Friday, April 19, 2013

डीओ आणि सदूची प्रेमकहाणी


विज्ञापनातल्या हिरो ने डीओ लावला
सुंदर पोरी त्याला, येउनी बिलगल्या.
सदू ने ही डीओ लावला
तिला पटवायला, चौपाटीवर आला.
डीओचा सुगंध दरवळीत, तिच्या जवळ पोहचला.
तिला होतील एलर्जी, ती पटापटा शिंकली
बहाणा करून ती, दूर निघोनी गेली.
सदूची प्रेमकहाणी, सुरु होताच  संपली.
असे कसे घडले, सदूला नाही कळले.
विवेक म्हणे सदू बाबा
भ्रमित विज्ञापने पाहुनी, 
असेच लोक बुडती.

Saturday, April 6, 2013

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका



नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबईअनधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी  इत्यादी अश्रु  ढाळतात- त्यांना पाहून मला काय वाटते

मगर

प्रेतांच्या ढिगार्यावर
तो नोटा मोजत होता.
कधी-कधी मगर हा
अश्रु ही ढाळीत होता.


मुंबईचे मृगजळ

मुंबईच्या मृगजळात त्याला
स्वप्नांची जागा भेटली.
त्यास का माहिती
ती त्याची कब्र होती.

Sunday, March 31, 2013

कोरडाच राहलो सदा.



पुनवेच्या चांदण्यात
भिजलो नाही कधी
अवसेच्या अंधाराला
कवटाळले सदा.

डोळ्यातलं तिचे प्रेम
दिसलं नाही कधी.
भोवर्‍यातच वासनेच्या
भटकत राहलो सदा.

प्रेमाचा अर्थ मला
कळला नाही कधी.
समुद्रात प्रेमाच्या
कोरडाच राहलो सदा. 

Monday, March 18, 2013

होळीचे वास्तव / काही विचारिका

काही वर्षांपूर्वी , ऑफिसातून परतताना , बस वर एक गुब्बार लागला, काच फुटली आणि, काचेचा एक तुकडा खिडकी जवळ बसलेल्या प्रवासाच्या कपाळावर लागला. रक्त वाहू लागले. आजकालच्या होळीचे वास्तव दाखविणाऱ्या काही क्षणिका:

(१)


मिसाईल गुब्बाऱ्याची
खिडकीवर आदळली.

सडे लाल रक्ताचे
जमिनीवर सांडले.

(२)

पूतना मावशी
होळीत जळाली.

(कुणास ठाऊक )

निर्दोष झाडांची
कत्तल मात्र झाली.


(३)

नशेत भांगेच्या
तो गटरात पडला.
संगे डुक्कारांच्या
तो होळी खेळला.


(४)

उधळले आकाशी
गुलाल सतरंगी.


रासायनिक एलर्जी
सर्वत्र पसरली.

Sunday, March 17, 2013

बटाटा चिप्स

मार्च महिन्यात आमची गृहलक्ष्मी ५-७ किलोचे बटाटा चिप्स करतेच. हे चिप्स बहुतेक वर्षभर पुरतात. ( अधिकांश चिप्स उपासाच्या दिवशी पोटात जातात). दिल्ली मुंबईत फ्लेट राहण्याऱ्या लोकांजवळ चिप्स वाळत टाकण्या साठी गच्ची नसते व मोठे भांडे हि नसतात. पण बाल्कनीत किलो -अर्धा किलो बटाट्याचे चिप्स ते टाकू शकतात.

बटाटा चिप्स करताना येणाऱ्या काही समस्या, एक- पुष्कळदा बटाटा चिप्स हे काळे पडतात. बटाटा चिप्स ज्या कपड्यावर किंवा प्लास्टिक शीट वाळत टाकल्या जातात,त्या वर ते चिपकतात व काढतात तुटतात या वर आमच्या गृहलक्ष्मी जी युक्ती वापरते ती रेसिपी सहित खाली देतो आहे:

सामग्री- बटाटे एक किलो, मीठ १/२ चमचे, फिटकरी लहान तुकडा (फिटकरी टाकल्याने बटाटे काळे नाही पडत), दोन २ किलो चे भांडे व बटाटे वाळत घालण्या साठी मुलायम कापड किंवा साडी व एक चाळणी.

कृती: बटाटे सोलून आवडी प्रमाणे चिप्स कापून पाणी असलेल्या भांड्यात टाका ( बटाट्यांना जंग लागणार नाही).

एका भांड्यात दीड एक लीटर गॅसवर तापायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात फिटकरी आणि १/२ चमचे मीठ घाला, नंतर त्यात बटाटे चिप्स टाका. तीन-चार मिनिटांत चिप्स उकळतात.

दुसर्या भांड्यात आता २ लीटर थंड पाणी तैयार ठेवा.

चाळणीच्या सहाय्याने उकळलेले चिप्स भांड्यातून काढून थंड पाण्यात घाला. (थंड झालेले चिप्स, कपड्यांवर किंवा प्लास्टिक शीटवर चिपकण्याची शक्यता कमी होते).


Friday, February 15, 2013

पैज – प्रेम दिन स्पेशल

आज १४ फेब्रुवारी- प्रेम दिवस- कॉलेजातील पोरांचा एक घोळका आशाळभूत नजरेने येणाऱ्या पोरीं कडे पाहत होता. पण कुठलीही पोरगी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती. तेवढ्यात ती कॉलेज सुंदरी त्यांना दिसली. तिला पाहून त्यांचे चेहरे उजळले. त्यातला एक म्हणाला म्हणाला आपण सर्व तिच्या  वर  फिदा आहोतआज प्रेम दिवस आहे. हिम्मत असेल तर आपल्या पैकी कुणी  तिला I love you म्हणून दाखवावे. त्या मुलीने त्याला आपल्या हातानी नुसता स्पर्श ही केला तर  १००० रुपयांची पैज तो जिंकेल. काही वेळ शांतता राहिली. सहजा-सहजी बळीचा बकरा कोण बनणारस्वत:ची शोभा कोण करायला तैयार होणार? काही विचार करून त्याने पैज स्वीकारली.एक गुलाब घेऊन तो तिच्या समोर आलातिला काही कळण्या आधीच तिच्या हातात गुलाब देत जोरात I love you असे म्हणले. ती क्षणभर गोंधळलीमग एक जोरदार त्याच्या मुस्कटात हाणली. सर्व पोरं त्याचाकडे बघून फिदीफिदी हसू लागली. खाली मान घालून तो त्यांच्या जवळ आला. त्यांना हसताना बघून तो ही जोरात हसू लागला म्हणाला  मित्रानो- मुस्कटात का होईना तिच्या मखमली हातांचा स्पर्श मला गालावर अद्याप ही जाणवतो आहे. मी पैज जिंकली आहे.

(काही वर्ष आधी माझ्या एका फेकू मित्राने त्याच्या बरोबर घडलेली हि घटना सांगितली होती). 

Tuesday, December 11, 2012

दोन क्षणिका - श्रोता आणि कवी, चोर आणि कवी


 श्रोता आणि कवी

त्याने माझ्या कविता आनंदाने ऐकली
वेळोवेळी दाद दिली अगदी मनाजोगती.
मला वाटले आहे तो ‘रसिक’ मोठा
नंतर कळले, तो होता ठार ‘बहिरा’.

खरं कळल्या वर, कवीचे काय झाले असेल.

चोर आणि कवी

मागे होता पोलीस
पुढे होता कवी.
चोराने स्वीकारली
आनंदाने कोठडी.

काय करणार बेचारा, कविता ऐकण्या पेक्षा जेल केंव्हाही बरी.

Thursday, November 22, 2012

रावण


काल संध्याकाळी जनकपुरीतल्या रामलीलेत ‘रावण दहनाची’ लीला बघितली. दर दसऱ्याला रावण वध होतो, पुतळे फुंकले जातात, तरीही रावण आज ही जिवंत आहे, का? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधत घरी परतलो.

दरवर्षी होतो रावण वध

तरीही रावण मरत नाही.
रावण अजर आहे
रावण अमर आहे.

रावण वसतो, आपल्याच हृदयात
काम-क्रोध मोह-माया, मद-मत्सर
इत्यादी आयुधांनी सज्ज रावण,
सदैव जागवतो असतो मनात,
दडलेल्या सुप्त राक्षसी महत्वाकांक्षा.

कोण लढणार, कसे लढणार
मनात दडलेल्या रावणाशी.
युद्धापूर्वीच जिंकतो रावण
ठरलेला असतो
रामाच्या नशीबी वनवास.

रावण अजर आहे
रावण अमर आहे.

Sunday, November 11, 2012

अवसेची रात्र आणि एक पणती


सर्वत्र पसरलेला गर्द काळोख, भूक, आत्महत्या, भ्रष्टाचार , महंगाई , इत्यादी आसुरी शक्ती प्रबळ झालेल्या आहे, तरी ही एक पणती.

अवसेच्या राती
निराश मनी
पेटविते ठिणगी आशेची
एक पणती

अवसेच्या राती
पांढर्या बुरख्या खाली
लपलेले काळे चेहरे
दाखविते जनतेला.
एक पणती.
अवसेच्या राती
सत्य आणि न्यायाची
प्रेमाची आणि सोख्याची
पेटवू आपल्या हृदयी
एक पणती.

Saturday, November 10, 2012

न्याय देवता


न्यायाच्या आशेने लोक कोर्टात जातात, सामान्य माणसांना बहुधा तिथे न्याय मिळत नाही कारण न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्याय होणार तरी कसा, सत्य दिसणार तरी कसे ???


*अस्मत द्रोपदीची
लुटल्या गेली दरबारी
तरी तिला दिसले नाही
तिच्या डोळयांवर  होती पट्टी
गांधारी सारखी.

*अब्रू

म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. एकदा कोर्टाच्या पायरी वर पाय ठेवला कि ... त्या केंव्हा संपतील कुणीच सांगू शकत नाही. 



 तो कोर्टाची पायरी चढला 
आणि चढतच गेला, 
चढतच गेला ....
अखेर!
दरबारी चित्रगुप्ताच्या 
त्याचा निकाल लागला 

Friday, October 19, 2012

गीत मिलनाचे , धरती समुद्राचे



ग्रीष्माच्या उन्हात,
धरती होरपळी.
विरहाच्या अग्नीत
समुद्र पेटला.

विरही उसांसे,
आकाशी भिडलें.
एकत्र होऊनी,
मेघरूप झाले.

श्रावणी धारांत,
धरती भिजली.
प्रणय गीत ते,
नभी गुंजले.

हिरव्या शालूत,
धरती लाजली.
कुणास पाहून ती
गालात हसली.

गुपित गोड त्यांचे,
कुणा ना कळले.
कवी मनाने,
हृदयी जाणले. 


Tuesday, October 9, 2012

कोळसा


(१)

गरीबांचे घर

पेटवितो कोळसा.

दलालांचे घर
'उजळीतो' कोळसा.

(२)

कोळसा काळा

लक्ष्मी काळी.

अवसेच्या राती
दिवाळी दिवाळी.

Thursday, October 4, 2012

लेखणी


लेखणी हातात  घेण सोप आहे, पण कुठल्या मार्गाचा अवलंबन करायचे हा मोठा प्रश्न आहे. कुठल्या रस्त्यावर जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
   
(१) 

सत्याच्या आगीत, होरपळली लेखणी.
आली नशीबी, वणवण हरिश्चंद्राची.

(२) 

अंधाऱ्या राती, गायली लेखणी
सोन्याच्या दारी, नाचली लेखणी.
  
(३)

कान केले बंद, झाकले डोळे हातानी.  

तोंडाला कुलूप लाऊनि, झाली मुकी लेखणी. 

Monday, September 24, 2012

आपण गणपतीला दुर्वा का वाहतो?


आपण गणपतीला दुर्वा का वाहतो? हा विचार मनात आला. माहित असेलेल एक उत्तरगणपतीला प्रिय म्हणून दुर्वा गणपतीला वाहिली जाते. पण माणूस स्वार्थी आहे स्वार्थ असल्या शिवाय तो कुणालाही काही ही वाहणार नाही. इंटरनेट वर बसून दुर्वाचे महत्व शोधू लागलो. सहजच यजुर्वेदातील दुर्वेचे महत्व सांगणार एक श्लोक वाचण्यात आला.

काण्डात्काण्डा प्ररोहन्ती परूष: परूषस्परि.
एव नो दुर्वे तनु सहस्रेण शतेन .
(यजुर्वेद १३.२०)
[ऋषी: अग्रणी, देवता-पत्नी,छंद: अनुष्टुप]

हे दुर्वा एका काण्डा-काण्डा शत, सहस्त्र आणि असंख्य बाहुने चहु बाजूना पसर अर्थात विस्तार कर आणि आम्हा प्रजाजनांना समृद्ध कर. दुर्वा प्रजाजनांना समृद्ध करते. कश्यारीतीने करते याचा विचार केला. दुर्वेचे अनेक उपयोग आहेत:

औषधीय उपयोग

दुर्व धातूचा अर्थच नष्ट करणे आहे. दुर्वा त्रिदोष नाशक आहे. वात कफ पित्त आणि कफ दोषांना संतुलित करते म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वेचा वापर होतो. आजचे प्राकृतिक चिकित्सक ही दुर्वेचा वापर औषधी म्हणून करतात. वैदिक ऋषींना दुर्वेचे औषधीय गुण माहिती होते.

दुर्वेचे पर्यावरणातील महत्व:
 
दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवते, पर्वतांना आणि नद्यांच्या किनार्याना ढासळू देत नाही. पाण्याला स्वछ आणि निर्मळ करते. हिरवी गार कुरणे डोळ्यांना शीतलता प्रदान करतातच शिवाय सूर्यप्रकाशात प्राणवायू ही उत्सर्जित करतात. अर्थातच पर्यावरण दृष्टीने दुर्वेचे महत्व आहे.

आर्थिक कारण:

गणपती अर्थात गणाचा अध्यक्ष अर्थात राजा. वैदिक काळात गायी, घोडे, शेळ्या हे मानवाच्या उपयोगी येणारे पशु. बैल-शेतीला, गाय-दुध, दही आणि तुपाला, घोडे प्रवासाला, युद्धाला इत्यादी.  शेळी, मेंढ्या इत्यादी जनावरांचे पालन मांस आणि वस्त्रांसाठी (त्या काळी अधिकांश लोक पशुंचे चर्मचा वापर वस्त्र म्हणून करायचे). या सर्वांसाठी लागणार हिरवीगार दुर्वा. अर्थात राज्यात दुर्वेनी भरपूर कुरण असतील तर पशु पुष्ट होतील आणी प्रजाजन समृद्ध होतील. शिवाय वाळलेल्या दुर्वेचे अन्य उपयोग- बसण्यासाठी आसन, इत्यादी.

मानवाची अमर होण्याची इच्छा:

मृत्युची भीती सर्वांनाच वाटते. अमर होण्याची इच्छा मनुष्य प्राणीत सुरवाती पासूनच आहे. आपल्या पुत्र आणि पौत्रांच्या माध्यमातून तो अमर राहण्याच्या प्रयत्न करतो. उन्हाळ्यात वाळलेले माळ- रान पाऊस पडताच क्षणात हिरवगार होते. शेंकडो वर्ष सुप्तावस्थेत राहूनही दुर्वांकुर पाऊस पडताच जमिनीतून बाहेर निघतात. जीवनाचा आनंद चाहुबाजूना पसरवतात. माणसाच्या मनात ही आपल्या संततीच्या माध्यमातून अमर राहण्याची इच्छा आहे. दुर्वा गणपतीला अर्पित करून आपण दुर्वेप्रमाणेच अमरतेच वरदान मागतो.

प्रश्न येतो दुर्वा गणपतीलाच का वाहतो?

राज्यात दुर्वेची भरपूर कुरण राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळच संपूर्ण जीवन चक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. आता ही आहेच. भाद्रपदात राना-वनात सर्वत्र हिरवीगार दुर्वा आपल्याला दिसून येते. पण पुढच्या पावसाळ्या पर्यंत ही दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे. गणाध्यक्ष अर्थात गण प्रमुखाने शत्रुं पासून या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जसे आपण सव्वा रुपया देवावर वाहून लाखांची कामना करतोच. तसेच प्रजाजनां आरोग्य पौष्टिक अन्न प्रदान करणारी दुर्वा सुरक्षित राहावी म्हणून उत्पन्नाचा सहावा हिस्सा गोपालक आणि शेतकरी गणाध्यक्ष अर्थात राजाला अर्पित करायचे. त्याच परंपरेचे जतन आज आपण गणपतीला दुर्वा वाहून करतो.

दुर्वेचे रक्षण करणे का आवश्यक आहे?

आज ही आपल्या देशात अधिकांश शेतकरी शेती साठी बैलांचा वापर करतात. शंभर कोटींच्या वर असलेल्या देशाला दुध, दही आणि तूप गायी म्हशीं पासूनच मिळते. शेळ्या- मेंढ्या मांस साठी पाळल्या जातात. हे सर्व पशु गवत अर्थातदुर्वाखाऊनच पुष्ट होतात. सरकार ही शेळ्या-मेंढ्यांच्या पालानाला प्रोत्साहन देत आहे. कुरणांच्या अनियंत्रित वापरा मुळे आज ही कुरणे नष्ट होतात आहे. आणि आज सर्वत्र उजाड रान-माळ दिसतात. याच सरकारी धोरणामुळे गावातील सार्वजनिककुरणेनष्ट होण्याच्या मार्गावर आहेतच. शहरात ही बघतो दरवर्षी नगर निगम पावसाळ्यात बागांमध्ये गवत लावते आणि पोर दिवाळीच्या सुट्ट्यात क्रिकेट खेळून ते नष्ट करतात. परिणाम, पर्वत पावसाळ्यात ढासळतात,  नद्या किनार्याना तोडतात, सुपीक जमीन पावसाळ्यात वाहून जाते, पृथ्वीवर उष्णता वाढण्याच्या मागचेहिरवी दुर्वा युक्त कुरणाचा ह्रास हे ही मुख्य कारण आहे.

आज गणपती सारखा राजा नाही आहे. देशात लोकशाही आहे. त्या मुळे दुर्वा युक्त कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी ही आपलीच आहे. या वर्षी गणपतीवर दुर्वा वाहताना या कुरणांची रक्षा करण्याची जवाबदारी आपलीच आहे हे आपण ओळखलत तर हीच खरी गणपतीची पूजा होईल.