Monday, May 30, 2022

माझे सैराटी समीक्षा

काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र मला म्हणाला, पटाईत, बर्‍याच महिन्यांपासून तू काही लिहले नाही. मी म्हणालो आजकाल मूड होत नाही. तो म्हणाला, अस कर, काहीतरी नवीन लिह. एखाद्या सिनेमाची समीक्षा तुझ्या शैलीत कर. मी त्याला म्हणालो, मी सिनेमे फारच कमी बघतो. उभ्या आयुष्यात थिएटरमध्ये जाऊन जास्तीसजास्त डझन भर बघितले असतील. तो म्हणाला, अरे सिनेमांची समीक्षा  करायला, जास्त डोक्स लागत नाही. आपल्या सुपर डूपर मराठी सिनेमा सैराटची कर. आता मित्राचा आदेश टाळणे शक्य नव्हते.  

आपल्या बॉलीवूड सिनेमांची एक विशेषता असते. विषय कुठलाही का  असेना, कथेचा मूळगाभा एकच असतो. हीरो बहुतेक गरीब मजदूर, मागासलेला, सुंदर हिरोईन, खलनायक श्रीमंत प्राण  आणि शशिकले सारखी हिरोईनची आई, जिला पैश्यांसाठी हिरोईनला तिच्या इच्छे विरुद्ध  प्राणच्या गळ्यात बांधायचे असते. प्राणला ही सुंदर हिरोईन पाहिजे. सुंदर हिरोईन गरीब हीरो वर प्रेम करते. त्याच्या घरची मीठ भाकर तिला आवडते. हीरो तिच्या सोबत झिंगाट डान्स करतो, गाणी म्हणतो. साहजिकच आहे ,प्राणला हे आवडत नाही. तो हीरोला जाळ्यात अटकविण्यासाठी षड्यंत्र रचत रहातो. हिरोचे  मित्र प्राण पणाला लाऊन हिरोची मदत करतात. प्राणचे षडयंत्र विफल होते. बहुधा तो जेल मध्ये जातो. हीरो हिरोईनचा सुखीचा संसार सुरू होतो आणि चित्रपट संपतो. "बुडत्या जहाजावरच्या प्रेम कथा" या हॉलीवूड सिनेमावर ही बॉलीवूडचा परिणाम दिसला. प्राण, शशिकला, सुंदर हिरोईन आणि गरीब हीरो. सर्वच तिथे दिसले. फरक एवढाच हिरोईनला वाचविताना हीरो शहीद होतो. प्राणला काही हिरोईन मिळत नाही. 

काळानुसार बॉलीवूडच्या चित्रपटांत थोडा फार बदल होत राहिला. पूर्वी हीरो मिल मॅनेजर किंवा मजदूर इत्यादि राहायचा. नंतर कॉलेजमध्ये शिकणारे  प्रेमवीर आले. सैराटच्या निर्मात्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी, ज्यांना प्रेम कशाशी खातात माहीत नाही,  प्रेम प्रकरण दाखविले. बहुतेक "मुलांनो शाळेत शिकू नका प्रेम करा, पोरीला घेऊन घरातून पळा " असा संदेश त्यांना द्यायचा असेल. गावाची पृष्ठभूमी होती, साहजिक मुलगी पाटलाची पोर आणि मुलगा दलित घराण्याचा दाखविला. हीरो हा डशिंग असावा लागतो. आज क्रिकेट खेळाडूंना सुंदर हिरोईन भेटतात. तर आमचा हीरो ही क्रिकेट उत्तम खेळणारा होता. प्रेमाची जागा, पनघट जागी, विहीर आली. हिरोईन आपल्या मैत्रिणींसोबत विहीरीत जलविहार करत होती, तेंव्हाच हीरो ने विहीरीत उडी मारली. काय हा डशिंग पणा, अहाहा! पाहून डोळे तृप्त झाले. हिरोईनला  पटावायला हीरोला असले नानाविध प्रकार करावेच लागतात.  बाकी गावात असे घडले तर संपूर्ण गावात चर्चा होते. तेंव्हाच या कहाणीचा दी एंड झाला असता. पण हिरोईनच्या मैत्रिणींनी याची चर्चा कुठेच केली नाही. तिची प्रेम कहाणी सहज पोटात पचविली. पूर्वीपार चालत आलेल्या बॉलीवूडी परंपरेनुसार झिंगाट डान्स हा झालाच. हिरोईन आणि  हिरोचे प्रेम आता जगा समोर उघड झाले. आपला शाळेकरी नाबालिग हीरो, नाबालिग मुलीला घेऊन पळाला. भरपूर मार खाऊन हिरोच्या  मित्रांनी त्याला हिरोईनलासोबत घेऊन पळण्यास मदत केली. (हिरोचे मित्र मार खाण्यासाठीच असतात). दोघांचा सुखी संसार एका महानगरात सुरू झाला.(आता नाबालिग पोरांना राहण्यासाठी जागा,  नौकरी कशी मिळाली असले फालतू प्रश्न विचारू नये).

प्रेम झाले, झिंगाट डान्स झाला, मस्त गाणे झाले, सुखी संसार सुरू झाला. सर्वसाधारण सिनेमा असता तर इथेच संपला असता. पण निर्मात्याला लक्षात आले की त्याला ऑनर किलिंग ही दाखवायची आहे. सिनेमात  90 टक्के मनोरंजन असल्याने सिनेमा खूप चालला. झिंगाट गाण्यावर खूप शिट्ट्या ही वाजल्या. बॉलीवूडी सिने सिद्धांताचे पालन करत गावातील दाहक वास्तव  दाखविण्याचे श्रेय ही निर्मात्याला मिळाले. 

सिनेमा पाहताना मनात अनेक प्रश्न आले,  प्रेम कथेत वयस्क स्त्री-पुरुष ही दाखविता आले असते. तसे असते तर दाहक वास्तव अजून उठून दिसले असते. पण मग झिंगाट डान्स आणि गाणी दाखविता आली नसती. शाळा आणि कालेजात शिकणार्‍या पोरांना हा सिनेमा अत्यंत आवडला. दिल्लीत आज ही  लग्नाच्या रिसेप्शन मध्ये  डीजे झिंगाट गाणे वाजवितात आणि  कोवळे मुले आणि मुली या गाण्याच्या तलवार झिंगाट डान्स ही करतात. अश्या सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल. शहरात येणार्‍या अल्पवयीन जोडप्यांचे शहरातील गिधाडे काय हाल करतात, हे कोवळ्या मुलांना माहीत असण्याची शक्यता नाही. पण निर्माता तर शिकलेला होता?   मला वाटते कोवळ्या मुलांवर अश्या सिनेमांचे काय परिणाम होतात, याच्याशी निर्मात्याला काही ही घेणे देणे नव्हते.  निर्मात्याचा मुख्य उद्देश्य फक्त गल्ला भरणे होता.  त्यात तो सफल ही झाला. बाकी  ऑनर किलिंग  मुद्दा म्हणजे  हत्तीचे दात दाखविण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे(हे माझे मत आहे, कुणाला सहमत होण्याची आवश्यकता नाही).

 



No comments:

Post a Comment