जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टात गेला
तोचि भला.
(दासबोध १९.९.१६)
[समर्थ म्हणतात - जो स्वत:च्या कार्यासाठी दुसर्यावर विसंबून राहतो त्याच्या कार्याचा नाश होतो, म्हणून जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोचि शहाणा समजावा].
आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो. मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात.
पण प्रत्येक कार्य ऑउटसौर्स करता येत नाही. ज्या कामांचे चांगले आणि वाईट परिणाम स्वत:च भोगायचे असतात. ती कामे करण्यासाठी स्वत:च कष्ट करावे लागतात अन्यथा काय होते, या वरून एक जुनी कथा आठवली.
पूर्वी इक्ष्वाकु वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते. राजा सत्यव्रताने सौपा मार्ग निवडला चक्क तपश्चर्या ऑउटसौर्स केली. ऋषी विश्वामित्र तपस्या करणार आणि सत्यव्रत स्वर्गात जाणार हे ठरले. या साठी राजा सत्यव्रताने किती सुवर्ण मुद्रा मोजल्या असतील, काही कल्पना नाही. एवढे मात्र खरे, ऋषी विश्वामित्र तपस्येला बसले आणि सत्यव्रताचे स्वर्गारोहण सुरु झाले.
आता परीक्षा देणारा एक आणि पास होणारा दुसरा, कुणालाही हे आवडणार नाही. आपल्या देशात परीक्षेत कॉपी करणाऱ्यां विरुद्ध कार्रवाई केली जाते. पोलीस कॉपी करणार्यांना अटक करतात. देवांच्या राजा इंद्राला सत्यव्रताचा ऑउट सौर्सिंग प्रकार मुळीच रुचला नाही. आता विश्वामित्र सारख्या प्रतिष्ठित ऋषी आणि इक्ष्वाकू वंशाच्या बलाढ्य राजाच्या विरुद्ध बलप्रयोग करणे देवराज इंद्राला जमणे शक्य नव्हते. पण इंद्राजवळ अप्सरा रुपी ब्रह्मास्त्र भरपूर होते. त्यांचा वापर कसा करायचा हे ही इंद्राला चांगले माहित होते. इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्रांची तपस्या भंग करण्याचा आदेश तिला.
मेनका विश्वामित्रांच्या पुढ्यात येऊन ठाकली. रती समान सुंदर स्त्री समोर पाहून विश्वामित्र यांची विकेट उडाली. विश्वामित्र राजाला दिलेले वचन विसरून गेले. तपस्या अर्धवट सोडून, विश्वामित्रांनी मेनके सोबत संसार थाटला. राजा सत्यव्रताची गत तर ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. अद्याप ही ते न धड पृथ्वी वर, न धड स्वर्गात, अधांतरीच लटकलेले आहे. त्यांची स्वर्गात जाण्याची मोहीम पूर्णपणे फसली.
दिल्लीत सोसायटी राहणारे बहतेक लोक (अधिकांश नौकरीपेशा वाले मराठी लोक) भाजीपाला सुद्धा मोबाईल वर मागवितात. घरपोच भाजी बहुधा शिळी असते. हे आळशी लोक चांगली भाजी म्हणजे काय हे ही विसरून गेलेले आहेत. (एकदा मी स्वत: एका मित्राच्या घरी आलेली संपूर्ण भाजी परत केली आणि त्यांना दुकानात घेऊन गेलो. तेंव्हा त्यांना कळले कित्येक वर्षांपासून त्यांचा ओळखीचा दुकानदार त्यांना निम्न दर्जेची भाजी पुरवत होता आणि चांगल्या दर्जाचे पैशे घेत होता). त्या दिवसापासून ते स्वत: बाजारात जाऊन भाजी आणू लागले. तसेच ऑन लाईन मिळणाऱ्या अधिकांश वस्तूंचा दर्जा ही बहुतेक चांगला नसतो, मनासारखी ही नसते आणि पुष्कळदा जास्ती किंमत मोजावी लागते.
आजच्या जगात दुसर्यावर विश्वास ठेवावेच लागतो. उदा: घर बांधायचे असेल तर ठेकेदारवर विश्वास ठेवावा लागतो. पण एक लक्षात ठेवा. अंधारात कुणाला सोन्याचे नाणे दिसले, कुणी पाहत नसेल तर शंभर पैकी नव्वद टक्के लोक सोन्याचे नाणे उचलतीलच. (स्वत:लाच विचारा). घराचा नक्शा पास करून घेणे, लोनची व्यवस्था, सरकारी अनुमती या बाबी स्वत:च बघाव्या लागतात. विटा, सिमेंट, लोखंड कुठे चांगले आणि स्वस्त: मिळते हे ही पाहावे लागते. ठेकेदार किती ही विश्वासू असला तरी आपल्याला जातीने उभे राहून कामावर लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा कुठे घर मनाप्रमाणे आकार घेते. अन्यथा घराचे स्वप्न, स्वप्नच राहण्याची शक्यता जास्त. दुसर्यांवर अवलंबून राहायचे असले तरी कामावर लक्ष हे ठेवावेच लागेल. त्या साठी थोडे कष्ट ही करावे लागतील.
ह्याच प्रमाणे परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करावाच लागतो, धन-संपती कमविण्यासाठी मेहनत ही करावीच लागते. सत्यव्रताने स्वत: तपस्या केली असती तर निश्चित ते स्वर्गात गेले असते.
सारांश एकच, प्रपंचातील कामे असो किंवा परमार्थ साधण्याचा मार्ग, कार्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला स्वत:च कष्ट करावेच लागतात. तेंव्हाच कार्य तडीस जाते. समर्थांच्या शब्दातच,
व्याप आटोप करती
धके-चपटे सोसती
तेणे प्राणी सदेव होती
देखता देखता.
(दासबोध १५.३.७)
No comments:
Post a Comment