Friday, May 10, 2019

गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी ???


गांधारीच्या लग्नाची एक कथा प्रचलित आहे. गांधार नरेश सुबलचे १०० पुत्र होते. त्यात शकुनि सर्वात लहान. भीष्माने गांधार नरेश सुबलचा पराभव केला. कैदेत शकुनि सोडल्यास सर्वांचा भुकेने तडफडत मृत्यू झाला. गांधारीचे लग्न हस्तिनापुरच्या राजकुमार धृतराष्ट्राशी झाले. गांधारी सोबत तिचा लहान भाऊ शकुनिचाही राजमहालात प्रवेश झाला.

गांधारी हस्तिनापुरात आली. लग्नानंतर गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधली. इतिहासाच्या संदर्भात या शब्दांचा अर्थ काय, हा प्रश्न नेहमीच मला सतावत होता.   

हस्तिनापुराने गांधारचा सर्वनाश केला होता. शकुनि हा गांधारच्या  गादीचा वारस होता. साहजिकच होते, शकुनिला गांधारचा दारूण पराभव विसरणे कदापि शक्य नव्हते. शकुनि गांधारचे राज्य सोडून हस्तिनापुरच्या वैभवशाली साम्राज्याला नष्ट करण्याचे उद्दिष्ट मनात ठेऊनच हस्तिनापुरात आला होता. 

लग्नानंतर स्त्री ज्या घरात येते, त्या घराण्याशी तिचे नाते जोडले जाते. गांधारी तर हस्तिनापुरची महाराणी होती. हस्तिनापुरचे हितच तिच्यासाठी सर्वोपरी असायला पाहिजे होते. गांधार हा हस्तिनापुरचा शत्रू. पराजय व अपमानाच्या आगीत जळणारा गांधार नरेश शकुनि बदला घेण्यासाठी कुठल्याही पातळीवर उतरू शकतो, हे तिला निश्चित कळत असेल. अश्यापरिस्थितीत सख्खा भाऊ का असेना, त्याला हस्तिनापुरच्या राजमहालात जास्त काळ ठेवणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रित करणे, हे हि तिला समजत असेलच. शकुनिला हस्तिनापुरच्या राजमहालापासून दूर ठेवणेच उचित होते. पण इथे तर शकुनि हस्तिनापुरला आला आणि त्याने हस्तिनापुरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पासे फेकणे सुरु केले. शकुनिच्या कुटील खेळी गांधारीला डोळ्यांनी दिसत होती, तरीही ती गप्प होती. बहुतेक तिच्या हृदयातहि बदल्याची अग्नी जळत होती. त्यासाठी स्वत:च्या घराची राख रांगोळी करण्याची तिची मानसिक तैयारी होती. वैयक्तिक बदल्यासाठी, शत्रूच्या मदतीने स्वत:च्या घराची राख रांगोळी करणारा हा आंधळाच असतो. हेच स्पष्ट करण्यासाठी महाभारतकार व्यासांनी गांधारीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, मला तरी असेच वाटते.

विष्णूशर्माला पंचतंत्रातील 'कावळे आणि उलूक कथा' लिहिण्याची प्रेरणा बहुधा महाभारतातूनच  मिळाली असेल. सारांश राजमहालात विदेशी लोकांची लुडबुड पाहूनही डोळे बंद ठेवणारे राजपुरुष/ राजमहिला गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधलेले आंधळे असतात.


No comments:

Post a Comment