आजकाल मैफिल व्हाॅट्सअप ग्रुपवर सदस्यांनी काढलेल्या चित्रांचा वर्षाव सुरु आहे. ग्रुपच्या सदस्यांनी काढलेले एकापेक्षा एक सुंदर चित्र ग्रुपवर पाह्यला मिळत आहे. साहजिकच आहे सदस्यांचे अप्रतिम चित्र पाह्यल्यावर, माझ्या मनात हि चित्र काढण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण चित्रकलेशी माझे सुरवातीपासून हाडवैर. चित्राचे सोडाच, एक सरळ रेषा हि कधी काढता आली नाही. कसेबसे १३ मार्क्स चित्रकलेच्या पेपर मध्ये मिळायचे. पण एक आठवले, वर्गात सर्वात बुटका असलो तरीहि, क्रिकेट ते हाॅकी कुठल्याही खेळाची टीम असो, माझी वर्णी लागायची. म्हणतात न, ज्याची कुठल्याच क्षेत्रात गति नसते तो आलराऊंडर असतो. माझेहि तसेच. ठरविले आपण हि चित्र काढायचे आणि ग्रुपवर टाकायचे.
चित्र काढण्यासाठी कागद, पेन्सिल व रंग हि लागतात. आधीच सौ.ला माझ्या डोक्याविषयी जबरदस्त शंका आहे. त्यात या वयात चित्रकलेसाठी लागणारे साहित्य विकत घेतले असते तर 'नवऱ्याला नक्कीच वेड लागले आहे', याबाबत तिची शंभर टक्के खात्री झाली असती. चित्रकलेचे साहित्य विकत घेण्याचा विचार मनातून काढून टाकला.
इरादा पक्का असेल तर रस्ता हि सापडतोच. टेक्नोलॉजीची मदत घेण्याचे ठरविले. आता पुढचा प्रश्न - चित्र कोणते काढायचे. माझी एक घाण सवय आहे, काही करण्याच्या आधी मी त्या विषयाच्या मुळात शिरतो. विचार केला, जगातील पहिले चित्र कोणते. बहुतेक सृष्टीच्या प्रारंभिक क्षणाचे चित्र अर्थात बिग बँगचे चित्र असावे. पुन्हा विचार केला, जे माहित आहे, त्याचे चित्र कुणीही काढू शकतो. त्यात विशेष काय. ज्याच्या बाबतीत काहीच माहित नाही त्या सृष्टीकर्त्याचे चित्र काढले पाहिजे. त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी जगातील सर्वात जुना ग्रंथ अर्थात ऋग्वेद पडताळला. ऋषी नेती नेती म्हणतात, ते काय:
वर खाली काहीच नव्हते
नव्हत्या दाही दिशा
जल, थल अग्नीहि नव्हती
नव्हता वारा आणि प्रकाश.
तिमिराचे होते आच्छादन
तपस्यारत होता विभु
स्वयं प्रकाशित आत्मा जणु
डोक्यात प्रकाश पडला,जे माहित नाही ते तिमिर कारण अंधारत कुणाला काहीच दिसत नाही. तिमिराच्या आवरणात दडलेला विभु, अर्थात स्वयं प्रकाशित आत्मा अर्थात सृष्टी निर्माता परमेश्वर, कुणाला दिसणे शक्यच नाही. त्याच सृष्टीकर्त्याचे चित्र सॉफ्टवेअरच्या मदतीने काढले.
(सृष्टीकर्त्याचे चित्र - चित्रकार विवेक पटाईत)
चित्र काढल्यावर, चित्रकलेची जाण असलेल्या एका मित्राला घरी बोलविले. त्याला चहा पाजला नंतर त्याला ब्लॉगवर काढलेले चित्र दाखविले. चित्र पाहून तो हि अचंभित झाला. बहुतेक त्याला काही कळेनासे झाले होते. थोड्यावेळ वाट पाहून मी त्याला विचारले, कसे चित्र आहे. त्याने साक्षात मला दंडवत प्रणाम करीत म्हंटले, गुरु एक तो दाढीवाला म्हतारा पेंटर आणि त्यासम दुसरे तुम्हीच. कुठे लपवून ठेवली होती तुमची कला. माझी ३४ इंची छाती गर्वाने ५६ इंचाची झालीच. मी त्याला विचारले, त्या दाढीवाल्या म्हाताऱ्या पेंटरचे चित्र कोट्यावधी रुपयात विकले जातात. काय किंमत असेल माझ्या या चित्राची. तो म्हणाला, गुरु तुमचे चित्र अमूल्य आहे, त्याची किंमत कवडीतहि मोजणे शक्य नाही, म्हणत त्याने धूम ठोकली.
No comments:
Post a Comment