Thursday, April 18, 2019

कारल्याच्या भाजीत शोधले सुखी संसाराचे रहस्य


नवीन वर्षाचा पहिला दिवस. गुढी उभारल्यावर सौ.ने प्रसाद दिला. कडूलिंबाची पाने, धने आणि गूळ. प्रसाद खाताना सुरवातीला कडूलिंबाच्या पानांची कटु चव नंतर गुळाची गोड चव. संसाराचे हि तसेच आहे, कडू स्वीकार केल्याशिवाय संसाराची गोडी अनुभव करता येत नाही. 

आज सौ.ने कारल्याची भाजी डब्यात दिली होती. भाजीवर ताव मारत असताना कारल्याच्या भाजी बाबत विचार करत होतो. लोक कारल्याची भाजी करताना कारल्यावर अगणित अत्याचार करतात. कारल्याची चामडी सोलून काढतात, नंतर त्वचेवर मीठ चोळतात आणि काही काही लोक तर कहरच करतात, कारल्याला चक्क मिठाच्या पाण्यात आंघोळ घालतात. हे सर्व अत्याचार कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठीच.   

आमची सौ. कारल्यावर जास्त अत्याचार करत नाही. ती साली सकट कारल्याच्या बारीक चकत्या करते. फोडणीत थोड जास्त तेल टाकते, भरपूर तिखटहि घालते. कारल शिजल्यावर आंबट आणि गोडीसाठी थोडा गूळ हि घालते.  सौ.च्या हातची कारल्याची भाजी खाताना कडू-तिखट आंबट-गोड सर्व स्वाद जिभेवर तरंगतात. संसाराचे सर्व रंग कारल्याच्या भाजीत सापडतात. तुम्ही जर कारल्याची भाजी मिटक्या  मारत  खाऊ शकत असाल तरच संसारात उठणाऱ्या  वादळांचा सामना समर्थपणे करू शकाल.

म्हणतात न शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहते. मन निरोगी असेल तर घरात शांती राहील, भांडणे होणार नाहीत. माझ्या सौ.चे माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मला दुधी, लाल भोपळा, तोरी व कारल्या सारख्या भाज्या खायला मिळतात. मी सुखी आणि समाधानी आहे. दुसर्या शब्दात, कारल्याच्या भाजीत सुखी संसाराचे रहस्य दडलेले आहे.  1 comment: