त्रिलोक विजयी बळीराजाने नर्मदा तटावर स्थित महिष्मती नगरीत राजसूय यज्ञ करण्याचे ठरविले. महिष्मती नगरीला कुंभ मेळ्याचे स्वरूप आले होते. देवराज इंद्र सहित सर्व अधीनस्थ राजे-महाराजे यज्ञाला उपस्थित होते. हजारो व्यापारी, कलाकार, ब्राम्हण आणि हजारो प्रजाजन ही तिथे उपस्थित होते. लाखो लोकांसाठी नगरीत राहण्याची, खाण्या पिण्याची आणि मनोरंजनाची सोय करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जंगल तोडले गेले. राजे- महाराजांसाठी आखेटची व्यवस्थाही केली होती. मनोरंजन आणि भोजनासाठी हजारो वन्य प्राण्यांची शिकार सुरू होती. यज्ञात ही मोठ्याप्रमाणात निरीह जनावरांची बळी दिली जात होती.
एक दिवस रात्री शयनकक्षात झोपण्याची तयारी करत असताना राजा बळीला एक आवाज ऐकू आला. महाराज, मला अभय द्या, माझी रक्षा करा. राजा बळीने इकडे-तिकडे बघितले कक्षात कुणीच दिसले नाही. राजा बळी म्हणाला हे अदृश्य आत्मा प्रगट हो, भिऊ नको, तुला अभय आहे. पुन्हा आवाज आला महाराज मी प्रगट आहे. मी वामन आहे. तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही एवढा सुष्म आहे. मी नर्मदेच्या वन्य प्रदेशात जनावरांच्या शरीरात राहणारा. पण तुमच्या सैनिकांनी आणि इथे जमलेल्या अतिथींनी हजारो जनावरांची शिकार केली. आता मला राहायला जागा उरली नाही. मानवी शरीरात मला जागा मिळाली तर मी सुरक्षित राहील. मानवी शरीरात हजारो जिवाणू राहतात. मीही त्यापैकी एक बनून राहील. बळीराजाने तथास्तु म्हटले.
वामनाने महिष्मती नगरात त्यावेळी उपस्थित हजारो लोकांच्या शरीरात प्रवेश केला. काही दिवसांतच राजे- महाराजे सहित हजारो लोक ज्वरग्रस्त झाले. हजारो मृत्यूमुखी पडले. यज्ञ अर्धवट राहिला. लोक आपापल्या देशी परतले त्यांच्या सोबत वामन ही. महिष्मती नगरी ओसाड पडली त्रिलोक विजयी बळीराजाला एका सुष्म वामनाने पराजित केले होते. जीवाच्या भीतीने बळीराजा ही महिष्मती नगरी सोडून दूर दक्षिणेत पाताळात जाऊन लपला.