Tuesday, July 14, 2015

मोड आलेल्या मुगाची उसळ



शनिवार, दिनांक ११.७.२०१५ 

तीन दिवसांपासून दिल्लीत रोज पाऊस पडत आहे.  परवा रात्री मूग भिजत टाकले होते. काल कपड्यात बांधून ठेवले.  काल संध्याकाळी पाऊस सुरु असल्यामुळे शुक्र बाजार लागला नाही. आज सकाळ पासून ही रिमझिम पाऊस सुरु आहे. पण घरात उसळीला लागणारे  साहित्य कांदे, टमाटर, आले, लसूण इत्यादी होते. मुगाला मोड मस्त आली होती. अश्या पावसाळी वातावरणात गरमागरम उसळ खायला कुणाला ही आवडेल.  सौ.ने मोड आलेल्या मुगाची उसळ केली  त्याचीच कृती खाली देत आहे. (सौ.ची तक्रार आहे, तिच्या केलेल्या रेसिपी मी आपल्या नावाने टाकतो. तिचे श्रेय तिला मिळालेच पाहिजे, अन्यथा .... आणखीन काय सांगणे... बाहेरचा वाघ घरात शेळीच असतो). असो.

 साहित्य: मोड आलेले मूग, कांदे मध्यम आकाराचे ३, टमाटर ३, हिरवी मिरची ३-४, लसूण ७-८ पाकळ्या, आले अर्धा ईंच, हिंग, मोहरी, हळद, काळी मिरी पूड, जिरे पूड प्रत्येकी १ छोटा चमचा,  तिखट आणि धने पूड २ छोटे चमचे, तेल  आवश्यकतेनुसार , मीठ चवीनुसार. 



कृती: आधी मोड आलेले मूग पाण्यातून अलगद काढून घ्या थोडा बहुत कपड्याचा वास लागला असेल तरी निघून जातो.  कांदे आणि टमाटर आणि कोथिंबीर बारीक कापून ठेवा. मिरची, आले-लसूणची पेस्ट करून घ्या.  


गॅस कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर मोहरी मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर हिंग टाका. नंतर आले-लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. एक मिनिटानंतर चिरलेले कांदे घालून थोड परतून घ्या नंतर त्यात काळी मिरी, जिरे आणि धने पूड आणि मोड आलेले मूग घाला. कढईवर झाकण ठेऊन, गॅस मध्यम करून ५ मिनिटे वाफ काढून घ्या.  आता झाकणउघडून, बारीक चिरलेले टमाटर घाला (पावसाळ्यात कांदे, टमाटर उसळी वर वरतून घालण्यापेक्षा शिजताना टाकलेले जास्त चांगले) आणि चवीनुसार मीठ टाकून उसळ परतून घ्या. पुन्हा २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवा. गॅस बंद करा. 


वरतून कोथिंबीर टाकलेली स्वादिष्ट गरम-गरम उसळ  रिमझिम पाऊस बघत खाताना मस्त लागते.    

No comments:

Post a Comment