श्रवणी लोभ उपजेल तेथे
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते
तया अधोगती.
समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः. न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः.
आज समाजात प्रचलित धार्मिक कथेंचे दोन भाग असतात. एक वास्तविक कथा आणि दुसरी स्वार्थासाठी त्यात केलेली भेसळ. यासाठी कथा अधिकारी व्यक्तीकडून श्रवण करण्याची गरज असते. नंतर कथा समजल्यावर कथेत सांगितलेल्या मार्गावर चालणे. पण हा मार्ग कठीण असतो. दुसरा सौपा मार्ग म्हणजे स्वार्थासाठी पोथीत केलेल्या भेसळ अनुसार कृती करणे अर्थात पोथीत सांगितले आहे, उपवास, दान दक्षिणा इत्यादी केल्याने सांसारिक फळे मिळतात. हा मंत्र जपा, परीक्षेत उत्तम गुण मिळतील. अभ्यास सोडून मंत्र जप केला तर परिणाम काय होईल हे सांगण्याची गरज नाही. मग आपण कथेला दोष देतो. आता साहजिक आहे, इच्छित फळे मिळाली नाही तर मनातील दुराशाही वाढणार आणि प्रपंचात असफलता ही मिळणार.
धार्मिक कथा आपल्याला काय सांगत आहे हेच कळत नाही आणि त्यामुळे चुकीचा अर्थ लावून आपण फक्त विधी विधानात रमून जातो आणि इच्छित फळे नाही मिळाली तर मनात नैराश्य येते. आपण पोथीला दोष देतो. सत्यनारायणाच्या कथें पैकी एका कथेचे उदाहरण. साधूवाणी हा व्यक्ती दिलेला शब्द न पाळणारा आणि सदैव खोटे बोलणारा आहे. हिंदीत एक म्हण आहे 'काठ कि हांडी बार बार नही चढती'. साधुवाणीला खोटे बोलण्यचे फळ भोगावे लागतात. त्याला कैद हि भोगावी लागली आणि व्यापारात मोठे नुकसान झाले. आजकाल ही अनैतिक रीतीने धन अर्जित करणाऱ्यांचे लाखो कोटी सरकारने जब्त करते. काहींना कारावास ही भोगावा लागतो. कथेच्या अखेर साधुवाणीला सत्य धर्माच्या मार्गावर चालून व्यापार करण्याचे महत्व कळते. वैश्याला (व्यापारीला) हि सत्य मार्गावर चालायला पाहिजे हा बोध या कथेतून मिळतो. सत्यनारायण कथा श्रवण करून सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून सांसारिक कर्तव्य पूर्ण केले तर घरात सुख-समृद्धी आपसूक येते आणि आध्यात्माच्या मार्गावर वाटचाल ही सहज सुरू होते. यासाठीच नवीन संसार सुरू करताना सत्यनारायण कथा श्रवण करण्याची प्रथा आपल्या समाजात आहे.
शेवटी ज्या पोथ्या फक्त देवी चमत्काराने भरलेल्या आहेत, श्रवण करणाऱ्याला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालून पुरुषार्थ करण्याची प्रेरणा देत नाही. त्या श्रवण करणे आणि त्यानुसार वागल्याने फक्त दुराशाच नशिबी येणार.
No comments:
Post a Comment