Saturday, December 15, 2018

छत्रपती आणि ब्राह्मण: श्री. सुनील चिंचोळकर यांचा लेख

(आज समाजात जातीभेद पसरविण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. तो दूर रकरण्यासाठी या लेखाचा प्रसार करणे मला आवश्यक वाटले.)

छत्रपतींच्या जीवनात ब्राह्मणांचे कोणते स्थान होते’,

 हे जर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पाहिले, तर ‘छत्रपतींच्या नावाचा वापर करून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद वाढवणे’, ही ‘महाराजांची क्रूर थट्टा आहे’, ही गोष्ट लक्षात येईल ! या सूत्राच्या पुष्ठ्यर्थ ‘अखिल भारतीय मराठा विकास परिषदे’ने प्रकाशित केलेल्या ‘समाज जागृती पुस्तिके’तील निवडक लिखाण पुढे दिले आहे. कधी नव्हे एवढी आज हिंदुऐक्याची आवश्यकता निर्माण झाली असतांना हिंदु जातीजातींत विभागणे उचित ठरणार नाही, यासाठी लेख प्रसिद्ध करत आहोत.

१. छत्रपतींच्या गुणांचे त्यांच्या हयातीत वर्णन करणारे पहिले तीन कवी ब्राह्मणच !

अ. ‘छत्रपती शिवाजी महाराज हयात असतांना त्यांच्या गुणांचे मुक्तकंठाने गायन करणारे पहिले कवी समर्थ रामदासस्वामी हे ब्राह्मण होते. त्यांनी त्या वेळी केलेले हे वर्णन पहा –

‘यशवंत, कीर्तीवंत । सामर्थ्यवंत, वरदवंत ।
पुण्यवंत आणि जयवंत । जाणता राजा ॥
आचारशील, विचारशील । दानशील, धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळाठायी ॥
या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हाकारणे ॥

भारतभर भ्रमण करणार्‍या समर्थ रामदासस्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर माणूस भेटला नाही, ही नोंद महत्त्वाची आहे. छत्रपतींच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांना पत्र लिहितांना समर्थांनी ‘शिवरायाचे आठवावे रूप । शिवरायाचा आठवावा प्रताप’, हाच उपदेश केला.

आ. छत्रपतींच्या हयातीत त्यांच्या गुणांचे वर्णन करणारे कवी भूषण हे ब्राह्मण होते.

इ. छत्रपतींच्या सांगण्यावरून संस्कृत भाषेत ‘शिवभारत’ नावाचे शिवचरित्र लिहिणारे कवी परमानंद नेवासकर, हे ब्राह्मण होते.

याचा अर्थ महाराजांच्या हयातीत त्यांचे चरित्र लिहिणारे अन् थोरवी गाणारे महत्त्वाचे तीनही कवी ब्राह्मण होते.

१ अ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी जाज्वल्य एकनिष्ठा असलेले ब्राह्मण !

१. छत्रपती शिवाजी महाराज आगर्‍याहून सुटल्यावर डबीर आणि कोरडे या महाराजांच्या दोन निष्ठावान सेवकांना औरंगजेबाच्या सैनिकांनी अटक केली. वस्तूतः या दोघांनीच संभाजी महाराजांना मथुरेस लपकवून ठेवले होते; पण त्यांनी ही गोष्ट शेवटपर्यंत औरंगजेबाला सांगितली नाही. उलट सुमारे दोन मास औरंगजेबाच्या कारागृहात ते रोज चाबकांचे फटके सहन करत राहिले.

२. ब्राह्मण माणसे विश्वासू आणि एकनिष्ठ असू शकतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले ठाऊक होते. सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेले जानंभट अभ्यंकर आणि दादंभट अभ्यंकर यांनी मरेपर्यंत सिंधुदुर्ग किल्ला सोडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने सिंधुदुर्ग किल्ला जिंकून घेतला, त्या वेळी हे दोघे भाऊ किल्ल्यात मारले गेले. ‘आम्ही सिंधुदुर्ग सोडून कुठेही जाणार नाही’, हा छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेला शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळला.

१ आ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील संवेदनशील आणि अतीमहत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार ब्राह्मणच !

१. छत्रपती शिवाजी महाराजांना कोंडाणा किल्ला घेऊन देणारे बापूजी देशपांडे ब्राह्मण होते.
२. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना फत्तेखानाबरोबर लढतांना सर्वांत महत्त्वाचे साहाय्य करणारे किल्लेदार नीळकंठ सरनाईक हे ब्राह्मण होते.
३. महाराजांच्या हेरखात्याचे पहिले हेरप्रमुख नानाजी देशपांडे ब्राह्मण होते. पुढे ही जागा बहिर्जी नाईक यांनी घेतली.
४. त्र्यंबकेश्वराचे वेदमूर्ती ढेरगेशास्त्री महाराजांच्या कल्याणासाठी भगवान शंकराजवळ अनुष्ठान करीत असत.
५. लालमहालातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाप्याप्रसंगी जी साहसी मोहीम आखली होती, त्याचे प्रमुख चिमाजी देशपांडे ब्राह्मण होते.
६. चिमाजीचे वडील लाल महालात जिजाऊबाईंकडे अनेक वर्षे चाकरीला होते; त्यामुळे त्यांना लाल महालाचे बारीकसारीक ज्ञान होते; म्हणून या मोहिमेची सूत्रे त्यांच्या हाती होती.
७. अफझलखानाला भेटण्यासाठी जातांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गाईची आणि ब्राह्मणाची पूजा केल्याची ऐतिहासिक नोंद आहे. ही पूजा सांगणारे प्रभाकर भट्ट हे महाराजांचे राजोपाध्ये होते.’

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राह्मणांविषयीचा नितांत आदरभाव आणि स्पष्टवक्तेपणा !

१. ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी मशिदींना अग्रहार (इनाम) दिल्याची ४-५ पत्रे उपलब्ध आहेत. केवळ या पत्रांच्या आधारावर महाराजांना सर्वधर्मसमभावी ठरवण्याची घाई केली जाते; मग ब्राह्मणांना अग्रहार दिल्याविषयीची ८२ पत्रे उपलब्ध आहेत, त्या आधारे अशाच प्रकारचा निष्कर्ष का काढू नये ?

२. ८.९.१६७१ या दिवशी तुकाराम सुभेदार यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘बापूजी नलवडा याणे कल्हावतीकरून तरवारेचा हात टाकीला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिल्हा. हे वर्तमान होऊन गेले. मर्हाटा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली. याचा नतीजा तो पावला.’ या पत्रात छत्रपतींचा ब्राह्मणांविषयीचा आदर तर दिसतोच, पण त्याचबरोबर महाराजांच्या सरदारांना महाराजांचा हा स्वभाव माहीत असल्यामुळे कसा धाक होता, हे नलवडे प्रकरणावरून कळते. प्रभावळीतील बापूजी नलवडे नामक मराठा सरदाराने एका ब्राह्मणावर तलवारीने वार केला, पण नंतर त्याला ही भीती वाटली की, ‘महाराजांना ही गोष्ट कळल्यावर महाराज आपल्यास कठोर शिक्षा करतील.’ या भीतीने त्याने स्वतःच्या पोटात सुरी खूपसून आत्महत्या केली. राज्यकर्त्यांचा असा धाक प्रजाजनांवर असला पाहिजे.

३. सुमारे ८-१० पत्रांमध्ये, ‘एखादा विशिष्ट नियम पाळावा’, म्हणून महाराजांनी गाईची आणि ब्राह्मणांची शपथ घ्यायला लावल्याचा उल्लेख आहे.

४. अनेक पत्रांमध्ये ब्राह्मण-भोजनाचे प्रावधान (तरतूद) असून ‘हा सर्व पैसा धार्मिक खात्याकर व्यय (खर्ची) करावा आणि याविषयी कुठलीही काटकसर करू नये’, अशी कडक सूचना महाराज देतात (सन १६४८). यावरून त्यांची ब्राह्मणांसंबंधांची भूमिका स्पष्ट होते.

५. अनेक ब्राह्मणांना भूमी अग्रहार देतांना महाराजांनी त्यांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे, उदा. ३ ऑगस्ट १६७४ला मुरारी त्रिमल विभूते यांना छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘स्वामी सिव्हासनी बैसता समयी तुम्ही स्वामीसनीध बहुत खस्त मेहनत केली. थोर पराक्रम करून स्वामीचे नवाजीस उतरला. तुमचे स्वामीकार्य जाणून तुम्हावर मेहेरबान होऊन सर्फराजीविषयी हे इनाम.’

६. ‘छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्यात यश यावे’, म्हणून जिजाऊबाई अनेक ब्राह्मणांकडून अनुष्ठान करून घेत, असा स्पष्ट उल्लेख १८ फेब्रुवारी १६५३ ला वेदमूर्ती गोपाळ भट यांना लिहिलेल्या पत्रात आहे. महाराज लिहितात, ‘वेदमूर्ती प्रभाकर भट यांच्या विद्यमाने स्वामी पासून मंत्र उपदेश संपादिला. स्वामीस आपण आपले आभ्योदयार्थ सूर्यप्रित्यर्थ अनुष्ठान सांगितले.’

२. छत्रपती ब्राह्मणांच्या आहारी गेले नव्हते !

ब्राह्मण कारभार्‍याच्या हातून चूक झाली त्याविषयी १९ जानेकारी १६७५ ला लिहिलेल्या पत्रात महाराजांनी ब्राह्मण कारभार्‍याची हजेरीदेखील घेतली आहे. महाराज लिहितात, ‘ऐशा चाकरास ठिकेठीक केले पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ? याउपरी बोभाटा आलीया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही.’ याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मण जातीविषयी आदर असला, तरी ते ब्राह्मणांच्या आहारी गेले नव्हते; पण त्याचसमवेत अशा १-२ पत्रांचे भांडवल करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे लपून ब्राह्मणद्वेष वाढवण्याचीही आकश्यकता नाही. ‘ब्राह्मणांना नष्ट करणे, हे ज्यांचे जीवनव्रत आहे’, त्यांनी अवश्य ब्राह्मणद्वेष करावा; मात्र असे करतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून त्या थोर महात्म्यास कलंकित करू नये.

३. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रितपालक’ म्हणवून घेताना संकोच वाटत नाही, तिथे त्यांच्या अनुयायांनी ‘गोब्राह्मण’ शब्दावरून कांगावा का करावा ?

छत्रपतींची सुमारे २०० पत्रे उपलब्ध आहेत. २०० पैकी सुमारे १०० पत्रे त्यांनी वेगवेगळ्या ब्राह्मणांना काहीतरी दान केल्याविषयी किंवा अग्रहार दिल्याविषयी आहेत. माणसाचे अंतःकरण जाणून घेण्यासाठी पत्र हे अतिशय मौलिक साधन आहे. ऐतिहासिक घटनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना जवळ केले. त्यांचा हा कल आपल्याला त्यांच्या पत्रां मध्ये देखील पहायला मिळतो. महाराजांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हटले की, काही लोकांचे डोके फिरते. परंतु इ.स. १६४७ या वर्षी मोरेश्वर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात, ‘ब्राह्मण अतिथ अभ्यागतास पावते. महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती. गाईचा प्रतिपाल केलीया बहुत पुण्य आहे.’ जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःला ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणवून घेताना संकोच वाटत नाही, तिथे त्यांच्या अनुयायांनी गोब्राह्मण शब्दावरून कांगावा का करावा, ते कळत नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, ‘‘महाराजांचा उल्लेख कोणी कोणी ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणून करतात. मला या उपाधीचे आकर्षण वाटते. भूमीला समृद्धीचा कर देणारे गोधन, तसेच आपल्या तपोबलाने आणि अध्ययनाने समाजाची उंची वाढवणारा ब्रह्मवेत्ता महाराजांना रक्षणीय वाटला, यात काहीच अप्रस्तूत नाही; पण शब्दांची ओढाताण केली जाते. अर्थाचा विपर्यास केला जातो. आजकाल मान्यता पावलेली ‘दुधाचा महापूर’ ही कल्पना आणि अवघडात अवघड परीक्षा घेऊन केली जाणारी अधिकार्‍यांची निवड, या प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात गोब्राह्मणप्रतिपालनाचे स्मरण घडवणार्‍याच नाहीत का ? एकविसाव्या शतकात ब्राह्मण हा शब्द विद्वत्ता, बुद्धीमत्ता, विज्ञाननिष्ठा आणि स्वतंत्रप्रज्ञा यांचा वाचक ठरला, तर किती बरे होईल !’’

४. छत्रपती शिवाजी महाराजांना साहाय्य करणारे ब्राह्मण आणि विरोधक असलेले मराठे !

अ. शिवचरित्रात शिवछत्रपतींच्या भोवताली जी महत्त्वाची प्रभावळ आहे, त्यात कितीतरी मंडळी ब्राह्मण होती.
आ. बंगळुरूहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहाय्यासाठी शहाजी महाराजांनी पाठवलेले दादोजी कोंडदेव हे अत्यंत विश्वासू कारभारी ब्राह्मण होते.
इ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्री मंडळातील आठपैकी सात मंत्री ब्राह्मण होते.
ई. डबीर, कोरडे, अत्रे आणि बोकीलकाका हे महाराजांचे सगळे वकील ब्राह्मण होते.
उ. अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ब्राह्मण होता, म्हणून आरडाओरड केली जाते; परंतु अफझलखानाचा वकील ब्राह्मण होता, तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील गोपीनाथपंत बोकील हा सुद्धा ब्राह्मण होता.
ऊ. औरंगजेबाच्या छावणीत सहस्रो मराठे सरदार होते’, याविषयी मौन पाळले जाते.
ए. प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे अडतीस नातेवाईक अफझलखानाच्या छावणीत खानाला साहाय्य करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला अफझलखान आला, त्या वेळी त्याच्या निवडक दहा देहरक्षकांमध्ये मंबाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे काका, तर पिलाजी मोहिते आणि शंकरजी मोहिते हे महाराजांचे दोन चुलत सासरे होते.’

– श्री. सुनील चिंचोळकर
(संदर्भ : अखिल भारतीय मराठा विकास परिषदेने प्रकाशित केलेली, ‘समाज जागृती पुस्तिका’)

No comments:

Post a Comment