Sunday, July 26, 2015

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो


दोन-तीन दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला प्रश्न विचारला—"पटाईतजी, सच-सच बताओ, आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया?" त्याचा प्रश्न ऐकून मी विचारात पडलो. मी अंतर्जालावर लिहायला सुरुवात का केली? नकळत समर्थांचे वचन आठवले—"मरावे परी कीर्तिरूपे उरावे."

प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्युलोकात शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही, पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनातही ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरीही मला उमगलेले सत्य मी माझ्या मित्राला सांगितले...

काहीतरी भव्य-दिव्य केले तर नामरूपी कीर्ती युगानुयुगे जिवंत राहते. श्रीरामांपासून ते गांधीजींपर्यंतच्या महान विभूतींची त्यांच्या कार्यामुळे कीर्ती आजही जिवंत आहे. आता निम्नवर्गीय कुटुंबात जन्मलेला, अभ्यासात बेताचा, बामुश्किल सरकारी कारकून झालेला माझ्यासारखा माणूस आयुष्यात काही भव्य-दिव्य करेल, असं कधीच वाटलं नाही.

बाबा आमटे इत्यादी लोकांसारखी समाजसेवा करण्याची इच्छाशक्तीही नव्हती. सारांश, काही भव्य-दिव्य करणे मला शक्य नव्हते. समाजात दुष्ट लोकांनाही प्रतिष्ठा मिळते. श्रीरामाबरोबर रावणही अमर झाला, आणि गांधीजींसोबत गोडसेही.

तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे—"पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याच्या तिन्ही लोकी झेंडा." आता माझ्यासारख्या सिंगल हड्डीच्या व्यक्तीकडून गुंडगिरी करणे शक्य नव्हते. शिवाय भित्रेपणाचे बाळकडू मध्यमवर्गीय मराठी माणसाला जन्मापासून पाजले जातेच. हा मार्गही बंद.

आता मेल्यानंतर कीर्तिरूपे उरणे शक्यच नव्हते. डॉक्टर, इंजिनीअर इत्यादींची नावे काही काळ लोकांच्या लक्षात राहतात. पण ज्या वेळी अभ्यास करायचा होता, केला नाही. ती वेळ केंव्हाच निघून गेली होती.

आता संसारात राहत असताना थोडंफार समाजकार्य केलं किंवा त्याचा दिखावा केला, तर निदान जिवंत असताना तरी आपलं नाव काही लोकांच्या लक्षात राहतं. पण इथेही लोचा झाला. एक तर सरकारी नोकरी, तीही स्टेनोग्राफर, पीए आणि पीएस. "येस येस" करण्यात ३३ वर्षं निघून गेली. त्यातही १८ वर्षं पंतप्रधान कार्यालयात. सकाळी सातला घरून निघाल्यावर रात्री ९–११ च्या दरम्यान घरी पोहोचणे.

गली-मोहल्ला आणि मंडळाचे दिखाऊ समाजकार्य तर सोडाच, घरची सर्व कामं सौ.च्या डोक्यावर टाकावी लागली. सद्यस्थितीत अशी अवस्था आहे की गली-मोहल्ल्यातही मला माझ्या सौ.च्या नावाने किंवा मुलाच्या नावाने ओळखतात.

आता एकच मार्ग उरला होता—लेखक बनण्याचा. लेखक बनण्यासाठी काही भव्य-दिव्य करावं लागत नाही, मेहनत आणि अभ्यासही करावा लागत नाही.
फक्त मनातील कल्पना कागदावर उतरवायच्या असतात. वयाच्या पंचविशीत लेखक बनण्याचा एक प्रयत्न केला होता. काही हिंदी/मराठी कविता काही प्रतिष्ठित मासिकांमध्ये पाठवल्या होत्या. पण कोणीही त्या छापल्या नाहीत, किंवा परतही पाठवल्या नाहीत. फक्त पोस्टखात्याची शंभर रुपयांची कमाई झाली. अखेर थकून-भागून कवी/लेखक बनण्याचा नाद सोडून दिला. "आपलं काही नाव होऊ शकत नाही" हे सत्य स्वीकारलं.

पण म्हणतात ना—एक मार्ग बंद झाला की दुसरा उघडतोच. असेच पंचवीस वर्षं निघून गेले. २०१० मध्ये घरात इंटरनेट लावलं. कदाचित माझ्यासारख्या लोकांच्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच इंटरनेटचा जन्म झाला असावा. या वेळेपर्यंत माझ्या मनात "आपण मराठी आहोत" याचा स्वाभिमान जागृत झाला होता.

इंटरनेटवर मी पाहिलेली पहिलीच साईट "मराठीसृष्टी" होती. या साईटमध्ये चक्क "आपल्यातला सुप्त लेखक जागवा" असं आव्हान होतं. आंधळा एक डोळा मागतो—इथं तर दोन डोळे तेही मुफ्त में! प्रथम विश्वासच बसला नाही.
भीतभीत पहिला लेख गुगल देवाच्या मदतीने टंकून टाकला. आश्चर्य म्हणजे पहिला लेख दुसऱ्याच दिवशी साईटवर दिसला. मग काय—मनातील दडलेली अमर होण्याची, प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली.

स्वतःचा ब्लॉगही स्वतःच्या नावानेच बनवला. जे जे मनात आलं, ते टंकू लागलो. अंतर्जालावर भाषेची, व्याकरणाची कसलीही चिंता करावी लागत नाही. काही चूक असेल तर वाचणारे लगेच प्रतिसाद देऊन ती दुरुस्त करतात.

चिंता करण्याची गरजच नाही. काही महिन्यांतच मराठीच्या इतर साईट्स—जसं की मिसळपाव, ऐसी अक्षरे,  बाबत कळलं. डोळे बंद करून आपला लेख सर्व ठिकाणी टाकू लागलो. अशा रीतीने मीही अंतर्जालावर लिहिणाऱ्या हजारोंच्या संख्येत असलेल्या लेखकांच्या श्रेणीत समाविष्ट झालो.

इंटरनेटवर लेखांची चोरीही होते. माझे काही लेखही चोरी झाले. खरं सांगायचं तर, चोरी झाल्याचं कळल्यावर दुख होण्याऐवजी कुठेतरी आनंदच झाला—"बंदे में कुछ दम है" असं वाटलं! आजकाल तर दर आठवड्यात एक लेख/कविता लिहिण्याचा संकल्प केलेला आहे.

पाककृतीपासून ते न कळणाऱ्या गंभीर प्रश्नांवरही लिहायला सुरुवात केली आहे. काहीही लिहिलं तरी निदान ५००–१००० लोक वेगवेगळ्या मराठी साईट्सवर वाचतीलच. (मराठीत लिहिलेली अधिकांश छापील पुस्तकं ३०० लोकही वाचत नाहीत.)

एक मात्र खरं—निदान जेवढे दिवस आपण अंतर्जालावर लिहित आहोत, तेवढे दिवस तरी काही लोकांना आपलं नाव लक्षात राहील. निदान सध्यातरी कीर्तिरूपे उरण्याची दुधाची तहान ताकावर तरी भागते आहे. (असं निदान मला तरी वाटतं.) तरीही प्रतिष्ठित लेखक समाज कधीतरी आपलीही दखल घेईल, अशी आशा वाटते. 



No comments:

Post a Comment