभा, श्रोत्याचे कार्य वक्ता जे बोलतो त्याचे श्रवण करायचे. दूसरा प्रश्न? श्रवण करण्याचा लाभ काय? समर्थ दासबोधात श्रवणाची महत्ता सांगताना म्हणतात: 

ऐक परमार्थाचें साधन। जेणें होय समाधान।

तें तूं जाण गा श्रवण। निश्चयेंसीं।  

श्रवणें आशंका फिटे। श्रवणें संशयो तुटे।

श्रवण होतां पालटे। पूर्वगुण आपुला।

श्रवणें होय कार्यसिद्धी। श्रवणें लागी समाधी।

श्रवणें घडे सर्व सिद्धी।समाधानासी।

समर्थ म्हणतात श्रवण केल्याने भक्ति प्राप्त होते, आसक्ती तुटते, चित्ताची शुद्धी होते, मी पणा नष्ट होतो, आशंका फिटतात आणि  संशय दूर होतात. या सर्वांचा परिणाम- पूर्वीचे दोष पालटतात, कुसंगती तुटते, कार्य सिद्ध करण्याचा निश्चय दृढ होतो. सांसारीक आणि आध्यात्मिक कार्य सिद्ध होतात आणि मनाला समाधान ही मिळते. 

 पुन्हा एक प्रश्न मनात येतो. आज पुस्तके उपलब्ध आहेत. दासबोध वाचता येते. मग निरूपण ऐकण्याची गरज आहे काआहे तर श्रवण कसे केले पाहिजेसमर्थांच्या शब्दांत: 

ऐकल्याविण कळलें। शिकविल्याविण शहाणपण आले। देखिलें ऐकलें। भूमंडळी।

सकळ कांहीं ऐकतां कळे। कळतां कळतां वृत्ति निवळे।नेमस्त मनामधें आकळे सारासार। 

श्रवण म्हणिजे ऐकावें। मनन म्हणिजे मनीं धरावें। येणें उपायें स्वभावें त्रैलोक्य  चाले॥

एक उदाहरण, आपण सर्वच शाळेत गेलो आहे. पाठ्य पुस्तकात धडा असतो. तरीही आपण मुलांना शाळेत पाठवतो.  कारण फक्त धडा वाचून धडया खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे त्याला जमणार नाही, हे आपल्याला माहीत असते. विद्यार्थी शाळेत जातो. वर्गात शिक्षकाला लक्षपूर्वक ऐकतो. शाळा सुटल्यावर तो घरी येतो. घरी आल्यावर अभ्यासाला बसतो. आता हा विद्यार्थी अभ्यास कुठे करणार. बैठीकीच्या खोलीत आजोबा टीव्ही वर समाचार पाहत होते. स्वैपाक घरात आई स्वैपाक करत होती. विद्यार्थी घरातल्या ज्या खोलीत कुणीही नाही अश्या खोलीत बसून पुन्हा धडा वाचतो. शाळेत शिक्षकाने काय सांगितले होते त्यावर विचार करतो, मनन करतो आणि नंतर प्रश्नांची उत्तरे लिहतो. जर विद्यार्थी शाळेत लक्ष देऊन शिक्षकाला ऐकणार नाही तर त्याला प्रश्नांचे उत्तर देणे जमणार नाही. तसेच श्रीदासबोध समजण्यासाठी निरूपण ऐकणेही गरजेचे. 

 श्रवणासाठी पहिला महत्वपूर्ण टप्पा म्हणजे श्रवणाची जागा. बहुतेक अधिकान्श भागवत कथा, भजन इत्यादि मंदिराच्या शांत परिसरात होतात.  कथा सुरू करण्यापूर्वी  माइक, दिवे इत्यादीची व्यवस्था सर्वच करतात. पण जर जागा स्वच्छ नसेल तर काय होते. समर्थ म्हणतात कथा सुरू झाली एक श्रोता   "निरूपणीं येऊन बैसला। तो विंचुवें फणकाविला। कैचें निरूपण जाला। कासाविस। साहजिकच आहे ज्या श्रोत्याला विंचू चावेल, तो असह्य वेदनेने कासावीस होईल. इतर श्रोता निरूपण ऐकणे सोडून त्याची मदत करायला धावतील. कथेचा रस भंग होईल. श्रोत्यांची एकाग्रता तुटेल. ज्या ठिकाणी श्रवणाचा कार्यक्रम असतो ती जागा स्वच्छ पाहिजे. डास, विंचू, उंदीर, पाली, झुरळ इत्यादि जंतूंचा वावर त्या परिसरात नसावा.  तुम्ही ऑनलाइन निरूपण ऐकत असाल तरी ही तुम्हाला या खबरदार्‍या घ्याव्याच लागतील. या शिवाय अड्मिनच्या अनुमति शिवाय मोबाइलचे माइक ही बंद ठेवावे लागेल. 

 बाहेरचे लोक, चोर इत्यादि येऊन ही श्रवणाच्या कार्यक्रमांत विघ्न आणतात. चोर जोडे चप्पलांची चोरी तर करतातच पण मौका साधून स्त्रियांचे दागिने ही लंपास करतता. काही लोक स्त्रियांची छेड काढण्यासाठीच अश्या कार्यक्रमांना येतात. श्रवणाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी भुरट्या चोरांवर आणि असामाजिक तत्वांवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करणे ही गरजेचे असते. काहीं श्रोत्यांना शारीरिक त्रासांमुळे जमिनीवर बसवत नाही, पण ते कथा, कीर्तन, निरूपण ऐकण्यासाठी येतात. अश्या श्रोत्यांच्या बसण्यासाठी खुर्च्यांची सोय करणे आवश्यक असते. याशिवाय सभागृहाच्या बाहेर पिण्याच्या पाण्याची, टॉयलेट इत्यादीची व्यवस्था करणे ही गरजेचे. 

काही श्रोता अज्ञानवश श्रवणाच्या कार्यांत विघ्न आणतात. त्यांच्या मुळे इतरांचे ध्यान ही भंग होते. उदाहरण: कथा सुरू असतानाच काही श्रोते पाणी पिण्यासाठी, काही मल-मूत्र त्याग करण्यासाठी मधेच उठून जातात, अश्या श्रोत्यांनी मागे बसणे उचित, जेणेकरून दुसर्‍यांचे ध्यान भंग होणार नाही. काही श्रोते घरून भरपूर जेवून येतात. कथा सुरू झाल्यावर ढेकरे देतात, काही चक्क घोरू लागतात. त्या झोपलेल्या श्रोत्याला निरुपणाचा लाभ मिळणे शक्यच नाही.  त्यापेक्षा त्याने घरी जाऊन झोपले तर किमान दुसर्‍या श्रोत्यांना त्रास होणारा नाही. काही श्रोते ऐकण्याचे नाटक करत हळू आवाजात आपसात गप्पा मारत राहतात. तर काही श्रोता त्या भागातील  आल इंडिया रेडियोच्या बातम्यांचे प्रसारण करण्यासाठीच अश्या कार्यक्रमांत येतात. अधिकान्श श्रोते निरुपणा एवजी त्या चटपटीत मसालेदार बातम्या कान लाऊन ऐकतात.  काही श्रोता सभागृहात आल्यावर ही मोबाइल बंद ठेवत नाही. त्यांचा मोबाइल सारखा वाजत राहतो  "हॅलो जरा जोरात बोला, इथे प्रवचन सुरू आहे, ऐकू येत नाही...".  श्रोत्यांचे लक्ष तो मोबाइल वर काय बोलतो आहे याकडे जाते. अश्या अज्ञानी श्रोत्यांच्या अश्या वागण्याचा त्रास कथा श्रवण करण्यास आलेल्या इतर श्रोत्यांना तर होतोच, पण कधी-कधी निरूपण करणारा वक्ता ही वैतागून जातो. त्याचे ही लक्ष कथेत  लागत नाही. तो ही विचार करतो, इथे हे असेच सुरू राहणार. आपण आपली कथा पूर्ण करू, ऐकायची असेल तर लोक ऐकतील. नाही ऐकली तरी आपल्याला बिदागी मिळणारच आहे. अश्या वक्त्यांसाठीच समर्थ म्हणतात "हरीदास ते रें रें करी पोटासाठी". सारांश एवढाच, श्रवण करायला जाण्याआधी श्रोत्यांनी सर्व आवश्यक  कार्य निपटून घ्यावे. ताजेतवाने होऊन शांत मनाने सभागृहात यावे. मोबाइल इत्यादि बंद ठेवावे.  तरच ते श्रवणाचा लाभ  घेऊ शकतील. 

अध्यात्म्याच्या मार्गात प्रगति करण्यासाठी मुमुक्षू साधकाला समस्त श्रोता अवलक्षणाचा त्याग केला पाहिजे. यासाठी समर्थांनी साधकांना मार्गदर्शन करताना म्हणतात:  

श्रवणामध्यें सार श्रवण। तें हें अध्यात्मनिरूपण।
सुचित करून अंतःकर्ण ग्रन्थामधें विवरावें॥

येकांतीं नाजुक कारबार। तेथें असावें अति तत्पर।
त्याच्या कोटिगुणें विचार। अध्यात्मग्रन्थीं ॥

श्रवणमननाचा विचार। निजध्यासें साक्षात्कार।
रोकडा मोक्षाचा उधार। बोलोंचि नये॥  

 समर्थ म्हणतात अध्यात्मनिरूपणाचे श्रवण हे सारामध्येही सार आहे. म्हणून अंत:करण एकाग्र करून अध्यात्म ग्रंथाचे नीट विवरण करावे. एकांतात गुप्तपणे चर्चा आपण अति सावध राहून करतो. त्याच्यापेक्षा  कोटिगुणाने सावध  राहून अध्यात्म ग्रंथांचे निरूपण ऐकले पाहिजे. समर्थ म्हणतात अश्यारीतीने ग्रंथांचे श्रवण केल्यास आत्मसाक्षात्कार होतो आणि रोकडा मोक्ष मिळतो अर्थात तत्काळ मोक्ष मिळतो.

सामाजिक संस्थांच्या सभा, कंपन्यांच्या, सरकारी अधिकर्‍यांच्या मीटिंग्स असो किंवा विद्वानांच्या सभा, जिथे धार्मिक विषयांवर शास्त्रार्थ किंवा वाद-विवाद होतात, अश्या सभांमध्ये प्रत्येक व्यक्ति वक्ता आणि श्रोता दोन्ही असतो. वक्ता त्यांचे मते मांडतात. त्यावर श्रोत्यांसोबत चर्चा करतात अधिकान्श चर्चांचा  मुख्य हेतु समस्यांवर तोडगा काढणे किंवा नियोजित कार्य कसे संपादित करावे इत्यादि असते. पण होते काय, समर्थ म्हणतात  

येक येंकापुढे बोले। श्रोते अवघे वक्ते जाले।

जैसा जंबूक मिळाले। कोळहाळ करिती।

आणि ही कोल्हेकुई  आरडा-ओरड कश्यासाठी असते:   

माझें होये तुझें नव्हे। ऐसी अखंड जयास सवे।

आपल्या थोरपणासाठीं। अच्यावाच्या तोंड पिटी

येकेकडे अभिमान उठे।

दूसरेकडे उदंड पेटे।

ऐसे श्रोते खरे खोटे। कोण जाणे।

 गर्व आणि अहंकाराने ग्रस्त वक्त्यांना वाटते, त्यांचेच मत खरे आणि दुसर्‍यांचे खोटे. काही वक्ता तर  दुसर्‍यांना बोलूच देत नाही. काही रागाने  वाटेल ते बोलत सुटतात. अश्या सभांमध्ये भांडे-तंटे होतात. कधी-कधी मारामारी ही होते. कोण काय बोलतो आहे, कुणाला काहीच कळत नाही. अश्या वातावरणात निर्णय घेणे अशक्य असते. अश्या वेळी जाणत्या श्रोत्यांने काय करावे.  

 समर्थ म्हणतात, दुर्जन आणि मूर्खांशी विवाद करणारा हा विवेकी श्रोता नसतो. अश्या लोकांची वटवट शांतपणे ऐकली पाहिजे. त्यांच्याशी वाद घालणे, हे विवेकी पुरुषाचे लक्षण नाही. शहाणे सज्जन पुरुष, दुसर्‍यांचे अंत:करण जाणतात. मान, प्रसंग, काळवेळ याचे त्यांना अचूक ज्ञान असते. दुखी आणि त्रासलेल्या  लोकांना कसे शांत करावे हे ही ते जाणतात.  विवेकी पुरुष नेहमीच विचाराने वागतो. विवेकाच्या बळावर दीर्घकाळ अखंड प्रचंड पुरुषार्थ करण्याची क्षमता त्याच्यात असते. तो स्वतः त्रास सोसून परत सर्व कार्य सुरळितपणे करतो आणि लोकांकडूनही करवून घेतो. समर्थ म्हणतात अश्या जाणत्या श्रोत्यांची  थोरवी लोकांना कळणे कठीण असते.  

 श्रोता अवलक्षण समासात समर्थांनी श्रोत्यांचे दोष आणि गुण तर सांगितले आहे. पण ज्यांना समाजाच्या भल्यासाठी भव्यदिव्य कार्य करायचे असेल  किंवा लोकांकडून करवून घ्यायचे असेल तर त्यांना विवेकपूर्ण रीतीने मोठे- मोठे निर्णय घ्यावे लागतात.  विवेक कसा करावा यासाठी समर्थ म्हणतात: 

 विवेक एकांती करावा।  येकांतीं येत्‍न सांपडे। येकांती स्मरण करावें   

आपले नियोजित निश्चय आणि हेतु सिद्ध करण्यासाठी, अंतरात्म्याशी चर्चा केल्याशिवाय विवेकपूर्ण निर्णय घेणे अशक्य असते. एकांतातच चिंतन मनन  योग्य प्रकारे करता येते. एकांतातच अंत:फूर्ती मिळते. योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते. भविष्य घडविण्याची क्षमता प्राप्त होते. स्वत: समर्थ याचे जागते उदाहरण होते. ते स्वत: बाबत म्हणतात "दास डोंगरी राहतो, यात्रा रामाची पाहतो". समर्थांनी 12 वर्ष भारत भ्रमण केले. मार्गात त्यांची भेट अनेक संत महातम्यांशी झाली असेल. समर्थांनी त्यांना श्रवण केले असेल, त्यांच्या सोबत देश आणि धर्माच्या बिकट परिस्थिति वर चर्चा केली असेल. एकांतात राहून समर्थांनी आपल्या अंतरात्म्याशी देश आणि धर्माच्या बिकट परिस्थिति वर चिंतन आणि मनन केले असेल. समर्थांनी देश आणि धर्माची रक्षा करून स्वराज्याची निर्मिती कशी करता येईल यावर फक्त उपाय सुचविला नाही अपितु समर्थांनी त्याकाळच्या विपरीत परिस्थितितही देशभरात धर्माच्या पुन: स्थापनेसाठी अनेक मठांची स्थापना केली.  त्या मठांमध्ये  प्रभू श्रीराम आणि हनुमंताच्या मूर्तींची स्थापना केली. समर्थांच्या मठांत  हनुमंतासारखी शूर वीर आणि धर्मनिष्ठ तरुण घडविल्या गेले जे देश आणि धर्माची रक्षा करण्यास समर्थ होते. स्वत: समर्थांच्या शब्दांत "समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा भूमंडळी कोण आहे". समर्थांच्या या कार्यांची छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेस मोलाची मदत झाली.  कालांतरात मराठा साम्राज्य अटक ते कटक पर्यन्त पसरले.  आजचे उदाहरण म्हणाल तर स्वामी रामदेव यांनी आर्ष गुरुकुलांत वेद, उपनिषद, दर्शन आणि योग शास्त्राचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर, हिमालयात गंगोत्रीच्या परिसरातील बर्फाच्छादित गुफेत तीन वर्ष एकांतवासात साधना केली होती. तिथून मिळालेल्या अंत:प्रेरणेने योग प्रसारासाठी देशात लाखो किमी प्रवास करून हजारो  योग शिविर घेऊन कोट्यावधी लोकांना स्वस्थ आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला. गेल्या 22 वर्षांपासून त्यांचे पहाटेचे योग प्रशिक्षण शिविर अखंडित सुरू आहे.  त्यांनी योग आणि आयुर्वेदाला भारतात आणि जगात प्रतिष्ठा मिळवून दिलीएका रीतीने ते आज समर्थ विचारांना सार्थक करीत आहेत. 

पूर्वजांचा इतिहास हा ही श्रवणाचा विषय आहे.  छत्रपती शिवरायांच्या इतिहास वाचून जर त्यांच्या तथाकथित अनुयायांना “गो ब्राम्हण प्रतिपालक छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो ही घोषणा द्यायला लाज  वाटत असेल, तर हे श्रवण नव्हे. अश्या मूर्ख लोकांसाठीच समर्थ म्हणतात: सांगे वडिलांची कीर्ती तो येक मूर्ख? आपल्या महान पूर्वजांचा आदर्श समोर ठेऊन आज आपण देशासाठी काही करू शकतो का? हा विचार करून स्वराज्य घडविण्याचे कार्य करणे म्हणजे श्रवण. आज आपल्या महाराष्ट्राचे पुत्र गडकरी ही देशाला जोडणार्‍या महामार्गांचे अतिशय वेगाने निर्मिती करून एका रीतीने समर्थांचे स्वप्न साकारतात आहे. असो.     

 श्रोता अवलक्षण समासाचे निरूपण ऐकून श्रोत्यांनी आपले दुर्गुण सोडून उत्तम श्रोता बनावे हा फक्त एक हेतु होता. पण या समासाचा मुख्य उद्देश्य जे जे उत्तम ऐकले   ते ते आचरणात आणावे हा आहे. मी आपल्या अल्प बुद्धीने या समासाचे  निरूपण करण्याचा प्रयास केला. यात अनेक उणिवा असतील. त्यासाठी जाणकार श्रोत्यांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावे, ही विनंती. आजच्या निरुपणाची सांगता, समर्थांच्या शब्दांत"

 ऐसा तो जाणता लोक। समर्थ तयाचा विवेक। त्याचे करणे कांहिं येक। जनास कळेना। बहुत जनास चालवी। नाना मंडळें हालवी। ऐसी हे समर्थपदवी। विवेकें होते। श्री राम। जय जय रघुवीर समर्थ.

 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोताअवलक्षणनिरूपणनाम समास दहावा।

जय जय रघुवीर समर्थ 

 


No comments:

Post a Comment