Friday, April 5, 2019

शुभमंगल सावधान


रोजडे दिनी तिनी गुलाबाची कळी दिली. गुलाबाच्या सुगंध त्याच्या नाकात भिनला, पण काटा हातात रुतला आणि रक्त वाहू लागले. अत्यंत गोड कोकिळेच्या आवाजात ती साॅरी म्हणाली व मधुबाला सारखे गालात लाजली जणू स्वर्गातील अप्सराच. त्याची शुद्धच  हरवली आणि विचार करण्याही शक्ती हि. तो तिच्या जाळ्यात अलगद अटकला. "शुभमंगल सावधान" पण कुणीच त्याला सावधान केले नाही. लग्न झाल्यावर तो तिची प्रत्येक इच्छा तळहातावर घेऊन पूर्ण करू लागला. वासनेच्या डोहात संसार फुलला आणि त्या सोबत संसाराचे चटके हि बसू लागले.  आता तिचे अवगुण त्याच्या दृष्टीस येऊ लागले. सकाळी नवऱ्याच्या हातचा चहा पिल्याशिवाय ती पलंगावरून उठायची नाही. नौकरीला जाण्याआधी मुलांचा नाश्ता हि त्यालाच तैयार करावा लागे. नुसते आयते खाऊन-खाऊन गुलाबाची कळी आता गोबीच्या फुलासारखी फुलली होती. अप्सरा आता हिडींबा दिसू लागली होती. 

त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. काय पाहून हिच्याशी लग्न केले. कुणी आपल्याला वेळेवर सावधान का नाही केले. किमान लग्न लावणाऱ्या गुर्जीनी तरी सावधान करायला पाहिजे होते. गुरुजींना जाऊन जाब विचारायला पाहिजे. गुरुजींना शोधता-शोधता तो एका लग्न मंडपात पोहचला. गुर्जी लग्न लावीत होते.  गुरुजीनी  चढ्या आवाजात शुभमंगल म्हंटले पण सावधान हा शब्द तोंडातच पुटपुटले. कुणालाच तो शब्द ऐकू आला नाही. नवऱ्या मुलाने आनंदाने हार नवरी मुलीच्या गळ्यात घातला. च्यायला ह्याचे नशीब हि फुटणार, म्हणत त्याने कपाळावर हात मारला.

काही वेळाने गुर्जींचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो म्हणाला, गुर्जी! हे तुम्ही ठीक केले नाही. सावधान शब्द हि जोरात उच्चारला पाहिजे होता. गुर्जी त्याला पाहत हसले आणि म्हणाले अरे एकदा जोरात 'सावधान' म्हंटले  होते आणि समर्थ बोहल्यावरून पळून गेले, त्यासोबत गुरुजीची दक्षिणा हि बुडाली. त्या दिवसापासून, आम्ही गुरुजी सावधान हा शब्द फक्त तोंडातच पुटपुटतो.   

No comments:

Post a Comment