Tuesday, October 12, 2021

राजकुमारी आणि दर्पण

 

एक राजकुमारी होती. आता राजकुमारी म्हंटले म्हणजे दिसायला ती सुंदर असणारच. हसताना तिची दंतपंक्ती दिसायची. तिचे  पांढरे शुभ्र  दात हिर्‍यासारखे  चमकदार आणि टणक  होते. (मोतीसारखे दात ही जुनी म्हण झाली. एकतर मोती हे अत्यंत नाजुक असतात आणि काही काळाने ते मलिन ही होतात). राजकुमारीला नटण्या-मुरडण्याची भारी हौस होती. तिचा वार्डरोब जगभरातील भारी ऊंची कपड्यांनी भरलेला होता. सलवार-कमीज, लहंगा, जीन, जर्सी, कोट-पेंट इत्यादी-इत्यादि. साड्यांचे तर विचारू नका, बनारसी ते मराठी मोळी नववारी पर्यन्त नाना रंगांच्या शेकडो होत्या. 

राजकुमारीच्या महालात एक मोठा दर्पण होता. हा बोलणारा दर्पण होता. राजकुमारी रोज सकाळी नवीन वस्त्र धरण करून, नटून-थटून दर्पणा समोर उभी राहायची आणि दर्पणला विचाराची, "सांग दर्पणा कशी मी दिसते"? दर्पण ही आनंदाने उत्तर द्यायचा, 'सुंदर, सुंदर, सुंदर'.  दर्पणाचे उत्तर ऐकून राजकुमारी प्रसन्न व्हायची. आपली सेल्फी काढून ती सोशल मीडियावर टाकायची. तिचे सोशल मीडियावरचे फोटू पाहून कित्येकांचे कलीजे रोज खल्लास होत असतील हे देवच जाणे. असो. 

एक दिवस सकाळी ती नववारी नेसून दर्पणा समोर उभी राहिली. तिच्या मनात विचार आला, रोज आपण आपली सेल्फी टाकतो. आज दर्पणात दिसणार्‍या आपल्याच प्रतिमेसोबत घेतलेली सेल्फी टाकू. तिने आपल्याच प्रतिमेसोबत सेल्फी घेतली आणि रोजच्या सारखे दर्पणला विचारले, 'सांग दर्पणा मी जास्त सुंदर दिसते की माझी प्रतिमा'. राजकुमारीचा प्रश्न ऐकून दर्पण बुचकळ्यात पडला. दर्पण काही राजनेता नव्हता, जे अश्या प्रश्नांचे डिप्लोमेटिक उत्तर देण्यात तरबेज असतात. दर्पणाला तर खरे बोलण्याची सवय होती. तो म्हणाला, 'राजकुमारी तुझी प्रतिमा तुझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसते'

अस होSSSय...

"आपलीच प्रतिमा झाली आपलीच वैरी..."

दुसर्‍या दिवशी सफाईवाल्याला कचर्‍याच्या ढिगात काही काचेचे तुकडे दिसले. 


No comments:

Post a Comment