Monday, May 23, 2022

वार्तालाप (२१) श्रीदासबोध : दशक ८: दुश्चितपणा आणि राजाची सुरक्षा.

 जय जय रघुवीर समर्थ 

समर्थांनी छत्रपति संभाजीराजेंना उद्देश्यून एक पत्र लिहले होते त्या पत्राची सुरवात  "अखंड सावधान राहावे, दुश्चित कदापि नसावे"  या ओळीने केली होती. इथे दुश्चितपणाचा एक अर्थ असावधान, बेफिकीर असा होतो. राजा सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित राहते. एका सुरक्षित राज्यातच प्रजा संपन्न  आणि सुखी राहू शकते. प्रजेच्या हितासाठी राजाची सुरक्षाही सर्वोपरी असते.  राजाच्या  सुरक्षेची जवाबदारी राजाचे सुरक्षा सल्लागार, सचिव आणि अंगरक्षक यांच्यावर असते. त्यांना नेहमीच अखंड सावधान राहण्याची गरज असते. श्रीदासबोधच्या आठव्या दशकात समर्थ म्हणतात "घात होतो दुश्चितपणे.., दुश्चितपणे शत्रू  जिणे...". राजा जर  असावधान असेल तर घात होतो. शत्रू  त्याला पराजित करतो. 

मी एसपीजीत असताना एक किस्सा अनेकदा ऐकला होता. त्यात किती सत्य आहे, हे मला माहीत नाही. पण हा किस्सा राजाच्या सुरक्षेची जवाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांची भूमिका काय असावी हे सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट करतो.  किस्सा असा आहे, भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित नेहरू यांची एक सभा होती. एक कनिष्ठ पोलिस अधिकारी आणि काही शिपाई प्रधानमंत्रीच्या सुरक्षेसाठी नियुक्त होते. सभा संपली. आपल्या प्रिय नेत्याचे चरणस्पर्श करण्यासाठी आणि हात मिळविण्यासाठी लोकांनी गर्दी केली. कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या लक्षात आले, लोकांचे हे प्रेम पंडितजींवर भारी पडत आहे. पंडितजींना शारीरिक इजा होऊ शकते.  त्याने शिपायांना आज्ञा केली, लोकांना पंडितजीपासून दूर करा. त्या कनिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पंडितजींचा हात पकडला आणि त्यांना ओढत कारकडे निघाले. अर्थातच पंडितजींना हे आवडले नाही. ते त्याच्यावर ओरडले, रागावले. पण त्या अधिकार्‍याने पंडितजींच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना कारमध्ये बसविले. दुसर्‍या दिवशी पंडितजींनी त्या अधिकार्‍याला आपल्या चेंबर मध्ये बोलविले. त्याला वाटले, आता पंडितजी रागावणार आणि त्याची  हकालपट्टी होईल. पण झाले उलट. पंडितजींनी त्याची प्रशंसा केली आणि म्हणाले आम्ही नेता लोक प्रजेसोबत असताना, भान विसरून जातो. तुम्ही प्रसंगावधान राहून योग्य निर्णय घेतला. त्या अधिकार्‍याने आपल्या कर्तव्याचे १०० टक्के पालन केले होते.   

आपल्या पूर्वप्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधींचे त्यांच्या शीख अंगरक्षकांसोबत अत्यंत पारिवारीक जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यावेळची परिस्थिति पाहता, प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनी शीख अंगरक्षकांची बदली करण्याचे ठरविले. त्यांनी प्रधानमंत्रीच्या निजी सचिवला त्यानुसार सूचना केल्या असतीलच. पण श्रीमती इंदिरा गांधींनी परवानगी दिली नाही.  प्रधानमंत्रीच्या सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांनीही योग्य निर्णय घेतला नाही. श्रीमती गांधीची हत्या झाली. संपूर्ण देशाला त्याचे परिणाम भोगावे लागले.  निष्ठा दोन प्रकारच्या असतात.  त्यांची निष्ठा स्वर्गीय इंदिरा गांधी या व्यक्ति प्रति होती अर्थात "तुम दिन को यदि रात कहो, हम रात कहेंगे" अशी होती. त्यांना प्रधानमंत्रीच्या सुरक्षे एवजी स्वतच्या हिताची जास्त काळजी होती. मी स्वत: अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निजी सचिव राहिलो आहे. प्रधानमंत्री असो किंवा अधिकारी, त्यांनाही भावना असतात. भावनेच्या भरात चुकीचे निर्णय तेही घेऊ शकतात. अश्या वेळी त्यांच्या सोबत कार्य करणार्‍या निजी सचिवांची/ अधिकार्‍यांची जवाबदारी वाढते.  जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न असेल तिथे राजाच्या विरोधाला न जुमानता राजाच्या सुरक्षेसाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी लागते. त्या अधिकार्‍यांची निष्ठा जर प्रधानमंत्री या पदाशी असती तर, त्यांनी  स्वर्गीय  इंदिरा गांधीच्या विरोधाला न जुमानता त्या शीख अंगरक्षकांची बदली केली असती. जास्तीसजास्त त्यांचीही बदली झाली असती. देश एका संकटापासून वाचला असता. समर्थांनी छत्रपती संभाजी महाराजांना पत्र लिहून सावधान केले होते. तरीही संकटाच्या वेळी त्यांच्या सोबत असणार्‍या सहकार्‍यांनी त्वरित योग्य निर्णय घेतले नाही. परिणाम, घात झाला. त्याची स्वराज्याला आणि महाराष्ट्राला मोठी किमत मोजावी लागली. 

सारांश जिथे राजाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो. तिथे मानवीय भावनांना स्थान नाही. राजाची अनुमति असो वा नसो, राजाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्याची क्षमता परिस्थितीनुसार राजाच्या सचिव, सुरक्षेचे दायित्व असलेल्या अधिकार्‍यांपाशी  आणि  अंगरक्षकांमध्ये असली पाहिजे. 




No comments:

Post a Comment