Tuesday, June 25, 2019

माझे पावसाळी ज्ञान


त्याकाळी जुन्या दिल्लीत नया बाजार येथे महाराष्ट्र समाज होता. जवळपासच्या भागात तीस ते पस्तीस मराठी कुटुंबांचे वास्तव्य होते. समाजात टेबल टेनिस व कॅरम खेळायची सुविधा होती. त्यामुळे समाज हा आमच्या सारख्या मुलांचा टाईमपास अड्डा होता. रविवारी सकाळी समाजात पुस्तकालयहि उघडायचे.  कुमार मासिक ते फास्टर फेणे हे सर्व त्यावेळी तिथे वाचायला मिळायचे. मी बहुतेक सातवीत असेल. जुलै महिन्यातील दिवस, बाहेर पाऊस पडत होता. माझ्या वर्गातील शिकणारे गण्या, झंप्या आणि एक दादा (नुकतेच काठावर 11वी पास झाले होते) आम्ही कॅरम खेळत होतो. आमच्या दृष्टीने दादा हा अत्यंत ज्ञानी होता. त्यादिवशी कॅरम खेळता-खेळता मिळालेले पावसाळी ज्ञान:

मी: दादा, मृगाचा पाऊस हा काय प्रकार आहेत.

दादा (शर्टाची कालर वर करीत):  तू हरीण बघितलास, कसा दिसतो तो.

मी: दादा हरीण सोनेरी असतो व त्याच्या शरीरावर काळे ठिपकेहि असतात. 

दादा: शाब्बास, पटाईत. जेंव्हा काळे-काळे ठिपके असलेले पांढरे ढग आकाशात जमतात, अगदी हरीणासारखे, आणि टीप टीप करत हळुवार असा पाऊस पडतो. या पावसाला मृगाचा पाऊस म्हणतात. पोरींना मृगाच्या पावसात भिजायला भारी मजा येते. 

झंप्या: (पोरींची नक्कल करत) अय्या! किती छान पाऊस, काय मजा येईल भिजण्यात.

दादाने डोळे वटारून झंप्या कडे पाहिले. मलाहि त्याच्या राग आला, 

मी: दादा, हा झंप्या वर्गातहि सदानकदा मुलींकडे पाहत असतो, अभ्यासाकडे  मुळीच लक्ष देत नाही. एखाद दिवशी वर्गातील मुली  याला चांगलेच  धुवणार आणि नंतर याचा बाहि याला चाबकाने बदडेल. हा पुढच्या तिमाही परीक्षेत १०० टक्के नापास होणार, मला खात्री आहे. 

दादा: हे काय ऐकतो मी झंप्या. अरे हे वय शरीर कमवायचे. वेळ मिळाल्यास थोडा बहुत अभ्यासहि करायचा असतो. काडी पैलवानला पोरी घास टाकत नाही. मर्द मुले मृगाच्या पावसात आंघोळ करत नाहीत. समजलास.

गण्या: मग आम्ही कुठल्या पावसात भिजायचं ???

दादा: हत्तीच्या (*हस्त नक्षत्र) पावसात.  जेंव्हा आकाशात हत्ती सारखे मोठे-मोठे काळे-काळे ढग जमतात. जोराचा धाड-धाड पाऊस पडतो. अंगावर  पावसाचे जबरदस्त तडाखे बसतात. अश्या पावसात आंघोळ केल्याने शरीर मजबूत होते. आता सांगा, मर्द मुले कुठल्या पावसात आंघोळ करतात.

आम्ही जोरात ओरडलो, हत्तीच्या पावसात.

दादा:  शाब्बास, मर्दांनो. हां, एक सांगायचे राहिलेच. एक आणिक खतरनाक पाऊस असतो. 

मी: कोणता दादा?

दादा: वाघाचा पाऊस. जंगलात वाघाला सर्वच प्राणी भितात. वाघाची चाहूल लागतात सर्व प्राणी घाबरून दूर पळतात. वाघ गुपचूप शिकार जवळ येतो. मग जोरात डरकाळी फोडत...

झंप्या:आई! ग!!! 

दादा: बायला, चूप बैस. तुझा ईलाज करावा लागेल. आई! ग म्हणण्या पूर्वीच वाघाचे दात तुझ्या नरड्यातून आरपार होतील. चड्डी फक्त पिवळी होणार तुझी. (आम्ही जोरात फिदी फिदी हसलो). तर काय म्हणत होतो मी, जेंव्हा आकाशात वीजा चमकतात. वादळ जोरात गडगडाट करत असतात. अचानक, जसा वाघ शिकारवर तुटून पडतो, तसेच वीजहि जोराचा कडकडाट करत जमिनीवर पडते. ज्याच्या अंगावर वीज पडणार तो क्षणात खलास. अश्या पावसात भिजायला जायचे नसते, गुमान घरात गुपचूप बसून राहायचे असते.  

त्या दिवशी प्रथमच मला पावसाचे किती प्रकार असतात व कोणत्या पावसात आंघोळ करायची असते, हे कळले. दादा बाबत आदर आणिकच वाढला. बाकी झंप्याला एक दिवस वर्गातील मुलींनी चांगलेच धुतले व तिमाही परीक्षेत नापास झाल्यामुळे त्याच्या बापानेहि. त्यानंतर त्याने कधीच मुलींकडे ढुंकूनहि पाहिले नाही. अजूनही तो अविवाहितच आहे. 

 *हस्त म्हणजे हात हत्ती नव्हे. 

No comments:

Post a Comment