Monday, February 25, 2019

प्रजापति ने केला सम्मान विष पिणाऱ्या शंकराचा


रोज कचरा  उचलतो 
त्याची  विल्हेवाट करतो 
धरतीला वाचविण्यासाठी 
रोज हलाहल पितो
शंकर .

अमृत मंथानाच्या वेळी समुद्रातून हलाहल विष बाहेर आले. शंकराने विष प्राशन करून देव, दानव आणि मनुष्य तिन्हींचे रक्षण केले. मोबदल्यात शंकराला काय मिळाले. प्रजापति अर्थात प्रजेचे लालन-पालन करणारा  राजा. त्यावेळी दक्ष हा प्रजापति होता. दक्ष प्रजापतिने यज्ञात सर्वांना बोलविले. जावई असला तरी,  स्मशानभूमीत निवास करणाऱ्या समाजातील निम्न कोटीच्या व्यक्तीला बोलविणे दक्षाला उचित वाटले नाही. आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने देहत्याग केला. हि झाली प्राचीन इतिहासातील कथा.

आज हि हजारो शंकर महानगरात, गावांत माणसांनी पसरविलेला  कचरा स्वच्छ करतात.  दिवस-रात्र  कचर्यात काम केल्याने त्यांना अनेक रोगराईला समोर जावे लागते. कधी-कधी रोगराई त्यांचा बळी पण घेते. दुसर्या शब्दांत आजचे सफाई कर्मचारी राष्ट्रातील प्रजेच्या  रक्षणासाठी रोज हलाहल विष पितात. पण हे सर्व करताना मोबदल्यात त्यांना काय मिळते. समाज त्यांना तुच्छ लेखतो. समाजात सर्वात खालचे त्यांचे स्थान. स्वतंत्रता प्राप्ती नंतर त्यांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्याचे अनेक प्रयत्न झाले. सरकारने शिक्षणाची व्यवस्था केली. नौकरीत आरक्षण दिले. अनेक कायदे बनवून त्यांच्यावर होणारे अत्याचार संपविण्याचे प्रयत्न केले. पण सामाजिक प्रतिष्ठा, ती तर फक्त समाजच  देऊ शकतो. 

स्वामी दयानंद यांनी समाजातील भेद मिटविण्यासाठी आर्यसमाजाची स्थापना केली. महात्मा फुले, शाहू महाराज यांनी दलित समाजाला शिक्षणाची प्रेरणा दिली. बाबासाहेबांनी संवैधानिक संरक्षण दलित समाजाला दिले. पण सामाजिक प्रतिष्ठा ती तर प्रजापतिच देऊ शकतो.  (राष्ट्राचा राजा किंवा आजच्या भाषेत प्रधानमंत्री). 

रामायण काळात अयोध्येचे राजकुमार श्रीराम वाळीत टाकलेल्या साध्वी अहल्येच्या आश्रमात गेले. तिथे ऋषी गौतमाचे व साध्वी अहल्येचे चरण स्पर्श करून, त्यांचे  आदर-आतिथ्य स्वीकार केले. त्यांच्या सोबत भोजन केले. श्रीरामाने अहल्येला समाजात पुन्हा स्थान मिळवून दिले. (वाल्मिकी रामायण, बालकांड सर्ग ४८-४९). श्रीरामाच्या कार्याची प्रशंसा स्वर्गीय देवतांनी पुष्पवृष्टी करून केली. 

पाय अर्थात चरणांचे स्थान शरीरात सर्वात खाली असते. आपले चरणच  आपल्या संपूर्ण शरीराचे ओझे उचलतात.  चरण नसतील तर माणूस काहीच करू शकत नाही किंवा अत्यंत कठीण आयुष्य त्याला जगावे लागते. चरणांचे महत्व ओळखूणच, ऋषी-मुनी, महापुरुष, विद्वान यांचा सम्मान करण्यासाठी  त्यांची पाद्यपूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची परंपरा समाजात अस्तित्वात आली.  पण  स्वत: घाणीत राहून समाजाला स्वच्छ व आरोग्यदायी जीवन देणाऱ्या शंकरांचा सम्मान आपण कधी करण्याचा प्रयत्न केला आहे का?  कधीच नाही. पण काल दिनांक २४.२.२०१९ हा दिवस भारतीय इतिहासात निश्चित सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. या दिवशी प्रत्यक्ष देशाच्या राजप्रमुख अर्थात पंतप्रधानांनी सफाई कर्मचार्यांची पाद्यपूजा करून त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली.  दुसर्या शब्दांत इतिहासात प्रथमच आजच्या प्रजापतिने शंकराचा सम्मान केला. असो.





No comments:

Post a Comment