Tuesday, June 4, 2019

आठवणीतून: ते सूर, ती आठवण आणि मी


क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस - सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नवे वळण देते. निराशाच्या गर्तेत बुडालेल्या मनात आशेचा संचार होतो. असाच एक अनुभव. वर्ष  २००७, मईचा महिना, काही महिन्यांपासून
पाठीचे मणके आपल्या जागेवरून हलल्यामुळे कमरेचे  दुखणे  वाढत होते. डॉक्टर कोठारीनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण आपण मराठीमाणूस. कामाप्रती अधिक निष्ठावान. मग व्हायचा तोच परिणाम झाला. त्यावेळी कार्याचा अधिकतेमुळे रोजच रात्री उशीर अर्थात घरी पोहचता-पोहचता रात्रीचे १० तरी वाजायचे.  एक दिवस रात्रीचे जेवण घेतल्यानंतर वाशबेसिन वर हात धुवत असताना पाठीत असंख्य विजा चमकतात आहे असे वाटले. डावा पाय सुन्न झाला. असंख्य वेदना कमरे व पायातून उमटल्या. डावा पाय सरळ करता येत नव्हता कसेबसे रात्र  जागून काढली. सकाळी एम्बुलेन्स बोलवली.  स्ट्रेचर  टाकून मला सफदरजंग हॉस्पिटलला नेले. पेशंट पहायचा दिवस नसतानाही  डॉक्टर कोठारी मला बघण्यासाठी हॉस्पीटला आले. डॉक्टरांचं न ऐकणार्या पेशंटच आणखीन काय होणार, आपण  पंधरा-वीस  दिवस वाट पाहू,  काही फरक पडला तर ठीक, अन्यथा ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. बिस्तरावर न हलता-डुलता पडून राहाण्याचा सख्त आदेश ही मला दिला. खंर म्हणाल तर त्या वेळी जरा ही पाय हलला तर एवढ्या वेदना होत होत्या की हालण- डुलण शक्यच नव्हत.  म्हणायला सोप आहे,  "प्रात:विधी" पासून सर्वकाही बिस्तरावर करताना, शरीरापेक्षा मनाला किती यातना होतात, हे रोगीच जाणतो.  असेच १० ते १२ दिवस  उलटले, वेदना किंचित ही कमी होत नव्हत्या. रात्री छोट्या स्टूल वर पाय ठेउन झोपण्याचा असफल प्रयत्न करायचो.  झोपेचा अभाव आणि दुखण याचा परिणाम शरीरावर व मनावर होऊ लागला होता. कदाचित आपण कधीच बिस्तरावरून उठू शकणार नाही असे वाटू लागले होते त्या मुळे मनात निराश्याची भावना दाटू लागली होती.

मग तो दिवस उगवला. रात्रीची वेळ होती, झोपण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात बायको म्हणाली,  "सा  रे ग म"  पुन्हा सुरु झाल आहे.  गाणे ऐका थोड बर वाटेल अस म्हणत तिने टीवी लावला. पण वेदने मुळे गाणे ऐकण्यात लक्ष लागेना

अचानक  "क्षण दिपती क्षण लपती,  भिजुनी उन्हें चमचमती"  हे  सूर काना वर पडले.  अचानक  पंचवीस पूर्वीची घटना डोळ्यांसमोर तरळली, पावसाळ्याचे दिवस होते. श्रावणाचा महिना असल्या मुळे ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. ऑफिस सुटल्या वर चार्टर बस साठी वाट पाहत कृषी भवनच्या बसस्टाप वर उभा होतो.  क्षणभरा करता पावसाची एक जोरात सर आली आणि चिंब भिजवून गेली. पुन्हा ऊन निघाले. अचानक डोळे प्रकाशात दिपले. वळून बघितले तिच्या सोनेरी केसात अडकलेल्या पावसाच्या थेम्बातून परावर्तीत होऊन सूर्य प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडत होता.  पांढर्या सलवार-कुर्त्यात  भिजलेली ती अतिशय मोहक दिसत होती. तिच्या वरून दृष्टी हलत  नव्हती. काही क्षणानंतर  वरती आकाशाकडे बघितल सूर्यदेव ही ढगाचा परदा सारून भिजलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. मला हसू आले. मनातल्या मनात शीळ घालत पुटपुटलो  "सूर्यदेव तुम्हीही आमच्या सारखे, दिसली पोरगी की शीळ घातली.  तुम्हाला स्वर्गात अप्सरांची काय कमी, पृथ्वीवरच्या सौंदर्याला का म्हणून बघता.  काही आमचा विचार करा." तेवढ्यात  चार्टर बस आली. बस मधे चढलो. खिडकी जवळची सीट मिळाली. बस सुरु झाली. सहज लक्ष गेल, पश्चिम दिशेला आकाशात इंद्रधनुष्य उमटलेल दिसत होत. गाण संपता-संपता केन्हां डोळा लागला कळलंच नाही. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर जाणवलं, वेदना पुष्कळ कमी झालेल्या होत्या. पाया खालचा स्टूल दिसत नव्हता. झोपेत पाय आपोआप सरळ झाला होता. बायकोचा चेहरा ही आज उजळल्या सारखा दिसत होता. इतक्या दिवसांपासून  ती पतिव्रता ही नवर्या सोबत  रात्र जागून काढत होती. काल छान झोप लागली वाटत. तुमच्या साठी 'पॉट'  घेऊन येऊ का, तिने विचारले. मी म्हणालो, आज बिस्तरावर नाही.  मुलाच्या मदतीने toilet पर्यंत गेलो.

रात्री ऐकलेले ते सूर आठवले, ती आठवण ही डोळ्या समोर आली. खरोखरच संगीतात एवढी शक्ती असते की एका रात्रीत वेदना कमी होतात व शरीरात नवीन चैतन्य निर्माण होते. नंतर कळले ती गायिका सायली पानसे होती.  हळू हळू तब्येतीत सुधारणा होऊ लागली.  सप्टेंबर महिन्याचा अखेरीच ऑफिस जॉईन केल. अर्थातच पुढील एक-दीड  वर्ष कमरेला बेल्ट आणि काठी सोबत ठेवावी लागली. माझ्या ठीक होण्यात डॉक्टर कोठारींचा मोठा वाट होता यात शंका नाही. पण त्या दिवशी ऐकलेल्या त्या सुराचा व त्या आठवणीचा ही मोठा वाटा आहे हे ही तेवढच सत्य.  

No comments:

Post a Comment