Saturday, July 17, 2021

खरे शिक्षण म्हणजे कौशल्य

 (सत्याला कल्पनाची जोड) 

आरती गुप्ता कारने उत्तम नगर येथील तिच्या बहिणाला भेटून घराकडे निघाली होती. उत्तम नगर म्हणजे गल्ली बोळ्यांचे कैक किलोमीटर पसरलेले मायाजाल. रस्ता जागोजागी खणलेला होता. पावसाळ्यातच गड्डे खोदण्याचे कार्य सरकारी एजेन्सी का करतात, ह्या प्रश्नाचे उत्तर तिला कधीच मिळाले नाही. आरती रस्त्यावर पसरलेल्या दगड-धोंड्यांवर लक्ष देत कार चालवत होती. पण कारचे मागचे टायर एका अणकुचीदार दगडावरून गेले आणि ते टायर पंक्चर झाले. तिने एका दुकानदाराला विचारले, इथे जवळ पंक्चर ठीक करणारा आहे का? दुकानदाराने उत्तर दिले, मॅडम, पुढच्या मोडवर डाव्या बाजूच्या ३० फुटवाल्या गल्लीत गाडी दुरुस्ती करणार्याचे गराज आहे. अखेर आरती कशीबशी गाडी चालवत त्या गराज जवळ पोहचली आणि गाडी थांबवून ती गाडीतून उतरली. ती काही म्हणणार त्या आधीच एक पंचविसीचा तरुण अक्षरचा धावत तिच्या जवळ आला आणि म्हणाला, मेम  मला ओळखले का, मी विजय. आपल्या मुळेच आज मी  गराजचा मालिक आहे. गेल्या वर्षीच हे गराज  विकत घेतले, सामानासहित. मौक्याच्या जागी आहे. पहिल्या माल्यावर राहण्यासाठी छोटासा फ्लेटहि बांधला आहे. त्याला मध्ये टोकत आरती म्हणाली, अरे बाबा, आधी प्रोब्लेम काय आहे, हे तरी बघून घे. "मेम, तुमच्या गाडीचे टायर पंक्चर झाले आहे, हे तर मला दिसत आहे. बाकी गाडीत आणिक काही प्रोब्लेम  असेल तर बघून घेईल. अर्धा-पाऊण तास लागेल, तो पर्यंत तुम्ही माझ्या घरी  चला".  

आरतीचा नाईलाज झाला. विजयने घरच्यांशी तिची ओळख करून दिली, तो म्हणाला, आरती मेम ने मला मार्ग दाखविला नसता, तर आज माझे स्वतचे गराज नसते. 

त्याच्या घरी चहा पिता -पिता आरती काळात दहा वर्ष मागे गेली. त्यावेळी ती सरकारी शाळेत नवव्या वर्गात  हिंदी शिकवायची. दिल्लीत सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे अधिकांश पालक, रेह्डी-पटरी वाले, भाजी-फळे विकणारे, मिस्त्री, लेबर इत्यादी असे छोटे-मोटे काम करून गुजराण करणारे असतात. आपली मुले शिकतील तर त्यांनाहि पांढरपेशा नौकरी मिळेलहि अशी आशा मुलांचे पालक बाळगून असतात. पण त्या गरीब पालकांना काय माहित, इथे न शिकता मुले वरच्या वर्गात जातात. देशात शिक्षणाचा आकडा वाढविण्यासाठी सरकार नव्या-नव्या योजना राबविते. ८वी पर्यंत  सर्वांना पास  करा. दहावीतहि ९९ टक्के विद्यार्थ्यांना पास करा, इत्यादी. मग  विद्यार्थी कितीही ढ असला तरी चालेल

नववीत अडमिशन घेतलेल्या मुलांना काही येते का, हे पाहण्यासाठी आरतीने मुलांना ५ वाक्य लिहायला सांगितले. दुर्भाग्य, त्या  बॅचचा  एकहि विद्यार्थी वाक्य शुद्ध लिहू शकला नाही. आरती विचार करू लागली, काय होणार या मुलांचे. कितीही नालायक असले तरी दहावीतहि यांना पास करावे लागेल. आपली शिक्षण व्यवस्था देश घडविणारी नवीन पिढी निर्माण करते कि बेरोजगारांची फौज. १८ वर्षाचा तरुण मतदान करून सरकार निर्मित करू शकतो. पण १२वी पास अधिकांश विद्यार्थी कुठले हि कौशल नसलेले असतात. 

अखेर आरतीने मौन सोडले, ती मुलांना उद्देश्यून म्हणाली, तुम्हाला खरोखर शिकायचे असेल तर शाळेत या, मन लाऊन अभ्यास करा. जर अभ्यासात मन नसेल लागत तर काही कामधंधा शिका. किमान दोन वेळच्या पोट पाण्याची व्यवस्था तरी होईल. वर्गात शांतता पसरली. अखेर  विजय आपल्या बाकावर उभा राहिला आणि म्हणाला, मेम, मला अभ्यासाचा कंटाळा येतो, पण वडिलांच्या धाकाने फक्त टाईमपास करण्यासाठी शाळेत येतो. मेम, आमच्या भागात एक गराज वाला आहे, तो काही दिवसांपासून मला म्हणतो आहे, तो मला कार-स्कूटर दुरुस्त करायला शिकवेल आणि रोजचे १०० रु हि देणार. आरती म्हणाली, तुला जर खरोखरच कार- स्कूटर दुरुस्तीचे काम शिकायचे असेल तर निश्चित जा. किमान आपल्या पायावर तरी उभा राहील. त्या दिवसानंतर विजयने शाळेत येणे बंद केले. विजय खरोखर काय करत हे जाणून घेण्यासाठी आरती स्वस्त: त्या गराज मध्ये गेली. गराज एक सरदारजी चालवीत होते, ते आरतीला म्हणाले विजय खूप मेहनती आहे, कामात रस घेतो. तू बघशीलच काही वर्षांतच याचे स्वत:चे गराज असेल. खरोखर तसेच झाले. विजयच्या आईने विजयने यासाठी किती मेहनत घेतली हे हि सांगितले. विजयची आई पुढे म्हणाली, विजयच्या लहान भावाने १०वी नंतर ऑटोमोबाईल डिप्लोमा केला. तो आज  गुडगाव इथे एका ऑटोमोबाईल कारखान्यात काम करतो, त्यालाहि चांगला पगार आहे. तो सुट्टीच्या दिवशी विजयला मदतहि करतो.

घरी येता येता आरती विचार करत होती, विजय सारखेच जर  वयाच्या १३-१४ वर्षापासून विद्यार्थ्यांनी रोजगार प्रदान करणारे शिक्षण घेतले तर देशातील बेरोजगारी दूर होईल. सरकारलाहि डिग्री वाटणार्या शिक्षण संस्थाहि उघडाव्या लागणार नाही. 



No comments:

Post a Comment