Thursday, June 23, 2022

मीर जाफरची आठवण आली

 

आजची तारीख 23 जून. सकाळी ब्रेकिंग समाचार पाहताना मीर जाफरची आठवण आली. 1757 साली आजच्या दिवशी प्लासीचे युद्ध झाले होते. राबर्ट क्लाईव जवळ अत्यंत कमी सैन्य होते. नवाब सिराजुदौलाच्या सेनापति मीर जाफर जवळ अठरा हजारचे. राबर्ट क्लाईवला विजयाचा पूर्ण विश्वास होता. त्याने नवाबच्या सेनापति मीर जाफरला बंगालचा नवाब बनविण्याचे आश्वासन दिले होते. आता मीर जाफरचे सल्लागार योग्य असते तर त्यांनी सल्ला दिला असता, युद्ध जिंकल्यावर नवाबकडून मोठी जागीर तू सहज पदरात पाडू शकतो. पुढे मागे आपल्या कर्तृत्वाने नवाब ही बनू शकतो. पण दुर्भाग्य एक ही योग्य सल्लागार त्याच्या जवळ नव्हता. क्लाईव युद्ध जिंकला. नवाब सिराजुदौलाचा सर्व खजाना ईस्ट इंडिया कंपनीने गिळंकृत केला. अडीच लाख पेक्षा जास्त रुपईया राबर्ट क्लाईवच्याही खिश्यातही गेला. सत्ता मिळाल्यावर नवाब मीर जाफर स्वत:चे आणि बंगालच्या जनतेचे कल्याण करण्याच्या विचारही करू शकला नाही. ईस्ट इंडिया कंपनीची सतत वाढती भूक पूर्ण करण्यासाठी त्याला बंगालच्या जनतेलाच पिळावे लागले. राज्यात अराजकता पसरली. तीन वर्षांत त्याची हकाल पट्टी झाली. शेवटी बंगालच्या सत्तेवर ब्रिटीशांचा पूर्ण अधिकार झाला. 

हरियाणा विधान सभेचा निकाल लागला. माननीय दुष्यंत चौटालाच्या पार्टीला 10 जागा मिळाल्या. त्यालाही मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखविल्या गेले होते. पण दुष्यंतने उपमुख्यमंत्री बनण्यात धन्यता मानली. राजनीतीत दुसर्‍यांचे उपकार घेण्यापेक्षा दुसर्‍यांवर उपकार करणे नेहमीच फायद्याचे असते. सत्तेची मलई चाखत तो हरियाणात त्याच्या पक्षाला अधिक सदृढ  करू शकतो. शिवाय त्याच्या सोयीने योग्य वेळी सत्तेतून बाहेर ही पडायचा मार्ग मोकळा. आज त्याच्या निर्णय योग्य होता, याची खात्री त्याला निश्चित झाली असेल. 

दुर्भाग्य माननीय उद्धव ठाकरे जवळ योग्य सल्लागार नव्हते. जे होते ते बहुधा मा. उद्धव एवजी मा. शरदजींने हित साधणारे होते. आपले अधिकान्श मतदार हे कॉंग्रेस विरोधी हिंदुत्ववादी विचारधारेचे आहे, ह्याचाही मा. उद्धवजींना विसर पडला. मुख्यमंत्री पदाच्या बदल्यात मोठी किंमत मा. उद्धवजींना द्यावी लागली. सत्तेची सर्व मलाई आजच्या राबर्ट क्लाईवच्या खिश्यात गेली. शिवसेनेच्या आमदारांवर ताकावर गुजराण करण्याची वेळ आली. याशिवाय पालघर ते चितळे पर्यन्त होणारे घटनाक्रम, तरुंगात असलेल्या मंत्र्यांविरुद्ध ही कारवाई करण्याची हिम्मत नसलेला मुख्यमंत्री इत्यादि, राज्यात भाजपला मजबूती प्रदान करत होते.  आज सकाळी यू ट्यूब वर बीएमसीचे महिन्यापूर्वीचे ओपिनियन पोल पाहीले. शिवसेनेला फारच कमी जागा मिळत आहे असे चित्र आहे. साहजिकच आहे, याची जाण अधिकान्श शिवसेनेच्या आमदारांना ही असेलच, की असेच चालत राहिले तर, पुढची  निवडणू  जिंकणे अशक्य आहे. स्वत:चे राजनीतिक अस्तित्व  सुरक्षित करणे हा प्रत्येक राजनेत्याचा धर्मच असतो. बंडखोर शिवसैनिक ही तेच करत आहे. 

बाकी इतिहासात मीर जाफर सोबत मा. उद्धवजींचे नाव ही  घेतले जाणार, हेच दुर्भाग्य त्यांच्या नशिबात येणार. 



Friday, June 17, 2022

करोंना : माझी गल्ली , गाव, आयएमए , पतंजलि इत्यादि


दिल्लीतील अधिकान्श जनता अनिधिकृत भागात राहते. अर्थात त्याचे श्रेय ही पंडित नेहरूंच्या डीडीए अक्ट 1957ला आहे. त्या कायद्यात घरे बांधण्याचा अधिकार फक्त डीडीए मिळाला. डीडीए मागणीनुसार घरे बांधू शकली नाही. नेता आणि प्रॉपर्टी डिलर्सने हात मिळविणी करून अनिधिकृत कालोनीज बांधल्या. लोकांना घरात शिरण्यासाठी रस्ता म्हणून 10, 20 आणि 40 फुटांच्या गल्ल्या आणि रस्ते मजबूरीने निर्मित करावे लागले. त्यामुळे सार्वजनिक सुविधा- शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, पार्क इत्यादि या भागांत फारच कमी. घरे ही जमिनीवर १५X६० ft.  आणि वरचे माले दोन-दोन फूट पुढे मागे जास्त. ७० टक्के दिल्लीकर अश्याच भागांत राहतात. माझ्या घरा समोरची गल्ली 20 फूटाची आणि मागची दहा फुटाची आहे. गल्लीत काही घरांत खाली घरमालक आणि वर एक-एक खोल्यांमध्ये भाडेकरू राहतात. कमीतकमी पाच ते सात भाडेकरू एका घरात असतातच. सर्व घरमालकांच्या घरात एसी आणि कारही आहे. आमच्या गल्लीत निवृत सरकारी कर्मचारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेते, किरकोळ समान विकणारे दुकानदार, टॅक्सी -रिक्शा चालक, भाजी विक्रेता, फळ विक्रेता, चहाची टपरी लावणारे, भांडी-धुणी करणार्‍या बाया, फॅक्टरी मजदूर  इत्यादि राहतात.    

आमची कालोनी ही सहा-सात गल्यांची आहे. करोंना काळात आमच्या भागात एक ही मृत्यू झाली नाही. विशेष म्हणजे आमच्या गल्लीत एका ही भाडेकरूच्या परिवारात करोंना हा शिरलाच नाही. बहुतेक त्यांना झाला असेल तरी माहीत पडला नसेल. दुसरीकडे एसीत राहणार्‍या अधिकान्श  घरी कुणा न कुणाला तरी करोंना हा झालाच. त्यातही दुसर्‍या लाटेत अर्थात एप्रिल महिन्यात ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये अडमिशन मिळणे कठीण होते. घरात आम्ही तिघे- मी, सौ. आणि मुलगा. मी रोज एक गोळी श्वासारी आणि कोरोंनील घेऊन कार्यालयात जात होतो. पार्लियामेंट सेशन सुरू झाल्यावर आरटीपीसीआर महिन्यातून एकदा होत असे. नेहमीच रिपोर्ट नेगेटिव्ह याची. पण लस घेतल्यानंतर मला, सौ. आणि मुलाला करोंना झाला. सौ आणि मुलाला सौम्य लक्षणे होती. मला आधीच भयंकर केजरीवाल खोकला आणि त्यात नाकही सतत वाहणारे. रोज रात्री झोपण्यापूर्वी Montek LC घ्यावी लगायची. याशिवाय पेंक्रियाचा क्षयरोग आणि हृदयाची सर्जरी ही झालेली होती. हृदय रोगांची औषधी ही रोज घेत होतो. फॅमिली डॉक्टर ने खोकल्यासाठी औषधी दिली आणि आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा सल्ला दिला. टेस्ट पाजिटीव आल्यावर, सीटी स्कॅन केले. 50 टक्केहून जास्त संक्रमण होते. आता ते आधी पासून होते की करोंना नंतर झाले हे सांगणे कठीण. माझी लेक, तिचा सासरा आणि जाऊ तिन्ही दिल्लीतल्या मोठ्या हॉस्पिटल्समध्ये काम करतात.  ते ही रोज सकाळी  गिलोय आणि  तुळशी  घेत होते. तसे चहात ही ते गिलोय टाकायचे. त्यांच्या हिमाचलच्या गावात भरपूर होते.  माझ्या लेकीने मला हॉस्पिटलमध्ये अडमिट होण्यास मना केले. बहुतेक तिथे प्रोटोकॉल औषधे घ्यावी लागली असती. फक्त डॉक्टरचा सल्ला घेऊन एक गोळी  steorid (40 रुपयांच्या दहा गोळ्या), विटामीन, कफ काढण्याचे आयुर्वेदिक औषध इत्यादि दिले. steorid गोळ्या एवढ्या स्वस्त असतात तरीही महागडे steorid  का दिले जात होते  हा ही एक मुद्दा आहे.  लेकीच्या हॉस्पिटलमध्येही रुग्णांना रोज काढा दिला जात होता, हे विशेष. दुसर्‍या लाटेत दिल्लीत अधिकान्श हॉस्पिटल्स काढा देऊ लागले होते. पतंजलि वैद्यचा सल्ला ही घेतला, रोज दोन वेळा, दोन-दोन गोळ्या श्वासरी आणि करोंनील घेणे सुरू केले. शिवाय दिवस-रात्र जेवढा वेळ मिळेल दीर्घ श्वास घेत राहिलो. नंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार तीन महीने कोरोंनील घेतले. सतत वाहणारे नाक, जुना खोकला ठीक झाला (40 वर्षांपासून नित्य नेमाने रोज रात्री घेणारे Montek LC औषध बंद झाले). बाकी आमच्या गल्लीतील एक ही करोंना रुग्ण हॉस्पिटलमध्ये अडमिट झाला नाही आणि मेलाही नाही. दिल्लीत अधिकान्श अधिकृत कालोंनीत मरणार्‍यांचे प्रमाण कमीच होते. गेल्या दोन वर्षांत आमच्या गल्लीत फक्त एक ८५ + म्हातारा दगावला. त्याला करोंना झालेला नव्हता. 

समोरच्या घरात सात ते आठ भाडेकरू राहतात. खालच्या फ्लोरवर प. उत्तरप्रदेशचे काही मुस्लिम भाईबंद. ते फळांच्या रेडया लावतात. दर दुसर्‍या दिवशी फळांचा टेम्पो तिथे येतो. सीझनच्या अनुसार टरबूज, खरबूज, आंबा, सफरचंद, डाळिंब, पेरु संतरा इत्यादि विकतात. करोंना काळात ही त्यांना कधी मास्क लावलेले पहिले नाही. कधी-कधी मी त्यांना टोकत ही होतो. नेहमी एकच उत्तर मिळायचे. आम्ही उन्हात फिरतो, आम्हाला करोंना होणार नाही. पण  जवळ  मास्क ठेवतो, मुख्य रस्त्यांवर जातो, तेंव्हा घालतो. एकदा मी विचारले तुमच्या गावांत करोंना आहे का. तो म्हणाला नाही, गावांतील लोक जास्त वहमी असतात. फक्त अफवा पसरली तरी ते त्या गावांत जाणार नाही. गावांत ही प्रत्येक व्यक्ति दुसर्‍याच्या घरात काय चालले आहे ह्यावर नजर ठेऊन असतोच. ह्याच मानसिकतेमुळे गावांत हा रोग कमी पसरला असावा. माझ्या लेकीचे सासरे ही हिमाचलचे. काही कामानिमित्त त्यांना गावी जावे लागले पण तिथे त्यांना एक आठवडा घरातच बंदिस्त राहावे लागले. बहुतेक आपल्या देशात खेड्या-गावातील अशिक्षित जनतेने प्रोटोकॉलचे पालन शहरी लोकांपेक्षा जास्त उत्तम रीतीने केले. त्या मागाचे कारण काही का असेना. आमच्या घरात भांडी, झाडू पोंछा लावणारी बाईच्या परिवारातही कुणालाही करोंना झाला नाही. तिच्या नातेवाईकांत सर्वच स्त्रिया घरात भांडी-धुणी करतात. भाजी विक्रेता, रिक्षाचालक, मेहनत मजदूरी करणार्‍यांपासून करोंना दूरच राहिला. घरगुती काढा मात्र सर्वच घ्यायचे.

दुसरीकडे माझा मोठा भाऊ नोयडात राहत होता. सामाजिक कार्यांत सदैव सहभाग असल्याने साहजिकच होते नोयडाचे सांसद आणि कैलाश हॉस्पिटलचे संचालक श्री महेश शर्मा ही त्याच्या चांगल्या ओळखीचे होते. दोन्ही मुले इंजीनियर आणि आयटी. एक मुलगा मुंबईत आणि दूसरा यूएसए मध्ये. अर्थातच त्याच्या काढा इत्यादीवर विश्वास नव्हताच. साहजिक होते हॉस्पिटलमध्ये अडमिट झाला. मुंबईवाला पुतण्या ही घरी पोहचला.  प्रोटोकॉलच्या उत्तम औषधी दिल्या गेल्या. श्री महेश शर्मा यांनी जातीने लक्ष ही दिले.पण तबियत बिघडत गेली. शुगर वाढली, लीवर, किडनी खराब झाल्या, व्हेंटिलेटर, डायलेसिस, शेवटी जीवन रक्षक इंजेक्शन इत्यादि. लाखोंचे बिल झाले. पण तो वाचला नाही. त्याचे शेवटचे दर्शन ही त्याचे घेता आले नाही. 

प्रोटोकॉलच्या अनेक औषधी निरर्थक होत्या म्हणून प्रोटोकॉल मधून बाहेरही झाल्या. उत्तम औषधींचे सत्य समजले. तेंव्हापासून एकच विचार मनात येतो. दादा करोंनामुळे गेला की चुकीच्या औषधींमुळे. नातेवाईकांमध्ये अनेक डॉक्टर आहेत एक ही सांगू शकला नाही की त्या औषधी का दिल्या गेल्या होत्या. सगळ्यांचे एकच उत्तर प्रोटोकॉलअधिकान्श सुशिक्षित डॉक्टरांनी अंधविश्वासी होऊन बिना आक्षेप घेता प्रोटोकॉल औषधी रुग्णांना दिली आणि स्वत: ही घेतली.  दिल्लीत तर एक नवीन म्हण तैयार झाली. "जो हॉस्पिटल गया वह गया, जो घर रहा वह बच गया". मेडिकल माफियाने अब्जावधी कमविण्यासाठी डॉक्टर आणि रुग्णांचे प्राण घेतले हे कटू सत्य आहे.

या सर्व काळात डॉक्टरांची आणि रूग्णांच्या हितैषी आयएमएची भूमिका अत्यंत संदेहस्पद होती. स्वास्थ्य मंत्रालयाने कोरोंनीलला नोव्हेंबर २०२० मध्ये 155 देशांत निर्यातीची अनुमति दिलेली होती. मीडियात बातमी नव्हती म्हणून आयएमए ही शांत होती. फेब्रुवरी २१ मध्ये कोरोंनीलवरचा रिसर्च पुस्तिका प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. आमचे मंत्री तिथे होते आणि मी ही तिथे होतो. पहिल्यांतच स्वामी रामदेव यांना पाहण्याचा योग आला.  तसे म्हणाल तर आयुर्वेदिक औषधीवर टिप्पणी करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार आयएमएला नव्हता. आयुर्वेदिक वैद्यांच्या हितैषी संस्थाने आक्षेप घेतला असता तर त्यात काही तथ्य आहे, हे समजले असते. आयएमएने  बहुतेक आयुर्वेदिक फार्मा कंपनीचे औषध होते म्हणून विरोध करून जनतेला भ्रमित करण्याचा असफल प्रयत्न केला. अधिकान्श टीव्ही डीबेट मध्ये आयएमएच्या प्रतींनिधींनी  प्रश्नांचे तार्किक उत्तर देण्याएवजी जोरजोरात ओरडत आणि हातवारे करत समस्त डाक्टरांची इंभ्रत धुळीस मिळविण्यास पुरोजर प्रयत्न केला. आयएमएच्या अश्या कृत्यांमुळे डॉक्टरांच्या विश्वासनीयतेला तडा जात आहे. हे ही ते विसरले. दुर्भाग्य इतकेच की अधिकान्श डॉक्टरांनी, काही अपवाद वगळता, आयएमएच्या कृत्यांचा विरोध केला नाही. 

बहुतेक आपल्याला माहीत आहे की नाही, करोंना काळात पतंजलिचे योगपीठमध्ये असलेले दोन्ही शिक्षण संस्थान (सीबीएससी) एक दिवस ही बंद झाले नाही. रोज एक तास, योग आणि व्यायाम, गिलोय आणि तुळशीचा काढा, हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि ब्रम्हचारी सुरक्षित राहिले. प्राकृतिक चिकित्सेचे केंद्र, योगग्रामला ऑक्टोबर २०२० मध्ये पुन्हा उघडण्याची अनुमति मिळाली. तिथली निवासी रोगी क्षमता फक्त ६०० होती. उन्हाळा सोडला तर तिथे फार कमी रुग्ण उपचार घेत होते. पण करोंना काळात असे काय घडले की, पतंजलिला ती क्षमता  वाढवून १२०० करावी लागली. त्यासाठी टेंट सिटी तैयार करावी लागली. १२०० लोकांना एकाच वेळी योग करवता येऊ शकेल, एवढा मोठा ३५००० sq. ft. डोम एका भारतीय कंपनीने दोन महिन्यात उभा करण्याचा विक्रम केला. एवढेच नव्हते तर योगपीठ इथेही २००० रुग्णांसाठी आयपीडीची नवीन व्यवस्था उभारवी लागलील. मोठ्या संख्येत वैद्य, फिजिओ, प्राकृतिक चिकित्सकांना प्रशिक्षण द्यावे लागले. भारी भीड असूनही इथे कुणाला करोंना होत नाही.  आज ही ३००० हून जास्त निवासी रुग्ण तिथे रोज असतात उपचार घेणार्‍यात अनेक डॉक्टर ही असतात. ज्यांना शंका आहे, सकाळी आस्था आणि वैदिक चॅनल उघडून स्वत:च्या डोळ्यांनी बघून खात्री करू शकतात. याचे कारण करोंना काळात पतंजलिच्या हजारो योग शिक्षकांनी ऑन लाइन आणि ऑफ लाइन योग कक्षा घेऊन कोटीहून जास्त करोंना रुग्णांचे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या प्राणांची रक्षा केली. त्यांचे हजारो कोटी वाचविले. परिणाम पतंजलिवर लोकांचा विश्वास वाढला. भारतात एकाच जागी निवासी उपचार देणारी सर्वात मोठी संस्था बनली. अर्थात याचे श्रेय आयएमएला दिले जाऊ शकते. 

माझ्या सारख्या सामान्य माणसाला एक गोष्ट चांगली समजली. करोंना सारख्या रोगांपासून मुक्ति पाहिजे असेल तर समावेशी चिकित्सा प्रणालीची  गरज आहे. परिस्थितीनुसार  योग, आयुर्वेद, प्राकृतिक चिकित्सा, सर्जरी आणि एलोपैथी औषधी सर्वांचा उपयोग रुग्णांना ठीक करण्यासाठी केला पाहिजे. माझे म्हणाल तर आजच्या घटकेला मी एलोपैथीचे औषध घेणे बंद केले आहे. (डिस्पेंसरीतून फ्री मध्ये मिळतात). फक्त पोटाच्या समस्येसाठी सरकारी डिस्पेंसरीतले आयुर्वेदिक औषध घेत आहे. असो.

 


Tuesday, June 14, 2022

वार्तालाप (२२)श्रीदासबोध : दशक 12: आचार विचार आणि प्रयत्न

श्रीदासबोधात समर्थांनी पूर्वापार पासून निर्मित वेद उपनिषद आणि समस्त शास्त्रांचे ज्ञान सामान्य जनांना कळेल अश्या सौप्या भाषेत सांगितले आहे. या दशकात इच्छित उद्देश्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्ननांची पराकाष्ठा केली पाहिजे, हे संगितले आहे. श्रीदासबोधात समर्थांनी फक्त उपदेश दिलेला नाही. प्रयत्न कश्यारीतीने केले पाहिजे हे ही सांगतात. आपल्या आचरण आणि व्यवहाराचा प्रभाव दुसर्‍यांवर पडतो. त्यासाठी समर्थांनी माणसाचे आचार, विचार आणि व्यवहार कसे असावे, हे सांगितले  आहे. 

समर्थ म्हणतात माणसाने सकाळी लवकर उठले पाहिजे. स्नान इत्यादि करून व्यवसायासाठी घरातून बाहेर निघण्यापूर्वी स्वच्छ वस्त्र परिधान केले पाहिजे. मलिन वस्त्र घातलेल्या, केश आणि दाढी व्यवस्थित केली नसलेल्या  व्यक्तीचा समोरच्यावर सकारात्म्क प्रभाव पडत नाही. अक्षर सुंदर आणि स्पष्ट असले पाहिजे. तुमचे लिखाण वाचणार्‍याला त्रास झाला नाही पाहिजे. फक्त अनुमानाच्या आधारावर कुठलीही चर्चा केली नाही पाहिजे. प्रत्यक्ष आणि तर्क आधारित प्रमाणाच्या मदतीने नेमकी, मुद्देसूद आणि मृदु भाषेत आपली बाजू सदैव मांडली पाहिजे. फक्त अनुमानाच्या आधारावर कार्य केल्याने गोत्यात येण्याची शक्यता जास्त आणि दुसर्‍यांचा विश्वास गमाविण्याची शक्यताही जास्त. भूतकाळात झालेले अन्याय विसरून दुसर्‍यांना क्षमा करता आली पाहिजे. दंभ दर्प आणि अभिमान यांच्या त्याग करता आला पाहिजे.  सत्याची कास कधीही सोडली नाही पाहिजे. इत्यादि. 

पुढे समर्थ म्हणतात पवित्र आचार आणि विचार इच्छित साध्य करण्यास बहुमोल मदत करतात पण इच्छित साध्य करण्यासाठी प्रयत्नांची ही पराकाष्ठा करावी लागते. आजचे उदाहरण, स्वामी रामदेव ही म्हणतात 'अखंड, प्रचंड, पुरुषार्थ' केल्या शिवाय इच्छित उद्देश्य पूर्ण होत नाही. ते स्वत: सकाळी साडे तीन वाजता उठतात. दीड तास प्रात:विधी आणि व्यायाम, त्यात 5 किमी धावणे ही आले. त्यांची योग कक्षा सकाळी 5 वाजता  प्रारंभ होते. त्या विभिन्न वाहिनींवर साडे नऊ वाजे पर्यन्त चालतात. गेल्या वीस वर्षांपासून एक ही दिवस त्यात खंड पडलेला नाही. त्यानंतर विभिन्न संस्थांचे कार्यक्र्म, शेकडो रुग्णांना प्रत्यक्ष भेटणे, देशातील विभिन्न प्रदेशांना भेट देऊन रात्री तीन वाजता परतल्यावर ही सकाळी साडे तीन वाजता पुन्हा नवीन सुरुवात होतेच. समर्थांनी म्हंटलेच आहे 'बोलण्यासारिखें चालणे, स्वयें करून बोलणे, तयाची वचने प्रमाणे'. जगातील सर्वच प्रसिध्द व्यक्ति मग त्या वैज्ञानिक असो, राजनेता असो की व्यवसायिक सर्वच 18-18 तास कार्य करतात. बोलतात तसेच वागतात. आपले पंतप्रधान ही रोज 18 तास काम करतात.  सारांश उत्तम मार्गांचा अवलंबन करून आणि सतत निरंतर प्रयत्न केल्याशिवाय आयुष्यात इच्छित उद्देश्य पूर्ण होत नाही. 

Friday, June 3, 2022

पुनर्जन्म सरड्याचा हवा

आयुष्यभर सत्तेचे सुख उपभोगणारा एक भारतीय नेता त्याच्या मृत्यूनंतर चित्रगुप्ताच्या दरबारात पोहोचला. चित्रगुप्ताने त्या नेत्याला सांगितले की तुझ्या कर्मानुसार तुला पुढचा जन्म तुझ्या इच्छित पशु योनीत मिळेल. आता मला सांग, तुला काय व्हायचं आहे। सिंह, चित्ता की हत्ती. नेत्याने विनंती केली, प्रभु पुनर्जन्म मला सड्याचा हवा।चित्रगुप्त म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. पण मला एक विचारू का, सिंह, चित्ता आणि हत्ती यांसारखे मोठे शक्तिशाली प्राणी सोडून तुला सरड्याच्या योनीतच पुनर्जन्म का पाहिजे? नेता हसला आणि म्हणाला, सिंह, चित्ता आणि हत्तीसारखे मोठे प्राणी जंगलाचा राजा होण्यासाठी नेहमीच लढत असतात. सर्वकाही असूनही, ते कधीही शांतपणे झोपत नाही. पण जंगलाचा राजा कोणी असला तरी सरड्याला काहीच फरक पडत नाही. सरडा जंगलातही आयुष्यभर मौज करतो.

Thursday, June 2, 2022

वार्तालाप (२३)श्रीदासबोध: श्रवण भक्ति आणि आत्म साक्षात्कार

आध्यात्मिक क्षेत्रात माझ्या गुरु सौ. मंगला ताईंनी मला एक प्रश्न विचारला. भगवंताबद्दल उत्कट प्रेम/ अनुरक्ती असलेल्या आत्मज्ञानी प्रवचन करणारा आणि आत्म साक्षात्कारी ह्या दोघांमध्ये काय फरक आहे.  

पहिला प्रश्न मनात साहजिक येणारच. आत्म साक्षात्कार म्हणजे काय? आत्मा म्हणजे ब्रम्ह आणि वेद म्हणतात "तत त्वं असि" अर्थात तू तोच आहे. दुसर्‍या शब्दांत आपल्याच शरीरात असलेला आत्मा हाच ब्रम्ह आहे. आत्मा हा सत्य, शाश्वत,  निर्गुण, निराकार, निर्मळ आणि आनंद स्वरूप असतो. मायेच्या अधीन असल्यामुळे आपल्याला असे वाटते, आत्म साक्षात्कार आपल्याला होणे असंभव. आत्म साक्षात्कारसाठी काय करावे, असे अनेक प्रश्न ही मनात येतात. पण आपल्यापैकी अनेकांना आत्म साक्षात्कार कधी न कधी हा होतोच. फक्त आपल्याला कळत नाही. अधिक खोलीत न जाता एक छोटासा माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग  सांगतो. श्रीदासबोधात श्रवण भक्ति ही सांगितली आहे. या प्रसंगाचा संबंध श्रवण भक्तीशी आहे. 

एक प्रश्न पुन्हा मनात येतो. अधिकान्श कीर्तनकार, भजन गायक इत्यादि पैसे घेऊन कार्यक्र्म करतात. ते स्वत: मायेच्या अधीन असतात, मग आपल्याला आत्म साक्षात्कार कसा घडवून आणणार. प्रश्न रास्त आहे, पण मायेने निर्मित शरीराला जीवित राहण्यासाठी कर्म हे प्रत्येकालाच करावे लागते. त्याशिवाय संसाराच्या गरजा पूर्ण करणे शक्य नाही. त्यासाठी दक्षिणा/ पैसा हा घ्यावाच लागतो. पण जेंव्हा प्रवचनकार/ भजन गायक भक्तीत तल्लीन होऊन  परमेश्वराची स्तुति करतो, तो त्याच्यासोबत ऐकणाऱ्यांना ही काही क्षणासाठी का होईना आत्म साक्षात्कार घडवून आणतो. माझा असाच एक अनुभव. त्यावेळी मी २३-२४ वर्षाचा असेन.आपल्या दोन मित्रांसोबत प्रगति मैदानात ट्रेड फेअर पाहायला गेलो होतो. माझे दोन्ही मित्र माईकल जेक्सनचे चाहते. मलाही  संगीतातले काहीच कळत नव्हते. आम्ही  प्रगति मैदानात असलेल्या शाकुंतल थिएटर जवळ पोहचलो. तिथे आम्हाला कळले, पंडित भीमसेन जोशी यांचा गाण्यांचा कार्यक्रम सुरू आहे. पंडितजी हे मोठे नाव होते.आमच्या पैकी कुणालाही शास्त्रीय संगीतात रस नव्हता तरीही पंडितजी मोठे नाव आहे, जरा थोडी झलक बघून घेऊ. आम्ही आत आलो. थिएटर भरलेले होते. एका भिंतीला टेकून आम्ही उभे राहिलो. एक सरदारजी  त्यांच्या सोबत तबल्यावर संगत करत होते. पंडितजींनी गाणे सुरू केले  "जो सदा हरी की भजे वही परम पद पाएगा..." पंडितजी भजनात तल्लीन होते. त्यांचा धीर गंभीर आवाज थिएटर मध्ये गुंजायमान झाला होता. माझे डोळे आपसूक बंद झाले. भान हरपले. मनात सतत सुरू असणारे सर्व विचार नष्ट झाले.  मी पणा संपला होता.  

टाळ्यांच्या आवाजाने माझी तंद्रा भंगली. जी माझी अवस्था झाली होती, तीच माझ्या दोन्ही मित्रांची झाली होती. आम्ही काही भक्त नव्हतो. पूजा पाठ करणारे नव्हतो. तेंव्हा धार्मिक ग्रंथ इत्यादीही  वाचलेले नव्हते. तरीही भक्ती भावाने भजन गणाऱ्याने आम्हाला काही क्षणासाठी का होईना, आमचा मी पणा संपविला होता. आज ही जेंव्हा हे भजन ऐकतो अंगावर शहारे येतात. पण तसा अनुभव मात्र कधीच आला नाही. जेंव्हा परमेश्वराचे गुणगान ऐकताना आपले डोळे बंद होतात, मनातील सर्व विचार नष्ट होतात, आनंदाने डोळ्यांतून अश्रु वाहू लागतात. ते क्षण म्हणजे 'आत्म साक्षात्कार'. आत्म साक्षात्कार प्रत्येकाला होऊ शकतो पण आत्म साक्षात्कार घडवून आणण्याची क्षमता  काहींपाशीस असते.