Monday, May 20, 2019

पोरे: एकाच माळेचे मणी


उत्तम नगर स्टेशनवरून मेट्रोत बसलो. गाडीत जास्त भीड नव्हती. दरवाज्याच्या एका बाजूला तीन तरुण पोरे पुस्तके वह्या उघडून अभ्यास करत होते. राजौरी गार्डन स्टेशनवर गोऱ्याचिट्ट्या स्मार्ट, स्मार्ट कपडे घातलेल्या तीन कालेज कन्या, मेट्रोत चढल्या. साहजिकच होते, इतरांप्रमाणे माझी नजर हि त्या मुलींवर खिळली. मेट्रोत शिरताच तिन्ही मुलींनी पुस्तके उघडली आणि त्या अभ्यासात मग्न झाल्या. मेट्रोचे झटके आणि आजूबाजूची लोक न्याहाळत असतील याची पर्वा त्यांना नव्हती. तिन्ही पोरांचे लक्ष त्या मुलींकडे गेले. त्यांचा पुस्तकी अभ्यास बंद झाला आणि हळूवार आवाजात चर्चा करत त्या पोरांनी, अभ्यासात मग्न मुलींचा अभ्यास करणे सुरु केले. मला नेहमीच वाटते, पोरी अभ्यासात मुलांपेक्षा हुशार असतात याचे मुख्य कारण त्या सुंदरतेचे अस्त्र वापरून मुलांना अभ्यासापासून दूर करतात. अचानक मनात विचार आला, सत्यव्रताने स्वर्गात जाण्यासाठी विश्वामित्र एवजी मेनकेला तपस्येसाठी ऑउटसौर्स केले असते तर त्यांचा त्रिशंकू नसता झाला. सत्यव्रत  जीवित  स्वर्गात पोहचणारे पहिले व्यक्ती ठरले असते. लगेच दुसरा विचार मनात आला, असे झाले असते तर सत्यव्रताला स्वर्गात कदाचित अप्सरांएवजी दाढीवाले ऋषीमुनी भेटले असते... हा विचार सुरु असताना, मनाच्या एका कोपर्यातून आवाज आला, लेका पटाईत या वयातही तू पोरींना न्याहाळीत आहे, शोभून दिसते का? लगेच दुसर्या कोपर्यातून उत्तर आले, वय कितीही झाले तरी पोरे पोरेच असतात, एकाच माळेचे मणी. 

No comments:

Post a Comment