Tuesday, May 19, 2020


रायसीना पर्वतावर स्थित सचिवालयाची ईमारत. एका हॉलमध्ये सहा अधिकाऱ्यांच्या स्टाफची बसण्याची व्यवस्था. एक उंचपुरा तडफदार व्यक्तित्वाचा धनी अत्यंत मृदुभाषी, माधुरी दीक्षित सारखे मोठे-मोठे डोळे गोल-गोल फिरवण्याची कला अवगत असलेला, अनेकांना  आपल्या विशाल ह्रुदयात समावून घेणारा. सहाजिकच होते माझ्या बिरादर पीए बंधूंनी त्याचे नाव किशन कन्हैया ठेवले होते. स्टाफ मध्ये  मी  पीए, एक स्टेनो, एक नुकताच सरकारी नोकरीत जॉईन झालेला सिंगल हड्डी क्लार्क आणि सरकारी नोकरीत मुरलेला डेव्हिड नावाचा शिपाई होतो. अधिकांश आईएएस अधिकाऱ्यांमध्ये नसलेला दुर्मिळ गुण म्हणजे सकाळी ९च्या आधी कार्यालयात उपस्थित होणे त्याचा अंगी होता. त्याकाळी कम्प्युटर आले असले तरी कटिंग आणि पेस्टिंगचा जमाना आला नव्हता. भरपूर डिक्टेशन आणि टंकनचे कार्य करावे लागायचे. साहेबांची एक सवय होती, मला आणि स्टेनोला ते गुरु, गुरुओं  म्हणून संबोधित करायचे आणि नेहमी कोड्यात बोलायचे. अधिकांश वेळी ते तारीफ करत आहे की समज देत आहे, हे कळायचे नाही. 

त्या दिवशी सकाळी येताच साहेबांनी टेलिफोनचा बजर दिला. "पटाईत, स्टेनो आणि शिपाई सोबत आत ये. आम्ही साहेबाच्या रूममध्ये आत शिरताच साहेब  म्हणाले " गुरुओं, माझा एक म्हातारा हॉस्पिटलमध्ये आहे. त्याला रक्ताची तहान लागली आहे. आज सकाळीच मी आणि माझ्या बायकोने त्याच्या चरणी रक्त अर्पित केले आहे. प्रसंगावधान असलेला डेव्हिड लगेच उतरला, सर, मुझे बीपी की प्रॉब्लेम हैं.  साहेब आमच्याकडे पहात करड्या आवाजात म्हणाले, तुम्हालाही काही समस्या असेल तर बोला. आम्ही "नाही" असे उत्तर दिले. मग ठीक आहे खाली कार उभी आहे, लगेच निघावे लागेल.  स्टेनो लगेच म्हणाला, सर मैने पहले कभी खून नहीं दिया. साहेब उतरले, ठीक आहे, तू हॉस्पिटल मधून सरळ घरी जाऊ शकतो. पटाईत, तुला परत यावे लागेल. आज भरपूर काम आहे. काही चारा नव्हता, रक्तदान केल्या शिवाय.

हॉस्पिटलमध्ये रक्तदान केल्यानंतर स्टेनो बाहेर पडला. बाहेर पडताच त्याने एक मोठा गिलास ज्यूस आणि सहा केळे  पोटात जिरवले. घरी गेल्यावर रक्तदान केल्याची माहिती त्याच्या माऊलीला दिली.  माऊलीचे प्रेम उतू गेले. काजू, बादाम घालून देसी तुपात केलेला शिरा त्याला खाऊ घातला. रात्री झोपण्यापूर्वी त्याने किलोभर दूध ही पोटात जिरवले. परिणाम पुढे दोन तीन दिवस तो सुट्टीवर राहिला.

मी कार्यालयात परतलो. बहुतेक पंधरा-वीस पाने त्या दिवशी टंकावे लागले. साहेब लवकर निघाले तरीही कार्य पूर्ण करता-करता रात्रीचे आठ वाजले. घरी निघायची तैयारी करत असताना,  सुनील म्हणजे ऑल इंडिया रेडिओ, कुणाशी तरी बोलत होता मला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजात. "आजकाल आपल्या सारख्यांना नौकरी करणे मुश्कील झाले आहे. बहुधा नौकरी सोडावी लागेल ...  अरे, इथे मोठे-मोठे तेलू आहेत. आपल्या जवळ तर पामोलिन ही नाही. ... अरे, अमूल मक्खन नाही रे.  त्यावर पाय घसरून पडलेल्या साहेबाला उचलणे शक्य नाही. तुझ्या बुध्दीच्या पलीकडचे आहे.. .. मीच सांगतो, वीआयपी येतात ना! त्यांच्या स्वागतार्थ  जमिनीवर लाल गालिचा अंथरला जातो. तू पटाईतला ओळखतो, अरे, तोच किशन कन्हैयाचा पीए. त्यानी साहेबाच्या चरणी स्वतःच्या रक्ताचा गालिचा अंथरला. .. काय म्हणाला, फेकतो आहे. विश्वास नसेल तर त्या हरामखोराला विचारून खात्री करून घे. उद्या जगाला कळले तर बाकी साहेबही त्यांच्या स्टाफला हलाल करून त्यांच्या शरीरातील रक्त काढून घेतील. .. काय म्हणतो, या नालायकांना  जांभळाच्या झाडांवर उलटे टांगले पाहिजे. अरे, तो पटाईत माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने पाहत आहे, ठेवतो फोन." माझ्याकडे पाहत सुनील म्हणाला "एैसे  क्यों देख रहा है, कुछ ग़लत कहा क्या मैंने". मी उतरलो, निघण्यापूर्वी तुला गुड नाईट करण्यासाठी थांबलो होतो. मी निघतो, तू बैस तुझ्या साहेबाच्या खिश्यात रात्री दहा वाजे पर्यंत
त्याकाळी मेट्रो नव्हती. उत्तम नगरची बस घेण्यासाठी रकाबगंज गुरुद्वारा पर्यंत पायी चालत जावे लागे. १५ मिनिटे लागायचे. चालताना मनात विचार आला पुढील दोन-तीन दिवसांत रायसीना पर्वतापासून ते इंडियागेट पर्यंत पसरलेल्या इमारंती स्थित सर्व बिरादर बंधूपर्यंत ही बातमी पोचणार. येणाऱ्या दिवसांत अनेक अवघड प्रश्नांचे उत्तर द्यावे लागतील. एकदाचा बस स्टँड वर पोहचलो. नेहमीप्रमाणेच बस ही खच्च भरलेली होती. दीड तासाचा प्रवास उभे राहून करावा लागला. प्रवासा दरम्यान डोक्यात चक्कर येऊ लागली आणि डोळ्यांसमोर अंधारी.  कसाबसा बस स्टैंड वर उतरलो आणि रिक्षा घेतली. घराच्या गल्लीच्या कोपऱ्यात रिक्षातून उतरलो. जर रिक्षा घरापर्यंत नेली असता तर  सौ.च्या  प्रश्नांना उत्तर देणे अवघड झाले असते. कारण बस स्टँड पासून मी  नेहमी पायीच घरी येत असे. रात्रीचे दहा वाजले होते. दोन्ही पोरे नुकतीच  झोपली होती. बाबांची  घरी येण्याची वेळ निश्चित नसल्याने माझी वाट पहाणे त्यांनी सोडून दिले होते. हातपाय धुऊन जेवायला बसलो. डोक्यात चक्कर येत असताना ही चेहऱ्यावर ते दिसू दिले नाही. जेवून सरळ बिछान्यावर पडलो. रात्री सौ.ने लाडात येऊन अंगावर हात टाकला. तिचा हात दूर सारून, तिच्याकडे पाठ  केली. पुढे अनेक दिवस ती कोप भवनात होती. शेवटी तिला सत्य सांगावे लागले. बाकी काहीही असो, त्या वर्षी सीआर मात्र सर्वोत्तम मिळाली होती. सुनीलच्या मते,  सर्वोत्तम शब्द लिहिण्यासाठी साहेबांनी शाईच्या जागी रक्त वापरले होते. पुढे अनेक वर्ष ही कथा रायसीना पर्वतावर गाजत वाजत राहिली.



No comments:

Post a Comment