Friday, March 29, 2019

मी बुद्धिबळ विजेता



उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागताच नागपूरला जाण्याचे वेध लागत असे. नागपूर म्हणजें आजी-आजोबा, काका-काकू,  चुलत, मावस, आते भाऊ- बहिणी. सर्वांसोबत मौजमस्ती करायचे दिवस. नागपुरात उन्हाळा भयंकर असतो. दुपारचे जेवण झाल्यावर २ ते ५ सर्वच झोपायचे. मला दुपारी झोपायची सवय नव्हती. घरा जवळच एक काका राहायचे. ते नुकतेच निवृत्त झालेले होते. त्यांना बुद्धिबळ खेळायची भारी हौस. त्यासाठी ते नेहमीच सावजाच्या शोधात राहायचे. तू दुपारी झोपत नाही, घरी ये मी तुला बुद्धिबळ शिकवितो. मी विचार केला, आपला टाईमपास हि होईल शिवाय बुद्धिबळ हि शिकायला मिळेल. न कळत मी त्यांच्या जाळ्यात  अटकलो.  दोन-तीन दिवसातच मला जाणीव झाली, त्यांना मला बुद्धिबळ शिकविण्यापेक्षा जिंकण्यातच जास्त आनंद मिळत होता. पण काकांसोबत बुद्धिबळ खेळण्याचा एक फायदा हि होता, तिथे काकूंच्या हातचा खाऊ खायला मिळत असे.  माझ्या दृष्टीने हा सौदा काही वाईट नव्हता. 

पण म्हणतात न सुखाला हि नजर हि लागतेच.  तीन-चार दिवसच झाले होते. सांयकाळी ६ वाजता घरी पोहचलो. सुलगवण्यासाठी भावंडाची फौज माझीच वाट पाहत होती. पोहचताच मोठी चुलत बहिण म्हणाली, काय विवेक आज किती डाव हरला. एक भाऊ म्हणाला, "डाव हरणे म्हणजे इभ्रत गमविणे". आपल्याला तर बुआ एखाद दिवशी कुणाकडून हरलो तर रात्रभर झोप येत नाही. तेवढेच  काय कमी होते. माझा लहान भाऊ हि उतरला, अरे शिऱ्या सोबत दादा इभ्रत हि सहज पचवितो. एक जोराचा हशा पिकला. च्यायला जाम पेटली.  मनात विचार आला, काकांसोबत खेळणे सोडून द्यावे. पण हा तर पळपुटे पणा होईल. उद्या काही हि करून काकांना हरविले पाहिजे. 

आम्ही जुन्या दिल्लीत राहायचो. गंगा-जमुनी तहजीब मध्ये वाढत होतो. बार-तेरा वर्षांचा असलो तरी खेळांचे काही ठळक नियम पाठ झाले होते. पहिला नियम- नेहमीच जिंकण्यासाठी खेळले पाहिजे. जिंकणे महत्वाचे. नियम दुसरा- खेळांच्या नियमांचा उपयोग जिंकण्यासाठी करता आला पाहिजे. उदा. "मांकड आउट" किंवा "अंडर आर्म चेंडू फेकणारा  क्रिकेटर"  हे आमचे आदर्श. नियम तिसरा- प्रतिस्पर्धी संभ्रमित किंवा बेसावध असेल तर धर्मराज युधिष्ठिरचा आदर्श नेहमीच डोळ्यांसमोर समोर ठेवावा. गरज पडली तर ''चा 'मा' करायला हि करचले नाही पाहिजे. असो.

दुसर्या दिवशी आज कसेही करून करून काकाना हरवायचे हा निश्चय करून  दुपारी  चार वाजता काकांच्या घरी पोहचलो. अर्थातच रोजच्याप्रमाणे डाव हरणे सुरु झाले. बहुतेक तो  तिसरा डाव  होता, काकांना वाशरूमला जाण्याची इच्छा झाली. चाल चालून ते वाशरूमला गेले. आता मी एकटाच खोलीत होतो. बुद्धिबळाच्या पटाकडे न्याहाळत असताना जाणवले, आपण जर घोड्याची साडेतीन चाल खेळली तर डाव पुढच्या चालीत जिंकता येईल. या घटकेला खोलीत कुणीच नाही, हिम्मत करून घोड्याला साडेतीन घर पुढे दामटले. काका वाशरूम मधून आले. पण आता काकांच्या नजरेला नजर मिळविण्याची हिम्मत नव्हती. डोक्यात एकच विचार येत होता, काकांना आपण केलेली हेराफेरी कळली तर??? मी काकांना म्हणालो, काका तहान लागली आहे, पाणी पिऊन येतो. काकू स्वैपाकघरात होती, मी तिला पाणी मागितले. पाणी देता-देता ती म्हणाली, तुझ्यासाठी आज उपरपेंडी करते आहे. मी डोळे चमकावीत म्हणालो, काकू मला तिखट आवडते, भरपूर लालमिरच्या घाल उपरपेंडीत. पाणी पिऊन मी खोलीत परतलो. त्या काकांना मी केलेली हेराफेरी कळली नव्हती. काका खेळताना शांत राहत असत पण त्यादिवशी मी खोलीत शिरताच ते म्हणाले, माझी चाल खेळून झाली आहे, वाचव आपल्या घोड्याला. मी पटाकडे बघितले, माझ्या घोड्याला शह देण्यासाठी एक प्यादा त्यांनी पुढे वाढविला होता. (बहुतेक त्यांच्या हातून घोडचूक घडली आहे, हे त्यांना जाणविले असेल, माझे लक्ष भटकविण्यासाठी त्यांनी असे म्हंटले असेल). त्यांना दाखवायला, मी म्हणालो काय काका, माझा आक्रमण करण्याचा प्रयत्न नेहमीच फसतो. हाही गेम मी हरणार. अर्थात हे म्हणत असताना माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. काही वेळ गंभीर राहून,  राणीला राजाच्या समोर ठेवले. राणीला घोड्याचे पाठबळ असल्यामुळे त्यांना काहीही करणे अशक्य होते. काका शह आणि मात, मी जिंकलो, मी जिंकलो अशी जोरात आरोळी ठोकली. आता इथे जास्त थांबलो तर पकडले जाऊ. इथून पळ काढला पाहिजे. मी त्या काकांना म्हणालो आज एवढेच पुरे. आम्हाला बाहेर जायचे आहे फिरायला. माझा जोराचा आवाज ऐकून काकू खोलीत आली आणि म्हणाली, जिंकलास छान झाले. अरे पण तुझ्यासाठी खास झणझणीत उपरपेंडी केली आहे, ती तरी खाऊन जा. मी लगेच उतरलो, ती झणझणीत उपरपेंडी काकाला खायला दे, म्हणत मी घराकडे धूम ठोकली. 

घरी येताच सर्वांसमोर आपल्या विजयाची डुगडुगी जोरात वाजविली. संपूर्ण मोहल्यात मी जिंकलो हि बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. असो. रात्रीचे जेवण झाल्यावर आम्ही गच्चीवर झोपायला जायचो. झोपण्यापूर्वी काका आम्हाला गोष्टी सांगायचे. रात्रीचे दहा वाजले होते. ते काका घरी आले. बहुतेक त्यांनी पुन्हा डाव मांडून पराजयाचे कारण शोधले असावे. माझी कान उघडणी करण्यासाठी ते घरी आले होते. आम्ही गच्चीवर आहोत हे कळताच ते हि गच्चीवर आले. येताच म्हणाले, काय विवेक, घोड्याची चाल किती घरांची असते. मी चमकलोच, या काकांना आपली हेराफेरी कळली आहे. माझे काका हि समोर होते. त्यांच्या समोर असत्य बोलणे शक्य नव्हते. एकीकडे धर्मसंकट व दुसरीकडे  इभ्रतीचा प्रश्न होता. खेळाचा नियम तीन आठवला. महाराज युधिष्ठिर यांचा आदर्श समोर ठेऊन आत्मविश्वासाने मी म्हणालो, काका मला बुद्धिबळ काय आहे हे माहित नव्हते. तुम्हीच मला खेळ शिकविला. बघा, राणी कितीहि घर सरळ, आडवी आणि तिरपी चालते. हत्ती कितीहि घर सरळ आणि आडवा चालतो. उंट कितीहि घर तिरपा चालतो. घोडा तर प्यादांच्या डोक्यावर उडी मारून कितीहि घर सरळ आणि एक घर आडवा किंवा कितीही घर आडवा आणि एक घर सरळ असा चालतो. काका म्हणाले, म्हणजे तू कबूल करतो, तू घोड्याला साडेतीन घर चालविले. मी म्हणालो, होय  मी असाच खेळलो होतो.  तुम्ही हि मला या खेळी बाबत टोकले नाही. यात माझी चूक काय. मी हरलो असतो तर तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता का? माझी गुगली त्या काकांना चांगलीच झोंबली. ते रागाने म्हणले, तू बोलण्यात पटाईत आहे. उद्यापासून खेळायला येऊ नको, म्हणत ते ताडताड पाय पटकत निघून गेले. ते गेल्यावर मी काकांना म्हणालो, काका मी खोटे बोललो नाही. काका फक्त हसले. बाकी बहिण-भावंडे जोरात म्हणाली, आम्ही पटाईत कधीच खोटे बोलत नाही. बुद्धिबळ विजेता विवेक पटाईत जिंदाबाद.

1 comment: