( हि कथा मैफिल दिवाळी अंकासाठी लिहली होती, तिथे प्रसिद्ध झाल्यानंतर आता ब्लॉग वर)
तब्बल ३५ वर्षांनी दोघ भेटले. केस पांढरे झाले असले तरीही
दोघांनी एका दुसर्याला ओळखले. त्याला तिच्या सोबतची शेवटची भेट आठवली. हो, नेहरू
पार्कच. केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळलेली ती, त्याला खेटून बसलेली होती. मोगऱ्याच्या
वेणीला हुंगण्याचे नाटक करत त्याने पटकन तिच्या गालाचे चुंबन घेतले.
“दूर हो, मला काय समजले आहे, तुझी हक्काची बायको? अजून लग्न नाही झाले आपले”.
‘मग केंव्हा विचारणार तुझ्या वडीलांना, आता तर वर्ष झाले मला नोकरी लागून’.
“अरे, माझे बाबा एका भाड्यावर राहणार्या बाबूशी आपल्या लेकीचे लग्न करायला तैयार होणार नाही”.
‘मग काय आपण असेच राहायचे’?
“माझा एसएससीचा पेपर क्लिअर झाला आहे ना. महिन्याच्या आत अॅपाइंटमेंट लेटर येईलच. मग विचारेल बाबांना, एका स्मार्ट पण अक्कल नसलेला, निर्व्यसनी, कंजूष मुलाशी लग्न करायचे आहे. दोघांच्या पगारात आमचे व्यवस्थित भागेल. माझे बाबा नाही म्हणणार नाही, खात्री आहे मला”.
‘मी कंजूष?’
“मग काय, आपल्या
प्रेयसीला चाणक्य सिनेमा हाल मध्ये ६५ पैश्याचे पहिल्या रोचे तिकीट घेऊन सिनेमा दाखवणार्याला काय म्हणायचे?
एका रुप्पलीचे पॅापकॅार्न आणि एक कप कॉफी दोघांसाठी. काय मजनू आहे माझा. बाय द वे तुझ्या
आई-वडीलांना विचारले का?”
‘दूध देणार्या गायीला, कोण नकार देणार’.
तिने त्याच्या पाठीवर जोरात गुद्दा मारला.
‘आई! ग! किती जोरात मारते’.
“आई! ग, नाही म्हणायचे, बायको ग, म्हणायचे”.
‘म्हणजे लग्न झाल्यावरही तू मारणार’
“हो, पण लाटण्यानी” ....
पुढे ती भेटलीच नाही. नंतर कळले मुंबईत एका सरकारी
कार्यालयात तिने नौकरी जॉईन केली होती. तिचे लग्नही झाले. तो देवदास तर नक्कीच
नव्हता. आईने पसंत केलेल्या मुलीशी त्याने लग्न केले.
---
‘कशी आहे’
“राग तर नाही ना माझ्यावर! माझ्या वडीलांना आपले प्रकरण
माहित झाले होते. मला तुझ्या पासून दूर नेण्यासाठी बाबांनी खेळी केली. आईने शपथ
घातली. तूही तिथे नव्हता. नाइलाजाने वडीलांची इच्छा पूर्ण केली”.
‘काय करतात तुझे मिष्टर’.
“ते हयात नाही. एका प्राईवेट कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. चांगला पगार होता पण त्याच सोबत दारू व जुगाराचे व्यसनही होते. नशेत सैतान संचारायचा त्यांच्या अंगात. सर्व राग माझ्यावर काढायचे. व्यसनांमुळे लग्नाच्या काही वर्षांतच ते वर गेले. माझ्याच पगारावर कसेबसे घर चालविले. मुलगा इन्जीनियर झाला. तोही बापाच्या वळणावर गेला. त्यालाही दारूचे व्यसन आहे. त्याने प्रेम विवाह केला, सूनही पिणारी. वेगळे राहतात दोघ. व्यवस्थित चाललेय आहे, त्यांचे.... बहुतेक निवृत्तिनंतर मला वृद्धाश्रम शोधावे लागणार. नशीब एकेकाचे. तुझे काय”.
तुझे लग्न झाले हे कळल्यावर खरं तर मला राग आला होता. पण आईने समजावले, आयुष्य हे असेच असते. आईने पसंत केलेल्या मुलीशी लग्न केले. अचानक त्याला काही आठवले, हं, लग्ना आधी एकदा भेटलो होतो आम्ही, सीपी मध्ये. ओडीयन मध्ये बाल्कनीचे तिकीट घेऊन सिनेमा पाहिला , “मैने प्यार किया” तो उगाच हसला.
“अरे वा! भाग्यशाली आहे ती, प्रेयसीसाठी ६५ पैशांचे तिकीट आणि बायकोसाठी बाल्कनी” बोलताना तिने जीभ चावली”.
‘हो! पण त्या नंतर गेल्या ३५ वर्षांत आम्ही सिनेमा पाहिला नाही कि कधी हॉटेलिंग केल नाही’. एकाच्या पगारात दिल्ली सारख्या शहरात गुजराण करणे मुश्कीलच. शिवाय पोरांचा शिक्षणाचा खर्चही भरपूर. आता सर्व ठीक आहे. घरही आहे स्वत:चे. लेकीचे, लग्न झाले आहे, जावयाला कसलंही व्यसन नाही. आजच्या काळात हीच जमेची बाजू म्हणावी लागेल. मुलाचे शिक्षणही पूर्ण झाले आहे. त्यालाही नौकरी लागली आहे. अजून तरी कुठल्याही पोरीने त्याला घास टाकलेली नाही. बघू काही काळ. मग आई आहेच सून शोधण्यासाठी.....काही क्षण शांतता. ‘तुझा मोबाईल नंबर देते का?’
“नको रे, उगाच त्रास होईल, तुला”.
तो काही बोलला नाही, त्याचे लक्ष रस्त्यावर मोगऱ्या फुलांच्या वेण्या विकणार्या दुकानदाराकडे गेले, मनात विचार आला. तिच्या पांढर्या केसांवरही मोगऱ्याची वेणी शोभून दिसेल. तो थांबला, त्याने तिला विचारले
‘वेणी घ्यायची का’?
“हो, घे ना! तुझ्या बायकोसाठी. मलाही आवडते, मोगऱ्याची वेणी....
त्याने दोन वेण्या घेतल्या. एक तिच्या हातात देत विचारले, ‘एकदा बघायचे आहे, वेणी केसांत माळलेली तू, कशी दिसते’.
वेणी हातात घेत, ती म्हणाली “तुला
विसरण्याचा प्रयत्न केला पण विसरू शकली नाही. हे गेल्यावर तर सारखी तुझीच आठवण
यायची. कधी-कधी वाटायचे, कदाचित अजूनही तू माझी वाट पहात असेल तर कधी वाटायचे तुझाही
संसार असेल. तुला विसरलेच पाहिजे. मनाला समजविण्याचा खूप प्रयत्न केला. तुझी आठवण
अनावर झाली कि बाजारात जाऊन मोगऱ्या फुलांची वेणी विकत घेते, खोलीचे दार बंद करून
वेणी केसांत माळून आरश्या समोर उभी राहून रडते... आजही रडणारच”. काही क्षण दोघ
काहीच बोलले नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली, “प्लीज, मला
भेटण्याचा पुन्हा प्रयत्न करू नको, वादळ उठेल, भावनांचा बंध फुटेल... तुझा संसार उध्वस्त होईल”. बोलता-बोलता ती विरुद्ध दिशेला वळली आणि झप-झप पाउले टाकत
चालू लागली. एका क्षणासाठीही तिने मागे वळून पाहिले नाही. काही क्षण तो स्तब्ध..
जडवत तिथेच उभा राहला. तिला हाक मारायची तीव्र इच्छा झाली पण...
काही वेळाने त्याचे लक्ष हातातल्या मोगऱ्याच्या वेणी कडे गेले. त्याने उभ्या आयुष्यात बायकोसाठी मोगऱ्या फुलांची वेणी घेतलीच नव्हती आणि आज... त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. लग्ना पूर्वी त्याच्या बायकोनेही राजा-राणीच्या सप्त रंगी संसाराचे चित्र पाहिले असेल. पण प्रत्यक्षात दिसली, नवर्याच्या अपुर्या पगारात घर चालवण्याची तिची धडपड. संसार फुलण्यासाठी तिने स्वत:च्या सर्व इच्छा मारून टाकल्या. कधी काहीही मागीतले नाही किंवा हट्ट केला नाही. त्याला आठवले, कित्येकदा त्याचा आणि पोरांचा डब्बा भरल्यावर भाजी शिल्लक राहायची नाही. कधी विचारले ‘अग! तुझ्यासाठी भाजी उरली नाही’. ‘मी माझे बघून घेईल’, हेच नेहमीचे उत्तर. बहुतेक लोणच्या सोबत किंवा पोळीला तेल तिखट मीठ लाउन भूक भागवायची. तिनेही त्याच्यावर शरीर व मनानी प्रेम केले आहे, बदल्यात त्याने काय दिले??? कधी मनाने प्रेम केलं का तिच्या वर? त्याने निश्चय केला, आता सर्व विसरून पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करायला हवी. घरी गेल्यावर त्याने आपल्या हाताने बायकोच्या पांढर्या शुभ्र केसांत मोगऱ्या फुलांची वेणी माळली....
खूप सुंदर कथा!
ReplyDelete👌
Delete