Sunday, July 4, 2021

ऋग्वेद: दस्यु कोण होते


ऋग्वेद एक धार्मिक ग्रंथ नव्हे तर भारतीय सभ्यता आणि इतिहासाचे दर्पण आहे. आपण ऋग्वेदातील मुख्य-मुख्य मंत्र ही फक्त वाचले असते तर आपल्याला आपली खरी ओळख कळली असती. आर्य विदेशी, मूळ निवासी दास किंवा दस्यु असा चुकीचा इतिहास शिकविण्याची कुणाची हिम्मत झाली नसती. आपला खरा इतिहास सर्वांना माहीत असावा त्यासाठी हा प्रपंच.


अकर्मा दस्युरभि  नो अमन्तुरन्यव्रतो अमानुषः।

त्वं तस्यामित्रहन्वधर्दासस्य दम्भय ll (ऋ.10/22/28)


या मंत्राचे दृष्टवा ऋषी विमद आहे. देवता इन्द्र अर्थात राजा आहे.  ऋषीने या मंत्रात दस्युंचे तीन लक्षणे सांगितली आहे. 

अकर्मा दस्यु: जो व्यक्ति कर्महीन, आळशी आणि प्रमादी आहे. जो मोठ्या बाता करतो पण कर्म करत नाही. त्याला ऋषीने दस्यु म्हंटले आहे. 

अमंतु दस्यु:  मंतु म्हणजे मनन करणारा. जो व्यक्ति मनन करत नाही, अविवेकी, मंतव्यहीन (उद्देश्यहीन), सामाजिक मर्यादा, कायदे, नियम इत्यादींचे पालन न करणारा, दुसर्‍यांच्या कार्यात विघ्न आणणारा. अश्या व्यक्तीला ऋषीने दस्यु म्हंटले आहे. 

अन्यव्रत दस्यु:  विपरीत कर्म करणारा, अधर्मयुक्त कार्य करणारा अर्थात चोर, डाकू, आतंकवादी इत्यादि अर्थात दुष्ट कार्यात ज्यांना आनंद मिळतो असे लोक. 

ऋषी पुढे म्हणतात इन्द्र अर्थात राजाचे कर्तव्य आहे, अश्या दुष्ट लोकांना दंड देऊन प्रजेचे रक्षण करणे.  

महाभारतात महर्षि व्यास (मिश्र वर्णाची संतती होते तरी ही आपल्या कर्माने ते ब्राम्हण होते) दस्युंचे वर्णन करताना म्हणतात: 

दृश्यन्ते मानुषे लोके सर्ववर्णेषु  दस्यव: l

लिङ्गान्तरे वर्तमाना आश्रमेषु तथैव च।

(महाभारत शा.65.23)

प्रत्येक आश्रमात आणि प्रत्येक वर्णात दस्यु असतात. रावण हा ब्राम्हण होता पण दुष्ट प्रवृतीचा होता म्हणून रावणाला दस्यु म्हंटले आहे. तसेच श्रीरामाचे एक पूर्वज  राजा कल्माषपाद त्याच्या दुष्ट कर्माने राक्षस झाला। असेच दोन नंबरचे करणारे वैश्य ही दस्यु असतात। शासकीय कर्मचारी समवेत सर्व सेवा करणारे जर  कर्तव्य पालनात कसूर करत असेल तर तेही दस्युच आहे. अश्या सर्व दस्युंना राजाने दंड दिलाच पाहिजे अन्यथा राज्य नष्ट होते. 

स्पष्ट आहे, कुठल्याही जाती किंवा धर्म विशेषच्या लोकांना दस्यु म्हंटलेले नाही. आपल्या समाजात  दस्यु हा कर्मवाचक शब्द आहे. प्रजेला त्रास देणारे, सदैव दुष्टतापूर्ण कार्य करणारे, आळशी, प्रमादी लोकांना दस्यु म्हंटलेले आहे. 

No comments:

Post a Comment