Saturday, August 8, 2015

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात


सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास.  माझ्या जवळ बसलेला  एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा  भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है.  कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का?

चौधरी उतरला,  चांगले माहित आहे, त्या वेळी हि कांद्याचा  भाव ५० रुपये किलो झाला होता.  पण त्याला १७ वर्षे झाली. त्या वेळी बसचे भाडे ३ रुपये होते, आज १५ रुपये आहे. मेट्रोत तर आणखीन जास्त लागतात.  माझ्या गळ्यात लटकलेले आय कार्ड पाहून, मला उद्देश्यून म्हणाला, या कालावधीत सरकारी  बाबूंचे पगार तर ५-७ पट नक्कीच वाढले असतील.  मी काय चूक बोलतो आहे. मी म्हणालो चौधरीजी आपले म्हणणे खरे आहे. आपण शेतकरी आहात का? 

चौधरी पुढे म्हणाला, माझी राजस्थान मध्ये शेती आहे, कांद्याच्या शेतीत कितीतरी वेळा नुकसान झाले आहे. मी तर शेतात कांदे लावणे सोडून दिले आहे.  सरकार कुठली हि आली तरी तिला शेतकर्यांची पर्वा नाही. तुम्हीच सांगा, महागाई शेतकर्याला हि आहे कि नाही, १९९८ च्या हिशोबाने आज सीजनमध्ये कांद्याला एका किलोचा ५०-७० रुपये आणि अगस्त-सेप्टेम्बरमध्ये किमान १००-१५० रुपयांचा भाव मिळाला  पाहिजे.   पण आज ऑगस्टच्या महिन्यात हि किलोला भाव फक्त ५० रुपये आहे.  सीजनमध्ये तर कांद्याचा भाव केवळ १० रुपये होता.  आज  जर किलोचा  भाव २५० रुपये असता तर कांदा महाग झाला म्हणता आले असते. सच तो यही है, गेल्या १७ वर्षांत कांद्याचा भाव १ रुपया वरून २० पैश्यावर आलेला आहे. त्याचा ह्या बोलण्यावरून मेट्रोत जोरदार हशा उमटला. एक प्रवासी उद्गरला,  लगता है, बुढापे में चौधरीजी  का दिमाग चल गया है.   

तेवढ्यात उत्तम नगरचे स्टेशन आले. घरी जाताजाता चौधरीजी जे म्हणाले त्यात किती सत्य आहे याचा विचार करू लागलो. चौधारीजींचे म्हणणे खरेच होते. खरोखरच गेल्या वर्षांत कांद्याची किंमत घसरत घसरत  रुपयावरून वीस पैश्यांवर आली आहे.


No comments:

Post a Comment