मानवीय जीवनाचे उद्दीष्ट धर्म मार्गावर चालत अर्थार्जन करणे, त्या धनाचा उपयोग स्वतच्या परिवारसाठी आणि समाज कल्याणसाठी करणे, हळू-हळू भौतिक सुखांचा त्याग करत अध्यात्माची वाटचाल करून मोक्षाची प्राप्ती करणे. धर्म मार्गावर चालण्यासाठी स्वस्थ शरीर आणि मन पाहिजे. पुरुषार्थ करण्याची क्षमता पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी नानाविध धार्मिक ग्रंथांचे श्रवण आणि मनन करावे लागते, उत्तम गुरूंकडून समजून घ्यावे लागते आणि आचरणात उतरवावे लागते. या साठी पुरुषार्थ हा करावाच लागतो.तेंव्हाच आध्यात्मिक क्षेत्रात साधकाची प्रगति होते. आध्यात्मिक मार्गावर चालण्यार्या साधकाला आत्मसंतोष रूपी स्वर्ग सुखाची प्राप्ती तर याच जीवनात होते.
पण माणूस स्वभावाने आळशी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात पुरुषार्थ करू शकत नाही. मग तो भौतिक आणि आध्यात्मिक जगात प्रसिद्धीसाठी सौपा आणि तामसिक मार्ग निवडतो. त्याला वाटते शरीराला कष्ट देणार्या तामसिक मार्गाचा अवलंबन करून या लोकात सहज स्वर्ग सुख भोगता येते आणि मोक्षाची प्राप्ती ही होते.
समर्थांनी दासबोधातील दुसर्या दशकातील सहाव्या समासात भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी शरीराला त्रास देण्याच्या प्रकारांचे वर्णन केले आहे. उदा. गळ टोचून घेणे, निखर्यावरून चालणे, जिभेला टोचून घेणे, देवतेले जीभ अर्पित करणे, डोक्यावर पेटलेल्या सरक्या ठेऊन चालणे, एक हात सदैव उंच ठेऊन वाळवून घेणे, स्वत:ला गळ्या पर्यन्त जमिनीत पुरून घेणे इत्यादि इत्यादि. काही तामसिक भक्त आपले शिर देवतेला अर्पित करून देतात तर काही देवाच्या दारी निराहार राहून प्राण त्याग करतात. अश्या तामसिक भक्तांना आत्महत्येचे पाप भोगावे लागते. नुकताच कुंभ मेला पूर्ण झाला. समर्थांनी वर्णन केलेले सर्व तामसिक प्रकार या मेळाव्यात दिसले.
अनेक महीने एक हात सतत उंच ठेवला तो वाळून जाईल. शरीराला कष्ट होईल. ईश्वराची प्राप्ती होणार नाही. देवतेला जीभ कापून अर्पित केल्याने साधक आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. याच प्रमाणे नाना प्रकारे शरीराला कष्ट दिल्याने साधकाला शारीरिक कष्ट होईल. जीवंतपणी नरक यातना सोसाव्या लागतील. ईश्वर प्राप्ती निश्चित होणार नाही. मोक्ष प्राप्तीचा प्रश्नच येत नाही. त्याला उदर निर्वाहासाठी काही काळ दान-दक्षिणा अवश्य मिळेल. अश्या अनेक तामसिक मार्गावर चालणार्या साधकांना काही काळानंतर पश्चाताप होतो. पण अधिकान्शांच्या बाबतीत वेळ निघून गेलेली असते. जीर्ण शरीर आणि मनाने पुरुषार्थ करणे ही शक्य होत नाही. उरलेल्या आयुष्यात फक्त नरक यातना त्यांच्या नशिबी येतात.
No comments:
Post a Comment