Thursday, April 25, 2019

त्रिनाळी: पुणेकर मतदाता


(आधुनिक ब्रम्हवृन्दानी मतदानाच्या दिवसी सर्वात कमी मतदान करून  जगाला त्यांचे खरे स्वरूप दाखविले,) 

कर्तव्यहीन पाषाण 
वाचाळवीर  विद्वान 
सदा देती ब्रम्हज्ञान.
 

Monday, April 22, 2019

सावली



दिवसा उजेडा सावली दिसते. काळी-काळी कुट्ट जणू कृष्णकृत्यांचा खुलासच करते. रात्री सावली दिसत नाही. साहजिकच आहे, काळे कृत्य रात्रीच्या अंधारात होतात. 

रात्र अंधारी
गुप्त सावली 
मानवी वेशात
नाचती हडळे.

सूर्याच्या उजेडात 
सावली दिसली
कृष्णकृत्य सारे
जगाला दिसले. 
 
 




Thursday, April 18, 2019

कारल्याच्या भाजीत शोधले सुखी संसाराचे रहस्य


नवीन वर्षाचा पहिला दिवस. गुढी उभारल्यावर सौ.ने प्रसाद दिला. कडूलिंबाची पाने, धने आणि गूळ. प्रसाद खाताना सुरवातीला कडूलिंबाच्या पानांची कटु चव नंतर गुळाची गोड चव. संसाराचे हि तसेच आहे, कडू स्वीकार केल्याशिवाय संसाराची गोडी अनुभव करता येत नाही. 

आज सौ.ने कारल्याची भाजी डब्यात दिली होती. भाजीवर ताव मारत असताना कारल्याच्या भाजी बाबत विचार करत होतो. लोक कारल्याची भाजी करताना कारल्यावर अगणित अत्याचार करतात. कारल्याची चामडी सोलून काढतात, नंतर त्वचेवर मीठ चोळतात आणि काही काही लोक तर कहरच करतात, कारल्याला चक्क मिठाच्या पाण्यात आंघोळ घालतात. हे सर्व अत्याचार कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठीच.   

आमची सौ. कारल्यावर जास्त अत्याचार करत नाही. ती साली सकट कारल्याच्या बारीक चकत्या करते. फोडणीत थोड जास्त तेल टाकते, भरपूर तिखटहि घालते. कारल शिजल्यावर आंबट आणि गोडीसाठी थोडा गूळ हि घालते.  सौ.च्या हातची कारल्याची भाजी खाताना कडू-तिखट आंबट-गोड सर्व स्वाद जिभेवर तरंगतात. संसाराचे सर्व रंग कारल्याच्या भाजीत सापडतात. तुम्ही जर कारल्याची भाजी मिटक्या  मारत  खाऊ शकत असाल तरच संसारात उठणाऱ्या  वादळांचा सामना समर्थपणे करू शकाल.

म्हणतात न शरीर निरोगी असेल तरच मन निरोगी राहते. मन निरोगी असेल तर घरात शांती राहील, भांडणे होणार नाहीत. माझ्या सौ.चे माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मला दुधी, लाल भोपळा, तोरी व कारल्या सारख्या भाज्या खायला मिळतात. मी सुखी आणि समाधानी आहे. दुसर्या शब्दात, कारल्याच्या भाजीत सुखी संसाराचे रहस्य दडलेले आहे.  



Tuesday, April 16, 2019

सरडा : काही क्षणिका



ईमान विकत घ्यायला 
बाजारात गेलो.
 मोल घेऊनी  सरड्याला 
घरी परतलो.

सरड्याचे चिन्ह 
नेत्याला मिळाले 
निवडणूक जिंकण्याची 
ग्यारंटी मिळाली.
  
रंगांची शर्यत 
सरडाच  जिंकला 
इंद्रधनू हरला 
आभाळात लपला.






Monday, April 15, 2019

कीर्तीसाठी मी मैफिलकर झालो.


स्वामी त्रिकालदर्शी ध्यानस्थ बसले होते. मी हात जोडून त्यांचे डोळे उघडण्याची वाट पाहत बसलो होतो. मनात विचारांचे काहूर उठले होते. कारण हि तसेच होते. गेल्या आठवड्याची गोष्ट. मोहल्यात  एक लग्न होते. साहजिक मीहि सौ. सोबत लग्नाला गेलो होतो. माझी ओळख करून देताना एक सद्ग्रहस्थ वदले "हे सौ. .. चे मिस्टर आहेत". तीस वर्ष या मोहल्यात वास्तव्य असूनही शेजार्यांना माझे नाव देखील ठाऊक नाही. मनाला किती वेदना झाल्या हे सांगणे कठीण. काल रात्री तर कहरच झाला. कार्यालयातून घरी परतायला उशीर झाला. मोह्ल्यातील कुत्रे एरवी येणाऱ्या-जाणार्यांवर भुंकतात पण त्यांनीहि माझी दखल घेतली नाही. कुत्र्यांच्या भुंकण्याची लायकी हि आपली नाही. जगणे व्यर्थ वाटू लागले.

समर्थ म्हणतात, "मरावे परी कीर्तिरुपी उरावे". इथे जीतेजी कुणी ओळखत नाही,  तिथे मेल्यावर कुणाला आपले स्मरण होणार.  काय करावे जेणेकरून आपले नाव काही काळ तरी लोकांच्या लक्षात राहिले पाहिजे. मन बैचैन झालेले होते. तेवढ्यात स्वामीजींनी डोळे उघडले, माझ्याकडे बघत म्हणाले, काय विवेक प्रसिद्धी ध्यास लागला आहे वाटते. 

मी म्हणालो, "स्वामीजी, आपल्यापासून काय लपले आहे,  प्रत्येकाला वाटते जगात नाव झाले पाहिजे, मला हि वाटते". 


स्वामीजी मंद हसले आणि म्हणाले, देशात निवडूणुकीचे वारे वाहत आहेत, निवडणूक लढव. 

"स्वामीजी, जिथे मोहल्यात कुणी ओळखत नाही, तिथे निवडणुकीचे तिकीट कोण देणार". 

मग असे कर, एखादी शाळा, अनाथालय किंवा धर्मशाळा बांध, जगी नाव होईल.  

"स्वामीजी, कशालाहो थट्टा करता गरीबाची. सरकार फक्त दाल-रोटी निघेल एवढाच पगार देते". 

मन्जे तुला प्रसिद्धी पाहिजे, तेही  पैका न खर्च करता?

"होय स्वामीजी, मला फक्त प्रसिद्धी पाहिजे. पैका नाही मिळाला तरी चालेल". 

मग एखादी कला अवगत आहे का? संगीत, नृत्य, चित्रकला इत्यादी...

"स्वामीजी, आता साठी जवळ आली आहे, संगीत नृत्य इत्यादी शिकण्याची वेळ निघून गेली आहे. चित्रकलेचे म्हणाल तर जास्तीसजास्त आडव्या-तिरप्या रेखा कागदावर रखडण्या व्यतिरिक्त काही अधिक येत नाही". 

स्वामीजी हसले, म्हणाले, हे हि पुरेसे आहे, आजच्या काळात कुणालाहि न कळणार्या चित्रांनांच जास्त वेल्यू आहे. फक्त त्या चित्रांना विवादास्पद नाव दे, पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही मिळतील. 

स्वामीजींचे बोलणे ऐकून खरे म्हणाल तर मला रागच आला, पण उसने अवसान आणून म्हणालो, "स्वामीजी, विवादांपासून मला दूरच ठेवा, आजकाल असहिष्णुता लई वाढली आहे. त्यात मी सिंगल हड्डी. जान जोखीम मध्ये टाकून मला प्रसिद्धी नको".

स्वामीजी जोरात हसले म्हणाले, बच्चा तुझी फिरकी घेत होतो. उगाच त्रागा करू नकोस, सौपा उपाय सांगतो, तू लेखक आणि  कवी हो, थोडेफार नाव निश्चित होईल.  

स्वामीजींना मध्येच तोडत मी म्हणालो, "स्वामीजी एक तर मला लिहिता येत नाही. दुसरे त्यातहि खिश्यातील ४० ते ५० हजार खर्च केल्यावर दोनशे तीनशे पानी पुस्तकच्या हजार एक प्रती छापल्या तरीही ती वाचणार कोण?  आजकाल पुस्तके, त्यातहि मराठी पुस्तके लोक विकत घेत नाही. मित्रांना, परिचितांना फुकट वाटली तरी ते वाचणार नाही. याची शंभर टक्के खात्री आहे. ती सरळ रद्दीत जातील".  

स्वामीजी म्हणाले, "बच्चा आधी मी काय म्हणतो तेपूर्ण ऐक. तुझ्यासाठी योग्य ठिकाण शोधले आहे. इनस्टेंट प्रसिद्धी मिळेल. गुगलवर अनेक  स्वयंसिद्ध लेखूकांनी  व्हाट्सअप ग्रुप तैयार केले आहेत. अश्याच एखाद्या  ग्रुपची सदस्यता ग्रहण कर. तिथे अनेक स्वयंसिद्ध लेखक/कवी  लेख आणि कविता टंकतात. फक्त एक गोष्ट लक्ष्यात ठेव, आवडो न आवडो, दुसर्यांचे लेख आणि कविता  लाईक कर. जेवढ्या जास्त तू दुसर्यांच्या कविता आणि लेख  लाईक करेल बदल्यात तुझ्या  निरर्थक लेखांनाहि  लाईक मिळतील.  काही काळातच,  किमान  शंभर ते  हजार लोक  तुला ओळखू लागतील. 

स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. घरी आलो मोबाईलवर ग्रुप शोधू लागलो. "मैफिल ग्रुप" सापडला. लगेच सदस्यता घेतली. पाहू किती कीर्ती मिळते ते. 





Monday, April 8, 2019

रूपक कथा: भव्य देवालय आणि भक्त


भक्तांनी त्यांच्या अवतारी देवतेचे भव्य मंदिर उभारले. मंदिराचा कळस सोन्याचा होता. मंदिरात भव्य सभामंडप होते. सभामंडपाच्या भिंतींवर बारीक कोरीव काम हि होते. गर्भगृहात माणिक-मोती धारण केलेली त्या देवतेची सुवर्ण मूर्ती होती. मंदिराच्या आवारात भक्तांची गर्दी होती. सर्वांचा मनात देव दर्शनाची अभिलाषा.

आता अवतारी देवता म्हणाल तर, त्या देवतेची पत्नी, पोरे-पोरी, सासू- सुना इत्यादी मंडळी हि येतीलच. मुख्य देवते सोबत मंदिराच्या आवारात त्यांची हि स्थापना केलेली होती. मुख्य देवेतेप्रमाणे याही देवता शक्तिशाली होत्या. भारी-भरकम दक्षिणा मोजल्यावरच देवतेची अनुकंपा भक्तांवर व्हायची. अर्थात देवतेचा कृपा प्रसाद त्या भक्तांना मिळायचा. बाकी भक्त फक्त देवतेचे दुरून दर्शन घेऊन कृतकृत्य व्हायचे. माझ्या देवतेचे मंदिर किती भव्य आहे, याचे वर्णन करून स्वत:ला धन्य समजायचे.   

मी असेच एका भक्ताला विचारले, बाबा एवढी तुझी देवतेप्रती निष्ठा आहे तरी देवता तुला प्रसन्न का होत नाही. तुझे दु:ख का दूर करत नाही. तो म्हणाला पूर्वी सत्ययुगात देवता भक्ताच्या तपस्येवर प्रसन्न होऊन स्वर्गातून थेट पृथ्वीवर यायचे, भक्ताच्या मदतीसाठी. आता देवता इथे पृथ्वीवरच मंदिरात विराजमान असतात.  भक्तांना तपस्या करायची गरज नाही. जो भक्त भरपूर दक्षिणा मोजतो, देवताची अनुकंपा त्या भक्तावर होते. मी काही पुढे विचारणार, तेवढ्यात भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे कपाट उघडले. देवतेची जयजयकार करीत भक्तांनी मंदिरात प्रवेश केला. 


Friday, April 5, 2019

शुभमंगल सावधान


रोजडे दिनी तिनी गुलाबाची कळी दिली. गुलाबाच्या सुगंध त्याच्या नाकात भिनला, पण काटा हातात रुतला आणि रक्त वाहू लागले. अत्यंत गोड कोकिळेच्या आवाजात ती साॅरी म्हणाली व मधुबाला सारखे गालात लाजली जणू स्वर्गातील अप्सराच. त्याची शुद्धच  हरवली आणि विचार करण्याही शक्ती हि. तो तिच्या जाळ्यात अलगद अटकला. "शुभमंगल सावधान" पण कुणीच त्याला सावधान केले नाही. लग्न झाल्यावर तो तिची प्रत्येक इच्छा तळहातावर घेऊन पूर्ण करू लागला. वासनेच्या डोहात संसार फुलला आणि त्या सोबत संसाराचे चटके हि बसू लागले.  आता तिचे अवगुण त्याच्या दृष्टीस येऊ लागले. सकाळी नवऱ्याच्या हातचा चहा पिल्याशिवाय ती पलंगावरून उठायची नाही. नौकरीला जाण्याआधी मुलांचा नाश्ता हि त्यालाच तैयार करावा लागे. नुसते आयते खाऊन-खाऊन गुलाबाची कळी आता गोबीच्या फुलासारखी फुलली होती. अप्सरा आता हिडींबा दिसू लागली होती. 

त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. काय पाहून हिच्याशी लग्न केले. कुणी आपल्याला वेळेवर सावधान का नाही केले. किमान लग्न लावणाऱ्या गुर्जीनी तरी सावधान करायला पाहिजे होते. गुरुजींना जाऊन जाब विचारायला पाहिजे. गुरुजींना शोधता-शोधता तो एका लग्न मंडपात पोहचला. गुर्जी लग्न लावीत होते.  गुरुजीनी  चढ्या आवाजात शुभमंगल म्हंटले पण सावधान हा शब्द तोंडातच पुटपुटले. कुणालाच तो शब्द ऐकू आला नाही. नवऱ्या मुलाने आनंदाने हार नवरी मुलीच्या गळ्यात घातला. च्यायला ह्याचे नशीब हि फुटणार, म्हणत त्याने कपाळावर हात मारला.

काही वेळाने गुर्जींचे लक्ष त्याच्याकडे गेले. तो म्हणाला, गुर्जी! हे तुम्ही ठीक केले नाही. सावधान शब्द हि जोरात उच्चारला पाहिजे होता. गुर्जी त्याला पाहत हसले आणि म्हणाले अरे एकदा जोरात 'सावधान' म्हंटले  होते आणि समर्थ बोहल्यावरून पळून गेले, त्यासोबत गुरुजीची दक्षिणा हि बुडाली. त्या दिवसापासून, आम्ही गुरुजी सावधान हा शब्द फक्त तोंडातच पुटपुटतो.