Thursday, June 2, 2022

वार्तालाप (२३)श्रीदासबोध: श्रवण भक्ति आणि आत्म साक्षात्कार

आध्यात्मिक क्षेत्रात माझ्या गुरु सौ. मंगला ताईंनी मला एक प्रश्न विचारला. भगवंताबद्दल उत्कट प्रेम/ अनुरक्ती असलेल्या आत्मज्ञानी प्रवचन करणारा आणि आत्म साक्षात्कारी ह्या दोघांमध्ये काय फरक आहे.  

पहिला प्रश्न मनात साहजिक येणारच. आत्म साक्षात्कार म्हणजे काय? आत्मा म्हणजे ब्रम्ह आणि वेद म्हणतात "तत त्वं असि" अर्थात तू तोच आहे. दुसर्‍या शब्दांत आपल्याच शरीरात असलेला आत्मा हाच ब्रम्ह आहे. आत्मा हा सत्य, शाश्वत,  निर्गुण, निराकार, निर्मळ आणि आनंद स्वरूप असतो. मायेच्या अधीन असल्यामुळे आपल्याला असे वाटते, आत्म साक्षात्कार आपल्याला होणे असंभव. आत्म साक्षात्कारसाठी काय करावे, असे अनेक प्रश्न ही मनात येतात. पण आपल्यापैकी अनेकांना आत्म साक्षात्कार कधी न कधी हा होतोच. फक्त आपल्याला कळत नाही. अधिक खोलीत न जाता एक छोटासा माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग  सांगतो. श्रीदासबोधात श्रवण भक्ति ही सांगितली आहे. या प्रसंगाचा संबंध श्रवण भक्तीशी आहे. 

एक प्रश्न पुन्हा मनात येतो. अधिकान्श कीर्तनकार, भजन गायक इत्यादि पैसे घेऊन कार्यक्र्म करतात. ते स्वत: मायेच्या अधीन असतात, मग आपल्याला आत्म साक्षात्कार कसा घडवून आणणार. प्रश्न रास्त आहे, पण मायेने निर्मित शरीराला जीवित राहण्यासाठी कर्म हे प्रत्येकालाच करावे लागते. त्याशिवाय संसाराच्या गरजा पूर्ण करणे शक्य नाही. त्यासाठी दक्षिणा/ पैसा हा घ्यावाच लागतो. पण जेंव्हा प्रवचनकार/ भजन गायक भक्तीत तल्लीन होऊन  परमेश्वराची स्तुति करतो, तो त्याच्यासोबत ऐकणाऱ्यांना ही काही क्षणासाठी का होईना आत्म साक्षात्कार घडवून आणतो. माझा असाच एक अनुभव. त्यावेळी मी २३-२४ वर्षाचा असेन.आपल्या दोन मित्रांसोबत प्रगति मैदानात ट्रेड फेअर पाहायला गेलो होतो. माझे दोन्ही मित्र माईकल जेक्सनचे चाहते. मलाही  संगीतातले काहीच कळत नव्हते. आम्ही  प्रगति मैदानात असलेल्या शाकुंतल थिएटर जवळ पोहचलो. तिथे आम्हाला कळले, पंडित भीमसेन जोशी यांचा गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. पंडितजी हे मोठे नाव होते.आमच्या पैकी कुणालाही शास्त्रीय संगीतात रस नव्हता तरीही पंडितजी मोठे नाव आहे, जरा थोडी झलक बघून घेऊ. आम्ही आत आलो. थिएटर भरलेले होते. एका भिंतीला टेकून आम्ही उभे राहिलो. एक सरदारजी  त्यांच्या सोबत तबल्यावर संगत करत होते. पंडितजींनी गाणे सुरू केले  "जो सदा हरी की भजे वही परम पद पाएगा..." पंडितजी भजनात तल्लीन होते. त्यांचा धीर गंभीर आवाज थिएटर मध्ये गुंजायमान झाला होता. माझे डोळे आपसूक बंद झाले. भान हरपले. मनात सतत सुरू असणारे सर्व विचार नष्ट झाले.  मी पणा संपला होता.  

टाळ्यांच्या आवाजाने माझी तंद्रा भंगली. जी माझी अवस्था झाली होती, तीच माझ्या दोन्ही मित्रांची झाली होती. आम्ही काही भक्त नव्हतो. पूजा पाठ करणारे नव्हतो. तेंव्हा धार्मिक ग्रंथ इत्यादीही  वाचलेले नव्हते. तरीही भक्ती भावाने भजन गणाऱ्याने आम्हाला काही क्षणासाठी का होईना, आमचा मी पणा संपविला होता. आज ही जेंव्हा हे भजन ऐकतो अंगावर शहारे येतात. पण तसा अनुभव मात्र कधीच आला नाही. जेंव्हा परमेश्वराचे गुणगान ऐकताना आपले डोळे बंद होतात, मनातील सर्व विचार नष्ट होतात, आनंदाने डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात. ते क्षण म्हणजे 'आत्म साक्षात्कार'. आत्म साक्षात्कार प्रत्येकाला होऊ शकतो पण आत्म साक्षात्कार घडवून आणण्याची क्षमता  काहींपाशीस असते.  

No comments:

Post a Comment