Thursday, May 14, 2015

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू


तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल.   अर्थात थोडा मोठा झालो होतो.   खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे.  मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते.  मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता.  म्हणून त्या मैदानाला लोक  स्टीफन ग्राउंड म्हणून  ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत   २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भा मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची  कल्पना करणे ही शक्य नव्हते.  आम्ही ५-६  मराठी मुले, काही मोहल्यातली आणि  दोन-चार मुस्लीम मुले ही येऊन जाऊन आमच्या टीम मध्ये मध्ये खेळत असे. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैशे गोळा करून खेळण्यासाठी २-३ रुपये जमवून काॅर्कचा  चेंडू विकत घ्यायचो.   त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १-१४ रुपयांना मिळत असे.    श्रीमंत मुलांचे पांढरे शुभ्र वस्त्र, चांगल्या दर्जाच्या बेट्स आणि त्याहून वेगळे म्हणजे ते क्रिकेटच्या चेंडूने क्रिकेट खेळायचे. त्यांना  पाहून आम्हाला इर्षा होणे साहजिकच होते. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल हे वाटत नव्हते.  

एक दिवस असाच मैदानात गोटू भेटला.  माझ्याच वयाच्या असेल.  त्याच्या जवळ क्रिकेटचे २-३ चेंडू होते. त्याने आणलेल्या  चेंडूंचा दर्जा पहून आम्हाला ही राहवले नाही. त्याला सहज विचारले, कितीला देतो.  १ रूपये से ५ रूपये तक की गेंद अपने पास है. लेना है तो बोलो.  माझ्या मित्राला शंका आली त्याने विचारले, कहाँ से लाते हो इतनी सस्ती  गेंदे. तो ऐटीत म्हणाला, अपनी जानपहचान है, DDCA में(Delhi District Criket Association).  DDCAवाले मेच संपल्यावर जुने चेंडू  ओळखीच्या लोकांना स्वस्तात विकतात. काही चेंडू तर एक-दोन ओवर जुने सुध्दा असतात. असे चेंडू तो डझनच्या भावाने  विकत घेतो.  २-४ ओवर जुना, अर्थात नवीन चेंडू  3-4 रुपयांना विकतो. थोडे जुने चेंडू असेल तर मिळेल त्या किमतीला अर्थात १-२ रुपयांना.  अर्थातच आम्ही ही कधी १ रुपया तर कधी दीड आणि अगदी नवा कोरा चेंडू असेल तर ३ रुपये देऊन ही  त्याच्या कडून क्रिकेटचे चेंडू विकत घेऊ लागलो. गोटू क्रिकेट ही चांगला खेळायचा, कधी-कधी सकाळच्या वेळी तो आमच्या सोबत ही खेळत असे. २-३ दिवसांनी कळले गोटू हे त्याचे टोपण नाव होते. खरे नाव असलम  होते. तो   बल्लीमारान या भागात राहायचा.

शाळेला हिवाळ्याच्या सुट्या लागल्या, गोटूने   वादा करून ही चेंडू आणून दिला नाही.  नंतर कळले आमच्या साठी आणलेला  चेंडू त्याने २ रुपयांना दुसर्या टीमला  विकला होता.  या वर माझ्या मित्राने त्याला जोरदार झाडले.  अखेर त्याने सांगितले आज सकाळी ११ वाजता तो फिरोजशाह कोटला येथे  जाणार आहे.  चेंडू भेटले तर उद्या सकाळी चेंडू आणून देईल.  आमचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरविले आपण ही तिचे जाऊ, पाहू कुणा कडून हा चेंडू विकत घेतो. एकदा कळले कि आपल्याला ही त्या माणसाकडून थेट थोक मध्ये चेंडू विकत घेता येतील. आपण ही चेंडू विकून पैसा कमवू.  सकाळी ११च्या सुमारास मी आणि माझा मित्र पायी-पायी चालत दिल्लीगेट वर पोहचलो. पूर्वी फिरोजशाह कोटला स्टेडियम आज सारखे मोठे नव्हते. एक रस्ता दिल्लीगेट हून राजघाट कडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत. भिंतीच्या मागे दरियागंज आणि  समोर बगीचा.  रस्त्याच्या दुसर्या बाजूला फुटबाल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ  फिरोजशाह कोटला स्टेडियम कडे जाते. गल्ली आणि स्टेडियमच्या भिंती यांच्या मधल्या भागात एक लहानसे मैदान होते.   मैदानाच्या एका भागात अभ्यासासाठी काही नेट्स आणि मध्ये एक क्रिकेटची पिच होती. तिथे बहुतेक DDCAच्या लीग मचेस  व्हायच्या.  आम्ही तिथे पोहचलो तर बघितले, राजघाट कडे जाणारा रस्ता आणि स्टेडियम कडे जाणार्या गल्लीच्या टोकावर  गोटू बसलेला होता.  मैदानात क्रिकेटची मेच सुरु होती. आम्हाला पाहताच तो चाचपला. म्हणाला, धन्धेका राज जानने आये हो क्या? भरोसा नहीं है मुझपे.  मी म्हणालो, भरोसा असता तर इथे कशाला आलो असतो. बाकी तुझ्या धंद्यात आम्ही टांग नाही अडविणार. आम्हाला फक्त चेंडू पाहिजे. तो म्हणाला सध्या मच सुरु आहे, काही काळ इथे उन्हात बसावे लागेल. मी म्हणालो, इतक्या दुरून मच पाहाण्यापेक्षा  थोड पुढे झाडाखाली हिरवळीवर बसू. खेळ व्यवस्थित बघता येइल.  तो फक्त हसला आणि म्हणाला, अब आ ही गये हो तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.  आम्ही ही त्याच्या सोबत चुपचाप बसलो. थोड्याच वेळाने, फलंदाजाने एक जोरदार फटका मारला आमच्या दिशेने चेंडू वेगात उसळी मारून रस्त्यावर  आला. गोटू जणू काही याच क्षणाची वाट पाहत होता. त्याने धावत जाऊन चेंडू उचलला आणि जोरात ओरडला, भागो, भागो. काही क्षण आम्हाला काहीच समजले नाही, पण त्याला रोड  पार करून पळताना बघितले  आणि आम्ही ही त्याच्या मागोमाग धूम ठोकली.  भिंती समोर असलेल्या बगीच्यात ही बरीच मुले क्रिकेट खेळत होती.  त्यांची परवा न करता पळत-पळत आम्ही भिंतीत असलेल्या लहानश्या भेगेतून  आत  शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. गोटू आम्हाला पाहत हसत म्हणाला, क्यों मजा आया ना. अबे बेवकूफों की तरह क्यों बैठे रहे. थोड़ी और देर हो जाती तो,पकडे जाते. बहुत मार पड़ती है. कभी कभी तो पुलिस को  भी सौंप देते हैं. जान हथेली पर रख कर गेंद जुटता हूँ तुम्हारे लिए. फिर भी भरोसा नहीं करते हो. मनात विचार आला, पकडल्या गेलो असतो तर....  आपली काही  चुकी नसताना ही भरपूर मार खावा लागला  असता.   घरी जर हा प्रकार कळला असता तर.  त्याची कल्पनाच करणेच अशक्य होते. क्रिकेट खेळणे तर बंद झाले असते, हे निश्चित.  थोड्या वेळाने,  मी गोटूला विचारले एवढा धोका पत्करून तू चेंडू चोरून आणून विकतो. मिळालेल्या पैश्याचे तू काय करतो. काही क्षण तो माझ्या कडे बघत राहिला, त्याचे डोळे पाणावले, तो म्हणाला घर पर   मुझसे छोटे दो भाई और एक बहन भी है. दो साल पहिले  मेरी माँ गुजर गयी, बाप ने दूसरी शादी की है.  त्याचा बाप संध्याकाळी साप्ताहिक बाजारांमध्ये भाजीची रेडी लावतो.  तो बापाला त्याच्या कामात मदत करतो.  पण बापाची नजर भारी. तो  त्याला  एक छदाम ही कधी देत नाही.   घरी सावत्र आई त्याच्या लहान  भावंडानां धड खायला ही देत नाही.  बापाला काही म्हंटले तर तो त्यांच्या वरच ओरडतो. कधी-कधी हात ही उगारतो.   या जान जोखिम मध्ये टाकून मिळवलेल्या  पैश्यानी तो लहान भावंडाना सावत्र आईच्या न कळत  खायला आणून देतो.  पुढे काय बोलावे, हे त्या वयात मला कळणे शक्य नव्हते. मुकाट्याने मी आपल्या घराकडे निघालो. जाताना त्याला आजची  घटना कुणाला ही सांगणार नाही याचे वचन दिले.  त्या  हिवाळी   सुट्ट्यात  आम्ही त्याला दिलेले वचन पाळले ही. पुढे  उन्हाळी  सुट्ट्यात तो आम्हाला मोरीगेटच्या मैदानात चेंडू विकताना दिसला नाही.  

या वर्षीचे  आय पी एलचा मेच पाहत असताना, कुणास ठाऊक,  तब्बल ४२ वर्षांनतर त्याची  आठवण आली.   काय करत असेल तो. ...


आजचा कवी

No comments:

Post a Comment