Wednesday, May 29, 2019

स्वातंत्र्यवीर व दलाल कुत्री


काल एक बंगाली सहकारी भेटला, मला म्हणाला स्वातंत्र्यवीर जर बंगाली असते तर त्यांना अपशब्द म्हणायची हिम्मत बंगाल मध्ये सोडा, देशात हि कुणाची झाली नसती.  तुम्ही मराठी ...  ज्या मराठ्यांच्या घोड्यांनी अटकेचे पाणी प्राशन केले  आहेत, ते आज गंगेचे पाणी हि पीत नाही. त्यांना फक्त थेम्स नदीचे पाणी आवडते.  
  
पाळीव कुत्री 
कारा भोगती 
महाली सुखाची 
दल्ली ब्रिटीशांची.

काळकोठडी 
काळ्या पाण्याची
कोल्हुत जुम्पती 
वीर स्वातंत्र्यी.

कुत्र्यांना मिळाली
सत्तेची हाड 
स्वातंत्र्यवीरांना
मिळाली बदनामी

नपुंसक महाराष्ट्राची
नपुंसक कहाणी.





Monday, May 20, 2019

पोरे: एकाच माळेचे मणी


उत्तम नगर स्टेशनवरून मेट्रोत बसलो. गाडीत जास्त भीड नव्हती. दरवाज्याच्या एका बाजूला तीन तरुण पोरे पुस्तके वह्या उघडून अभ्यास करत होते. राजौरी गार्डन स्टेशनवर गोऱ्याचिट्ट्या स्मार्ट, स्मार्ट कपडे घातलेल्या तीन कालेज कन्या, मेट्रोत चढल्या. साहजिकच होते, इतरांप्रमाणे माझी नजर हि त्या मुलींवर खिळली. मेट्रोत शिरताच तिन्ही मुलींनी पुस्तके उघडली आणि त्या अभ्यासात मग्न झाल्या. मेट्रोचे झटके आणि आजूबाजूची लोक न्याहाळत असतील याची पर्वा त्यांना नव्हती. तिन्ही पोरांचे लक्ष त्या मुलींकडे गेले. त्यांचा पुस्तकी अभ्यास बंद झाला आणि हळूवार आवाजात चर्चा करत त्या पोरांनी, अभ्यासात मग्न मुलींचा अभ्यास करणे सुरु केले. मला नेहमीच वाटते, पोरी अभ्यासात मुलांपेक्षा हुशार असतात याचे मुख्य कारण त्या सुंदरतेचे अस्त्र वापरून मुलांना अभ्यासापासून दूर करतात. अचानक मनात विचार आला, सत्यव्रताने स्वर्गात जाण्यासाठी विश्वामित्र एवजी मेनकेला तपस्येसाठी ऑउटसौर्स केले असते तर त्यांचा त्रिशंकू नसता झाला. सत्यव्रत  जीवित  स्वर्गात पोहचणारे पहिले व्यक्ती ठरले असते. लगेच दुसरा विचार मनात आला, असे झाले असते तर सत्यव्रताला स्वर्गात कदाचित अप्सरांएवजी दाढीवाले ऋषीमुनी भेटले असते... हा विचार सुरु असताना, मनाच्या एका कोपर्यातून आवाज आला, लेका पटाईत या वयातही तू पोरींना न्याहाळीत आहे, शोभून दिसते का? लगेच दुसर्या कोपर्यातून उत्तर आले, वय कितीही झाले तरी पोरे पोरेच असतात, एकाच माळेचे मणी. 

Monday, May 13, 2019

वात्रटिका: मला हिरा सापडला ???


नुकतीच सौ. ऋचा मायी लिखित कथा वाचली. फावल्या वेळातील बायकोचा छंद नवऱ्याला हिरा मिळवून देतो. हिरोला नेहमीच हिरा सापडतो पण माझ्या सारख्याला काय सापडेल???

बायकोचा छंद जोपासला 
मला हिरा सापडला 
अंगणी नोटांचा वर्षाव झाला.

घड्याळाचा गजर वाजला 
हिरा तत्क्षणी अदृश्य झाला 
हाती उरला फक्त कोळसा.  


Friday, May 10, 2019

गांधारीच्या डोळ्यांवरची पट्टी ???


गांधारीच्या लग्नाची एक कथा प्रचलित आहे. गांधार नरेश सुबलचे १०० पुत्र होते. त्यात शकुनि सर्वात लहान. भीष्माने गांधार नरेश सुबलचा पराभव केला. कैदेत शकुनि सोडल्यास सर्वांचा भुकेने तडफडत मृत्यू झाला. गांधारीचे लग्न हस्तिनापुरच्या राजकुमार धृतराष्ट्राशी झाले. गांधारी सोबत तिचा लहान भाऊ शकुनिचाही राजमहालात प्रवेश झाला.

गांधारी हस्तिनापुरात आली. लग्नानंतर गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधली. इतिहासाच्या संदर्भात या शब्दांचा अर्थ काय, हा प्रश्न नेहमीच मला सतावत होता.   

हस्तिनापुराने गांधारचा सर्वनाश केला होता. शकुनि हा गांधारच्या  गादीचा वारस होता. साहजिकच होते, शकुनिला गांधारचा दारूण पराभव विसरणे कदापि शक्य नव्हते. शकुनि गांधारचे राज्य सोडून हस्तिनापुरच्या वैभवशाली साम्राज्याला नष्ट करण्याचे उद्दिष्ट मनात ठेऊनच हस्तिनापुरात आला होता. 

लग्नानंतर स्त्री ज्या घरात येते, त्या घराण्याशी तिचे नाते जोडले जाते. गांधारी तर हस्तिनापुरची महाराणी होती. हस्तिनापुरचे हितच तिच्यासाठी सर्वोपरी असायला पाहिजे होते. गांधार हा हस्तिनापुरचा शत्रू. पराजय व अपमानाच्या आगीत जळणारा गांधार नरेश शकुनि बदला घेण्यासाठी कुठल्याही पातळीवर उतरू शकतो, हे तिला निश्चित कळत असेल. अश्यापरिस्थितीत सख्खा भाऊ का असेना, त्याला हस्तिनापुरच्या राजमहालात जास्त काळ ठेवणे म्हणजे सर्वनाशाला आमंत्रित करणे, हे हि तिला समजत असेलच. शकुनिला हस्तिनापुरच्या राजमहालापासून दूर ठेवणेच उचित होते. पण इथे तर शकुनि हस्तिनापुरला आला आणि त्याने हस्तिनापुरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी पासे फेकणे सुरु केले. शकुनिच्या कुटील खेळी गांधारीला डोळ्यांनी दिसत होती, तरीही ती गप्प होती. बहुतेक तिच्या हृदयातहि बदल्याची अग्नी जळत होती. त्यासाठी स्वत:च्या घराची राख रांगोळी करण्याची तिची मानसिक तैयारी होती. वैयक्तिक बदल्यासाठी, शत्रूच्या मदतीने स्वत:च्या घराची राख रांगोळी करणारा हा आंधळाच असतो. हेच स्पष्ट करण्यासाठी महाभारतकार व्यासांनी गांधारीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, मला तरी असेच वाटते.

विष्णूशर्माला पंचतंत्रातील 'कावळे आणि उलूक कथा' लिहिण्याची प्रेरणा बहुधा महाभारतातूनच  मिळाली असेल. सारांश राजमहालात विदेशी लोकांची लुडबुड पाहूनही डोळे बंद ठेवणारे राजपुरुष/ राजमहिला गांधारीप्रमाणे डोळ्यांवर पट्टी बांधलेले आंधळे असतात.


Tuesday, May 7, 2019

सृष्टीकर्त्याचे अप्रतिम चित्र



आजकाल मैफिल व्हाॅट्सअप ग्रुपवर सदस्यांनी काढलेल्या चित्रांचा वर्षाव सुरु आहे. ग्रुपच्या सदस्यांनी काढलेले एकापेक्षा एक सुंदर चित्र ग्रुपवर पाह्यला मिळत आहे. साहजिकच आहे सदस्यांचे अप्रतिम चित्र पाह्यल्यावर, माझ्या मनात हि चित्र काढण्याची इच्छा उत्पन्न झाली. पण चित्रकलेशी माझे सुरवातीपासून हाडवैर. चित्राचे सोडाच, एक सरळ रेषा हि कधी काढता आली नाही. कसेबसे १३ मार्क्स चित्रकलेच्या पेपर मध्ये मिळायचे. पण एक आठवले, वर्गात सर्वात बुटका असलो तरीहि, क्रिकेट ते हाॅकी कुठल्याही खेळाची टीम असो, माझी वर्णी लागायची.  म्हणतात न, ज्याची कुठल्याच क्षेत्रात गति नसते तो आलराऊंडर असतो. माझेहि तसेच. ठरविले आपण हि चित्र काढायचे आणि ग्रुपवर टाकायचे. 


चित्र काढण्यासाठी कागद, पेन्सिल व रंग हि लागतात. आधीच सौ.ला माझ्या डोक्याविषयी जबरदस्त शंका आहे. त्यात या वयात चित्रकलेसाठी लागणारे साहित्य विकत घेतले असते तर  'नवऱ्याला नक्कीच वेड लागले आहे', याबाबत तिची शंभर टक्के खात्री झाली असती. चित्रकलेचे साहित्य विकत घेण्याचा विचार मनातून काढून टाकला.  

इरादा पक्का असेल तर रस्ता हि सापडतोच. टेक्नोलॉजीची मदत घेण्याचे ठरविले. आता पुढचा प्रश्न - चित्र कोणते काढायचे. माझी एक घाण सवय आहे, काही करण्याच्या आधी मी त्या विषयाच्या मुळात शिरतो. विचार केला, जगातील पहिले चित्र कोणते. बहुतेक सृष्टीच्या प्रारंभिक क्षणाचे चित्र अर्थात बिग बँगचे चित्र असावे. पुन्हा विचार केला, जे माहित आहे, त्याचे चित्र कुणीही काढू शकतो. त्यात विशेष काय. ज्याच्या बाबतीत काहीच माहित नाही त्या सृष्टीकर्त्याचे चित्र काढले पाहिजे. त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी जगातील सर्वात जुना ग्रंथ अर्थात ऋग्वेद पडताळला. ऋषी नेती नेती म्हणतात, ते काय: 


वर खाली काहीच नव्हते
नव्हत्या दाही दिशा 
जल, थल अग्नीहि नव्हती  
नव्हता वारा आणि प्रकाश.

तिमिराचे होते आच्छादन
तपस्यारत होता विभु
स्वयं प्रकाशित आत्मा  जणु

डोक्यात प्रकाश पडला,जे माहित नाही ते तिमिर कारण अंधारत कुणाला काहीच दिसत नाही. तिमिराच्या आवरणात दडलेला विभु, अर्थात स्वयं प्रकाशित आत्मा अर्थात सृष्टी निर्माता परमेश्वर, कुणाला दिसणे शक्यच नाही.  त्याच सृष्टीकर्त्याचे चित्र सॉफ्टवेअरच्या  मदतीने काढले.








(सृष्टीकर्त्याचे चित्र - चित्रकार विवेक पटाईत)


चित्र काढल्यावर, चित्रकलेची जाण असलेल्या एका मित्राला घरी बोलविले. त्याला चहा पाजला नंतर त्याला ब्लॉगवर काढलेले चित्र दाखविले. चित्र पाहून तो हि अचंभित झाला. बहुतेक त्याला काही कळेनासे झाले होते. थोड्यावेळ वाट पाहून मी त्याला विचारले, कसे चित्र आहे. त्याने साक्षात मला दंडवत प्रणाम करीत म्हंटले, गुरु एक तो दाढीवाला म्हतारा पेंटर आणि त्यासम दुसरे तुम्हीच. कुठे लपवून ठेवली होती तुमची कला. माझी ३४ इंची छाती गर्वाने ५६ इंचाची झालीच. मी त्याला विचारले, त्या दाढीवाल्या म्हाताऱ्या पेंटरचे चित्र कोट्यावधी रुपयात विकले जातात. काय किंमत असेल माझ्या या चित्राची. तो म्हणाला, गुरु तुमचे चित्र अमूल्य आहे, त्याची किंमत कवडीतहि मोजणे शक्य नाही, म्हणत त्याने धूम ठोकली. 
        


Thursday, May 2, 2019

माझी कविता



सौंदर्य आरस्पानी 
नाही हिच्या पाशी.
  
छंद अलंकारांचा बांधा 
नाही हिच्या अंगी.

ओबड-धोबड शब्दांच्या
ठिगळ्या  फक्त  अंगावरती.

 तरीही  प्राणापेक्षा प्रिय मला
 सखी प्रेयसी कविता माझी.